2 उत्तरे
2
answers
ग्राहक मंच काय आहे? तेथे तक्रार कशी करावी?
19
Answer link
बाजारात जाऊन मनसोक्त खरेदी झाल्यावर त्या गोष्टींचा आनंद घेताना लक्षात येते, त्या वस्तूमध्ये काही दोष आहे. नुसती धुसफूस करून उपयोग नसतो; पण काय करावे हेही कळत नाही. अशावेळी ग्राहक न्यायालयाचा(कन्ज्युमर कोर्ट) फायदा होऊ शकतो. त्यासाठी काय करायला हवे याची माहिती.
कोणत्या तक्रारी करता येतात ?
सदोष किंवा असुरक्षित वस्तू (उदाहरणार्थ: चॉकलेटमध्ये पोरकिडे, शीतपेयांत गुटख्याचे पाकीट, सदोष बियाणे नीट उगवले नाही, कपडे धुण्याच्या एक किलो पावडरमध्ये त्यापेक्षा कमी वजनाची पावडर, दुचाकीचे कमी मायलेज, गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आग लागून जीवित-वित्त हानी होणे.)
सेवेतील उणिवा (उदाहरणार्थ: ड्रायक्लीनर्स, वरातीतील बॅंड, बॅंक, विमा, कुरिअर, पोस्ट, टेलिफोन, वाहतूक अशा सेवा पुरवणाऱ्या यंत्रणांच्या कामकाजातील उणिवा, डॉक्टरांच्या निष्काळजी उपचारांमुळे रुग्ण कायमचा अपंग झाला, कोचिंग क्लासमध्ये नियमित वर्ग घेतले गेले नाहीत, विजेच्या दाबातील चढ-उतारांमुळे उपकरणांचे नुकसान झाले, रेल्वे प्रवासात आरक्षित डब्यात सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने सामान चोरीला गेले.)
वस्तूवरील छापील किमतीपेक्षा अधिक किंमत आकारली, बिल्डरने कराराच्या मुदतीत सदनिकेची किंमत वाढवून कराराचा भंग केला, व्यायाम, आहार-नियंत्रण वगैरे न करता वजन घटविण्याची दिशाभूल करणारी जाहिरात, परदेशी विद्यापीठाची पदवी दिल्यानंतर अथवा आपला अभ्यासक्रम केल्यानंतर नोकरीची हमी देऊन फसवणूक.
विनामूल्य सेवा आणि व्यावसायिक उद्देशाने खरेदी केलेल्या वस्तू व सेवा; तसेच विशिष्ट यंत्रणांनी दिलेल्या वैधानिक सेवा (स्टॅच्युटरी ड्यूटीज्: उदाहरणार्थ: परीक्षांचे आयोजन करण्याची विद्यापीठांनी पुरविलेली सेवा) यांच्या बाबतीत ग्राहक न्यायालयांकडे तक्रार करता येत नाही.
तक्रार कशी करावी ?
स्वतःच्या शब्दांत, मुद्देसूद व आवश्यक तपशिलासह साध्या कागदावर लेखी तक्रार करता येते. (तक्रार-अर्जाचा विशिष्ट मसुदा नाही; पण मंच किंवा आयोग यांच्या कार्यालयांत अर्जाचा नमुना उपलब्ध असतो.)
अर्जासोबत काही शुल्क द्यावे लागते.
तक्रारदाराने वकील नेमणे आवश्यक नाही; मात्र वकिलांना मज्जावही नाही.
सोबत पुरेसा पुरावा जोडावा लागतो. (उदाहरणार्थ: खरेदीची पावती, हमीपत्र, सेवेबाबतचे करार-पत्र, तक्रारीसंदर्भातील पत्रव्यवहार, जाहिरातीचे कात्रण, आवश्यक तेथे तज्ज्ञांचे मत इत्यादींच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात.)
नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च यांची मागणी केलेली असल्यास, पुरेसा पुरावा नसल्यास न्यायालये भरपाई नाकारतात किंवा नाममात्र भरपाई देतात. यासाठी खरेदीशी संबंधित कागदपत्रे फाईलमध्ये नीट ठेवावीत.
तक्रार कोण करू शकतो ?
मोबदला देऊन वस्तू किंवा सेवा खरेदी करणारा किंवा खरेदीचा करार करणारा ग्राहक अथवा त्याचे कायदेशीर वारस, एकाच प्रकारची तक्रार असलेल्या ग्राहकांच्या वतीने एक किंवा काही ग्राहक.
तक्रारदारांच्या वतीने नोंदणीकृत ग्राहक संघटना (तक्रारदार या संस्थेचे सभासद असलेच पाहिजेत असे नाही.)
तक्रारनिवारण कसे होते ?
तक्रारीची प्रत व नोटीस मंचाकडून विरुद्ध पक्षाला पाठविली जाते.
विशिष्ट मुदतीत त्यांनी उत्तर न दिल्यास एकतर्फी निकाल दिला जातो; मात्र उत्तर देऊन त्यांनी तक्रार नाकारल्यास त्या वादावर सुनावणी होते.
