गणित संशोधन शास्त्रज्ञ शोध

शून्याचा शोध कोणी लावला?

5 उत्तरे
5 answers

शून्याचा शोध कोणी लावला?

6
श्रेष्ठ भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेला शून्याचा शोध ही जगाला दिलेली एक अद्भुत भेट आहे हे जगातल्या विद्वानांनी मान्य केले आहे. सर्वाधिक लोक त्याचे श्रेय आर्यभट यांना देतात, तर बरेचसे लोक ते ब्रह्मगुप्त यांना देतात. काही लोकांच्या मते आर्यभटांच्या आधी होऊन गेलेले विद्वान पिंगला यांनी किंवा त्यांच्याही पूर्वी कोणा अज्ञात विद्वानांनी तर काहींच्या मते नंतरच्या काळातल्या भास्कराचार्यांनी शून्याचा शोध लावला.

मग प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये निरनिराळ्या संख्यांचे उल्लेख कसे येतात अशी शंका आपल्या मनात येते. रावणाला दहा तोंडे होती तर कौरवांची संख्या शंभर होती. विष्णुसहस्रनाम प्रसिद्ध आहे. कार्तवीर्यार्जुनाला हजार हात होते, तर सगराला साठ हजार पुत्र होते. गणेशाचे वर्णन "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ" असे केले आहे आणि श्रीरामाची स्तुती "चरितम् रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्" अशी करून "सहस्रनामतत्तुल्ल्यम्" अशी रामनामाची महती सांगितली आहे. पौराणिक कथा आणि स्तोत्रे यांमध्ये मोठमोठ्या संख्यांचे उल्लेख असलेली अशी असंख्य उदाहरणे आहेत. त्यांची रचना झाली तेव्हा अजून शून्याचा शोध लागलेला नसेल ?

शिवाय 'शून्य' या शब्दाचा अर्थ काय? कुठल्याही वस्तूचे नसणे म्हणजे तिची संख्या शून्य इतकी असणे असा अर्थ आपण लावतो. धान्याचा डबा रिकामाच असला किंवा झाला तर त्यातली उणीव, पोकळी, रिकामेपणा वगैरे गोष्टी कुणालाही आपोआप जाणवतात. शून्याच्या या सर्वसामान्य रूपाचा मुद्दाम शोध लावायची काय गरज आहे? मग प्राचीन भारतीयांनी कुठल्या शून्याचा शोध लावला असे सांगतात?

त्याचा संबंध गणिताशी येतो. एक, दोन, दहा, वीस आदि संख्यांचा उगम मोजमापे करण्यासाठी झाला. यातले एकापासून दहापर्यंतचे आकडे हातांच्या बोटांवर मोजता येत होते. त्याहून जास्त वस्तू मोजायच्या झाल्यास दहादहांचे गट करून ते गट मोजायचे आणि उरलेल्या वस्तू वेगळ्या मोजायच्या असे करून ती संख्या काढता येत होती. उदाहरणार्थ, तीन वेळा दहा अधिक एक सुटा म्हणजे एकतीस. अशा प्रकारे दहा वेळा दहा म्हणजे शंभर, दहा वेळा शंभर म्हणजे हजार अशा प्रकारे संख्यांची नावे ठेवली गेली. रोजच्या जीवनात याहून मोठ्या संख्या मोजण्याची गरजच पडत नव्हती. अस्तित्वात नसलेल्या वस्तू कशा मोजणार? त्यासाठी शून्य नावाच्या संख्येचीही गरज नव्हती. व्यवहारात आवश्यकता नसली तरी विद्वान लोकांनी कल्पनेमधून अनेक मोठमोठ्या संख्यांची रचना केली होती. पूर्वीच्या काळात या संख्या अक्षरांमधूनच व्यक्त केल्या जात असाव्यात.

