3 उत्तरे
3 answers

लहान मुलांना जंतावरील घरगुती औषध सांगा?

7
खरे तर वर्षभरात कधीही पोटातील जंतांचा त्रास होऊ शकतो. पण पावसाळा सुरू झाला की, जंतांचा त्रास हमखास वाढताना दिसतो. अस्वच्छतेमुळे असेल, पण ग्रामीण भागातील मुलांना हा त्रास अधिक होतो. आणखी एक गोष्ट, केवळ मुलांनाच जंतांचा त्रास होतो असे नाही, मोठ्यांनाही तो होऊ शकतो.

खरे तर वर्षभरात कधीही पोटातील जंतांचा त्रास होऊ शकतो. पण पावसाळा सुरू झाला की, जंतांचा त्रास हमखास वाढताना दिसतो. अस्वच्छतेमुळे असेल, पण ग्रामीण भागातील मुलांना हा त्रास अधिक होतो. आणखी एक गोष्ट, केवळ मुलांनाच जंतांचा त्रास होतो असे नाही, मोठ्यांनाही तो होऊ शकतो.


मुलांना पोटात दुखण्याचा त्रास होत असेल, मळमळल्यासारखे वाटत असेल, त्याचवेळी पोटात एखादा गोळा फिरल्यासारखे वाटत असेल, पातळ जुलाब होत असतील तर त्याला जंत झाले आहेत असे समजायला हरकत नाही. मोठ्या आकाराचे जंत पोटाच्या आतड्यांमध्ये राहून तिथे एका विशिष्ट प्रकारचा गोळा तयार करतात, त्याने हे त्रास होतात. मूल व्यवस्थित आहार घेत असूनही अशक्त दिसत असेल, पोट मोठे दिसत असेल, छोटे मूल तोंडातून सतत फेस काढत असेल, बारीक ताप सतत असेल तरी जंतांची शक्‍यता लक्षात घ्यायला हवी. चेहऱ्यावर पांढरे डाग दिसत असतील, मुलांना वारंवार खोकला होत असेल, अंगाला खाज सुटत असेल, गुदद्वारापाशी खाज असेल, तर त्या मुलांच्या पोटात जंत वाढल्याचे ते लक्षण असू शकते. मुलांना जंत होणे ही आपल्याकडची एक महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात साधारण ऐंशी ते नव्वद टक्के मुलांच्या पोटात जंत असतात. जर पोटात जंत असतील तर आपण खातो त्यातले बरेचसे अन्न पोटातले जंतच खाऊन टाकतात. साहजिकच जंतांचा त्रास असणाऱ्यांमधील बरेच लोक अशक्त, कुपोषित होतात. हे जंत रक्त शोषण करतात, तसेच अन्नाचे लोहात रुपांतर करण्यासही अडथळा आणतात. परिणामी शरीराला लोहाची कमतरता निर्माण होते. मोठ्या आकाराच्या जंतांवर वेळीच उपाय न केल्यास ते गोळा तयार करून आतड्याची वाट बंद करतात. अशा वेळी उलट्या व पोटदुखी होऊन प्रसंगी मृत्यू येऊ शकतो.

पूर्वी लहान मुलांच्या पोटात जंत होऊ नयेत यासाठी घरगुती औषधे दिली जात असत. आता प्रभावी औषधे निघाली असली तरीही पुरेशी माहिती नसल्याने ती मुलांना दिली जातातच असे नाही. जंक फूडचा शरीरावर होणारा मारा, खालावलेली रोगप्रतिकारशक्ती, पालेभाज्या-फळे यांचे आहारातील घटलेले प्रमाण, यामुळे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत जंत होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छतेच्या सवयी चांगल्या नसतील तर हातावाटे जंतू शरीरात शिरकाव करतात. ज्यांना अनवाणी चालण्याची सवय असते, त्यांच्या पायाच्या भेगांमधून शरीरामध्ये जंतू जाण्याची शक्‍यता असते.