उपलब्ध पुरावे आणि दोन्ही पक्षांनी केलेले युक्तिवाद यांच्या आधारे निर्णय दिला जातो.
कोणत्याही पक्षाच्या विनंतीवरून फक्त एकदाच सुनावणी पुढे ढकलता येते. त्याच्या कारणांची नोंद मंचाला करावी लागते.
विरुद्ध पक्षाला नोटीस दिल्यापासून नव्वद दिवसांत प्रकरण निकालात काढणे अपेक्षित आहे. सदोष वस्तूची प्रयोगशाळेत तपासणी करावी लागल्यास ही मुदत दीडशे दिवस आहे.
या प्रत्येक टप्प्यासाठी कायद्याने मुदत घालून दिलेली असते.
तक्रार वैयक्तिक आकसाने केलेली अथवा उथळ स्वरूपाची असल्याचे न्यायालयाचे मत झाल्यास तक्रारदाराला दहा हजार रुपयांपर्यंत दंड करण्याची कायद्यात तरतूद आहे.
तक्रारनिवारणाची त्रिस्तरीय यंत्रणा
1. राष्ट्रीय (ग्राहक तक्रारनिवारण) आयोग.
अधिकार व कामकाज: एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दावे आणि राज्य आयोगाच्या निर्णयांवरील अपिले व सुधारणा अर्ज.
2. राज्य (ग्राहक तक्रारनिवारण) आयोग.
अधिकार व कामकाज: वीस लाख रुपये ते एक कोटी रुपये यांमधील रकमांचे दावे आणि जिल्हा मंचाच्या निर्णयांवरील अपिले व सुधारणा अर्ज.
3. जिल्हा (ग्राहक तक्रारनिवारण) मंच.
अधिकार व कामकाज: एक रुपया ते वीस लाख रुपये यांमधील रकमांचे दावे.

पुण्यातील जिल्हा मंचांचे पत्ते:
1. पुणे जिल्हा (ग्राहक तक्रारनिवारण) मंच
(पुणे शहरातील तक्रारींसंबंधी)
सर्व्हे क्रमांक 692/6, पुष्पा हाईट्स, बिबवेवाडी कॉर्नर, पुणे-सातारा रस्ता, पुणे - 411 037.
दूरध्वनी क्रमांक: 020 - 24217489.
2. अतिरिक्त पुणे जिल्हा (ग्राहक तक्रारनिवारण) मंच
(पुणे शहराबाहेरील तक्रारींसंबंधी)
पत्ता वरीलप्रमाणे, दूरध्वनी क्रमांक: 020 - 24210364.
(तक्रार कशी करावी, याबाबत येथे मार्गदर्शन उपलब्ध)
3. अखिल भारतीय ग्राहक पंचायत
ग्राहक सदन, गोळे कॉम्प्लेक्स, 634 सदाशिव पेठ, फडतरे चौक, पुणे 411 030.
दूरध्वनी क्रमांक: 020 - 24460707.
वेळ: सकाळी 09.30 ते 11.30, सायंकाळी 05.30 ते 07.30, बुधवारी बंद.
सौजन्य - सकाळ साप्ताहिक
0
Answer link
ग्राहक मंच:
ग्राहक मंच (Consumer Forum) हे एक न्यायालयीन व्यासपीठ आहे जे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करते. जर तुम्हाला कोणत्याही वस्तू किंवा सेवेबद्दल काही तक्रार असेल, जसे की सदोष वस्तू, अपुरी सेवा, जास्त किंमत आकारणे, तर तुम्ही ग्राहक मंचात तक्रार दाखल करू शकता. ग्राहक मंच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जलद आणि स्वस्त मार्ग आहे.
ग्राहक मंचात तक्रार कशी करावी:- तक्रार तयार करा: तुमची तक्रार साध्या भाषेत लिहा. तक्रारीत तुमचे नाव, पत्ता, संपर्कdetails, तसेच ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे त्यांचे नाव, पत्ता आणि तपशीलवार माहिती लिहा. वस्तू किंवा सेवेची माहिती, खरेदीची तारीख, बिल आणि तुमच्या नुकसानीची माहिती नमूद करा.
- पुरावे जोडा: तुमच्या तक्रारीला समर्थन देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडा, जसे की खरेदी बिल, वॉरंटी कार्ड, इत्यादी.
-
तक्रार दाखल करा: तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तक्रार दाखल करू शकता:
- ऑनलाइन: राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या वेबसाइटवर (consumerhelpline.gov.in) जाऊन तुम्ही ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता. ग्राहक हेल्पलाईन
- ऑफलाइन: तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील ग्राहक मंचात जाऊन तक्रार दाखल करू शकता. तक्रारीची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.
- शुल्क: ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यासाठी नाममात्र शुल्क लागू शकते.
- सुनावणी: तक्रार दाखल झाल्यावर, ग्राहक मंच तुम्हाला सुनावणीसाठी बोलावेल. सुनावणीच्या वेळी तुमचे म्हणणे मांडा आणि पुरावे सादर करा.