प्रॉपर्टी जमीन रिअल इस्टेट मालमत्ता खरेदी

मी एका ठिकाणी प्लॉट विकत घेऊ इच्छितो, तर मला प्लॉट विकत घेताना काय काळजी घेतली पाहिजे?

3 उत्तरे
3 answers

मी एका ठिकाणी प्लॉट विकत घेऊ इच्छितो, तर मला प्लॉट विकत घेताना काय काळजी घेतली पाहिजे?

6
नवीन प्लॉट खरेदी करताना प्लॉटच्या खालील गोष्टी तपासून घ्या.
  1. एन ए ऑर्डर: हा कागद प्लॉट एन ए असल्याचा पुरावा असतो
  2. सर्वे नंबर उतारे: प्रत्येक प्लॉटला सर्वे नंबर व गट नंबर असतात. जे सिटी सर्वे म्हणूनही ओळखले जातात. प्लॉटचे हे उतारे तपासून घ्या, आणि तो सर्वे नंबर विकणाऱ्याचा नावावर असल्याची खात्री करा.
  3. उताऱ्यांवर बँकेचा बोजा नसल्याचे तपासून घ्या, जर बोजा असेल तर अशा विक्रीवर नंतर बंदी लागू शकते व तुम्ही अडकून बसाल.
  4. प्लॉटचे जुने खरेदी खत: जर प्लॉटची मालकी एकाहून जास्त वेळेस बदलली असेल तर जुने खरेदीखत तपासून घ्या.
  5. ७/१२: जर शेती प्लॉट असेल तर त्याची एन ए ऑर्डर नसते, अशा वेळेस त्याचा ७/१२ उतारा काढून घ्यावा. या उताऱ्यावर कर्जाचा बोजा नसल्याची खात्री करा.
  6. वरील सर्व उताऱ्यांवर विकणाऱ्याचे नाव तपासून घ्या, बऱ्याचदा लोक तिसऱ्याचेच प्लॉट परस्पर विकतात.
उत्तर लिहिले · 31/12/2020
कर्म · 283280
1
•प्लॉट खरेदी करताना घ्यावयाची काळजी


सर्वप्रथम खरेदी करावयाचा प्लॉट (भूखंड) मालकी हक्क (Free Hold) आहे, की भाडे तत्त्वावर (Lease Hold) आहे, यांची खात्री करून घ्यावी. सर्व साधारणपणे नोंदणीकृत सहकारी संस्थेमधील भूखंड भाडे तत्त्वावरील असतात व त्यामुळे या प्रकराचा प्लॉट (भूखंड) खरेदी घेताना सहकारी संस्थेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते. प्लॉट (भूखंड) सेकंड सेलचा असल्यास सभासदाला भाडेकरार सहकारी संस्थेकडे सोपवून (Surrender)त्यानंतर संस्थेच्या परवानगीने नवीन सभासदाच्या नावे नवीन भाडेकरार नोंदवावा लागतो. अन्यथा हा विक्री व्यवहार बेकायदा ठरू शकतो.

प्लॉट खरेदी करताना मूळ जमीन मालकाचा ७/१२ अथवा सिटी सर्व्हेचा उतारा तपासणे आवश्यक असते. कारण ७/१२ अथवा सिटी सर्व्हेचा उतारा हा जमीन मिळकतीचा आरसा असतो. त्यामध्ये जमीन मिळकतीच्याबाबत सर्व नोंदी असतात. गावच्या नमुना नं ६ मधील मागील ३० वर्षांच्या नोंदी तपासून पाहणे आवश्यक आहे. सर्व फेरफारीच्या नोंदी तपासल्यानंतर खरेदी देणाऱ्या विद्यमान मालकाचा मालकी हक्क कायम आहे की नाही हे कळते. ७/१२ अथवा सिटी सर्व्हेच्या उताऱ्यामध्ये कूळ म्हणून कोणाचे नाव आहे का? हे पाहवे व असल्यास कुळाच्या हक्काबाबतची माहिती तपासावी. ७/१२ अथवा सिटी सर्व्हेच्या उताऱ्यावर इतर हक्कांत सहकारी बँका, पतपेढ्या, सोसायट्या, सरकारी तगाई असलेल्या नोंदींची तपासणी करावी. ते फिटल आहेत का हे पाहावे. ७/१२ अथवा सिटी सर्व्हे उताऱ्यामध्ये जमीन वहिवाट करणाऱ्याचे अथवा कसणाऱ्याचे नाव दर्शविलेले असते. त्यामुळे त्या जमिनीमध्ये खरेदी देणाऱ्या इसमांची वहिवाट आहे का? हे तपासून पाहावे. प्लॉट मिळकत खरेदी करताना जमिनीवर असणारे कर्जाचे बोजे फिटले असल्याचे दाखले घ्यावेत. ७/१२ अथवा सिटी सर्व्हे सदरील इतर हक्कात कोणाची नावे समाविष्ट असल्यास त्या व्यक्तीची संमती प्लॉटच्या खरेदी खताच्यावेळी संमती घेणे आवश्यक आहे. प्लॉट मिळकतीवर कोणत्याही सार्वजनिक कामाकरिता संपादन (Reservation) असल्यास त्याबाबत संबंधित 'नगर रचनाकार' जिल्हाधिकारी, कार्यालय भूमी संपादन शाखेकडून त्याबाबतची माहिती करून घ्यावी. ७/१२ च्या उताऱ्यावर 'नवीन शर्त' असा शेरा असल्यास जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय अशी प्लॉट मिळकत घेता येणार नाही. ७/१२ च्या उताऱ्यावर 'कूळ कायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र' असा शेरा असल्यास अशी प्लॉट मिळकत जिल्हाधिकारी यांच्या परवानगी शिवाय विकत घेऊ नये. तसेच ७/१२ च्या उताऱ्यावर इतर अधिकारात '८४ (क)स पात्र' असा शेरा असल्यास अशी प्लॉट मिळकत ही सरकार जमा होऊ शकते. प्लॉट मिळकतीबाबत जमीन मालकाने सर्व कर, पट्ट्या चालू तारखेपर्यंत भरल्या आहेत, यांची खात्री करावी. तसेच प्लॉट मिळकतीबाबात जमीन मालकांनी कोणाशीही लेखी अथवा तोंडी करार झाला आहे का? अथवा या मिळकतीवर कोणाही व्यक्तीचा संस्थेचा हितसंबंध आहे का? याबाबत स्थानिक लोकांकडे चौकशी करावी. मराठी व इंग्रजी स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर नोटीस द्यावी व हरकती मागवाव्यात. प्लॉट खरेदी करताना प्लॉटच्या चारही दिशांना म्हणजेच चतु:सीमेअन्वये कोण जमीन मालक आहे, याची खात्री करून घ्यावी. तसेच या बाबतचा नकाशा तयार करून तो खरेदी खतास जोडावा व त्यावर खरेदी देणाऱ्यांच्या सह्या घ्याव्यात. प्लॉट मिळकत ही 'मान्य ले आऊटप्रमाणे असल्यास' या बाबतचा नकाशा व आदेश (ऑर्डर), वकील व आर्किटेक्ट यांच्याकडून तपासून घ्यावे.  