 एक, दोन, तीन अशा शब्दांऐवजी १, २, ३ अशी चिन्हे (अंक) लिहिली तर संख्या लिहिणे सोयीचे होईल अशी नामी कल्पना भारतीयांना सुचली तशीच इतर देशांमधल्या लोकांनाही निरनिराळ्या काळांमध्ये सुचली. उदाहरणार्थ, रोमन लोकांनी एक, पाच, दहा यांच्यासाठी I, V, X अशी अक्षरेच चिन्हांप्रमाणे योजिली आणि त्यांचा उपयोग करून ते संख्या लिहू लागले, जसे आठसाठी VIII, चौदासाठी XIV वगैरे. यात शून्याला स्थान नव्हते. जितकी मोठी संख्या असेल तितकी जास्त चिन्हे वापरायची आणि ती लक्षात ठेवण्याची गरज होती. ती संख्या वाचणे सोपे नव्हते.

भारतीय शास्त्रज्ञांना एक अफलातून कल्पना सुचली. त्यांनी १ हूनही लहान असा शून्य नावाचा कोणतेही मूल्य नसलेला अंक ० या वेगळ्या चिन्हासह तयार केला. १ ते ९ पर्यंत आकडे (चिन्हे) लिहून झाल्यावर दहाव्या आकड्यासाठी वेगळे चिन्ह न वापरता १ या आकड्याच्या समोर ० मांडून त्यांनी १० हा अंक तयार केला. १० च्या पुढील अंक लिहिण्यासाठी १ च्या पुढे १, २, ३ वगैरे लिहून ११,१२,१३ वगैरे अंक तयार केले. ९१, ९२, ९३ करीत ९९ च्या नंतर १ च्या पुढे दोन शून्ये मांडून १०० (शंभर) हा अंक तयार केला. अशा प्रकारे कितीही मोठी संख्या फक्त दहा चिन्हांमधून लिहिता येणे शक्य झाले. असे अंक लिहिणे सर्वांत आधी कुणी सुरू केले याची स्पष्ट नोंद मिळत नाही. प्राचीन काळातली जी काही भूर्जपत्रे, ताम्रपत्रे, शिलालेख वगैरे आज उपलब्ध आहेत ते सगळे अक्षरांमध्ये लिहिलेले आहेत हे पाहता अंकांबद्दलचे फारसे स्पष्ट पुरावे दिसत नाहीत.

महाभारतामध्ये पांडव आणि कौरव यांची एकंदर संख्या "वयम् पंचाधिकम् शतम्" असे युधिष्ठिर सांगतात. यात १,०,० या तीन अंकांना मिळून शतम् हा एक शब्द येतो. आजही १०५ असे लिहिलेले असले तरी आपण ते एकशे पाच असे वाचतो. एक आणि पाच यांचा उच्चार करतो, पण दशमस्थानावरल्या शून्याचा उल्लेख करत नाही. यामुळेच अक्षरांमध्ये लिहिलेल्या किंवा पाठांतरामधून शिकवल्या गेलेल्या साहित्यामधून त्या आकड्यातल्या शून्याचे अस्तित्व लक्षात येत नाही. संस्कृत भाषेमधले आपल्याला माहीत असलेले सर्व साहित्य श्लोक, ऋचा किंवा मंत्रांच्या स्वरूपात असल्यामुळे ते अक्षरांमध्ये आहे. त्यात संख्यांचे आकडे किंवा त्यातली शून्ये दिसत नाहीत. कदाचित त्या काळात फक्त आकडेमोड करण्यासाठी अंकांचा उपयोग करत असतील आणि आलेली उत्तरे किंवा निष्कर्ष अक्षरांमध्ये लिहून ठेवत असतील. ती आपल्याला या विद्वानांच्या ग्रंथांमध्ये मिळतात.

आर्यभटांनी लिहिलेल्या ग्रंथात "स्थानम् स्थानम् दशगुणे स्यात" असे विधान आहे. त्यामध्ये दशमानपद्धतीमधील स्थानमूल्याची (प्लेसव्हॅल्यूची) व्याख्या दिसते. अशा पद्धतीने लिहिलेल्या १०, १००, १००० आदि संख्यांमध्ये शून्याचा उपयोग होणे स्वाभाविक आहे म्हणून शून्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. ब्रम्हगुप्ताने लिहिलेल्या ग्रंथात शून्य या आकड्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरेंचे नियमच सांगितले आहेत. यामुळे त्यांनाही हे श्रेय दिले जाते.

