शरीराची काळजी कशी घ्यायची?
विश्वातील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे आपले शरीर आपल्याला निरोगी राखायचे असेल तर आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे. म्हणून योग्य व्यायाम, संतुलित भोजन व आराम अत्यंत महत्त्वाचा आहे.
भुकेचे तीन प्रकार असतात-
हितभूक– सात्विक आहार (तेच खाल्ले पाहिजे जे लाभदायक आहे).
मितभूक– (भुकेपेक्षा कमी खाणे).
ऋतभूक– (आहार ऋतुला अनुकूल असावा).
गरजेपेक्षा जास्त खाल्लं की पोट बिघडतं. 90 टक्के आजार तर पोट साफ नसल्यामुळे होतात. म्हणून नेहमी पोट साफ राहील, याची काळजी घ्या.
पोट साफ ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय-
*दररोज सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी त्यात थोडे लिंबू व मध टाकून ते पाणी घोट घोट पद्धतीने प्यावे.
(टीप- सकाळी उठल्यावर तोंड न धुता हे पाणी प्यावे. कारण सकाळची लाळ आपल्या पोटात जाणे अत्यंत गरजेचे आहे.)
*सकाळ- संध्याकाळ कोमट पाण्यातून त्रिफळाचूर्ण घ्यावे.
*पाणी भरपूर प्रमाणात प्यावे, पाणी पिताना नेहमी बसून व घोट घोट पद्धतीने प्यावे. पाण्याचा घोट तोंडात फिरवून नंतरच प्यावे. कारण पाण्याबरोबरच तोंडातील लाळ आपल्या पोटात जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
*सकाळी पोटभर जेवा. खरं तर सुर्यास्तानंतर जेवून करू नये. रात्री दूध किंवा फळांचा रस घ्यावा.
रात्री पोटभर कधीही जेवू नये.
आपण दोन कारणांसाठी जेवतो.
1) शक्ती मिळविण्यासाठी, 2) चवीसाठी.
किती तरी पदार्थ आपण फक्त चवीसाठी खातो, त्यात काही पौष्टिकता असो किंवा नसो, कदाचित ते शरीराला अपायकारकही ठरत असतील.
आपण म्हणतो की, ‘आपण जगण्यासाठी खातो’ पण खरं तर असे आढळून आले आहे की, ‘आपण खाण्यासाठी जगतो.’
किती व कधी खाल्ले पाहिजे-
सामान्य माणूस दिवसातून दोन किंवा तीन वेळचे जेवण घेतो. खरं तर सकाळी व्यायामानंतर मोड आलेली कडधान्ये खावीत, कष्टकरी लोकांनी व्यायामानंतर न्याहारी करावी. त्यानंतर 3-4 तासांनी दुपारचे जेवण, त्यानंतर सूर्यास्ताआधी दुपारचे जेवण, त्यानंतर सुर्यास्ताआधी हलके जेवण. खरं तर सकाळी उठताच पाणी, दुपारी जेवणानंतर ताक आणि रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध पिणे अमृतासमान मानले जाते.
निरोगी जीवनाचे रहस्य
- भुकेपेक्षा कमी खा.
- सकाळी लवकर उठा व चालायला लागा.
- एखादा खेळ खेळा, खेळणे हा सुद्धा व्यायामच आहे.
- सकाळी चालून आल्यावर भूक चांगली लागते त्यावेळी मोड आलेले कडधान्ये खा.
- साधे जेवण खा. जेवण करताना प्रसन्न मनाने जेवा, भांडू नका. काळजी न करता जेवा, चावून चावून खा, जेवताना न हसता, न बोलता एकाग्र मनाने व आनंदाने जेवा.
- जेवण करताना गाजर, मुळा, टोमॅटोल मेथी, कडधान्य, ताक, आमटी किंवा मोसमानुसार कच्च्या भाज्या खाव्यात.
- कणिक कोंड्यासह खा. शक्य असल्यास हाताने दळलेले खा.
जेवताना मध्येच पाणी पिऊ नका. (असे केल्यास जठराग्नी विझतो व अन्न सडते.)
