2 उत्तरे
2
answers
डास चावल्याने एड्स का होत नाही?
5
Answer link
डास जेव्हा आपल्याला चावतात तेव्हा ते आपलं रक्त शोषून घेतात. त्यामुळे ज्याला मलेरिया झाला आहे अशा व्यक्तीला डासानं चावा घेतला असल्यास मलेरियास कारणीभूत असणारे रोगजंतू त्या रक्तातून डासांच्या शरीरात शिरतात. असे डास इतरांना चावले तर त्या चाव्यातून मलेरियाचे रोगजंतू त्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात शिरतात. तिलाही मलेरियाची बाधा होते.
आपण याचा अनुभव घेतलेला असतो. तर मग असा प्रश्न पडतो, की ज्या व्यक्तीला एड्स झाला आहे अशा व्यक्तीला चावलेला डास इतर कोणाला चावला तर त्या चाव्यातून एड्सची लागण होणार नाही का? एड्स झालेल्या व्यक्तीच्या रक्तात एड्सला कारणीभूत असणारे एचआयव्ही जातीचे विषाणू वावरत असतात हे खरं आहे. म्हणून तर अशा व्यक्तीला इंजेक्शन देताना वापरलेली सिरिंज दुसऱ्या कोणाला तरी इंजेक्शन देण्यासाठी वापरली तर त्या व्यक्तीलाही एड्सची बाधा होऊ शकते. एवढंच काय, पण एड्स झालेल्या व्यक्तीची दाढी किंवा मुंडण करण्यासाठी वापरलेला वस्तरा निर्जंतुक न करता दुसऱ्यासाठी वापरला तरीही त्या वस्तऱ्याला चिकटलेल्या रक्ताच्या थेंबांमधून एचआयव्हीचा शिरकाव दुसऱ्याच्या शरीरात होऊ शकतो, तर मग तो डासांच्या चाव्यामधून का नाही होणार, हा प्रश्न म्हणूनच सयुक्तिक वाटतो. कोणतेही विषाणू परोपजीवी असतात. त्यांना जगण्यासाठी आणि आपल्या वाढीसाठी विशिष्ट यजमान पेशींची गरज भासते. एचआयव्हीचे विषाणू मानवी शरीरातल्या टी-लिम्फ पेशींना आपले यजमान बनवतात. त्यांच्या जिवावर आपली गुजराण करत ते रक्तात वाढत राहतात. अशा रक्ताचा घास जेव्हा एखादा डास घेतो तेव्हा त्यातले काही विषाणू डासाच्या शरीरात निश्चितच प्रवेश करतात; पण तिथं त्या विषाणूंना आपल्या यजमान पेशी सापडत नाहीत. डासाच्या शरीरातल्या पेशींवर ते विषाणू जगू शकत नाहीत. मलेरियाच्या रोगजंतूंच्या वाढीतला काही भाग डासाच्या शरीरातच होत असतो. त्यामुळे ते तगून राहतात. तशी परिस्थिती एड्सच्या रोग्याच्या रक्ताचा घास घेणाऱ्या डासाबाबतीत नसते. त्यामुळे डासाच्या शरीरात शिरलेल्या एचआयव्हीच्या विषाणूंची वाढ तर होतच नाही; पण डासाच्या पचनसंस्थेकडून त्या विषाणूंचं विघटन होऊन त्यांचा नायनाट होतो. त्यामुळे असा डास जेव्हा दुसऱ्या निरोगी
व्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात टोचण्यासाठी एचआयव्ही विषाणू हजरच नसतात. अर्थात, अशा डासांच्या चाव्यामुळं त्या निरोगी व्यक्तीला एड्सची बाधा होण्याची शक्यताच उरत नाही..
0
Answer link
डास चावल्याने एड्स (AIDS) होत नाही, कारण एचआयव्ही (HIV) विषाणू डासांच्या शरीरात जिवंत राहू शकत नाही आणि डासांच्या माध्यमातून मानवी शरीरात प्रवेश करू शकत नाही.
याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
-
विषाणूची प्रतिकारशक्ती: एचआयव्ही विषाणू मानवी शरीराबाहेर जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही. डासाच्या शरीरात त्याची प्रतिकारशक्ती कमी होते.
-
पचन क्रिया: डास जेव्हा रक्त शोषतात, तेव्हा ते रक्त पचवतात. या प्रक्रियेमध्ये एचआयव्ही विषाणू नष्ट होतो.
-
विषाणूची मात्रा: डासाच्या चाव्याव्दारे संक्रमित करण्यासाठी आवश्यक असणारी विषाणूची मात्रा पुरेशी नसते.
त्यामुळे, डास चावल्याने एड्स होत नाही.