भीती कशी दूर करावी? भिती वाटणे उपाय
भीती कशी दूर करावी
आज प्रत्येकाच्याच मनात कसली ना कसली तरी भीती ही असतेच…. उदाहरणार्थ, एखाद्याला जवळची वस्तू अथवा माणूस गमावण्याची भीती, एका विद्यार्थ्याच्या मनात आपण पास होऊ का ही भीती, पालकांच्या मनात मुलांच्या भवितव्याची भीती, मरणाची भीती वाटणे, अंधाराची भीती, जवळची व्यक्ती दूरवण्याची भीती आणि कोरोणा सारख्या आजाराची भीती.. नाना प्रकारच्या भीती आपल्या मनात चलबिचल करत असतात आणि ती भीती कशी दूर करावी हा सर्वांपुढे प्रश्न उभा होतो. मुळात भीती ही एक कल्पना असते जी वास्तविक गोष्टींना भीतीदायक बनवते.
जगण्याचीही भिती वाटते,
मरण्याचीही भिती वाटते,
पांढरपेशी मनास माझ्या,
कसलीही पण भिती वाटते…
डोळ्यांदेखत विरून गेल्या
धुक्यासारख्या इच्छा सा-या
नवइच्छांना जन्म द्यावया
खरे सांगते .. भिती वाटते…
कविता क्षीरसागर यांनी लिहिलेल्या कवितेत किती सत्यता आहे ना..?
बहुतेक वेळा-प्रसंगानुरूप आपल्या मनात भीती तयार होणे किंवा भीती वाटणे हे सामान्य आहे. भीती ही फक्त माणसांनाच वाटते का? तर नाही. फटाक्यांच्या भीतीने कितीतरी प्राणी गाड्यांखाली लपतात, पक्षी मोठा आवाज झाला की घाबरून उडून जातात. अर्थात काहीवेळा भीती वाटणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु एखादा भयानक चित्रपट पाहून काही वेळासाठी घाबरणे हा वेगळा प्रकार पण काही गोष्टीची भीती मनात ठेवून आयुष्य व्यतीत करणे हा वेगळा प्रकार.
तर जाणून घेऊयात जवळपास सर्वांच्याच मानगुटीवर बसलेली ही भीती कशी दूर करावी?
#भीतीला सामोरे जाणे
भीतीला सामोरे जा (भीती वाटणे)
सर्वात आधी तर आपल्या मनात घर करून बसलेल्या भीतीला आपण सामोरे जायला शिकायला हवे. कारण भीती दूर करण्यासाठीची ही पहिली पायरी आहे. सुरुवातीची ही पायरी तुम्हाला कठीण वाटेल परंतु ती तेवढीच आवश्यक आहे हे विसरू नका. ती भीती कोणत्याही प्रकारची असली तरी तिला सामोरे जा. जोपर्यंत तुम्ही त्या भीतीला पूर्णपणे तोंड देत नाही तोपर्यंत प्रयत्न करत रहा. त्याबद्दल कागदावर लिहून काढा. कारण या गोष्टींचा विचार करत असताना आपल्या मनात त्या विचारांचा गुंता होण्याची शक्यता असते. आपलं डोक आणि मन शांत करून मग आपल्याला अमुक गोष्टीची भीती का वाटते याचा विचार करा.
डोक शांत करण्यासाठी तुम्ही चहा अथवा कॉफीचा आसरा सुध्दा घेऊ शकता. तुमच्या भीती बद्दल विचार करताना सर्वात आधी स्वतःला हे समजववा की तुम्ही या भीतीला पूर्णपणे तोंड देऊ शकता. आपल्या सर्वानाच या गोष्टीची पुरेपूर कल्पना असते की, आपल्या मनात सुप्त असणारी भीती ही बहुतेक वेळा अनाठायी असते. म्हणूनच आपण या भीतीवर मात करू शकतो हा विश्वास तुम्ही स्वतःला देणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही तुमच्या भीती बद्दल अधिक जाणून घेतलात की मग त्यावर कोणते उपाय करावे याविषयी तुम्हाला एक कल्पना मिळते.
