सर्दी आरोग्य

सारखी सारखी सर्दी होते काय करू सांगा?

डॉ. आनंद ओक

दोन ते तीन दिवसांपुरता आल्यास फारसा त्रास न देणारे; परंतु त्यापेक्षा जास्त वेळ राहिल्यास मात्र सर्वाधिक त्रस्त करणारे काही आजार असतात. त्यापैकी जास्त प्रमाणात आढळणारा असा आजार म्हणजे ‘सर्दी’.
‘सर्दी’ या आजाराने जर्जर झालेली अनेक माणसे वेगवेगळ्या लक्षणांनी डॉक्टरकडे येतात.
- पहाटे किंवा रात्री शिंका येतात त्यानंतर नाक गळू लागते. त्यातूनच नंतर घसा धरतो असे सांगणारे कही असतात.
- रोज रात्री नाक चोंदते किंवा बंद होते व श्‍वास घेण्यास त्रास होतो.
- कोणताही उग्र वास आला, जरासा वारा लागला की शिंका येऊन नाक गळू लागते.
- सर्दी झाली की नाक चोंदते, डोके जड होते, डोके व डोळे दुखतात, सकाळी व रात्री डोके जास्त दुखते.
- काही रुग्णांना सर्दी झाली की कान दुखू लागतात, बधीर होतात, चक्‍कर येते.
- लहान मुलात नाक गळू लागली की घसा दुखतो, टॉन्सीलना सूज येते, छाती घरघरू लागते, कफ साठतो हे वारंवार घडत असते.
- सर्दी झाली की लगेचच अर्धे डोके दुखते व्यवहारात काहीजण यासच ‘अर्धशिशी’ म्हणतात.

अशा विविध स्वरूपात येणार्‍या रुग्णांच्या मनात असंख्य शंका असतात. सर्दी नक्‍की का होते? माझीच सर्दी लवकर बरी का होत नाही? सर्दी कायमची बरी होईल का? सर्दीसाठी डॉक्टर ऑपरेशन केले, कॉटरी केली मित्राची सर्दी कमी झालीय; परंतु माझी मात्र बरी होत नाही! सर्दीसाठी नक्‍की काय पथ्य पाळावेत? अशा शंका घेऊन येणारेही असतात.

तसेच डॉक्टर सर्दीसाठी खासगी वैद्याकडून औषध घेतोय सर्दी बरी आहे, पण हल्‍ली अंगावर चेहर्‍यावर सूज येते, चक्‍कर येते हे कशामुळे? असे विचारणारेही असतात. ‘अ‍ॅलर्जी म्हणजे काय?’ ‘माझा हा आजार अ‍ॅलर्जीमुळे आहे का? ही अ‍ॅलर्जी कायमची बरी होऊ शकते का?’ ही शंका बर्‍याच जणात आढळते. या सर्व रुग्णांना म्हणून ‘सर्दी’ या आजाराबद्दल आयुर्वेदीय द‍ृष्टिकोन काय हे या लेखात सांगत आहे.

‘अ‍ॅलर्जी म्हणजे नक्‍की काय?’

अ‍ॅलर्जी याचा व्यवहारात अर्थ ‘सहन न होणे’ विश्‍वातील सजीव किंवा निर्जीव,  द‍ृश्य किंवा अद‍ृश्य अशा कोणत्याही पदार्थाची उदा. थंडपाणी, थंड हवा, धूळीकण इत्यादीपासून ते विशिष्ट कपडे, गंध, प्रकाश अन्‍नपदार्थ पर्यंत कोणत्याही घटकाची अ‍ॅलर्जी असू शकते. म्हणजेच असे त्रास देणारे पदार्थ नाकाच्या किंवा घशाच्या संबंधात आल्यानंतर तेथील पेशींना ते सहन होत नाहीत व परिणामी त्या जागी उत्तेजना उत्पन्‍न होऊन शरीर असा पदार्थ नाकातून, घशातून बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न करते म्हणजेच शिंका येतात किंवा ठसका लागतो, तरीही हे पदार्थ तसेच राहिल्यास त्या ठिकाणी सूज येते व स्त्राव पाण्यामध्ये असतो, पण नंतर तो कफाप्रमाणे चिकट काही वेळा पिवळस दुर्गंधीयुक्‍त असतो. काही वेळा रक्‍त मिश्रीतही असतो.

थोडक्यात अशा सहन न होणार्‍या पदार्थापासून वरील लक्षणे उत्पन्‍न होतात व आपली प्रतिकारशक्‍ती जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत ज्या ज्या वेळी अशा गोष्टी संपर्कात येतात तेव्हा प्रत्येक वेळी ही ‘अ‍ॅलर्जी’ उत्पन्‍न होते.

प्रतिकार शक्‍ती वाढण्यास तसा काही काळ जावा लागत असल्यामुळे अ‍ॅलर्जी देखील जास्त दिवस टिकून राहते; पण याचा अर्थ ती कधीच बरी होत नाही असा समज करून घेऊ नये. आयुर्वेदातील काही वनस्पतीज औषधे व भस्मे ही नाकातील त्वचेची प्रतिकारशक्‍ती वाढवून वारंवार येणारी ‘अ‍ॅलर्जी नाहीशी करू शकतात असे अनुभवास येते.

