कला संगीत

लोकगीत म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

लोकगीत म्हणजे काय?

5
लोकगीते

मौखिक परंपरेने चालत आलेल्या अनेकविध गीतप्रकारांचा निर्देश या संज्ञेने केला जातो. सर्व लोकसाहित्याप्रमाणे लोकगीते ही समूहमनाची व समूहप्रतिभेची निर्मिती आहे. निसर्गाच्या लयबद्धतेशी व तालबद्धतेशी संवाद साधीतच ही गीतनिर्मिती झाली. लोकगीत, लोकसंगीत व लोकनृत्य ही परस्परोपजीवी, परस्परावलंबी व निसर्गसंवादी अशी मानवाची निर्मिती आहे. लोकगीतांची व अन्य लोककलांची निर्मिती निखळ मनोरंजनाच्या प्रेरणेतून झालेली नाही. मात्र रंजन हा सर्व कलांचा आद्य परिणाम निश्चितच आहे. लोकगीताची निर्मिती व्यक्तीची असली, तरी त्या निर्मितीमागची प्रेरणा समूहमनाची असते. त्यामुळे एका अर्थाने ही निर्मिती सामाजिक ठरते. त्यातून सामूहिक जीवनाचा आविष्कार होतो.

लोकगीताची रचना आशयदृष्ट्या साधी, सरळ, एकेरी असून आविष्कारदृष्ट्या लयबद्धता हे लोकगीताचे आकर्षणकेंद्र असते. लोकगीताची आवाहकता स्थलकालातीत असते, ती या लयीमुळेच. शिवाय त्याची आद्य रचना कितीही जुनी असली, तरी लोकाचारात ते गीत नित्य नव्याने आविष्कृत होते. लोकगीते मौखिक परंपरेने चालत आलेली असल्याने त्यांत अनेक उच्चारबदलही होतात. क्वचित काही भाग विस्मृतीत जातो. विविध परंपरांतील गीतांची क्वचित सरमिसळ होते आणि अर्थदृष्ट्या गीत दुर्बोध होत जाते. तरीही स्वर-लयीच्या आकर्षणाने आणि तत्संबद्ध कृतीमुळे ते लोकाचारात टिकून राहते. महाराष्ट्रातील भोंडल्याची किंवा हादग्याची गाणी हे याचे उत्तम उदाहरण होय.

लोकगीतांची रचना बहुधा चारचरणी आणि सुगम असते. त्यांचा आविष्कार (गायन) सामूहिक असतो. निदान ध्रुवपदगायन सामूहिक असते व ते घोळून घोळून म्हणणे हे लोकगीताचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे अनेकदा श्रोत्याला ते कंटाळवाणे वाटते. लोकगीताचे गायन बहुधा एकसुरी व संथ असते.

दैनंदिन श्रमाची कामे, एखादे विधिविधान किंवा क्रिडा अशांसारख्या कृतींबरोबर बहुधा लोकगीत येते. त्यामुळे कृतिसंबद्ध शारीरिक हालचालींशी गीताची लय बांधलेली असते. आविष्कार व शब्दरचना या दोन्ही दृष्टींनी लोकगीत  लवचिक असते. गायकाची कृती व भावावेग यांबरोबर ते आपले रूप थोडेफार बदलते.

लोकगीते ही संस्कृतीच्या आद्यावस्थेतील मंत्रांचे काम अनेकदा करतात. ती गीते ज्या कृतींशी बांधलेली असतात, त्या कृती हे आद्यावस्थेतील यात्वात्मक विधी होते. पाऊस पडावा म्हणून पावसाची नक्कल हे पर्जन्यनृत्याचे आद्यरूपही असते व त्याचबरोबर पावसाला केलेले लयताबद्ध शाब्दिक आवाहनही असते. ते आद्य मंत्र व गीत दोन्ही असते. समूहाचे आवाहन अधिक सामर्थ्यशाली होते. ही जाणीव असल्याने त्या मंत्ररूप ध्रुवपदाचे गायन समूहाचे असते. लोकगीत, संगीत व नृत्य असे परस्परोजीवी असतात.

लोकाचारातील अनेक मंत्रही गीतरूपच असतात. रोगनिवारणासंबंधीचे मंत्र, सर्पविष उतरविण्याचे मंत्र (वाऱ्याची भजने) ही मंत्रसदृश लोकगीतेच आहेत. अनेक विधींत अशी मंत्रसदृश लोकगीतेच आहेत. अनेक विधींत अशी मंत्रसदृश गीते असतात. आदिवासी समाजात लग्न लावणारी स्त्रीपुरोहित ‘धवलेरी’ जी गीते गाते, ती विवाहविधीच्या मंत्राचे काम करतात. धवलेरी जी गीते गाते, त्यांना ‘धवळे’ असे म्हणतात. महानुभाव साहित्यात महदंबेने चक्रधरांच्या विवाहसमयी गायिलेली गीते ‘महदंबेचे धवळे’ म्हणून प्रसिद्ध आहेत. काही आदिवासी जमातींत अजूनही स्त्रीपुरोहित (धवलेरी) धवळे गाऊन लग्नीविधी करते.

