कोंबड्यांना झालेल्या देवी रोगावर काय इलाज करावा?
कोंबड्यांचे करा रोगांपासून संरक्षण
हिवाळ्यात इतर सर्व जनावरांप्रमाणे कोंबड्यांनासुद्धा रोग होतात. कोंबड्यांमध्ये रोगांचा प्रसार होण्याचे प्रमाण खूप अधिक असते. त्यामुळे कुक्कुटपालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे रोगांची लक्षणे, नियंत्रण यासंबंधी माहिती घेणे आवश्यक ठरते.
कोंबड्यांमध्ये ५ प्रकारचे रोग प्रामुख्याने आढळतात.
१) विषाणूजन्य २) जिवाणूजन्य ३) बुरशीजन्य ४) परोपजीवी जंतू ५) कमतरतेमुळे होणारे रोग
वरील सर्व रोग हे जैविकजन्य आहेत. याशिवाय कोंबड्यांमध्ये भौतिकजन्य, रासायनिकजन्य, आहारजन्य रोग उद्भवतात.
भौतिक जन्य : तापमान थंड किंवा गरम, दाब कमी किंवा जास्त झाल्यामुळे होणारे रोग.
रासायनिकजन्य रोग : आम्ल, अल्कली व विषबाधेमुळे होणारे रोग.
आहारजन्य रोग : आहाराच्या व आहारातील विविध घटकांच्या कमतरतेमुळे उद्भवणारे रोग.
जैविक जन्य आजार हे जिवाणू, विषाणू, बुरशी, परोपजीवी यांच्यामुळे उद्भवतात.
विषाणूजन्य आजार :
१) राणीखेत : हा पिलांना होणारा घातक रोग आहे. या विषाणूची लागण झाली, तर पिलांमध्ये मरतुकीचे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत वाढते.
प्रसार :
- रोगाच्या विषाणूंचा प्रसार आजारी पक्ष्यांच्या विष्टा व मलमूत्रातून होतो. रोगाने मेलेली कोंबडी कुत्री, मांजरे, कावळे आदी पशुपक्षी खाऊन त्याचा प्रसार करतात.
- पोल्ट्री फार्ममध्ये काम करणारे कर्मचारी, भेट द्यायला आलेले पाहुणे यांच्यामार्फत सुद्धा रोगाचा प्रसार होतो.
- पक्ष्यांचे होणारे स्थलांतरण हा या रोगाला पसरविण्याचा खूप मोठा मार्ग आहे.
लक्षणे :
- कोंबड्यांना सपाटून ताप येणे
- हिरवट पिवळसर हगवण लागणे
- चोचीत चिकट स्राव किंवा द्रव येणे व तो पक्षी मान झटकून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करणे.
- मान पाठीवर ठेवणे.
- मलूल बनणे, पायांना, पंखांना लकवा येणे.
- उभे न राहता येणे, तोल जाऊन पडणे.
- शेवटी कोंबड्यांचा मृत्यू
उपचार : या रोगासाठी उपचार उपलब्ध नाही. परंतु प्रतिबंध मात्र घालता येतो; त्यासाठी त्याचे लसीकरण करून घ्यावे.
२) देवी :
हा कोंबड्यांचा संसर्गिक विषाणूजन्य आजार आहे. तो कोंबड्यांव्यतिरिक्त सर्व पक्ष्यांमध्ये होतो.
या रोगाची लहान पिलांना जास्त बाधा होते. श्वासनलिकेमध्ये फोड आल्यामुळे पिले गुदमरून मरतात.
प्रसार : या रोगाचा प्रसार राणीखेत रोगासारखाच होतो.
लक्षणे :
- देवीचे फोड अन्ननलिका, श्वासनलिकेत येतात. घसा, नाक, तुरा, कानांचे पाळे, डोळे - कान यांवर लहान- मोठे फोड येतात.
- फोड फुटून पातळ व घाणेरडा चिकट स्राव वाहतो. जखमा होतात व त्या बऱ्या झाल्यास त्या ठिकाणी खपल्या पडतात.
