समाजशास्त्र समाज जमाती इतिहास

आदिवासीमधील गोंड यांबद्दल माहिती पाहिजे?

2 उत्तरे
2 answers

आदिवासीमधील गोंड यांबद्दल माहिती पाहिजे?

1
भारतातील संख्येने सर्वांत मोठी असलेली आदिवासी जमात. ही बहुतेक सर्व मोठ्या राज्यांत विखुरलेली आहे. यांची लोकसंख्या १९६१ मध्ये ३९,९१,७६७ होती. त्यांपैकी मध्य प्रदेशात ३०,९४,६१३; ओरिसात ४,४५,७०५; महाराष्ट्रात २,७२,५६४; आंद्र प्रदेशात १,४३,६८०; बिहारमध्ये ३३,५२१ आणि बाकीचे इतरत्र होते.

गोंड द्रविड वंशी प्रमुख जमात आहे. भारतातील जंगलात राहणाऱ्या जमातींत ती अग्रगण्य समजली जाते. गोंडांची वस्ती प्रामुख्याने गोदावरी व विंध्य पर्वत यांमध्ये आढळते. अशा विस्तीर्ण प्रदेशावर पसरलेल्या जमातींत वांशिक व भाषिक समानता आढळणे कठीणच. अर्धेअधिक गोंड गोंडी बोलभाषा बोलतात. सर जॉर्ज ग्रीअर्सनच्या मते गोंडी बोली तेलुगूपेक्षा तमिळशी व कन्नडशी जास्त मिळतीजुळती आहे. तथापि सोळाव्या शतकातील राजगोंड राजांच्या सुवर्ण मोहरांवरून काही तेलुगू भाषिक आख्यायिकांविषयी माहिती मिळते. गोंडांनी स्वतंत्र राज्ये प्रस्थापित केल्यामुळे या जमातीच्या इतिहासास आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मध्य प्रदेशातील बस्तर, छिंदवाडा, मंडला जिल्हे; महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि आंध्र प्रदेशातील आदिलाबाद व वरंगळ जिल्ह्यांच्या प्रदेशास गोंडवन म्हणतात. गोंडवनावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होईपर्यत गोंडांचे राज्य होते. गोंडांचे वंशज स्वतःस राजगोंड म्हणवितात. ते स्वतःस गोंड संस्कृती व भाषेचे खरे प्रतिनिधी समजतात. बरेच राजगोंड शहरांतून रहावयास लागले आहेत. त्यांनी उच्चवर्णीय हिंदूंच्या चालीरीती आत्मसात केल्या आहेत. मध्य प्रदेशातील बस्तर जिल्ह्यात गोंडांच्या तीन उपजमाती राहतात. मुडिया, डोंगरी माडिया आणि शृंग माडिया (बायसन-हॉर्न माडिया). गोंडांच्या एकंदर चाळीस उपजमाती आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रात पंधरा आहेत. त्यांत प्रामुख्याने राजगोंड, माडिया, गैता, धुरवा, गोंड गोबारी इत्यादींचा उल्लेख करता येतो. गोंड स्वतःस कोइटोर म्हणवितात. गोंडांचा इतर जमातींशी संबंध आल्याने नवीन जमाती निर्माण झाल्या. त्यांपैकी खाती, आगरिया, सोलाहा व कोइला या जमाती गोंड खेड्यातच राहतात. काही राज्यकर्त्या गोंड कुटुंबांची राजपुतांशीही सोयरीक झाली.

महाराष्ट्रातील २,७२,५६४ गोंडांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात ६१ टक्के, यवतमाळमध्ये ३१ टक्के व नांदेडमध्ये ५ टक्के गोंड राहतात. १,५४,१११ गोंडांची गोंडी ही मातृभाषा आहे; ७३,९२० गोंडांची मराठी आणि ३१,५९७ गोंडांची माडिया मातृभाषा आहे.