वाढता हृदयरोग- या रोगाने सगळीकडे थैमान घातले आहे. जगातील अत्याधुनिक वैद्यकीय उपचारही निकामी ठरले. म्हणून शेवटी दोन- तीन लाख खर्च करून ‘बायपास’ची अल्पायुषी सोय करण्यात आली. या ऑपरेशन नंतर 4-5 वर्षांचे लुळे पांगले यमयातनेने भरलेले जीवन जगता येते एवढेच मात्र खरे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन अमेरिकेतील हृदयरोगत्रस्त मंडळी वेगाने निसर्गोपचाराकडे वळू लागली आहेत.
गॅस्ट्रिक अल्सर- पोट साफ नसेल तर अनेक आजार होतात. त्यात आम्लता किंवा ऍसिडिटी जास्त काळपर्यंत टिकून राहिली तर त्याचेच पर्यवसान अल्सरमध्ये होते. स्त्री- पुरुषांना होणारा हा रोग ऍसिडीटीच्या कारणांनीच उद्वतो. असे व्रण आकाराने अर्धा किंवा एक इंचाच्या व्यासापर्यंतचे दिसून येतात. कधीकधी रुग्णाला त्यामुळेच उलटीही होते. हायड्रोक्लोरिक ऍसिडचा दुष्प्रभाव हळूहळू अल्सरच्या ठिकाणी होत राहिला तर ही जखम खोलवर पसरत जाते आणि आमाशयाच्या भिंतीलाच छिद्र पाडते व रोग्याचा मृत्यु होतो.
भोजनाआधी जठराच्या विशिष्ट भागात दुखणे आणि जेवण होताच दुखणे थांबणे हे अल्सरचे महत्त्वाचे लक्षण होय.
उपचार- निश्चित व कमी वेळात सुधारणा घडविण्याचा मार्ग म्हणजेच लंघनचिकित्सा होय.
लंघनानंतर तीन दिवस दुधीभोपळा व काकडी एकत्र शिजवून त्याचे गाळलेले सूप द्यावे (तिखट मीठ न घालता).भुकेप्रमाणे दिवसातून चार-पाच वेळा 200 मिलीग्रॅम पर्यंत देता येते. नंतर हळूहळू सकाळी कपभर कोमट पाण्यात लिंबाचा दहा/बारा रस घालून प्यावे.
आहाराबद्दल महत्त्वाची माहिती-
- आहारात गोड, कडू, तिखट, आंबट, तुरट व खारट या सर्व चवींच्या पदार्थांचा समावेश असावा.
- आहारातील साखर, तेल, तूप, नारळ यांचे प्रमाण कमी करावे. जेवणाच मिठाचे प्रमाण कमी करावे. लिंबाच्या रसाचा वापर वाढवावा. लोणची, पापड, तळलेले पदार्थ रोज खाऊ नयेत. मांसाहारी पदार्थात साधारणपणे मीठ जास्त घातले जाते म्हणून ते कमी करावेत किंवा त्यातील मिठाचे प्रमाण कमी करावे.
- हवाबंद डब्यातील पदार्थ कमी खावेत. त्यात सोडियमचे प्रमाण अधिक असते. रोज ताजे व घरी कमी तेलात बनवलेले पदार्थ खावेत.
- टोमॅटो सॉस कमी खावा. जॅम, मुरंबे काही दिवस पूर्ण वर्ज्य करावेत.
- डाएटिंगबद्दल चुकीचे समज नसावेत.
- डाएटिंग म्हणजे संतुलित आहार.
- वजन कमी करण्यासाठी अचानक खाणे- पिणे फार कमी केल्यास अपाय होऊ शकतो.
- वजन कमी करण्यासाठी सरसकट सगळाच आहार कमी न करता तेल, तूप, साखर व अन्य चरबीयुक्त पदार्थ कमी करावेत. भरपूर पाणी प्यावे.
- एकावेळी भरपूर जेवण्याऐवजी दिवसभर थोडे थोडे खावे.
- सकाळी उठल्याबरोबर चहा न घेता एक टोमॅटो खावा. यामुळे खूप वेळ भूक लागत नाही व वजनावर नियंत्रण राहते.
