भाषांतर किंवा अन्यभाषिक अनुवाद याचे कार्यानुसार दोन मुख्य प्रकार ठरतात : छायानुवाद आणि भावानुवाद.
भाषांतर किंवा अन्यभाषिक अनुवाद याचे कार्यानुसार दोन मुख्य प्रकार ठरतात : छायानुवाद आणि भावानुवाद. प्रथम काही उदाहरणे घेऊ : (१) मराठी : मामा, इंग्लिश छायानुवाद : mother’s brother, भावानुवाद : uncle (२) इंग्लिश : I don’t have a penny, मराठी छायानुवाद : ‘माझ्याजवळ पेनीसुद्धा नाही’, भावानुवादः ‘माझ्याजवळ छदाम नाही’. मूळ ‘ रूप १ ⟶ अर्थ १’ या जोडीला उद्देशून आपल्याला दोन प्रश्न विचारता येतात : (१) रूप १ मुळे कोणता अर्थ १ व्यक्त होत आहे, हे भाषा २ मधून सांगा. ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे छायानुवाद. उदा., एखाद्या दस्तऐवजाचा तर्जुमा मागितला, किंवा सटीक आवृत्तीत मूळ संस्कृतचा मराठीत किंवा जुन्या मराठीचा आधुनिक मराठीत अर्थ घ्यायचे ठरवले, तर त्या ठिकाणी छायानुवादाची अपेक्षा असते. (२) उलट रूप १ मुळे व्यक्त होणारा अर्त १ हाच भाषा २ मधून कसा व्यक्त करता येईल? त्याची पुन्हा अभिव्यक्ती कशी करता येईल ? ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे भावानुवाद. उदा., प्रवाशाच्या मार्गदर्शिकेत रस्ता कसा विचारायचा, किंवा द लॉर्ड्स प्रेयर ही ख्रिस्ती प्रार्थना मराठीत कशी करायची, हे सांगायचे तर भावानुवादाची अपेक्षा असते. भावानुवादाचे टोकाचे उदाहरण म्हणजे एखाद्या कवितेची दुसऱ्या भाषेत पुनर्निर्मिती, किंवा एखाद्या नाटकाचे दुसऱ्या भाषेत आणि दुसऱ्या वेषात रूपांतर. छायानुवाद करताना तो ज्या भाषेत करावयाचा त्या भाषेची प्रकृती सांभाळण्याचे बंधन एवढे नसते. अर्थ १ व्यक्त झाला ना मग रूप २ सुघड नसले तरी चालेल अशी भूमिका असते. ‘हे भाषांतर आहे असे वाटतच नाही’, असे स्तुतिदाखल म्हणायचे ते भावानुवादाबद्दल छायानुवाद हा बोलूनचालून छायेसारखा असायला हवा. भावानुवाद करताना अर्थ १ शी इमान व त्याचवेळी भाषा २ शी इमान अशी तारेवरची कसरत असते. ‘भाषांतरे आणि बायका एक आकर्षक तरी असतात, किंवा एकनिष्ठ तरी असतात-दोन्ही असणे कठीण!’ ह्या फ्रेंच भाषेतील उक्तीमध्ये बरेच तथ्य आहे, असे भाषांतराच्या संबंधात तरी म्हणावे लागते.
एक भाषा दुसऱ्या भाषेतून उसनवारी करते, हाही एक अनुप्रेषणाचाच प्रकार म्हणायचा. ही उसनवारी साक्षात असेल (उदा., हिंदीमधून ‘bidi’, किंवा संस्कृतमधून ‘ahimsa’ ही इंग्लिश भाषेने केलेली उसनवारी), किंवा छायानुवादी असेल (उदा., अहिंसा ऐवजी ‘non violence’), किंवा भावानुवादी असेल (उदा., बीडी ऐवजी ‘leaf cigarette’).
यंत्रद्वारा भाषांतर : ह्या सर्वांवरून लक्षात येईल की, अनुवाद करणे सोपे नसेल. तरी छायानुवाद करायचा आणि तोही साहित्यापासून दूर अशा तांत्रिक, शास्त्रीय मजकुराचा करायचा तर तो बराचसा यांत्रिक पद्धतीने भागते. शास्त्रीय मजकुराची निर्मिती प्रचंड आणि विविध भाषांमधून होते आहे. शास्त्रीय ज्ञान असलेले भाषांतरकर्ते पुरेसे नाहीत. मात्र भाषांतराची निकड तर जास्त आहे. ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाढी मग ह्यापुढचा विचार आला, की यंत्रद्वारा भाषांतरकार्य करवून घेता येईल काय?- गणकयंत्राचा वापर वाढल्यावर अमेरिका, इंग्लंड आणि रशिया ह्या देशांत १९५०-६० या दशकात ह्या दिशेने बराच शोध घेण्यात आला. पण भाषारचनेची गुंतागुत पहाता हे काम वाटले तेवढे सोपे नाही, असे लक्षात आले. ललित किंवा वैचारिक वाङ्मयाची गोष्ट सोडूनच द्या, पण तांत्रिक वा शास्त्रीय वाङ्मयाचेही फार तर ओबडधोबडच भाषांतर सध्या तरी हाती येऊ शकेल, ह्या गोष्टी ध्यानात आल्या आणि सुरूवातीचा उत्साह नंतर टिकलेला नाही. गणकयंत्राची क्षमता सतत वाढते आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मंडळी तिकडे वळतील, असे दिसते आहे.