कुठलीही गोष्ट मोजण्याची सुरुवात एकापासून होते, एक हा त्यातला सर्वांत लहान आकडा असतो, त्याहून लहान फक्त अपूर्णांक असतात. पण शून्य हा अंक निर्माण झाल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यानंतर शून्यापेक्षाही लहान म्हणजे -१, -२ अशा ऋण अंकांची कल्पना मांडली गेली आणि अंकगणिताचा अधिक विकास होत गेला. समीकरणे, सूत्रे वगैरे लिहिणे व सोडवणे सोपे झाले. पुढे यातून बीजगणित आणि कॅल्क्युलस या शाखांचा जन्म झाला. शून्याचा शोध किती महत्त्वाचा होता याची कल्पना यावरून येईल.

'शून्याचा शोध' लावला याचा अर्थ आकड्यांच्या जगात शून्याला स्थान दिले गेले. हे अंकगणितामधले शून्य सर्वांत आधी भारतीयांनी उपयोगात आणले खरे, पण ते नेमके कुणी आणि कोणत्या कालखंडात सुरू केले हे अद्याप गूढच आहे आणि ते तसेच राहणार आहे. त्याबद्दल भक्कम पुराव्यासह विश्वासार्ह अशी माहिती कदाचित मिळणारही नाही. आर्यभटांच्या ग्रंथामध्ये पहिल्यांदा शून्याचे संकेत मिळाले आणि ब्रह्मगुप्तांनी शून्याच्या उपयोगासंबंधीचे नियम सांगितले म्हणून शून्याचा शोध लावण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