- वजन कमी करण्यासाठी अन्य कोणत्याही मार्गांपेक्षा शारीरिक श्रमांनीच अन्न पचविणे हा उपाय आहे.
- जेवणापूर्वी टोमॅटो सूप प्यावे व लगेच जेवावे. जेवण कमी जाते व पोटही भरते. मात्र सूपमध्ये क्रीम घालू नये. इतर कोणतेही जास्त ‘फॅटस’ असलेले सूप घेऊ नये.
- डाएटिंग करताना आहारातील ‘फॅटस’चे प्रमाण कमी करणे आवश्यक असते. यासाठी ताक, सूप किंवा दूध घेण्यापूर्वी पातळ मलमलच्या कपड्यात खडा घेऊन तो द्रव पदार्थाच्या पृष्ठभागाशी बुडवून गोल गोल फिरवावा. सर्व ‘फॅटस’ कपड्याला चिकटून येतात.
- जीवनासाठी आहार हा प्राणमय आहे. आहारामुळे स्वास्थ्य टिकून राहते. आहारामुळे वर्ण, प्रतिभा, सुख, बळ मिळते. प्रत्येकाने हितकर आहाराचे सेवन काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते. या नियमांना शास्त्राने ‘आहारविधिविधान’ संबोधले जाते.
- अन्नग्रहण करण्याची जागा स्वच्छ, मन प्रसन्न व सुगंधित असावी. जेवणापूर्वी प्रत्येकाने हातपाय, तोंड स्वच्छ धुवावे. स्वच्छ वस्त्र घालून मग जेवणास बसावे. जेवणासाठी वापरावयाची सर्व भांडी स्वच्छ व नीटनेटकी असावीत.
- जेवण गरम गरम सेवन करावे, ते स्निग्ध असावे.
- अति घाई- घाईने अथवा एकदम सावकाशपणे जेवण करू नये.
- जेवताना फार बोलू नये. जास्त हसू नये.
- जेवताना आहारावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करावे.
- गरम जेवण चविष्ट असते. अग्नि प्रदीप्त होतो व जेवण लवकर पचते.
- शरीरातील वातदोषाचे योग्य वहन होते. कफदोष संतुलित राहतो
खालील 5 स्थितीमध्ये आहार सेवन करू नये.
अध्यशन
एकदा जेवण केले की थोड्या वेळातच पुन्हा जेवण करणे म्हणजे ‘अध्यशन’ होय.चांगल्या पचनाची लक्षणे जाणवण्यासाठी साधारणत: 3- 4 तासांचा अवधी लागतो. या कालावधीआधी पुन्हा अन्नग्रहण केल्यास अजीर्ण, उलटी- जुलाब होणे अशी लक्षणे दिसून येतात. म्हणूनच पूर्वीचे खाल्लेले अन्न पचल्याशिवाय अजिबातच जेवण करू नये.
विषमाशन
जेवणाची वेळ नसताना जर थोडे अथवा अधिक जेवण केले तर विषमाशन होय. अवेळी भोजन करणे म्हणजे आजारांना आमंत्रण होय. म्हणून विषमाशन टाळावे.
समशन
शरीर प्रकृतीला जे अनुकूल आहे ते पथ्यकारक पदार्थ व जे प्रतिकूल (नको असलेले) ते अपथ्यकर पदार्थ असे एकत्रित सेवन करणे म्हणजेच समशन होय. यामुळे शरीरातील वात- पित्त- कफ या त्रिदोषांचा प्रकोप होतो. दारु सेवन व दुग्धाहार हे समशन होय.
अनशन
अन्न सेवन न करणे, उपवास करणे म्हणजेच अनशन होय. दीर्घकालीन उपवास केल्याने शरीर घटकांचे पोषण होत नाही. यामुळे कुपोषणजन्य वातप्रकोप होतो. तसेच शरीराची ताकद, कांती नष्ट होते. ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता नाश पावते. शरीरातील सारभूत भाग म्हणजेच ओज नाहीसे होऊन विविध वातविकार निर्माण होतात.
विरूद्धाशन
विरुद्ध प्रकारचा आहार सेवन केल्याने विविध आजार उत्पन्न होतात.