भारतीय संतांनी लोकप्रचलित गीतसरणींचा उपयोग करून लोकछंदांत रचना केल्या आहेत. हिंदी संतांचे दोहे, चौपाई, छप्पय, पदे ही सर्व लोकगीतसरणींची गीते आहेत. मराठी संतांनी वैपुल्याने वापरलेला ओवी हा छंद लोकछंदच आहे. अभंग हे ओवीचेच रूप आहे. त्याखेरीज गौळण, भारूड, पदे या सर्व लोकगीतसरणींचाच उपयोग संतांनी केलेला दिसतो. पुराणग्रंथांची फलश्रुतीही आख्यान मंत्रसामर्थ्ययुक्त असल्याची धारणाच व्यक्त करते. देवतांची स्तोत्रे व देवतांची लीला-कथा स्तोत्रे ही मंत्रसामर्थ्ययुक्त लोकगीते होत.

लोकगीते लोकबोलीतच उत्स्फूर्तपणे रचली जातात. लोकगीतांचा प्रत्येक पाठ अधिकृत असून त्यांच्या चाली पारंपरिक असतात. लोकगीते कृतिसंबद्ध असल्याने ती प्रयोगरूप असतात. लोकजीवनाची व समूहमनाची अभिव्यक्ती, धर्मविधीचा एक भाग, श्रम हलके करणे अशा अनेक गरजांची पूर्ती लोकगीते करतात. लोकगीतावर कर्त्याची नाममुद्रा नसते, त्यावर समूहाचे स्वामित्व असते. तथापि शाहिरी रचनांमध्ये जरी व्यक्तिनाममुद्रा असली, तरी त्यांच्यावरही समूहाचे स्वामित्व असते. त्या गीतांची रचनासरणी लोकपरंपरेतूनच आलेली असते.अशा गीतांना लौकिकगीते म्हटले जाते. लोककथांमध्ये जसे काही आवर्ती कल्पनाबंध (मोटिफ) व मूलकल्पनाबंध (आर्किटाइप) पुन्हापुन्हा येतात, तसेच ते लोकगीतांतही येतात.

लोकगीत ही खूपच व्यापक संज्ञा असून, देशोदेशींच्या अनेकविध गीतप्रकारांचा त्यात समावेश होतो. लोकगीतांचे वर्गीकरण कथागीते व अन्य लोकगीते अशा दोन गटांत केले जाते. यूरोपीय, विशेषतः इंग्रजी लोकसाहित्यातील बॅलड हा कथाकाव्याचा एक प्रकार आहे. मराठीतील पोवाड्याशी त्याचे साधर्म्य दिसून येते. भारतातील कथाकाव्यपरंपरा अत्यंत समृद्ध आहे. नाताळसारख्या ख्रिस्ती सणोत्सवानिमित्त गायिली जाणारी कॅरोल नामक आनंदगीते, निग्रोखलाशांची सागरी गीते, सागरकिनाऱ्यावरील कोळीगीते, लोकांच्या दैनंदिन कामकाजाशी संबद्ध श्रमपरिहारार्थ गायिली जाणारी गीते, लष्करी संचलनगीते, पारंपरिक सणोत्सवानिमित्त गायिली जाणारी गाणी वगैरे अनेक प्रकारांचा समावेश लोकगीतांमध्ये होतो. लोकगीतांचे वर्गीकरण स्वतंत्र स्त्रीगीते, पुरूषांची गीते, स्त्री-पुरूषांची संयुक्त गीते अशा प्रकारेही करता येते. त्यांत सामान्यतः स्त्रीगीतांचे प्रमाण अधिक दिसून येते. शिवाय बालकांची बडबडगीते, शिशुगीते, अंगाईगीते, नृत्य-खेळगीते इ. अनेक प्रकार आढळतात. स्त्री-पुरूषांच्या गीतांमध्येही श्रमगीते, धर्मविधिगीते, नृत्य-उत्सवगीते, खेळगीते, भगतांची उपासनागीते असे ढोबळ मानाने वर्गीकरण करता येईल.

संकलित माहिती
विकासपीडिया

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लीक करा...
लोकगीत
उत्तर लिहिले · 24/9/2018
कर्म · 458580
0
उगाच
उत्तर लिहिले · 24/6/2022
कर्म · 0
0

लोकगीत म्हणजे परंपरेने चालत आलेले गीत. हे गीत एखाद्या विशिष्ट व्यक्तीने तयार केलेले नसतं, तर ते अनेक लोकांच्या सामुदायिक प्रयत्नांमधून तयार होतं.

लोकगीताची काही वैशिष्ट्ये:

  • हे गीत पिढ्यानपिढ्या तोंडी स्वरूपात जतन केले जाते.
  • लोकगीतांमध्ये साधी भाषा वापरली जाते, जी सहजपणे समजते.
  • यात अनेकदा स्थानिक चाली व परंपरांचा प्रभाव असतो.
  • लोकगीते विशिष्ट प्रदेशाची संस्कृती आणि जीवनशैली दर्शवतात.

उदाहरणे:

  • लावणी
  • भारुड
  • ओवी

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंक पाहू शकता:

लोककला (mahaeshikshan.gov.in)

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5120

Related Questions

अजिंठा येथील लेणी यावर सविस्तर निबंध लिहा?
कविता लिहिण्यासाठी कवीकडे काय असायला पाहिजे?
ग्रामीण कलेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
अभिनेत्री म्हणून सुलभा देशपांडे यांच्या नाटकातील भूमिकांबद्दल थोडक्यात माहिती?
अभिनेत्रीची म्हणून सुलभा देशपांड नाटकातील भूमिकेशी तन्मयता in few words?
अभिनेत्रीची म्हणून सुलभा देशपांड नाटकातील भूमिकेशी तन्मयता?
अभिनेत्री म्हणून सुलभा देशपांड े यांना जाणवलेले नाटकाच े आशयसूत्र in few words?