#आवडणार्या गोष्टी करा
भीती वाटल्यावर आवडणार्या गोष्टी करा
भीती वाटणे ही गोष्ट दूर करण्यासाठी उपयोगी पडणारा एक सोपा उपाय म्हणजे योगासने. याने तुमचे मन शांत राहण्यास मदत मिळेल. अगदी काही मिनिटांसाठी योगासने करणे उपयुक्त ठरू शकते. याशिवाय तुम्ही एखादे चांगले पुस्तक वाचू शकता, नवीन भाषा अथवा कला शिकून घेऊ शकता. इंटरनेटवर उपलब्ध असणारे चांगले विडिओ व आवडते गाणी ऐकू शकता. अजून एक उपाय म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या करा. काहींना कलेची आवड असते तर काहीना स्वयंपाक करण्याची.. तुमची आवड ही कोणतीही असो पण त्याने तुमचे चित्त स्थिर राहणे आवश्यक आहे.
#तुमच्या भीतीबद्दल जवळच्या व्यक्तींशी बोला
भीती कशी दूर करावी
तुमच्या भीती बद्दल तुमच्या जवळच्या माणसांना सांगा. त्यांची मदत घ्या. यात कोणत्याही प्रकारचा कमीपणा नाही. प्रत्येक व्यक्तीला कसली ना कसली तरी भीती ही असतेच त्यामुळे या गोष्टीचा विचार करू नका की कोणी हसेल अर्थात तुमच्या भीती विषयी बोलताना लाजू नका. तुमच्या या सततच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला या गोष्टी बद्दल खात्री मिळेल की बहुतेक वेळा तुमच्या मनातील भीती ही एक वाईट कल्पनेचे रूप असते. तुम्ही जेवढे सकारात्मक बनाल तेवढीच ती अनाठायी भीती कमजोर होईल.
तुम्हाला ती भीती का वाटते आणि ती भीती कशी दूर करावी याचा विचार करा. आपण लहान असताना अशी कोणती घटना घडली होती का ज्याने आपल्याला अमुक गोष्टीची भीती वाटते हा प्रश्न विचारा. जमल्यास तुमच्या पालकांसोबत याविषयी चर्चा करा. कारण भीतीच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे.
#सकारात्मक दृष्टीकोण ठेवा
सकारात्मक रहा
तस पाहायला गेलो तर आपल्या मनातील भीतीकडे दुर्लक्ष करणे आणि आपल मन दुसर्या एखाद्या सकारात्मक गोष्टीकडे गुंतवणे हे अगदी सोपे आहे. पण मुद्दा हा आहे की आपण कधी असा प्रयत्न देखील करत नाही. फक्त एकदा तरी अशी कल्पना करा की भविष्यात तुम्ही तुमचे आयुष्य या अमुक भीती शिवाय घालवत आहात. यामुळे तुम्हाला एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी मदत मिळेल. आपल्या भीतीवर मात करणे ही एक आनंद आणि प्रगतीची चावी आहे. तसेच निसर्गाच्या सान्निध्यात राहा कारण याने आपल्या शरीर आणि मन दोघांना एका प्रकाराची सकारात्मक ऊर्जा मिळते. तुम्ही तुमच्या प्रिय जणांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. या गोष्टी केल्यामुळे तुमचे मन हे दुसर्या चांगल्या विचारात गुंतून राहिल.
#आहारकडे दुर्लक्ष करू नका
वेळेवर आहार घ्या
कदाचित तुम्हाला ही बाब माहित नसेल की तुमच्या आहाराचा तुमच्या विचारांवर प्रभाव पडत असतो. त्यामुळे तुमच्या आहाराकडे सुध्दा लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी महागड्या डायट प्लॅनची गरज नाही. फक्त जे खाता ते योग्य वेळेवर आणि प्रमाणात खा, यामुळे तुमच्या शरीरात देखील चांगले बदल घडून येताना तुम्हाला जाणवतील. त्याचप्रमाणे सकारात्मक विचार करण्यास शिका. आपण नकारात्मक गोष्टींचा एवढा विचार करतो की सकारात्मक बाबींकडे दुर्लक्ष करतो.
