मंदिर अध्यात्म देव धार्मिक

देवीची नऊ रूपे कोणती?

3 उत्तरे
3 answers

देवीची नऊ रूपे कोणती?

6
हिंदु धर्मात भगवती देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्र अधिक प्रचलित आहे. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरदऋतूच्या प्रारंभी येते. पूर्वीच्या ऋषी-मुनींनी बल संवर्धनार्थ हेच शारदीय नवरात्र पसंत केले असावे असे वाटते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते. दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते. दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेलं आढळते.


नवरात्री उत्सव दुर्गापूजा, नवरात्रोत्सव आणि त्याचे व्रत


हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. त्या दिवसापासून महाराष्ट्रात संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो. एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. पाटाभोवती फेर धरून स्त्रिया, आणि विशेषतः मुली, भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात. घटामध्ये नंदादीप प्रज्वलित करून ब्रह्मांडातील आदिशक्ति-आदिमायेची मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव. घटरूपी ब्रह्मांडात मारक चैतन्यासहित अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे अखंड तेवणाऱ्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे.

व्रत- नवरात्र हे एक काम्य व्रत आहे. पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात.तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचन पूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते. आश्विन शुद्ध नवमी अखेर हे व्रत चालते.या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात,घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात.क्वचित होमहवन व बलिदानही करतात.नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात.शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.

देवीची नऊ रूपे

सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपाची नावे असून दुर्गा, काळी,चंडी,भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.


प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री

अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
उत्तर लिहिले · 1/8/2020
कर्म · 1340
4
  • १ शैलपुत्री
पहिले रूप आहे-शैलपुत्री.शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या,मुलगी.देवीच्या या रुपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते.भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर,निडर आणि शांत होण्यास मदत होते.

  • २ ब्रह्मचारिणी
ब्रम्हचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते.ब्रम्हचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे , “आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे,आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योती स्वरूप आहे” या सजगतेसह जीवन जगत असाल तेंव्हा तुम्ही ब्रम्हचर्यात असता.

जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल.जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल-हे ब्रम्हचर्य होय.

आपण देवीच्या या रुपाची आराधना करतो तेंव्हा आपल्या मध्ये ब्रम्हचर्याचे गुण जागृत होऊ लागतात.आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते,जो आपला मूळ स्वभाव आहे.आणि जेंव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेंव्हाच आपण शूर,निडर,पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो.

  • ३ चन्द्रघंटा
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रुपाची आराधना केली जाते.या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात.चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते.चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते.देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते.

जेंव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेंव्हा आपले मन,आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिक आहे.

  • ४ कूष्माण्डा
कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते.हे पुनरुत्पादनाचे,निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे.हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे.कुश्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे.ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते.

  • ५ स्कंदमाता
स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे.बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे.सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.

स्कंद म्हणजे तज्ञ,निष्णात.सामान्यपणे जे तज्ञ,प्रविण असतात ते उद्धट असतात. पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे.

देवीच्या या रुपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात.

  • ६ कात्यायनी
देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत.कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात.विवाह म्हणजे संरक्षण,वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा.हि देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतिक आहे.

आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय.

  • ७ कालरात्रि
काल म्हणजे वेळ,समय.काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे.रात्री म्हणजे गाढ विश्रांती,शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती.विश्रांती शिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो कां?कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती.

  • ८ महागौरी
गौर म्हणजे गोरा,सफेद.सफेद रंग शुद्धतेचे प्रतिक आहे.शुद्धता निरागसतेमधून येते.महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ.महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते.


  • ९ सिद्धिदात्री
जी सर्व सिद्धी देते ती सिद्धीधात्री.जे हवे आहे,जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा,गरजेपेक्षा ज्यादा मिळणे म्हणजे ‘सिद्धी’.साधकाला अध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात.जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील.

तुम्ही स्व मध्ये स्थिर असाल तेंव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल,तेंव्हाच समतोल न ढळण्याची खात्री असेल.गुरुपरंपरेला येथे खूप महत्व आहे.साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी.सिद्धीधात्री सर्व इच्छापुर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते.गुरुकृपेमुळे “प्राविण्य आणि मुक्ती”या सिद्धीधात्रीने दिलेल्या देणग्या आहेत. 
उत्तर लिहिले · 1/8/2020
कर्म · 7815
0

देवीची नऊ रूपे (नवदुर्गा) खालीलप्रमाणे आहेत:

  1. शैलपुत्री: ही देवी पार्वतीचा अवतार आहे आणि हिमालय पर्वताची मुलगी आहे.
  2. ब्रह्मचारिणी: ही देवी तपश्चर्या आणि धैर्याचे प्रतीक आहे.
  3. चंद्रघंटा: ही देवी शांती आणि कल्याणाचे प्रतीक आहे. तिच्या मस्तकावर चंद्राच्या आकाराचा घंटा आहे.
  4. कुष्मांडा: या देवीने आपल्या हास्याने ब्रह्मांड निर्माण केले असे मानले जाते.
  5. स्कंदमाता: ही देवी कार्तिकेय (स्कंद) ची आई आहे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे.
  6. कात्यायनी: ही देवी योद्धा आणि धैर्याचे प्रतीक आहे.
  7. कालरात्री: ही देवीDarkness आणि वाईटाचा नाश करणारी आहे.
  8. महागौरी: ही देवी शांती आणि सौंदर्याचे प्रतीक आहे.
  9. सिद्धिदात्री: ही देवी सर्व प्रकारच्या सिद्धी (अलौकिक शक्ती) प्रदान करते.

हे Navadurga नवरात्रीच्या नऊ रात्रींमध्ये पूजले जातात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2200

Related Questions

आदिनाथ देवा बद्दल माहिती द्या?
ज्ञानेश्वरी मध्ये काय आहे?
निवृत्ती नाथ दिंडी शास्र?
वारकरी संप्रदायाचा आचारधर्म स्पष्ट करा?
मोक्षावर टीप लिहा?
विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?