व्याकरण

पैसा-आडक्यामध्ये आडका म्हणजे काय?

1 उत्तर
1 answers

पैसा-आडक्यामध्ये आडका म्हणजे काय?

3
अडका 'शब्द नेहमी ' पैसा ' या शब्दाच्या जोडीने येतो. क्वचितच एकट्याने किंवा स्वतंत्र पणे 'अडका ' शब्द येतो. उदा. 'पैसा अडका'. असे 'पैसा' च्या जोडीने 'अडका' वापरण्याचे कारण अडका जुन्याकाळी एक तांब्याचे पैशाचे नाणे - चलनी एकक (युनीट) होते.

अडका— म्हणजे अर्धा रुका , अर्धा पैसा होता आणि अर्धा आणा ही. सामन्यतः दाम,पैसा, सोंने, द्रव्य , धन, पैसा अडका, संपत्ति.

त्यात अडका ऐवजी अटका (अर्धा टका) असा ही पाठभेद आहे. [ अटका = अर्धा टका ]

कुठे कुठे अडका म्‍हणजे रूक्याचा चतुर्थांश असा उल्लेख येतो.

हा रुक्का किंवा रूका म्हणजे एक आण्याचा बारावा भाग, त्यालाच पै म्हणतात.

अरबीत याला रुकआ शब्द आहे तर तुलनेत संस्कृत मधे याला रुक्म म्‍हणजे सोने असा शब्द आहे. बँकिंग परिभाषेत रुक्का म्हणजे प्रोनोट, वचन-पत्र. पत्र, रोखा, पत्ता, कोष्टक, यादी. शादीचा रुका.

संस्कृत मधे अर्द्ध रूका आणि अर्द्धक अशी 2 नावे आहेत. अडका हे त्याचे प्राकृत रूप वाटते .



एक पैसा संग्रह - 

पैशाच्या संदर्भात आजही आपण जुन्या चलनी नाण्याचा त्यातल्या त्यात कमी मुल्याच्या- कमी किंमतीच्या नाण्याचा उल्लेख करीत असतो. उदा. कवडी, दमडी, दिडकी, पै , पैसा, ढबू पैसा, शिवराई, आणा, पावली, चवली रुपया इ. वापर - माझ्याकडे आज एक फुटकी कवडी ही नाही खर्चायला . कवडी किंमतीला माल घेऊन घेऊन साठेबाज नंतर टंचाईच्या काळात भरपूर नफा कमावतात. पैशाला पासरी = अत्यंत स्वस्त. दमडीची /काडीची ही अक्कल नाही त्याला = शून्य व्यवहार ज्ञान असणे. फुकट काही मिळत नाही जगात दिडक्या मोजाव्या लागतात.



राणी व्हिक्टोरिया एक रुपया, साल १८९२ -  : 

जुना रुपया सोळा आणे किंमतीचे चांदीचे नाणे असायचे . निरनिराळ्या राज्यांत व निरनिराळ्या टांकसाळीतील रुपयांना निरनिराळी नावे होती. त्यांचे प्रमाण पुढील प्रमाणे - कंपनीच्या १०० रुपयांबरोबर १०४ चांदवडी , १०४ चिंचवडी , १०६ भडोच , १०९ बडोदी , बाबाशाई , ११२ खंबायती , १०७ अमदाबादी … धन ; संपत्ति ; पैसा ; नाणे .

तसे गोंडी भाषेत अडका म्हणजे मडका / मडके आहे. उदा. 'अडका ते अडका कोसला अडका.' पण त्याचा या अड्क्याशी संबंध नाही. आणखी रुका हे जमीन मोजण्याचे परिमाण होते. जमीनीच्या मोजमापांत अर्धा रुका ही ६५ बिघे विस्ताराची जमीन असते. पण या मापात काही संगती किंवा एकवाक्यता दिसत नाही. हे अडीच 2.5 बिघ्यांपर्यंत ( २॥ , ५ , ८ , १० , २० ) निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे आहे. रूका म्हणजे देशात कुठे पाच बिघे , तर कुठे आठ बिघे, तर कुठे दहा बिघे- तर कुठे फक्त अडीच बिघे आणि काही ठिकाणी तर वीस बिघे असे माप असे.

अडका शब्द असलेल्या काही म्हणी वाक्प्रचार :

हाती नाही अडका बाजारात चालला धडका = जवळ पैसे नसताना निर्धन माणुस खरेदीस जातो.

अडक्याची देवता / भवानी सापिक्याचा शेंदूर = देवमूर्तीपेक्षां देवाला सेंदूर फासण्यालाच जास्त खर्च. [ सापिका = एक नाणें, शिवराई. अडका = अर्धा पैसा. ]

जळला तुमचा अडका माझा मुलगाच लाडका = पैशापेक्षा मुल महत्वाचे असणे .

अटक्याची /अडक्याची कोंबडी आणि टका फळणावळ = लहानशा कार्याला फार खर्च झाला म्हणजे म्हणतात. समान म्हण = दमडीची कोंबडी अन रुपयाचा मसाला .

अडक्याची केली वाण, लोणच्याची केली घाण = थोडीशी काटकसर करण्याकरितां लोणच्यामध्यें पुरेसें मीठ वगैरे टाकलें नाहीं तर तें सर्व लोणचें खराब होतें. त्या प्रमाणें एखाद्या क्षुल्लक बाबीकडे जरुर तेवढें लक्ष्य न दिल्यामुळें किंवा एखाद्या किरकोळ बाबतींत कंजुषपणा दाखविल्यामुळें एखादे वेळीं मोठें कार्य ही बिघडून जातें अशावेळीं ही म्हण वापरतात.

पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला = जवळचें सर्वं जाऊन पुन्हां मानहानीचा प्रसंग येणें, सर्वस्व गमावून नाकदुर्‍या काढण्याची वेळ येणें.

अडक्याचं दिडकं, पैशाचं सव्वा शेर = ज्याला हिशेब करतां येत नाहीं त्याची अशी समजूत करून देणें.

अडक्याचा घोडा-(लक्षणेने) = थोडक्या प्रयासानें व हलक्या मोलानें मिळणारी वस्तु.



HISTORICAL INDIA किंग जॉर्ज VI सिक्के सभी कलेक्शन - 10 सिक्के - क्वार्टर अन्ना, दो अन्ना, वन अन्ना, हाफ अन्ना, 1/2 पाइस, 1/12 अन्ना ( पीतल, तांबा, कॉपर निकल ) मल्टीकलर Image Credit : 
उत्तर लिहिले · 16/5/2022
कर्म · 48335

Related Questions

मराठीच्या व्याकरणाचा सुवर्णकाळ कोणत्या राजघराण्याच्या काळाला म्हटले जाते ?
रक्तदान उपक्रमामध्ये तुम्हाला व तुमच्या मित्राला सहभागी करून घेण्यासाठी विनंती पत्र कसे लिहाल?
मराठी व्याकरणासाठी चांगली pdf मिळेल काय ?
पुरुषलिंगी नामाचे अनेकवचन हे पुरुषलिंगी होते की नपुंसकलिंगी? स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन हे स्त्रीलिंगी होते की नपुंसकलिंगी?
संयुक्‍तवाक्‍य व मिश्रवाक्‍य यांच्या विषयी माहिती मिळेल का?
डाव साधने वाक्यप्रचार कोणत्या जीवक्षेत्राशी संबंधित आहेत हे सांगून त्यांचा वाक्यात उपयोग कसा कराल?
संधी म्हणजे काय? संधीचे प्रकार कोणते?