जंत होतात कसे?
  विष्ठेतून जंतांचा प्रसार होतो. जंतांची अंडी, अळ्या विष्ठेतून बाहेर पडतात. ग्रामीण भागात शौचालयांची कमतरता असल्याने उघड्यावर संडास केला जातो. त्या वेळी ही अंडी, अळ्या यांचा प्रसार होतो. पावसाच्या पाण्याने ती इतरत्र पसरतात व पावलांच्या भेगांतून, नखांतून, हाताच्या तळव्यावरून ती आपल्या शरीरात प्रवेश करतात. पावसाळ्यात जंत होण्याचे प्रमाण वाढण्याचे हेही एक कारण आहे.
  दूषित अन्नाच्या सेवनाने किंवा दूषित पाणी पिल्यामुळे पोटामध्ये जंत होतात.
  थंड पाणी, दही, दुधापासून बनवलेले पदार्थ, मिठाया, कच्च्या पालेभाज्या, वनस्पती तुपात तळलेले पदार्थ यांच्या सेवनामुळे जंत होण्याची शक्‍यता असते.
  डुक्कर, गाय-बैल यांसारख्या प्राण्यांच्या मांसाच्या सेवनाने जंत होऊ शकतात.

जंत-कृमींचे प्रकार
जंतांचे मुख्य दोन प्रकार आहेत. त्यातील मुख्यत: पचनसंस्थेत वाढणाऱ्या जंतांनाच जंत म्हटले जाते. यकृत, स्नायू अशा इतर ठिकाणी वाढणारे जंत आपण सहसा विचारात घेत नाही. पचनसंस्थेच्या जंतांचे चार-पाच प्रकार आपल्या देशात आढळतात. या सर्व जंतांची अंडी सर्वसाधारणतः विष्ठेतून सगळीकडे पसरतात. या अंड्यांतून सूक्ष्म कृमी बाहेर पडून तोंडावाटे अथवा त्वचेवाटे परत शरीरात प्रवेश करतात आणि नवीन माणसाला जंतांची बाधा होते. यांतले काही जंत त्यांच्या जीवनचक्रात रक्तावाटे फुप्फुसात येतात. त्यामुळे काही श्वसनाचे विकार होतात, खोकला येतो. 

आयुर्वेदात जंत-कृमींचा विचार करण्यात आलेला आहे. बाह्यकृमी व अभ्यंतर कृमी असे मुख्य दोन प्रकार करण्यात आले आहेत. बाह्य कृमींमध्ये उवा-लिखा यांसारख्या कृमींचा समावेश करण्यात आला आहे. तर अभ्यंतर कृमी, शरीराच्या आतील कृमींमध्ये आतड्यात, पचनसंस्थेत, रक्‍तामध्ये, रक्‍तांच्या शिरांमध्ये, मलामध्ये उत्पन्न होणाऱ्या कृमींचा समावेश करण्यात आला आहे. या अभ्यंतर कृमींचा आकार, त्यांचे असण्याचे स्थान याच्या आधारे उपप्रकार करण्यात आले आहेत.

यातील रक्‍तज कृमी आकाराने खूप बारीक, गोल असतात. सूक्ष्म स्वरूपी असे हे कृमी रक्‍तामध्ये उत्पन्न होत असतात. जखमेमध्ये यांचा संपर्क झाल्यास वेदना, सुजणे, दाह, खाजणे, पू होणे, जखम चिघळणे अशा तक्रारी आढळतात. चिघळलेल्या जखमांमध्ये हे कृमी कालांतराने त्वचा, मांस, स्नायू यांचाही नाश करू शकतात. या रक्‍तज कृमींचा आपण येथे विचार केलेला नाही.