उत्तर लिहिले · 1/2/2018
कर्म · 19415
3
*_⭕ शून्याचा शोध आणि भारत ⭕_*



_जयंत नारळीकर_

'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
    *_우   माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   우_*   '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
*_🌹तारीख  २६ आॅक्टोबर  2019 🌹_*
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
भारतात पूर्वी उच्च विज्ञान आणि तंत्रज्ञान नांदत होते. विमाने, अण्वस्त्रे आदींची वर्णने पुरातन वाङ्‌मयात सापडतात, त्यातून हे सिद्ध होत नाही काय? हजारो वर्षांचे दीर्घायू लाभलेल्या व्यक्ती, रोगांवर विजय मिळवणारे औषधी व शस्त्रक्रियांचे उपाय आदी तत्कालीन चिकित्सा विज्ञानाची उच्चपातळी दर्शवतात...
आजकाल यासारख्या विधानांमुळे विविध स्तरांवर वाद उद्‌भवतात. विधानांच्या बाजूने आणि विरुद्ध टोकाची मते मांडली जातात. वास्तविक असे वाद भावनेच्या आहारी न जाता उपलब्ध पुरावे लक्षात घेऊन हाताळले पाहिजेत.उदाहरणार्थ, आर्यभट (पाचवे शतक) ते भास्कराचार्य (बारावे शतक) यांच्या सात शतकांच्या कालखंडात भारताची ‘वैज्ञानिक सुबत्ता‘ युरोप आणि मध्यपूर्वेच्या तुलनेत निश्चितच उच्चहोती, हे उपलब्ध पुरावे दर्शवतात. आर्यभट, ब्रह्मगुप्त, भास्कर आदींच्या लेखनाचे भाषांतर अरबांनी केले आणि त्यामुळे भारतीय ज्ञान-विज्ञान जगप्रसिद्ध झाले. परकी आक्रमकांच्या असहिष्णुते बद्दल तक्रार करताना अशा सकारात्मक उदाहरणांचीही दखल घेतली पाहिजे.माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,पायथॅगोरसचे प्रमेय पायथॅगोरसच्या पुष्कळ आधी भारतीय विद्वानांना माहीत होते आणि यज्ञाच्या वेदी बनवताना त्यांनी त्याचा वापर केला होता, हे शुल्वसूत्रा सारख्या जुन्या, वेदकालीन ग्रंथात वाचायला मिळते. ग्रीक आणि भारतीय परंपरांमधला फरक असा. काही गृहीतके मान्य करून युक्लिडने तर्कशास्त्रावर अधिष्ठित प्रमेयांचे जाळे निर्माण केले. त्या उलट भारतीय परंपरेत प्रमेयांचे निष्कर्ष सिद्ध न करता तथ्यरूपात वापरले गेले. आकाशातल्या तारकांच्या दिशा निश्चित करताना वापरलेली भारतीयांची गणिती पद्धत ग्रीक पद्धतीपेक्षा अधिक बिनचूक होती, याची ग्वाही युरोपमधील आधुनिक तज्ज्ञांनी दिली आहे. अशा तऱ्हेने भारतीय विज्ञान परंपरेतली शक्तिस्थळे दाखवता येतील या प्रयत्नांमागे सबळ पुरावा असल्याने विज्ञानाच्या न्यायालयात हेमुद्दे ग्राह्य मानले जातात. आता आपण असे काही नमुने पाहूया, जेथे सादर केलेला पुरावा ग्राह्य ठरत नाही.विमानाचे उदाहरण पाहा. एखादे उच्चस्तरीय विकसित होते, तेव्हा त्या मागचे विज्ञानही पुढे जात असते. एअरोडायनॅमिक्स या विषयाच्या प्रगतीतून हवेत तरंगू शकणाऱ्या यानांच्या निर्मितीला चालना मिळाली. आधुनिक शास्त्रात या विषयाची सुरवात बर्नूलीच्या प्रमेयातून होते. परंतु, भारतीय परंपरेत या प्रमेयातील तथ्याचा उल्लेख कुठे सापडत नाही.असाच आक्षेप ब्रह्मास्त्र (अण्वस्त्र)व घटोत्कचाला मारणारी इंद्राची ‘शक्ती‘(गायडेड मिसाइल) बद्दल घेता येईल. आधुनिक विज्ञानात या स्तरापर्यंत तंत्रज्ञान पोचण्यापूर्वी त्याला विद्युतचुंबकीय शास्त्राची गरज भासते.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=610893979308529&id=100011637976439
वास्तविक दैनंदिन जीवनात आपण याशास्त्राचा पुष्कळ वापर करतो. दिवे, पंखे, चालण्यामागे हे शास्त्र आहे. जसे दहावी-बारावीची गणिते सोडवणाऱ्याला साधी बेरीज-वजाबाकी करता आली पाहिजे, तसे ही संहारक शस्त्रास्त्रे निर्माण करणाऱ्या संस्कृतीला विद्युतचुंबकीय शास्त्र अवगत असायला हवे.पण संपूर्ण महाभारतात या शास्त्राची चुणूकही सापडत नाही. फार काय, आपण असे म्हणू शकतो ः आज भारतात खेडोपाड्यात विजेचे दिवे आणि नळाचे पाणी पुरवण्याचे आश्वासन कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर आल्यावर देऊ करतो. त्या न्यूनतम सुविधा हस्तिनापूरनरेशांनाही उपलब्ध नव्हत्या. निदान महाभारतात त्यांचा कुठेही उल्लेख नाही!जुने पुरावे तपासून पाहताना एक काळजी घ्यावी लागते, हे मी माझ्या एका चुकीतून शिकलो. ‘शुक्रनीती‘ या सुमारे 2000 वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकात एखाद्या संस्थेत (अथवा परिवारात) नोकर-मालक संबंध कसे असावेत,याचा सविस्तर उल्लेख आहे, हे एका प्रख्यात लेबर ऑफिसरने माझ्या नजरेस आणले. खरोखर काही श्लोकात नोकराच्या पगाराचा एक ठराविक हिस्सा मालकाने कापून त्यातून नोकराच्या पेन्शन वा प्रॉव्हिडंट फंडाची सोय करावी, असे म्हटले आहे. आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी अशा उदाहरणातून दिसते, असे विधान मी एका लेखात गौरवाने केले.त्यानंतर काही दिवसांनी एका संस्कृत विद्वानांचे पत्र आले. त्यांनी लिहिले होते, की मी निर्देश केलेले श्लोक मूळ शुक्रनीतीतले नव्हेत, हे सिद्ध झाले आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या एका अधिकाऱ्याने ते नंतर त्या ग्रंथात घुसडले. त्यातील नियम ब्रिटिश अधिकारी ईस्ट इंडिया कंपनीतील नोकरांसाठी वापरत असत. थोडक्यात जुन्या ग्रंथांचा अभ्यास करताना त्यातील ‘प्रक्षिप्त‘ भाग कोणता याची काळजी घेणे आवश्यक आहे!सुश्रुताच्या वैद्यकीय लेखनात मुख्यत्वेकरून शस्त्रक्रियेची वर्णने आहेत. मात्र, त्यांत कालानुरूप भर का पडली नाही? कारण असे सांगण्यात येते. उच्चवर्णीय शस्त्रक्रियेला (अपवित्र म्हणून?) हात लावत नसत. ती कामे नाभिक किंवा वर्णाश्रमातले खालच्या पायरीवरचे करीत. म्हणून सामाजिक प्रतिष्ठा नसलेले हे शास्त्र पुढे गेले नाही. या उलट असाच एक ‘सर्जन‘ प्लॅस्टिक सर्जरी करतो ही ख्याती ऐकून एका इंग्रजाने त्याची पद्धत सविस्तर पाहून यायला त्याच्या गावी असलेल्या आपल्या हस्तकाला सांगितले. त्याने ही सर्जरी प्रत्यक्ष पाहून पुरवलेली माहिती वापरून त्याच्या वरिष्ठाने ही पद्धत युरोपात लोकप्रिय केली. पिकते तिथे विकत नाही हेच खरे!आज आपल्या पुरातन पूर्वजांना आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान किती माहित होते, याबद्दल उलटसुलट दावे केले जात आहेत. अशा विधानांमागे विश्वसनीय पुरावे असणे आवश्यक आहे; अन्यथा असे दावे तज्ज्ञांच्या लेखी हास्यास्पद ठरतात.
*'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖_*
0