गोंड प्रामुख्याने शेतीवर उपजीविका चालवितात. चंद्रपूरमध्ये मुख्य पीक भाताचे आहे, तर यवतमाळमध्ये ज्वारीचे आहे. याशिवाय उडीद, तूर, मूग यांचीही लागवड होते. वालपापडी, पिवळा भोपळा, अंबाडी व वांगी या भाज्या जास्त प्रमाणात दिसतात. परंतु धार्मिक सण-पंडुम-झाल्याशिवाय कापणी होत नाही आणि भाज्याही काढीत नाहीत. गोंडांना मोहाची दारू विशेष प्रिय असते. शेतांना व खेडेगावास बांबूचे कुंपण असते. अजूनही जंगलात स्थलांतरित शेती आढळते. स्थलांतरित शेती करणाऱ्या डोंगरी माडियांचे पुनर्वसन करणे चालू आहे. ते कडू दुधी भोपळा विपुल प्रमाणात पिकवितात; वाळवून, कोरून त्यांचे चमचे व डाव तयार करतात. शेतीशिवाय मासेमारी, कंदमुळे गोळा करणे व शिकार हे दुय्यम उद्योगही गोंड करतात. वर्षातून एकदा माडिया सार्वजनिक शिकारीस जातात. त्या वेळी खेड्यातील सर्व जाति-जमातींचे स्त्रीपुरुष व मुले त्यांत सहभागी होतात. शिकार मिळाल्यास गावजेवण करण्यात येते. शिकार मिळणे हे आपल्यावर अमंगल जादूप्रयोग झाल्याचे द्योतक मानतात. शिकार देवास अर्पण करून भक्षण केल्यास त्यांचे परिमार्जन होते. त्यामुळे शिकार न मिळाल्यास लोकांत नैराश्य येत नाही. शिकारीवर गेलेले लोक जंगलात डिंक, कंद, झाडाची साल इ. गोळा करतात. गोंड गाई-म्हशी, शेळ्या, डुकरे व कोंबड्या पाळतात. माडिया गाईचे दूध काढत नाहीत. जसे आईचे दूध मुलाकरिता तद्वतच गाईचे दूध वासराकरिता, हा त्यांचा समज आहे. ते गाईस नांगरास जुंपतात. स्त्री ज्याप्रमाणे शेतावर काम करते, त्याचप्रमाणे गाईही काम करू शकतात, हे त्यांचे म्हणणे तर्कशुद्ध वाटते. कोंबड्या बहुतांशी सणावारी देवासमोर बळी देण्यासाठी वापरतात. सगळ्या जनावरांना वेगळ्या झोपड्यांत ठेवतात. माडिया खेड्यांतील स्वच्छता वाखाणण्याजोगी असते.

गोंडांच्या झोपड्यांच्या भिंती बांबूंनी विणलेल्या असतात. छप्पर गवताचे असते. झोपडीतील एक भाग स्वयंपाकघर म्हणून वापरतात. आतील विभाजन चटयांनी करण्यात येते. धान्याच्या कणगी बांबूने विणलेल्या किंवा जाड दोराच्या असतात. इतर पदार्थ मडक्यांत साठवितात. तवा मातीचा असतो. घर व घरातील बहुतेक वस्तू कुटुंबातील व्यक्तींनीच तयार केलेल्या असतात. माडिया खेडी स्वयंपूर्ण असतात. फारसा आर्थिक विनिमय होत नाही. माडिया प्रदेशात आठवड्याचे बाजार भरत नाहीत. कारण बाजारात नेण्यास व तेथून विकत घेण्यास काहीही वस्तू नसतात. कपडा व मडकी सोडल्यास इतर सर्व गरजा स्वतःच भागवितात. त्यामुळे त्यांना चलनाची गरज लागत नाही. गरजेपुरता वस्तुविनिमय करतात. माडिया पुरुष केवळ लंगोटी घालतात; आर्थिक सुबत्ता असल्यास मांड्या झाकण्याइतपत वस्त्र व सुताची बंडी घालतात. स्त्रिया कमरेभोवती आखूड वस्त्र गुंडाळतात. चोळी वा पोलके वापरीत नाहीत. अलीकडे शहराजवळच्या खेड्यांतील माडिया स्त्रिया गुडघ्यापर्यंत साडीवजा वस्त्रे नेसतात व पदराने उरोभाग झाकतात. हिवाळ्यात शेकोटीजवळ सर्व लोक झोपतात. त्यामुळे या लोकांत भाजण्याचे अपघात बरेच होतात. गोंड स्त्रियांना केशभूषेची विशेष आवड असते. केसांत एकापेक्षा जास्त फण्याही कायम खोचलेल्या असतात. तसेच रंगीबेरंगी मण्यांच्या माळाही त्या घालतात. मुडिया व माडिया मुलेही केसांभोवती रंगीत मणी घालतात. याशिवाय स्त्रिया रुप्याचे दागिनेही वापरतात. त्या शरीरावर गोंदवून घेतात. पुरुष तंबाखूची विडी स्वतः तयार करतात व ती चकमकीने देवकापसावर ठिणगी पाडून पेटवितात. यांच्या तंबाखू ठेवण्याच्या डब्या कलाकुसरयुक्त असतात.