कफज कृमीमध्ये पचनसंस्थेच्या पहिल्या भागातील कृमी आणि आतड्यातील व मलातील कृमी यांचा समावेश होतो. कफज कृमींच्या आकारात विविधता असते. पांढऱ्या रंगाचे, स्नायूप्रमाणे चपटे, गोल, गांडुळाप्रमाणे लांब, बारीक ठिपक्‍याप्रमाणे, धाग्यांप्रमाणे दिसणारे, लहान अथवा मोठे लांबडे अशा विविध प्रकारातील हे कृमी पचन संस्थेच्या सुरुवातीच्या भागात असतात. ते अति वाढल्यास तोंडाकडे अथवा खालच्या बाजूला पसरतात, मळमळणे, तोंडाला पाणी सुटणे, पचन न होणे, चव कमी होणे, उलटी होणे, बारीक ताप येणे, पोट फुगणे, काही वेळा  शिंका-सर्दी या तक्रारी असतात. लहान मुलांत पोट मोठे दिसणे, पातळ जुलाब होणे, कधी कधी उलटी होणे, अंग खाजणे, चेहऱ्यावर पांढरे डाग दिसणे, गुदद्वाराची जागा खाजणे, खाणे नको वाटणे, तर काही जणांत सारखी खा-खा होणे, तब्येत न सुधारणे या तक्रारी आढळतात.

आतड्यातील व मलातील कृमी हे प्रामुख्याने शिळे, नासलेले, बिघडलेले अन्न खाणे, माती खाणे, अशुद्ध पाणी पिणे या कारणांनी उत्पन्न होतात. आतड्यामध्ये राहणारे हे जंत थोडे मोठे, लांब असतात. यांचा रंग काळा, पिवळा, सफेद, निळा असतो. संडासला पातळ होणे किंवा अजिबात साफ न होणे, पोटात दुखत राहणे, भूक कमी लागणे, अंगाला खाज सुटणे, निरुत्साह, त्वचा निस्तेज रुक्ष होणे, रक्‍ताचे प्रमाण घटणे, गुदद्वाराच्या जागी खाज येणे या तक्रारी असतात. काही जणांचे वजन घटते. या कृमींकडे दुर्लक्ष केल्यास यातूनच ॲनिमिया, यकृताची वाढ होणे, पोटात पाणी होणे, अंगावर सूज येणे, काही वेळा हृदयविकार जडणे हे आजार उद्भवतात.

जंत झाल्याचे कसे ओळखावे?
  मोठे जंत (गोल जंत), लहान जंत (कृमी) हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. अशी मुले अशक्त असतात. ही मुले लवकर दमतात. त्यांच्या शरीराची वाढ खुंटू शकते. मूल अशक्त असेल, पोट मोठे असेल, ते लवकर दमत असेल, त्याच्या शरीराची वाढ योग्य तऱ्हेने होत नसेल, तर जंत झाल्याचे ओळखावे.
  पोटात बारीक दुखत राहणे हे एक लक्षण आहे.
  पातळ भसरट जुलाब होणे, शौचास साफ न होणे. उलट्या होणे.
  कधी कधी मोठे जंत खूप झाल्याने आतड्यात ते एक प्रकारचा गोळा तयार करतात. असा गोळा पोटात फिरत असल्याची भावना होणे हे जंत झाल्याचे चिन्ह असते.
  आकडेकृमी आतड्यांतून रक्त शोषतात. त्यामुळे अनिमिया होतो. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्याने चेहऱ्यावर पांढरे डाग दिसू लागतात.
  काही प्रकारच्या कृमींमुळे गुदद्वाराजवळ खाज सुटते. कारण बारीक कृमी अंडी घालायला गुदद्वाराशी येतात.

फुफ्फुसाच्या आजाराची शक्‍यता
पोटात जंत झाले की फुफ्फुसाचे आजारही होऊ शकतात, हे आता लक्षात आले आहे. हा त्रास छोट्यांबरोबर मोठ्यांनाही होऊ शकतो. काही प्रकारच्या कृमी आतड्यातून मलाद्वारे खाली न जाता, उलट्या बाजूने प्रवास करीत फुफ्फुसांत जातात. तिथे त्या राहिल्याने श्वसनमार्गाचे विविध प्रकारचे त्रास वाढवतात. अशा वेळी श्वसनाच्या आजारावर औषधोपचार करावे लागतातच, पण या कुटुंबातील सर्वांनीच सहा महिन्यांतून एकदा जंतांचे औषध घ्यायला हवे.