- बऱ्यांच पक्ष्यांमध्ये डोळ्यांवर आलेल्या फोडांमुळे डोळे जातात.
- पक्ष्यांना ताप येतो. अंडी उत्पादन कमी होते.
- खाणे पिणे बंद होते.
- शेवटी अशक्तपणा येऊन पक्षी दुबळे होतात व दगावतात.
विषमज्वर : यालाच फौल टाय..पुलोरम रोग असे म्हणतात. हा रोग साल्मोनेल्सा नावाच्या जिवाणूपासून होतो.
प्रसार : या रोगाचा प्रसार राणीखेत प्रमाणे होतो.
लक्षणे :
- कोंबड्यांना अधूनमधून ताप येतो.
- कोंबड्यांची विष्ठा पातळ पिवळसर व हिरवट दिसते.
- लहान पिल्लांना पांढरी घट्ट विष्ठा होते.
- अचानक पातळ विष्ठा झाल्यामूळे पिले अशक्त होतात. वजनात घट हाेते.
- मोठ्या पक्ष्यांच्या अंडी उत्पादनात घट होते.
- हगवणीमुळे पक्षी दुबळे होतात व शेवटी मरतूक होते.
प्रतिबंध : सोळा आठवड्यांच्या पक्ष्यांमध्ये रक्ततपासणी करावी. रोगांचे जंतू आढळल्यास उपचार सुरू करावेत. हा एक भयानक आजार असून, तो कोंबड्यांपासून माणसांमध्ये पसरू शकतो.
नियंत्रण : योग्य प्रतिजैविकांचा वापर करावा.
रक्ती हगवण (कॉक्सिडिओसिस) : हा रोग कॉक्सिडिया या एकपेशी जिवाणूमुळे होतो. रक्ती हगवण ही सर्व वयाच्या पक्ष्यांमध्ये होते. परंतु ३ ते १२ आठवड्यांच्या पिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येते.
प्रकार - हा रोग २ प्रकारांमध्ये आढळतो.
१) सीकल कॉक्सिडिओसिस (आंत्रपुच्छाचा रोग)
२) इन्टेस्टाइनल कॉक्सिडिओसिस (आतड्याचा कॉक्सिडिओसिस रोग)
प्रसार : हा रोग आयमेरिया नावाच्या जंतासारख्या प्राण्यापासून होतो. हा परोपजीवी जंत आहे. त्याचे एकूण आठ प्रकार आढळतात. हा जंत कोंबड्यांच्या आतड्यात व पचनक्रियेत बिघाड करतो. त्यामुळे पक्ष्यांना रक्ती हगवण सुरू होते. प्रसार राणीखेत रोगाप्रमाणे होतो.
लक्षणे
- कॉक्सिडिओसिसची बाधा झालेले पक्षी कोपऱ्यात गर्दी करतात.
- खाद्य व पाणी घेण्याचे टाळतात.
- पंख पिंजल्यासारखे दिसतात.
- आतड्यातील दाहामुळे डोळे बंद करून गुंग उभे राहतात.
- प्रमुख लक्षण म्हणजे गुदद्वाराजवळचा भाग विष्ठेने भरलेला असतो.
- रक्ती हगवणीमुळे शरीरातील रक्त कमी होते. त्यामुळे तुरा पांढुरका दिसतो.
- वाढ खुंटते.
- गुदद्वारावर सूज व चिकटलेली विष्ठा यावरून या रोगाचे निदान करता येते.
उपचार ः नियंत्रणासाठी ॲम्प्रोलिअम, मोनेन्सीन सल्फोनामाइड, सल्फोक्युनाझालीन यासारखे औषध वापरता येते.
प्रतिबंध ः कोंबड्यांच्या घरामध्ये ओलसरपणा राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.
मॅरेक्स -
हा विषाणूजन्य रोग असून, तो सर्व पक्ष्यांमध्ये आढळतो. याचे प्रमुख लक्षण म्हणजे पक्ष्यांचे पाय व पंख लुळे पडतात.
प्रसार ः रोगाचा प्रसार राणीखेत रोगाप्रमाणे होतो.