देशविरुद्ध- ज्या देशातील अथवा प्रदेशात जसे वातावरण असेल त्याच्या समान गुणांनी युक्त आहार सेवन केल्यास दोषप्रकोप होतो. उदा. उष्ण प्रदेशात पित्तदोषाचे प्राधान्य असते. अशा ठिकाणी उष्ण- तीक्ष्ण, लघु गुणांचा आहार घेणे हे देशविरुद्ध आहे.
कालविरुद्ध- थंडीच्या दिवसात फ्रीजमधील अन्नपाणी सेवन करणे हे कालविरुद्ध आहे.
अग्नीविरुद्ध- आपली पचनशक्ती जशी आहे त्याप्रमाणे हा आहार होय. म्हणजेच मंद अग्नि असताना मैदायुक्त पदार्थ खाणे हे अग्नीविरुद्ध आहे.
मात्राविरुद्ध- काही आहारीय द्रव्ये समान मात्रेमध्ये घेणे हे मात्रेविरुद्ध होय. उदा. मध व तूप हे समान मात्रेत सेवन केल्यास विषवत काम करते.
सात्म्यविरुद्ध- आपल्या शरीराला सात्म्य असणाऱ्या गुणांविरोधी अन्न हे सात्म्यविरुद्ध होय. यामुळे विविध आजार उत्पन्न होतात.
दोषविरुद्ध- शरीरप्रकृती (वात-पित्त-कफ प्रधान) जशी असेल त्यानुसार किंवा त्रिदोषापैकी कोणत्या दोषाची अनावश्यक वाढ झाली असेल त्यानुसार आहार घेणे हे दोषविरुद्ध होय.कफप्रधान प्रकृतीच्या व्यक्तीने कफदोषाचा प्रकोप झालेला असताना कोरड्या पदार्थांचे सेवन करणे चुकीचे आहे.
संस्कारविरुद्ध- अन्नपदार्थांवर विशिष्ट संस्कार करून बनविलेला आहार (शिजविणे, तळणे, वाफवणे इ.) हा शरीरात व्याधी, आजार उत्पन्न करत असल्यास हे अन्न संस्कारविरुद्ध आहे. उदा. दही गरम करणे.
वीर्यविरुद्ध- उष्ण व शीत असे वीर्याचे दोन प्रकार पडतात. या दोन्ही वीर्यांचे अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करणे हे वीर्यविरुद्ध आहे. उदा. तिखट आमटी व दूध एकत्र करून खाणे.दूध हे शीतवीर्याचे असते तर आमटी उष्ण वीर्यात्मक असते.
कोष्ठविरुद्ध- आपल्या शरीरात पचनासाठी उपयुक्त भागाला कोष्ठ संबोधतात. बोलीभाषेत यालाच ‘कोठा’ म्हणतात. या कोष्ठाच्या विरुद्ध गुणांचा आहार म्हणजेच कोष्ठविरुद्ध होय. कोठा चांगला असुनसुद्धा जर हलक्या गुणांचे कोरडे पदार्थ खाणे हे कोष्ठविरुद्धी होय.
अवस्था- क्रमविरुद्ध- मानवी शरीर जन्मानंतर तीन अवस्थांमधून जात असते. बाल्यावस्था, प्रौढावस्था व वृद्धावस्था. या तिन्ही अवस्थेत त्रिदोषांपैकी एका दोषाचे प्रमाण हे निसर्गत: इतर दोघांच्या तुलनेत जास्त असते. म्हणून त्या त्या दोषाला संतुलित ठेवणारा आहार घेतल्यास आरोग्य टिकून राहते. उदा. बालकांमध्ये कफ दोष प्राबल्याने असतो. म्हणूनच वाढत्या वयानुसार पौष्टिक परंतु कफप्रकोप न करणारा आहार मुलांना द्यावा.
परिहाराविरुद्ध-
विशिष्ट स्वरुपाच्या आहारानंतर विशिष्ठ क्रम (परिहारआचरण) पाळावा लागतो. त्याला परिहार म्हणतात. याच्या विरुद्ध असणारा आहार हा परिहाराविरुद्ध होय.