काय कराल उपाययोजना?
  सर्व जंतांचे जीवनचक्र अस्वच्छतेवर अवलंबून असते. मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावली गेली तर जंतांची बाधा सहसा होत नाही. म्हणून जंतांच्या उच्चाटनासाठी मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लागली पाहिजे. घरोघरी सुरक्षित शौचालये हाच यावरचा मुख्य उपाय आहे. तसेच शौचावरून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुणेही आवश्‍यक.

  याबरोबरच कृमींवरील उपचार करताना ते पुन्हा होऊ नयेत म्हणून कृमींच्या निर्मितीची कारणे टाळणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. पचन ठीक नसतानाही जेवण करणे, आहारात आंबट, गोड, खारट पदार्थ जास्त वारंवार खाणे, लहान मुलांत चॉकलेट, गोळ्या, कॅटबरी, बिस्किटे, आइस्क्रीम इत्यादींचा अतिरेक; शिळे, उघड्यावरील, बिघडलेले पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, न पचणाऱ्या पदार्थांचे वारंवार सेवन करणे, पालेभाज्या पूर्ण स्वच्छ न धुता खाणे, फ्रूट सॅलेड वारंवार खाणे, अशुद्ध मटण, चिकन, धाब्यावरील शिळे पदार्थ, गूळ, दही, दूध एकत्र खाणे, माती ही कृमी उत्पन्न होण्याची मुख्य कारणे असतात. पचनशक्‍ती कमी असताना म्हणजेच अग्निमांद्य झाले असताना अशा आहाराचे सेवन टाळायलाच हवे.

  डुक्कर, गाय-बैल, कोंबडी यांचे मांस नीट न शिजल्यामुळे विशिष्ट प्रकारचे लांब जंत (टेप वर्म) आतड्यामध्ये तयार होतात. म्हणून मांस कुकरमध्ये चांगले शिजवणे हाच यावरचा हमखास प्रतिबंधक उपाय आहे.

  नखे वारंवार कापणे, काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुणे उत्तम.

घरगुती उपाय
  रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घेण्याने जंतांचे त्रास कमी होतात. लहान मुलांसाठी दूध तयार करताना त्यात वावडिंगाच्या बिया उकळून ते दूध द्यावे. बिया दोन-तीन तास आधीच भिजवून ठेवल्यावर त्याचे सत्व दुधात लवकर मिसळते. तयार विडंगारिष्टही वापरता येईल. विडंगारिष्ट अर्धा ते तीन चमचे दिवसातून दोन वेळा पाजावे. देताना दोन-तीन आठवडे रोज द्यावे. नंतर तीन-चार आठवड्यांचा खंड पाडावा असा दोन-तीन वर्षांपर्यंत हा क्रम ठेवावा. या उपायाने जंत होणार नाहीत.

  जेवणानंतर ताकात बाळंतशोप, बडीशेप, ओवा व हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून घेण्यानेही जंत कमी होतात.

  शेवग्याच्या शेंगा उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ व मिरे पूड टाकून घेण्याने जंत कमी होतात. मुलांच्या आहारात सौम्य कडू रस (उदा. शेवग्याच्या पाल्याचा रस व मध) जाईल हे पाहावे.

  जंत होऊ नये म्हणून आहारात कढीलिंब, ओवा, हिंग, मिरी, हळद, जिरे, सैंधव मीठ, शेवगा, दालचिनी, मुळा, मोहरी या गोष्टींचा आहारात नियमितपणे समावेश करावा.

  कारल्याच्या पानांचा रस पिणे, मुळ्याचा रस व मध एकत्र करून घेणे यामुळे जंत पडण्यास मदत होते.

  कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण व हिंग यांचे मिश्रण मधासह घेण्याने जंतांचा नाश होतो.