जुनाट सर्दीची लक्षणे ः-

नाक खाजणे, हुळहुळणे, शिंका येणे, पाणी/कफ पाझरणे, डोके दुखणे, कान बधीर होणे, घसा दुखणे, आवाज बसणे, चक्‍कर येणे, डोके जड राहणे, ताप येणे, खोकला येणे, या लक्षणांपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणे ज्यावेळी वारंवार होतात. औषध घेण्यापुरते बरे वाटते, पुन्हा त्रास होतो अशावेळी त्यास ‘जुनाट सर्दी’ किंवा ‘जीर्ण प्रतिश्याय’ किंवा ‘पीनस’ किंवा ‘क्रॉनिक र्‍हायनायटीस’ किंवा ‘क्रॉनिक सायनुसायटीस’ असे म्हणतात.

सर्दी दुर्लक्षिण्याने होणारे उपाय-

वरील लक्षणांवर जर वेळीच उपाय केले जाहीत तर यातूनच घसा बसणे, खोकला येणे, बेडके पडणे, ताप येणे, छातीत कफ साठणे, दम किंवा श्‍वास लागणे असे पुढील श्‍वसनाचे विकार होतात, तर काही वेळा ‘मेंदूज्वर’ ‘मेनिंजायटीस’ देखील होऊ शकतो. याच वेळी उत्साह नसणे, कामात लक्ष न लागणे, चिडचिड होणे, भूक कमी होऊन तब्येत खालावणे असे दुष्परिणाम देखील असंख्य व्यक्‍तीत बघायला मिळतात.

शास्त्रीय आयुर्वेदिक उपचार-

ही जुनाट सर्दी बरी करणारे व नंतर हा गुण टिकवून ठेवणारी आणि नाकाचीच  प्रतिकारशक्‍ती वाढवून वारंवार होणारा हा सर्दीचा त्रास कायमचा बरा करणारी अशा विविध औषधी व उपक्रम आयुर्वेदाने सांगितले आहेत व याचा फायदा बर्‍याच रुग्णांना झालेला आढळून येत आहे.

आयुर्वेदाच्या मते शरीरातील वात, पित्त व कफ हे तीन ही दोष बिघडल्यामुळे विशेषतः वात व कफ यामुळे हा आजार उत्पन्‍न होत असतो. म्हणून औषधांच्या सहाय्याने असे बिघडलेले वात व कफ कमी करून नाकाची प्रतिकार शक्‍ती वाढवून विशिष्ट  पथ्य काही काळपर्यंत संभाळले की हा आजार पूर्णतः बरा होऊन आटोक्यात राहतो.

वनस्पतीज औषधे-

आयुर्वेदातील सुंठ, वेखंड, मिरी, पिंपळी, दशमूळ, गुग्गुळ, एरंड, जेष्ठमध, जायफळ, लवंग, अडुळसा, तुळस, धोतरा, शेवगा, बिब्बा इत्यादी वनस्पती व त्यापासून बनवलेली  विधि औषधं या विकारात उपयुक्‍त ठरतात. हळद रोज पाव ते एक चमचा या प्रमाणात तीन व सहा महिने नियमित घेत राहिल्यास नाकाची प्रतिकारशक्‍ती खूपच प्रमाणात वाढून हा आजार वारंवार होत नाही.

खनिज, प्राणीज पदार्थांपैकी ताम्रभस्म, शृंगभस्म, अभ्रक भस्म, गंधक, पारा, हरताळ, मनशील व हींगुळ यापासून बनविलेले कज्जली, रसपर्पटी, समीर पन्‍नग, रसमाणिम्य, रससिंदूर तसेच त्रिभुवन किर्ती, आनंदभैरव, सूक्ष्मत्रिफळा, लक्ष्मीविलास, त्रिफळा गुग्गुळ, नागगुटी, आरोग्यवर्धीनी इत्यादी  गोळ्या अत्यंत उपयोगी पडतात. अर्थात प्रत्येक माणसाच्या प्रकृती, कोठा, असणार्‍या त्रासाची तीव्रता, नाकातील अंतःस्त्वेची अवस्था यानुसारच ही औषधे  प्रत्येकास वेगवेगळ्या प्रमाणात व वेगवेगळ्या कालापर्यंत द्यावी लागतात. त्यामुळे आयुर्वेद तज्ज्ञाकडून परीक्षा करूनच ती घेणे जास्त फायदेशीर आहे.

पंचकर्मोपचार -
एखाद्याच्या शरीरातील वात व कफ अत्याधिक प्रमाणात बिघडलले असतील अशा वेळी लवकर आराम पडण्याच्या द‍ृष्टीने हा उपचार केला जातो. या अंतर्गत- वमनाद्वारे- उलटीतून कफ बाहेर काढतो.