लक्षणे :
- भूक मंदावते.
- पक्षी गुंग उभे राहतात.
- वजनात घट होते.
- पाय व पंख यामधील त्राण जाऊन पक्षी लुळे पडतात.
उपचार ः प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.
गंबोरो रोग - (इन्फेक्शिअस बर्सल डीसिज)
हा विषाणूजन्य व संसर्गजन्य रोग आहे. ४ ते १० आठवड्यांच्या पिलामध्ये प्रामुख्याने आढळतो.
प्रसार ः राणीखेत प्रमाणे
व अंड्यांच्या ट्रेमधूनसुद्धा याचा प्रसार होतो.
लक्षणे :
- प्रमुख लक्षण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व पक्षी दुबळे होऊन रोगास बळी पडतात.
- एकाच वेळी मोठ्या संख्येने आजारी पक्षी पिसे विस्कटून सुस्त दिसतात.
- खाणेपिणे कमी होते.
- पक्षी अकडून व काळवंडून उभे राहतात.
- गुदद्वाराच्या बाजूंची पिसे पिवळसर, विष्ठेने भरलेली दिसतात.
- पक्षी तोल गेल्यासारखे अडखळत चालतात.
- ३० ते ३५ टक्के मरतूक आढळते.
उपचार ः लसीकरण करणे व घरे स्वच्छ ठेवणे.
वरील सर्व रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय
१) बाहेरून पक्षी घ्यावयाचे झाल्यास चांगल्या फार्ममधून खरेदी करावेत.
२) पक्ष्यांची घरे स्वच्छ असावीत
३) पक्ष्यांची घरे वेळोवेळी निर्जंतुक करून घ्यावीत.
४) पक्ष्यांची संख्या मर्यादित व जागे प्रमाणे असावी.
५) पक्ष्यांना पाणी व संतुलित खाद्य द्यावे.
६) खाद्याची व पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत. वेळोवेळी निर्जंतुक करून घ्यावीत.
७) पक्ष्यांना योग्य वेळी, योग्य मात्रेत लसीकरण करावे.
८) आजारी पक्षी घरातून वेगळे करावेत.
९) पक्ष्यांच्या घरात नवीन व्यक्तींना प्रवेश देऊ नये.
१०) मेलेल्या पक्ष्यांची योग्यरीत्या विल्हेवाट करावी. त्यांना उघड्यावर फेकू नये.
११) पक्ष्यांच्या घराच्या आजूबाजूला इतर पक्षी, कुत्रे, मांजरी, उंदीर, घुशी यांचा उपद्रव टाळावा.
१२) प्रत्येक वेळी मरतूक झालेल्या पक्ष्यांचे शवविच्छेदन करून घ्यावे व त्यानुसार उपचार करावा.
टीप : सर्व प्रतिजैविकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावा.
कोंबड्यांना देवी (Fowl Pox) हा रोग झाल्यास खालील उपाय करावे:
- लसीकरण: देवी रोगावर प्रभावी उपाय म्हणजे लसीकरण. कोंबडी लहान असतानाच तिची लस टोचून घ्यावी.
- lesion paste: lesion paste लावल्याने जखम लवकर भरते.
- Potasium Permagnate: पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने जखम धुवावी.
- Boric powder: बोरिक पावडर जखमेवर लावावी.
- Triturated Thuja 200: ही homeopathic औषधी कोंबड्यांना द्यावी.
- कोंबड्यांना नियमितपणे संतुलित आहार द्या.
- कोंबड्यांना स्वच्छ आणि हवेशीर जागेत ठेवा.
- कोंबड्यांच्या पिंजऱ्याची नियमित स्वच्छता करा.
- नवीन कोंबड्यांना कळपात दाखल करण्यापूर्वी काही दिवस अलग ठेवा.
जर तुमच्या कोंबड्यांना देवी रोग झाला असेल, तर त्यांना पशुवैद्यकाकडून (Veterinarian) तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ते तुम्हाला योग्य उपचार आणि मार्गदर्शन करू शकतील.