  डाळिंबाची साल वाळवून त्याचे चूर्ण करून रोज अर्धा चमचा इतक्‍या प्रमाणात घेतले तर जंतांचे प्रमाण कमी होते.

  खाजकुयलीची कुसेही जंत पाडण्यासाठी उपयुक्त आहेत. याच्या एका शेंगेवरील कुसे खरवडून काढून गोटीइतक्‍या गुळामध्ये मिसळून रात्री खायला द्यावे. गुळाऐवजी एक चमचा मधही चालेल. दुसऱ्या दिवशी त्रिफळा चूर्णासारखे सौम्य रेचक द्यावे. याने गोल जंत पडतात. खाजकुयलीची कुसळे, तळहात, तळपाय याशिवाय इतरत्र त्वचेवर लागली तर तीव्र आग होते. म्हणून कुसळे खरडताना ती वाऱ्यावर उडणार नाहीत याची काळजी घ्यावी.

  रोठा सुपारी भांडेभर पाण्यात घालून ते पाणी पाव होईपर्यंत उकळून काढा करावा. हे पाणी प्यायल्याने कृमींचा नाश होतो.

  वारंवार जंत होण्याची सवय मोडण्यासाठी जेवणानंतर एक-दोन लवंग किंवा दालचिनीचा छोटा तुकडा चघळावा.

  लसणाची एक पाकळी तुपात तळून सकाळ-संध्याकाळ महिनाभर घ्यावी, म्हणजे जंत होण्याची शक्‍यता कमी होते.

  रोज चार ते पाच कडीपत्याची ताजी पाने चावून खाल्ल्यास बारीक दोऱ्याप्रमाणे दिसणारे जंत मलावाटे पडून जातात.

  मेथी, कारले, सिमला मिरची या भाज्या नेहमी आहारात असाव्यात, यामुळे पोटात जंत होत नाहीत.

जंत पडण्यासाठी औषधे
तात्पुरता उपचार म्हणून जंत पडून जाण्यासाठी औषध द्यावे. जंतांवर बेंडाझोल गोळ्या गुणकारी आहेत. डोस दिवसातून दोन गोळ्या याप्रमाणे तीन दिवस घेता येतो. अलबेंडा औषध याच जातीचे आहे. पण त्याची एकच गोळी किंवा डोस पुरतो. बेंडाझोलपेक्षा हे औषध थोडे महाग पडते. या औषधांमुळे जंत मारले जातात, मात्र ते मलाद्वारे बाहेर पडतातच असे नाही. त्यासाठी या गोळ्यांबरोबर एरंडेल, त्रिफळा चूर्ण किंवा तसेच एखादे रेचक द्यावे, म्हणजे जंत बाहेर पडतात.

टेपकृमीवर प्राझीक्वांटेल गोळीचा एकच डोस पुरतो. हे प्रभावी औषध आहे. आरोग्य विभागातर्फे दिले जाणारे अल्बेडेंझॉलही प्रभावी आहे. हे औषध सर्व वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित असून, यामुळे रोगप्रतिकारशक्ती व पचनशक्ती वाढण्यासही मदत होते. त्यामुळे ग्रामीण भागात प्राथमिक शाळा व अंगणवाड्या यांमधील मुलांना पावसाळ्यात हे औषध आरोग्य विभागातर्फे दिले जाते. आजारी बालकांना जंतनाशकाची गोळी दिली जात नाही. या जंतनाशक औषधांमुळे किरकोळ स्वरूपाचे दुष्परिणाम होताना दिसतात. त्यात सौम्य प्रमाणात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोकेदुखी, पोटदुखी व थकवा यांचा समावेश आहे. हे दुष्परिणाम जंत संसर्गामुळे व त्यावर होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होतात. कल्केरिया कार्ब, सीना, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर यांसारख्या होमिओपॅथी औषधांचाही वापर करता येईल.
उत्तर लिहिले · 29/6/2020
कर्म · 8110
3
*पोटातली कृमी*

▪पळसाचे बी, हिंग, ओवा, कापूर एकत्र करून कृमिकुठार नावाचे औषध बनते. याच्या (250मि.ग्रॅ.च्या) दोन गोळया रोज रात्री याप्रमाणे आठवडाभर घ्याव्यात.