गोंड जमात अनेक अंतर्विवाही उपजमातींत व बहिर्विवाही सकुलकांत व कुळींत विभागली आहे. तीन ते सात देव भजणाऱ्या कुळींची ही सकुलके आहेत. एका सकुलकात अनेक कुळी असतात. या कुळींचे आपापसांत विवाह होत नाहीत. कुळींची नावे आडनावे म्हणून लावतात. उदा., धुर्वे, मर्सकोले, नरोटे, हिचामी इत्यादी. सकुलक व कुळी प्रत्येक उपजमातीत वेगवेगळ्या असतात.

लहान कुटुंबे म्हणजे मुख्यतः एकसदस्य कुटुंबे सु. ५ टक्के आढळतात. महाराष्ट्रात ४५ टक्के गोंड कुटुंबे २ ते ४ व्यक्तींची आणि ३८ टक्के ५ ते ७ व्यक्तींची आढळतात, तर उरलेली ७ पेक्षा जास्त व्यक्तींची आढळतात. कुटुंब पितृसत्ताक आहे. आते-मामे-भावंड-विवाहांस प्राधान्य दिले जाते. बहुपत्नीविवाह संमत आहे. परंतु वधूमूल्य द्यावे लागते. विनिमय-विवाह, सेवा-विवाह व सहपलायन-विवाह समाजमान्य आहेत. विधवाविवाह, देवरविवाह व घटस्फोट यांसही मान्यता असते. विवाह वराच्या घरी होतात. माडियांत व मुडियांत युवागृहांचा विवाहाचे जोडीदार निवडण्यास उपयोग होतो. युवागृहास घोटुल म्हणतात. बस्तरच्या मुडिया गोंडामध्ये पूर्वी युवागृहात अविवाहित मुले व मुली जोडीने सारी रात्र एकत्र घालवीत. मुलीस मोतीआरी व मुलास चेलिक म्हणतात. घोटुलच्या प्रमुखास सरदार म्हणतात. विवाहपूर्व प्रेमसंबंध समाजमान्य असतात. परंतु विवाहबाह्य संबंधांतून वा व्यभिचारांतून खुनाची प्रकरणे उद्‌भवतात. विवाह झाल्यावर घोटुलचे सदस्यत्व संपते. लिंगो पेन देवतेमुळे मोतीआरीस गर्भ राहत नाही, असा मुडियांचा समज आहे. घोटुलमध्ये लैंगिक शिक्षणाशिवाय जमातीच्या आर्थिक, सामाजिक व धार्मिक अंगांचेही शिक्षण दिले जाते. घोटुलचे तरुण सदस्य जमातीची सर्व कामे एकजुटीने करतात. नवीन शिक्षणपद्धती घोटुलच्या माध्यमातून या जमातीवर बिंबविल्यास ती लवकर आत्मसात केली जाईल, असा एक दृष्टिकोन आहे. चंद्रपूरच्या माडियांत अजूनही रोज सायंकाळी मुले व मुली एकत्र नृत्य करतात. ढोलाच्या तालावर सणावारी किंवा अतिथीसमोर नृत्य करतात. घोटुलचा उपयोग अतिथिगृह म्हणूनही करण्यात येतो. स्त्रियांना समानतेची वागणूक मिळते. परंतु ऋतुकालात त्यांना वेगळ्या झोपडीत रहावे लागते. माडियांमध्ये अशा स्त्रीची पडछायाही विटाळ ठरते.

मयताचे दफन करतात व त्यास श्वापदांनी उकरू नये म्हणून वर गोट्यांचा (दगडांचा) ढीग रचतात. मयताची बाज (खाट) त्या दगडांवर टाकतात. दफन करताना मंत्र म्हणत नाहीत. सर्व नातेवाईक थडग्यावर धान्य टाकतात. काही गोंड उपजमातींत कधीकधी दहनही करतात.