चरकसंहितेमध्ये आठ गोष्टींचा संबंध हा आहाराशी जोडला आहे. या गोष्टींना ‘अष्टौआहारविधिविशेषायतन’ म्हटले आहे.
1) प्रकृती
आहारीय घटकाचे अंगभूत गुण म्हणजेच त्याची प्रकृती होय. यामध्ये उष्ण-थंड; मऊ- कठीण, चिकट- कोरडेपण अशा गुणांचा विचार करावा. पदार्थांच्या गुणावरून तो सेवन करावा अथवा नाही, याचा निर्णय घ्यावा. ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास जास्त होतो अशा व्यक्तींनी जास्त तिखट, मसालेदार व आंबवलेले पदार्थ खाऊ नयेत.
2) करण-
करण म्हणजे ‘संस्कार’ होय. एखाद्या पदार्थावर करण म्हणजेच संस्कार करण्यामुळे त्याचे मुळचे गुण बदलून त्यामध्ये नवीन गुण उत्पन्न होतात.
उदा. दूध आटवून तयार केलेली बासुंदी पचायला जड असते. गहू, तांदूळ भाजून बनवलेले भाजणीचे पीठ पचायला हलके असते.
दुधात सुंठ पावडर टाकून उकळल्यास ते पचायला हलके बनते.
म्हणून संस्कारित पदार्थांचा आहारात समावेश करताना योग्य निर्णय घ्यावा लागतो.
3) संयोग-
दोन अथवा दोनपेक्षा जास्त घटक मिसळून पदार्थ बनविण्याच्या क्रियेला ‘संयोग’ म्हणतात. संयोगातून बनलेला पदार्थ पूर्वीच्या द्रव्यांच्या गुणांपेक्षा वेगळ्या गुणाचा असतो.
उदा. बाजरीच्या पिठाची भाकरी खाल्ल्यास पोट गच्च् वाटतंय अशी काहीजण तक्रार करतात. कारण बाजरी रुक्ष (कोरडी) गुणाची असते. परंतु बाजरीच्या पिठाची भाकरी थापत असताना त्यात पांढरे अथवा काळे तीळ लावल्यास पोटात वात धरत नाही. कारण तीळामध्ये असणारी स्निग्धता ही वाताच्या वहन (वाहणे) या कामाला उपयुक्त ठरते. भाकरीचे योग्य पचन होते.
आंब्याचा रस सेवन करताना त्यात साजूक तूप व मिरेपूड मिसळावी म्हणजे पचायला हलका असतो.
शरीर प्रकृतीला अनुकूल पदार्थांचे सेवन करताना संयोगविधी फार उपयोगी ठरते.
4) राशी-आहाराच्या बाबतीत राशीचा अर्थ “मात्रा’ म्हणजेच प्रमाण असा आहे.
सर्वग्रह व परिग्रह असे 2 प्रकार मानले जातात.
संपूर्ण आहाराचा एकत्रित विचार सर्वग्रह राशीत केला जातो. यानुसार त्याची मात्रा ठरविली जाते.
परिग्रह राशीत आहारातील केवळ विशिष्ट घटकाचा विचार करून जेवणाचे प्रमाण ठरविले जाते.
जेवणात चपाती, बासुंदी, भजी, बटाट्याची भाजी असे पचायला जड पदार्थ असतील तर अशा जेवणाची मात्रा निश्चितच कमी असावी. म्हणजेच थोड्या प्रमाणात सेवन करावे.
जेवणाच्या ताटात भाजणीच्या पीठाचे थालीपीठ व जवसाची चटणीसारखे पचनाला हलके पदार्थ असतील तर त्याची मात्रा (प्रमाण) कधी तरी वाढली तरी पचनावर विशेष ताण पडत नाही.
5) देश-धान्य ज्या प्रदेशात उत्पन्न होते तो प्रदेश म्हणजे देश होय. या प्रदेशाचा व त्यातून घेतलेल्या धान्याचा परस्परांशी गुणसंबंध असते. अशा धान्य गुणांवर जेवणाचे प्रमाण ठरविणे आरोग्यदायी ठरते.