▪ लहान मुलांसाठी दूध तयार करताना त्यात वावडिंगाच्या बिया उकळून ते दूध द्यावे. वरचा आहार चालू करताना म्हणजे सहा महिन्यांनंतर पाच बिया वापराव्यात.  दोन वर्षापर्यंत वाढवत 25 बियांपर्यंत न्यावे. याचा अर्थ असा, की दिवसभराच्या द्यायच्या वरच्या दुधात 5 ते 25 बिया वापराव्यात. बिया दोन-तीन  तास आधीच भिजवून ठेवल्यावर त्याचे सत्व दुधात लवकर मिसळते.

▪पोटात कृमींचा त्रास लहान मुलांप्रमाणेच बर्‍याच वेळा मोठयांनाही होत असतो. यावरही वावडिंग घालून उकळलेले पाणी १५ दिवस पिण्याने उपयोग होतो. दुसरा उपाय म्हणज रोठा सुपारी भांडंभर पाण्या घालून ते पाणी पाव होईपर्यंत उकळुन काढा करावा.हे पाणी प्यायल्याने कृमींचा नाश  होतो.
उत्तर लिहिले · 30/6/2020
कर्म · 340
0
जंतूंवर उपचार करण्यासाठी काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत:

लहान मुलांसाठी जंतांवर उपचार करण्यासाठी काही घरगुती उपाय:

  • ओवा: ओव्यामध्ये अँटी हेल्मिंटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे जंतू मारण्यास मदत होते.

    उपयोग: एक चमचा ओव्याचा रस मधासोबत mix करून मुलांना द्या.

  • लसूण: लसणामध्ये सल्फर नावाचे तत्व असते, जे जंतूंना मारण्यास मदत करते.

    उपयोग: लसणाच्या दोन पाकळ्या बारीक करून पाण्यात उकळा आणि ते पाणी मुलांना प्यायला द्या.

  • हळद: हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्व असते, जे जंतूंना वाढू देत नाही.

    उपयोग: एक चमचा हळद पावडर कोमट पाण्यात मिक्स करून मुलांना प्यायला द्या.

  • कडुलिंब: कडुलिंबामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात.

    उपयोग: कडुलिंबाच्या पानांचा रस मुलांना प्यायला द्या किंवा कडुलिंबाची पाने वाटून लेप जंत झालेल्या जागी लावा.

इतर उपाय:

  • मुलांना भरपूर पाणी प्यायला द्या.
  • मुलांना संतुलित आहार द्या.
  • मुलांची स्वच्छता राखा.

जर घरगुती उपायांनंतरही आराम नाही मिळाला, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पाच वर्षाच्या बाळाला झोपेत कधीही अचानक आकडी येते, यावर आयुर्वेदिक उपचार सांगा?
माझ्या लहान मुलाला (दीड ते दोन वर्ष) सर्दी आणि खोकला भरपूर प्रमाणात आहे. औषधं दिली, तरी काही कमी होत नाही, त्यासाठी काही घरगुती उपाय कोणते?
२ ते ३ वर्षातील मुलांसाठी खोकला व कफावरील अचूक उपाय सांगा?
लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी काय करावे?
गाढविणीचे दूध लहान बाळांना का पाजावे आणि सहा महिने वय असलेल्या बाळाला ते दूध पाजणे योग्य आहे का?
माझ्या ६ महिन्याच्या मुलाला खूप लूज मोशन होत आहे, काही आयुर्वेदिक उपाय सांगा?
लहान मुलांना जास्त ताप आल्यास काही घरगुती उपाय आहेत का? तसेच, डॉक्टरांकडे दाखवले आहे, पण मुलांना अचानक रात्री ताप आल्यास काय करावे?