गोंड स्वतःस हिंदू म्हणवितात. ते सवर्ण हिंदूंप्रमाणेच अस्पृश्यता पाळतात. गोंडांचा जादूवर फार विश्वास असतो. ते स्वतःचे अमंगल जादूपासून संरक्षण करण्यासाठी सामाजिक नीतिनियमांचे काटेकोर पालन करतात. वाघासारख्या हिंस्त्र पशूंपासून रक्षण करण्यासाठी खेड्यात मंगल जादूचा उपयोग करण्यात येतो. गोंड परमेश्वरास भगवान म्हणतात. याशिवाय प्रत्येक कुळीचा एक बडा देव असतो. शेतीतील सर्व क्रियांशी काही धार्मिक विधी निगडित असतात. अमावास्येला शेतीची कामे करीत नाहीत. गोंड राज्यकर्ती जमात असल्याने त्यांच्यात दसऱ्याचे विशेष महत्त्व असते. त्या दिवशी मुखियास किंवा राजास भेटण्याची प्रथा आहे. बस्तरचा राजा देवी दातेश्वरीचा (पृथ्वीदेवता) मुख्य पुजारी आहे. दसऱ्यास जगदलपूर येथे देवीची व राजाची मिरवणूक काढण्यात येते, तेव्हा हजारो आदिवासी दर्शनासाठी जमतात. खेड्यांच्या मुखियास गायता म्हणतात. हे पद वंशपरंपरागत चालते. गायत्याच्या हुकुमांची ताबडतोब अंमलबजावणी होते. माडिया खेड्यांत कोतवालाचे काम महार करतात. गोंडांच्या उपजमातींत उच्चनीच स्तररचना आढळते. राजगोंड स्वतःस सर्वश्रेष्ठ समजतात. माडिया स्वतःस गोवारींपेक्षा श्रेष्ठ समजतात. गोंड जमात विस्तीर्ण प्रदेशावर पसरली आहे व तिचे विभाजन अनेक स्वायत्त व अंतर्विवाही उपजमातींत झालेले आहे. या सर्व उपजमातींना स्वतःची संस्कृती आहे. काही उपजमातींना सांस्कृतिक वैशिष्ट्यामुळे स्वतंत्र जमातीचा दर्जा प्राप्त झाला आहे. बस्तरचे मुडिया गोंड व चंद्रपूरमधील माडिया गोंड या वैशिष्ट्यपूर्ण जमाती आहेत. यांच्यात अजून आदिवासींची वैशिष्ट्ये पहावयास मिळतात.

महाराष्ट्रात ७ टक्के आदिवासी साक्षर आहेत. आदिवासींमध्ये ७ टक्के गोंड साक्षर आहेत. प्राथमिक शिक्षण गोंडी भाषेत दिल्याशिवाय शिक्षणाची प्रगती होणे कठीण आहे. पूर्व महाराष्ट्रात आदिवासी कल्याण योजनांतर्गत शिक्षित गोंडांना नोकऱ्या दिल्या जातात.
उत्तर लिहिले · 6/5/2020
कर्म · 55350
0
गोंड जमाती: माहिती
गोंड ही भारतातील एक मोठी आदिवासी जमात आहे. ते प्रामुख्याने मध्य भारतातील डोंगर आणि जंगलात राहतात.
गोंड शब्दाचा अर्थ:
गोंड हा शब्द 'कोंड' या तेलगू शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ 'डोंगर' असा आहे.
गोंड लोकांचा इतिहास:
गोंड लोकांचा इतिहास खूप जुना आहे. ते मूळचे मध्य भारतातील असून तेथे त्यांनी अनेक রাজ্যे स्थापन केली. गोंड राजांनी अनेक किल्ले, तलाव आणि मंदिरे बांधली.
गोंड लोकांची संस्कृती:
गोंड लोकांची संस्कृती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचे নিজস্ব ভাষা आणि रीतिरिवाज आहेत. ते निसर्गाची पूजा करतात आणि त्यांचे सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात.
गोंड लोकांचे जीवन:
गोंड लोक साधारणपणे शेती करतात. ते जंगलातून मध, डिंक आणि इतर वस्तू गोळा करून विकतात. ते बांबू आणि लाकडाच्या वस्तूही बनवतात.
गोंड लोकांबद्दल अधिक माहिती:
गोंड लोकांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3600

Related Questions

बौद्ध समाजाची लोकसंख्या किती आहे?
मातंग समाजाची लोकसंख्या किती आहे?
विवाहासाठी मुलगी कशी शोधावी?
गावातील ग्रामस्थांची वागणूक कशी असावी, कसे वागावे?
आदिवासी हे हिंदू नाहीत का?
जाधवांचे सोयरे पाहुणे कोणती आडनावे आहेत?
महाराष्ट्रातील एक आडनाव 'जो' पासून सुरू होणारं?