शून्याचा शोध कोणी लावला याबद्दल निश्चित माहिती नाही, परंतु भारतीय गणितज्ञांनी शून्याचा (०) उपयोग सर्वप्रथम केला असे मानले जाते.

शून्याचा इतिहास:

  • भारतात, इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात शून्याचा उपयोगplaceholder म्हणून केला गेला.
  • ब्रह्मगुप्त (इ.स. ५९८-६६८) यांनी शून्याला एक संख्या मानून त्याच्या गुणधर्मांचे वर्णन केले.
  • शून्याचा आधुनिक numeral म्हणून उपयोग करण्याचे श्रेय भारतीय गणितज्ञांना जाते.

त्यामुळे, शून्याचा शोध एका विशिष्ट व्यक्तीने लावला असे म्हणता येणार नाही, परंतु भारतीय गणितज्ञांनी याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1780

Related Questions

846211111247896294 या संख्येला तीन ने भाग जातो का?
दोन संख्यांचा गुणाकार 6075 आहे. त्यातील एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती?
एक घड्याळ प्रत्येक तासाला 15 मिनिटे मागे पडते, जर ते एक वाजता बरोबर लावले असते, तर एका तासानंतर तासाचा काटा किती अंशाचा कोन करेल?
एक घड्याळ प्रत्येक 15 मिनिटांनी मागे पडते. जर ते एक वाजता बरोबर लावले असते, तर एका तासानंतर तास काट्यातील कोन किती अंशाचा असेल?
एक घड्याळ प्रत्येक 15 मिनिटांमध्ये पडते, जर ते एक वाजता बरोबर लावले असते, तर एका तासानंतर घड्याळातील काट्यांमधील कोन किती अंशाचा असेल?
वर्गात काही विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय १८ वर्ष आहे. वर्गामधील १२ विद्यार्थी निघून गेले ज्यांचे सरासरी वय १५ वर्ष होते, व उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी वय १९ वर्ष आहे, तर वर्गात सुरुवातीला किती विद्यार्थी होते?
186*5-189/3+2= किती उत्तर येईल?