सर्दीशमन नस्यकर्म-

नाकाच्या आसपासच्या प्रदेशातील वाढलेला कफ काढून टाकण्यासाठी प्रथम नाक, कपाळ, चेहरा, डोके, यांना औषधी तेलाने विशिष्ट प्रकारे  मालीश करून नंतर औषधी काढ्यांच्या वाफेने शेक देऊन योग्य असे औषधांचे काही थेंब नाकात सोडले जातात. फक्‍त पंचवीस मिनिटांत होणारा हा उपचार सलग सात ते चौदा दिवस केल्यास बिघडलेला सर्व कफ निघून जातो. नाकात व शेजारी मुरलेली सूज कमी होते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाकातील त्वचेची प्रतीकार शक्‍ती वाढून रोगाचे मूळ कारणावरच उपचार होतो. नंतर काही काळपर्यंत सर्दीनाशक ‘पीनस हर’ ‘वचा तेल’ रेाज दोन किंवा तीन थेंब स्वतःच नाकात टाकून पथ्य सांभाळल्यास हा विकार पूर्ण बरा होतो.

पथ्यपालन महत्त्वाचे -

आहारातील वात, कफ वाढविणारे असे दही, आंबट ताक, केळी, तळलेले पदार्थ, लोणची चिंच,  पाणीपुरी, भेळ यासारखे तसेच मासे, अंडी, बे्रड, आबंट फळे, कोल्ड्रींक्स, बीअर हे पदार्थ तसेच वारंवार वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी पिणे या गोष्टी पूर्णतः काही काळ वर्ज्य कराव्या लागतात. या रुग्णांनी थंड पाण्यात काम करणे, गार वार्‍यातून काळजी न घेता प्रवास करणे, धूळ उडवणारी अशी, झाडणे, लोटणे, पाखडणे, झटकणे ही कामे कधीही करू नयेत. तसेच धुराचा संपर्क प्रयत्न पूर्वक टाळावा. चालू धावत्या जगात या गोष्टी सर्वस्वी टाळणे शक्य नसते. अशावेळी सर्दीनाशक ‘पीनसहर तेल’ किंवा ‘वचा तेल’ किंवा ‘अणु तेल’ बोटाने नाकाला लावून काम केल्यास किंवा वापरल्यास वरील पदार्थांचा नाकाच्या त्वचेवर होणारा दुष्परिणाम टाळता येऊन वारंवार होणारी ‘अ‍ॅलर्जी’ बंद होऊ शकते असे अनुभवास आले आहे. याच्याच जोडीला प्रवाात कानात कापसाचे बोळे घालावे, हेल्मेट वापरावे, उंच उशी न घेता झोपावे, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, थंड पाण्याची डोक्यावर अंघोळ करू नये, शिक्षकांनी वारंवार ‘डस्टर’ आपटणे टाळावे.

वरील गोष्टी टाळत असतानाच कही विशिष्ट  पदार्थ नियमित सेवन करणे हे देखील गरजेचे असते. यामध्ये आले, लसूण, मिरी, लवंग, दालचिनी, हळद, वेखंड, कढत पाणी, शेवगा, मुळा, कुळीथ व मांसरस (मटण सूप) नियमाने खावे. उठल्या उठल्या कढत पाण्याच्या गुळण्या कराव्यात. हळद, सुंठ, मिरी, लवंग यांचे समभाग मिश्रण टाकूनच चहा, कॉफी किंवा दूध प्यावे. याप्रमाणे आयुर्वेदशास्त्राच्या द‍ृष्टीने काही काळ उपचार केल्यास व पथ्य सांभाळल्यास ही सर्दी कायमची बरी होण्यास अशक्य असे काहीच नाही असे अनुभवास येईल हे निश्‍चित!
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

सारखी सारखी सर्दी होते काय करू सांगा?

Related Questions

सर्दी झाल्यानंतर नाक मोकळे करण्यासाठी काय करावे?
कान कशामुळे ठणकतात? सर्दीमुळे काय उपाय करावेत?
हल्ली मला वारंवार नाकपुडी बंद होण्याचा/चोंदण्याचा त्रास होत असतो. त्यासाठी मी वाफ घेतो, नाकात ऑट्रिव्हिनसारखे ड्रॉप टाकतो, प्राणायाम करतो, गाईच्या दुधाच्या तूपाचे थेंब नाकात टाकतो. तरीदेखील नाक चोंदण्याचा त्रास होतोच. नाक चोंदले की श्वास घ्यायला त्रास होतो. आता दुसर्‍या कोणत्या उपायाने नाक चोंदणे थांबेल?
नाक खूप दुखत आहे, उपाय काय सांगा लवकर?
मी कांदा खाल्ला तर मला सर्दी होते, काय कारण असेल? काही उपाय सुचवा?
नाकपुडी बंद राहण्यावर/चोंदण्यावर काय उपाय करावा (घरगुती), तसेच कोणते औषध वापरावे?
नाकपुडी बंद होण्यावर उपाय काय आहे?