नागपूर, सोलापूर या ठिकाणी उष्णता जास्त असते. तेथे उत्पन्न होणारे धान्य हलकी पचण्यास सुलभ असतात. तेथील व्यक्तींची पचनशक्तीही अशी धान्ये शरीरसात्म्य (सामावून) करवून घेणारी असते.
कोकणात होणारा तांदूळ हा पौष्टिक मानला जातो. कारण तेथील वातावरण हे तांदुळातील गुणांना पूरक असते.
6) काल-कोणत्या वेळी आपण आहार घेतो तो काळ आहाराचे पोषकत्व ठरविण्यास कारणीभूत होतो. शरीरातील पचनसंस्थेत पित्ताचे स्त्रवण होण्याच्या वेळी घेतलेला आहार व्यवस्थित पचतो. इतर वेळी घेतलेल्या अन्न घटकांचे योग्य पचन न झाल्याने अग्नी मंद होवून आजारांना आमंत्रण मिळते. कालाच्या या प्रकाराला “नित्यग काल’ म्हटले जाते. यानुसार जेवण केल्यास दोषांचा प्रकोप टाळला जातो.
आवस्थिक काल-आजाराच्या कोणत्या अवस्थेत कसा आहार घेतल्यास शरीरोपयोगी ठरतो याला आवस्थिक काल म्हणतात. उदा. जुलाब होत असल्यास पेज अथवा सूप्स असा आहार घेतल्याने पचनसंस्था चांगली राहते.
कुपोषणात पचनाचा विचार करून दिलेल्या आहाराचा निश्चित फायदा होतो.
7) उपयोग संस्था-
वर उल्लेख केलेल्या आहाराच्या नियमांचे पालन करून आहार सेवन करण म्हणजेच उपयोग संस्था होय.
8) उपयोक्ता-भोजन करणाऱ्या (स्वत: जेवण सेवन करणारी व्यक्ती) म्हणजेच उपयोक्ता होय.
प्रत्येक मनुष्याने स्वत:चे वय, ताकद, अग्नी, अन्नसात्म्यता यांचा सारासार विचार करून स्वत:ला योग्य आहाराची मात्रा ठरवावी.
जेवताना पाणी पिण्याबाबतीत नियम-
आपण जेवणाच्या आधी खूप पाणी पिले तर पचनशक्ती मंदावते. आहार कमी सेवन केला जातो. यामुळे शरीर कृश बनते. जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिल्यास वजन वाढते.
जेवणानंतर अगदी घोट- घोट पाणी पिल्यामुळे शरीरक्रिया व्यवस्थित होते. आरोग्य चांगले राहते. अपचन झाल्यास पाणी पिण्यामुळे फायदा होतो. जेवण झाल्यावर एक तासाने पाणी पिल्यास शरीराला ताकद मिळते.
शरीराची काळजी घेणे हे एकंदरीत आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीसाठी अत्यंत आवश्यक आहे. काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:
1. संतुलित आहार:
- आहारामध्ये फळे, भाज्या, धान्ये, प्रथिने आणि हेल्दी फॅट्स यांचा समावेश असावा.
- प्रक्रिया केलेले (Processed) अन्न आणि जंक फूड टाळा.
- पुरेसे पाणी प्या.
2. नियमित व्यायाम:
- दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.
- व्यायाम प्रकारात चालणे, धावणे, योगा, किंवा आपल्या आवडीच्या ऍक्टिव्हिटीचा समावेश असू शकतो.
3. पुरेशी झोप:
- दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
- झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा इतर स्क्रीनचा वापर टाळा.
4. ताण व्यवस्थापन:
- योगा, ध्यान (Meditation) किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम करून ताण कमी करा.
- आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवा.
5. नियमित तपासणी:
- डॉक्टरांकडून वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्या.
- लसीकरण वेळेवर करा.
6. स्वच्छता:
- शरीराची नियमित स्वच्छता ठेवा.
- नियमितपणे हात धुवा.
7. व्यसनांपासून दूर राहा:
- धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
हे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकता.
आरोग्य हीच संपत्ती आहे!