उत्तर लिहिले · 31/12/2020
कर्म · 14895
0
प्लॉट खरेदी करताना घ्यावयाची काळजी:

प्लॉट खरेदी करताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:

  • मालकी आणि शीर्षक तपासणी: जमिनीच्या मालकीचे रेकॉर्ड आणि शीर्षक तपासणे महत्त्वाचे आहे. हे सुनिश्चित करा की विक्रेता हा जमिनीचा कायदेशीर मालक आहे आणि त्याला ती विकण्याचा अधिकार आहे. यासाठी तुम्ही सरकारी भूमी अभिलेख कार्यालयात किंवा वकिलाची मदत घेऊ शकता.
  • जमिनीचे सर्वेक्षण: खरेदी करण्यापूर्वी जमिनीचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. यामुळे जमिनीची हद्द, आकार आणि इतर भौतिक वैशिष्ट्ये निश्चित करता येतात.
  • भोगवटा प्रमाणपत्र: जमिनीच्या विक्रेत्याकडे भोगवटा प्रमाणपत्र (Occupancy Certificate) असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र दर्शवते की जमीन कायदेशीररित्या वापरण्यासाठी योग्य आहे.
  • ना-हरकत प्रमाणपत्र (NOC): काही विशिष्ट प्रकरणांमध्ये, तुम्हाला विविध सरकारी विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रे (No Objection Certificates) मिळवणे आवश्यक असू शकते. उदाहरणार्थ, जर जमीन वन विभागाच्या जवळ असेल, तर तुम्हाला वन विभागाकडून एनओसीची आवश्यकता असेल.
  • जमिनीवरील भार आणि दायित्वे: जमिनीवर कोणतेही कर्ज, गहाण किंवा इतर दायित्वे नाहीत ना, याची तपासणी करणे आवश्यक आहे.
  • zoning आणि वापराचे नियम: जमिनीचा वापर कोणत्या कारणांसाठी केला जाऊ शकतो हे तपासणे महत्त्वाचे आहे. काही जमिनी केवळ निवासी वापरासाठी असतात, तर काही व्यावसायिक वापरासाठी.
  • विकास योजना: महानगरपालिका किंवा संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून जमिनीच्या आसपासच्या विकास योजनांची माहिती घेणे आवश्यक आहे.
  • पाणी आणि निचरा सुविधा: जमिनीवर पाणीपुरवठा आणि निचरा सुविधा उपलब्ध आहेत की नाही, हे तपासणे आवश्यक आहे.
  • पोहोच मार्ग: जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ता आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे.
  • कायदेशीर सल्ला: प्लॉट खरेदी करण्यापूर्वी वकिलाचा सल्ला घेणे उचित आहे. वकील तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांमध्ये मदत करू शकतात.

प्लॉट खरेदी करताना या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची फसवणूक टळू शकते आणि तुम्हाला कायदेशीर अडचणींपासून मुक्ती मिळू शकते.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

नवीन किंवा जुने घर विकत घेताना कोणकोणती माहिती समोरच्या व्यक्तीस विचारावी?
सायन मुंबई मध्ये 1 गुंठा जागा पाहिजे आहे, मिळेल का?
सदनिका खरेदी करताना काय खबरदारी घ्याल?
घर घेताना कोणत्या गोष्टींची माहिती असावी?
प्लॉट खरेदी करत असताना, तांबडा पट्टा, पिवळा पट्टा यानुसार खरेदी किंमत ठरते का?
प्लॉट खरेदी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, खर्च, कशा पद्धतीने खरेदी करायचा यासाठी घ्यावयाची काळजी?
मला प्लॉट घ्यायचा आहे, त्यासाठी काय खबरदारी घ्यावी जेणेकरून माझी फसवणूक होणार नाही?