#भीती कशी दूर करावी यासाठी नेहमी प्रयत्न करत रहा
भीती कशी दूर करावी
तस पाहायला गेलो तर प्रत्येक गोष्टीमागे एखादे कारण असते. मग यात तुमच्या मनातील भीतीचा सुध्दा समावेश आहे. कारण तुम्ही जेव्हा भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करता तेव्हा एका प्रकारे तुम्ही नवीन काहीतरी शिकता. तुमच्या भीती वाटण्या बद्दल जर तुम्ही सोशल मिडियावर लिहाल तर तुम्हाला समजेल की तुमच्यासारखे कितीतरी जण भीती दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. याने तुम्हाला एक प्रकारे प्रेरणा मिळू शकते. तसेच तुम्ही अशा व्यक्तींना संपर्क करा, ज्यांना तुमच्या सारख्याच भीती होत्या परंतु आता ते त्या भीतीच्या विळख्यातून सुटले आहेत. यासाठी सध्या काही अॅप्स सुध्दा उपलब्ध आहेत तसेच भीती कशी दूर करावी यासाठी गूगल वर सुद्धा खूप काही मिळेल ज्याने तुम्हाला तुमची भीती दूर करण्यासाठी मदत मिळेल.
काही प्रसंगामध्ये एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते. जगातील बहुतांश लोकांना किड्यांची, सापांची, उंचीवर जाण्याची भीती वाटणे तसेच एखाद्या मानसिक ताण-तणावाची सुद्धा भीती असते . आता तुम्ही बोलाल की गोष्ट तर सामान्य आहे. परंतु काही वेळा अशा बारीक-बारीक भीतीच मोठ्या होतात आणि त्यांच रूपांतर फोबीया मध्ये होतं. तुमच्या मनातील भीती ही फोबीया मध्ये बदलायच्या आधीच त्यावर नियंत्रण मिळवणे हे नितांत गरजेचे आहे. कारण काही फोबीया हे तुमच्यासाठी आणि इतरांसाठी घातक ठरू शकतात. यासाठी तुम्ही फोबीया नामक भारतीय चित्रपट पाहू शकता, याने तुम्हाला हे समजेल की काही वेळा फोबीयामुळे आपल्या दैनंदिन जीवनात कसा फरक पडतो. आंतरजालावर तुम्हाला या विषयासंबंधी कित्येक चित्रपट आणि पुस्तके मिळतील जी उपयुक्त ठरू शकतात.
जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फोबीया असेल तर घरगुती उपायांकडे कल देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा. योग्य आणि खात्रीदायक अशा मानसशास्त्र वैद्याची मदत घ्यावी. तुम्ही संमोहन शास्त्राची सुध्दा यात मदत घेऊ शकता.
तसेच कोरोणा सारख्या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा स्वतःची आणि आप्त जणांची काळजी घ्या. उगाच तुमच्या मनाला भीतीचे माहेरघर बनू देऊ नका.
शेवटी तुम्हाला कोणत्याही बाबीबद्दल भीती वाटत असली तरी एक गोष्ट आयुष्यात कायम लक्षात ठेवा की त्या भीतीवर कोणत्या प्रकारे तसेच कसे नियंत्रण कसे मिळवायचे आणि तुमची भीती कशी दूर करावी हे तुमच्यावरच अवलंबून आहे. निव्वळ एका भीतीपोटी तुमचे आयुष्य खराब करू नका. तुमच्या मनावर विश्वास ठेवा आणि तुमचे मन तुम्हाला जी दिशा दाखवेल त्यावर चालण्यासाठी सज्ज व्हा. त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा.