सात बारा कृषी भूमी अभिलेख

सातबारा (७/१२) व ८अ बद्दल सविस्तर माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

सातबारा (७/१२) व ८अ बद्दल सविस्तर माहिती द्या?

22
*सातबारा(7/12) व 8अ या बद्दल सविस्तर माहिती*
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!

नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!

जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!

*कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.*  

*ग्रामपंचायत*

एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

* *गाव नमुना नंबर - 1* - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.

* *गाव नमुना नंबर - 1अ* - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

* *गाव नमुना नंबर - 1ब* - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 1क* - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

* *गाव नमुना नंबर - 1ड* - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 1इ* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 2* - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 3* - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.

* *गाव नमुना नंबर - 4* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 5* - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6* - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6अ* - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6क* - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6ड* - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 7* - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 7अ* - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 8अ* - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 8ब, क व ड* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 9अ* - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 10* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 11* - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 12 व 15* - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 13* - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 14* - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 16* - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 17* - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 18* - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

* *गाव नमुना नंबर - 19* - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 20* - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 21* - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते.
*गाव नमुना सात बारा (7/12) म्हणजे काय?*
_______________________
जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाही व त्यातील बदल कळणार नाहीत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावांतील महसूली माहिती ही, गांव नमुना क्र.1 ते 21 या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील 7 नंबरचा नमुना मालकी हक्काबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून 7/12 चा नमुना प्रस्तावित करण्यांत आला.


7/12 उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु 7/12 हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही.

उदाहरणार्थ गणपत नांवाच्या शेतकर्याने त्यांच्या मालकीची 1 हेक्टर जमीन 5 मे 2000 रोजी गोविंद नावाच्या शेतकर्यास रजिष्टर खरेदीखताने विकली. रजिष्टर दस्त 5 मे रोजीच नोंदविला. 6 मे 2000 रोजी या जमीनीचा मालक कोण असा प्रश्न विचारला तर खरेदीदार गोविंद हाच मालक ठरतो. परंतु 6 तारखेला 7/12 वर गणपतचेच नांव असू शकते. बऱ्याचवेळा खरेदी विक्रीनंतर 3 – 4 महिन्यांनी 7/12 वर नोंदी होतात. म्हणून खरेदीदाराचा मालकी हक्क 3 – 4 महिन्यांनी निर्माण होतो असे नाही!!!

7/12 उतारा हा प्रत्येक शेतकऱ्याला वाचता आला पाहिजे. त्यावर गांवाचे नांव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पध्दती, कब्जेदाराचे नांव, खाते क्रमांक, शेताचे स्थानिक नांव, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-7) लिहिलेला असतो.
तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, इत्यादी तपशील खालच्या बाजुला (नमुना-12) मध्ये लिहिलेला असतो.
सर्वसाधारणपणे दर दहा वर्षांनी 7/12 पुस्तके नव्याने लिहीली जातात. ज्यांचा हक्क उरलेला नाही, अशा जुन्या नोंदी वगळून नव्याने 7/12 उतारे लिहिले जातात.
7/12 वरील मालकीहक्काच्या सदरातील किंवा इतर हक्कातील कोणतेही महत्वाचे लिखाण हे फेरफार नोंद केल्याशिवाय 7/12 वर येऊ शकत नाही. याचा अर्थ असा की, कोणत्याही शेतकऱ्याला जर अशी शंका आली की, पूर्वी अमुक नांव 7/12 वर कसलाही कायदेशीर आधार नसतांना नोंदलेले आहे, तर त्याने जुने 7/12 उतारे काढून, फेरफार नोंदीच्या नकला घेऊन ते नांव कशाच्या आधारे नोंदविले त्याची खात्री केली पाहिजे.

दैनंदिन जीवनांत आपणास रेशनचा फॉर्म, शाळेचा फॉर्म, टेलिफोनचा फॉर्म, पासपोर्टचा फॉर्म, ट्रॅक्टर नोंदणीचा फॉर्म, इलेक्ट्रीसिटीचा फॉर्म असे विविध फॉर्म भरावे लागतात. परंतु वर्षानुवर्षे हाताळला जात असलेला 7/12 चा नमुना मात्र अनेकांना अनाकलकनीय कां वाटतो? जाणीवपूर्वक 7/12 उतारा शांतपणे समजून घेतला पाहिजे.

_■* 7/12 च्या संदर्भात खालील महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवावेत._

(1) आपल्या नावांवर असणाऱ्या प्रत्येक स्वतंत्र गटासाठी एक 7/12 उतारा असतो.
(2) आपल्या नांवावर असणाऱ्या सर्व गटांच्या 7/12 प्रमाणे 8अ वर एकत्रीत नोंद असते, त्यामुळे सर्व गटांचे 7/12 व 8अ यांची तुलना करुन पहा.
(3) 7/12 वर इतर हक्कात कोणत्या नोंदी आहेत हे काळजीपूर्वक पहा. कर्ज, तगाई यांची रक्कम व कर्ज देणाऱ्या संस्थेचे नांव बरोबर असल्याची खात्री करावी.
(4) शेतात असणाऱ्या विहीरींची किंवा बोअरवेलच्या नोंदी त्या त्या 7/12 उताऱ्यावर “पाणी पुरवठयाचे साधन” या रकान्याखाली करुन घ्या.
(5) सर्व फळझाडांच्या नोंदी नमुना बारा मध्ये “शेरा” रकान्यात करुन घ्या.
(6) कोणतीही फेरफार नोंद मंजूर झाली असेल तर लगेचच 7/12 वर या नोंदीचा अंमल घेतला जातो.
(7) कायद्यानुसार प्रमाणित नोंद ही, त्याविरुध्द सिध्द करण्यांत येईपर्यंत खरी असल्याचे मानले जाते.
(8) अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यावर फेरफार नोंद न घालता फक्त वर्दीवरुन अज्ञानाच्या पालकाचे नांव कमी करता येते.
(9) दर दहा वर्षांनी 7/12 पुन्हा लिहिला जातो. खोडून टाकलेल्या सर्व बाबी वगळून व शेवटची स्थिती दर्शविणाऱ्या चालू नोंदीची नक्कल करुन 7/12 लिहिला जातो.
(10) 7/12 वर केली जात असलेली पिकपहाणीची नोंद दरवर्षी केली जाते. दरवर्षीची पिकपहाणी ही कायद्यानुसार स्वतंत्र बाब आहे.
(11) महसूल कायद्यानुसार अपीलात किंवा फेरतपासणीमध्ये मूळ 7/12 अगर नोंदीमध्ये बदल करावयाचे आदेश दिले गेले तर तलाठयास निकालपत्राची प्रमाणीत प्रत मिळाल्यानंतर थेट फेरफार नोंद घालावी लागते. अशा नोंदीची नोटीस पक्षकारांना देण्याची आवश्यकता नाही.

*जमीनीतील कूळ हक्क:*

जमीनीला कूळ लागणे हा वाक्यप्रयोग आता आपल्याला चांगला माहिती झाला आहे. कूळ म्हणजे काय? कूळ कसा तयार होतो? कूळाचे कोणते हक्क असतात? आणि शेत जमीन व कूळ यांचे कायदेशीर संबंध काय असतात? याची आज आपण माहिती घेऊ.
” कसेल त्याची जमीन ” असे तत्व घेऊन कूळ कायदा अस्तित्वात आला. दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले. सन 1939 च्या कूळ कायद्यानुसार सर्वप्रथम जमीनीत असणाऱ्या कायदेशीर कूळाची नांवे 7/12 च्या इतर हक्कात नोंदली गेली. त्यानंतर 1948 चा कूळ कायदा अस्तित्वात आता. त्याने कूळांना अधिक अधिकार प्राप्त झाले. सुधारित कायद्यानुसार कलम-32-ग नुसार दिनांक 1.4.1957 रोजी दुसर्याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या करणार्या व्यक्ती या जमीन मालक म्हणून जाहिर करण्यांत आल्या. या जमीनी यथावकाश प्रत्यक्ष प्रकरणाच्या निकालाप्रमाणे कूळांच्या मालकीच्या झाल्या. गेल्या 40 वर्षामध्ये राज्यातील बहुसंख्य कूळ कायद्याच्या प्रकरणांचा निकाला लागला आहे. तरीदेखील वेगवेगळया कारणामुळे किंवा वरिष्ठ न्यायालयात चाललेल्या अपिलांमुळे अजूनही कूळ कायद्यांचे हजारो दावे प्रलंबित आहेत.

*कूळ हक्क :-*

आज रोजी जमीन कसणार्या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्याखेरीज कूळ हक्काबाबत स्पष्ट जाणीव शेतकर्यांमध्ये होणार नाही. हे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
(1) सन 1939 च्या कूळ कायद्यात दिनांक 1.1.1938 पूर्वी सतत 6 वर्षे कूळ म्हणून जमीन करणार्या व्यक्तीला किंवा दिनांक 1.1.1945 पूर्वी सतत 6 वर्षे जमीन कसणारा आणि दिनांक 1.11.47 रोजी जमीन कसणारा कूळ या सर्वांची नोंद नोंदणीपत्रकात संरक्षीत कूळ म्हणून केली गेली.
(2) सन 1955 साली कूळ कायद्यात काही सुधारणा करण्यांत आली. ही सुधारणा करण्यापूर्वी वहिवाटीमुळे किंवा रुढीमुळे किंवा कोर्टाच्या निकालामुळे ज्या व्यक्तींना कायम कूळ म्हणून संबोधण्यांत आले व ज्यांची नोंदणी हक्कनोंदणी पत्रकात कायम कूळ म्हणून नोंद केली गेली त्या सर्वांना कायम कूळ असे म्हटले जाते.
(3) आज रोजी दुसऱ्याच्या मालकीची कोणतीही जमीन कायदेशीररित्या जर एखादा माणूस कसत असेल व अशी जमीन, जमीन मालकाकडून जातीने कसण्यांत येत नसेल तर त्याला कूळ असे संबोधले जाते. याचाच अर्थ तो माणूस जमीन मालकाच्या कुटूंबातील नसला पाहिजे किंवा जमीन गहाण घेणारा नसला पाहिजे किंवा पगारावर ठेवलेला नोकर नसेल किंवा मालकाच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर त्याला कूळ असे म्हणतात.
(4) कूळ होण्याच्या नियमाला काही महत्वाचे अपवाद करण्यांत आले आहेत. विधवा किंवा अवयस्क व्यक्ती किंवा शरीराने किंवा मनाने दुर्बल झालेला माणूस किंवा सैन्यदलात काम करणारा माणूस, यांची जमीन दुसरी व्यक्ती जर कसत असेल तरी, त्या व्यक्ती स्वत:च जमीन कसतात असे मानले जाते.
(5) कूळ हक्काच्या संदर्भातील दुसरी बाजू म्हणजे जमीन मालकाने स्वत:हून जमीन कसणे होय. याची व्याख्यासुध्दा कूळ कायद्यात करण्यांत आली आहे. एखादा इसम स्वत: जमीन कसतो काय, हे ठरविण्यासाठी खालील नियम लावले जातात.
(अ) स्वत: अंगमेहनतीने तो जमीन कसत असेल तर,
(ब) स्वत:च्या कुटूंबातील कोणत्याही इसमाच्या अंगमेहनतीने जमीन कसत असेल तर,
(क) स्वत:च्या देखरेखीखाली मजूरीने लावलेल्या मजूरांकडून जमीन करुन घेत असेल तर, असे मजूर कि ज्याला पैसे दिले जात असोत किंवा मालाच्या रुपाने वेतन दिले जात असो. परंतू पिकाच्या हिश्श्याच्या रुपाने जर मजूरी दिली गेली तर तो कूळ ठरु शकतो.
(6) कूळ ही संकल्पना समजण्यास थोडी अवघड आहे, परंतु कूळ होण्यासाठी खालील महत्वाचे घटक मानले जातात.
(अ) दुसऱ्याच्या मालकीची जमीन अन्य इसम वैध किंवा कायदेशीररित्या कसत असला पाहिजे.
(ब) जमीन मालक व कूळ यांच्यात तोंडी का होईना करार झाला असला पाहिजे व तोंडी करार कोर्टात सिध्दा झाला पाहिजे.
(क) असा इसम प्रत्यक्ष जमीन कसत असला पाहिजे व त्या बदल्यात तो मालकाला खंड देत असला पाहिजे.
(ड) जमीन मालक व कूळ यांच्यात पारंपारिकरित्या जपलेले मालक व कूळ असे विशिष्ठ सामाजिक नाते असले पाहिजे.

_■कूळ कायदा कलम-43 च्या अटी :_

जी कूळे, यापूर्वी जमीनीचे मालक झाले आहेत, त्यांच्या द्रूष्टीने कूळ कायदा कलम 43 नुसार जमीन विकायला बंदी केली जाते व तसा शेरा त्याच्या 7/12 वर इतर हक्कात लिहिला असतो. “कूळ कायदा कलम-43 ला पात्र”, अशा प्रकारचा हा शेरा 7/12 वर लिहिला जातो. शहरीकरणामुळे किंवा स्वत:च्या गरजेनुसार जमीन विकण्याची आवश्यकता असल्यास, कूळांना अशी जमीन विकण्यापूर्वी प्रांत अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. जमीन विक्रीची परवानगी कोणाला द्यावी याबाबतचे नियमदेखील शासनाने बनविले आहे. त्यानुसार कूळ कायदा कलम-43 ला पात्र असलेली जमीन खालील अटींवर विकता येते.
(1) बिगर शेती प्रयोजनासाठी.
(2) धर्मादाय संस्थांसाठी किंवा शैक्षणिक संस्थेसाठी किंवा सहकारी संस्थेसाठी.
(3) दुसऱ्या शेतकर्याला परंतू जर असे कूळ कायमचा शेती व्यवसाय सोडून देत असेल तर किंवा जमीन कसायला असमर्थ ठरला असेल तर.
(4) अशी जमीन विकण्यापूर्वी शासकीय खजिन्यात अतिशय नाममात्र म्हणजे जमीनीच्या आकाराच्या 40 पट एवढी नजराण्याची रक्कम भरावी लागते. याचा अर्थ अशी जमीन सार्वजनिक कामासाठी किंवा संस्थांना विकतांना फारशा जाचक अटी नाहीत. परंतू सर्रास दुसर्या जमीन मालकास अतिशय किरकोळ पैसे भरुन मालकीच्या झालेल्या जमीनी, कूळांनी परस्पर विकू नयेत म्हणून वरील क्र.3 ची महत्वाची अट ठेवण्यांत आली आहे. व त्यांना शेवटचा उपाय म्हणून शेती व्यवसाय सोडतानाच अशी कूळ हक्काची जमीन विकली पाहिजे असा याचा अर्थ आहे.

_■नव्याने कुळहक्क निर्माण होतो का?_

आज एखादा इसम कूळ होऊ शकतो का? कूळ कायदा कलम-32 (ग) नुसार दिनांक 1.4.57 रोजी जमीन कसणार्या माणसाला मालक म्हणून जाहिर केले आहे, परंतु आजरोजी जमीनीत नव्याने कूळ निर्माण होऊ शकतो काय? व असल्यास कशा पध्दतीने कूळ निर्माण होतो याबाबत शेतकर्यांमध्ये कुतूहल आहे. याबाबतची तरतूद कूळ कायद्याच्या कलम-32 (ओ) मध्ये नमूद करण्यांत आली आहे.
कूळ कायदा कलम-32 (ओ) नुसार आजही दुसर्याची जमीन कायदेशीररित्या एक वर्ष जरी दुसरा इसम कसत असेलतर तो कूळ असल्याचा दावा करु शकतो. तथापी त्यासाठी खालील महत्वाच्या अटी कायम आहेत.
(अ) वहिवाटदार व मालक यांच्यात करार झाला असला पाहिजे.
(ब) तो मालकाकडून जमीन कसत असला पाहिजे.
(क) तो खंड देत असला पाहिजे.
(ड) जमीन मालक व कूळ असे विशिष्ठ नातेसंबंध असले पाहिजेत.
आजकाल जमीन मालक स्वत:हून कोणतेही करार वहिवाटदाराशी करीत नसल्यामुळे, कलम-32(ओ) च्या दाव्यांची संख्या अतिशय अल्प आहे. जमीन मालकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे अशा पध्दतीचे कोणतेही करार तो वहिवाटदाराबरोबर करीत नाही. तथापी आधी पिक पाहणीला नांव लावून घ्यावयाचे व एक वर्षाच्या पिक पाहणीचा 7/12 जोडून दिवाणी न्यायालयातून जमीन मालकाला जमीनीत यायला मनाई आदेश आणावयाचे व त्यानंतर काही दिवसांनी कलम-32 (ओ) नुसार कूळ असल्याचा दावा करावयाचा अशाप्रकारे वहिवाटदार व्यक्ती कूळ असल्याचा दावा सर्वसाधारणपणे करतात.

*गाव नमुना सात बारा (7/12) म्हणजे काय?* 

जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाही व त्यातील बदल कळणार नाहीत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावांतील महसूली माहिती ही, गांव नमुना क्र.1 ते 21 या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील 7 नंबरचा नमुना मालकी हक्काबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून 7/12 चा नमुना प्रस्तावित करण्यांत आला.

*गाव नमुना 8अ म्हणजे काय?*


८अ मधे एका व्यक्तिच्या नावावर असलेले सगळे गट नं येतात. थोडक्यात ती एक खातेवहीच आहे. ८अ ऑनलाईन मिळणार नाही.

आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा गांव दप्तरातील नमुना म्हणजे 8अ चा उतारा होय. जमीन जर खरेदीची असेल तर, खरेदी तारखेनंतर घेतलेला 8अ चा उतारा फाईलला लावावा तसेच दरवर्षी शेतसारा भरल्यानंतर 8अ चा उतारा फाईलला लावावा. जमीन जर वडीलोपार्जित चालत असलेली असेल तर वडील हयात असतांना त्यांच्या नावावर एकूण किती जमीन होती व आजरोजी आपल्या नावावर किती जमीन आहे हे दाखविणारे दोन्ही 8अ चे उतारे प्राप्त करुन घेऊन फाईलला लावले पाहिजेत.
उत्तर लिहिले · 24/6/2018
कर्म · 569245
0

सातबारा (७/१२) उतारा:

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हा एक प्रकारचा जमिनीचा रेकॉर्ड असतो. यात जमिनीचा मालक कोण आहे, जमिनीवर किती कर्ज आहे, जमिनीचा प्रकार काय आहे, क्षेत्र किती आहे, लागवड योग्य आहे की नाही, इत्यादी माहिती दिलेली असते.

  • महत्व: जमीन खरेदी-विक्री करताना, जमिनीवर कर्ज काढताना किंवा जमिनीसंबंधित कोणताही व्यवहार करताना सातबारा उतारा महत्त्वाचा असतो.
  • उपलब्धता: सातबारा उतारा आता ऑनलाइन देखील उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या वेबसाइटवर (bhulekh.mahabhumi.gov.in) तुम्ही तो पाहू शकता.
  • घटक: सातबारा उताऱ्यात दोन भाग असतात - १) अधिकार अभिलेख पत्रक (Village Form VII) आणि २) जमीन महसूल खाते उतारा (Village Form XII).

८अ उतारा:

८अ उतारा हा देखील जमिनीच्या मालकीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हे खातेदारांच्या जमिनीच्या नोंदीचे एकत्रीकरण दर्शवते.

  • महत्व: ८अ उतारा जमिनीच्या मालकी हक्काची माहिती देतो. खातेदाराच्या नावावर असलेली एकूण जमीन, तिचे क्षेत्र आणि त्यावर लागलेला कर (tax) याची माहिती यात असते.
  • उपलब्धता: ८अ उतारा तलाठी कार्यालयात मिळतो. काही ठिकाणी तो ऑनलाइनही उपलब्ध असतो.
  • उपयोग: जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ८अ उतारा महत्त्वाचा असतो. यावरून खातेदाराच्या नावावर किती जमीन आहे, हे समजते.

टीप: जमिनीच्या व्यवहाराआधी सातबारा आणि ८अ उतारा तपासून घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1080

Related Questions

जुना सातबारा व नकाशा ४८ गुंठे आहे आणि ऑनलाइन नवीन नकाशा ३५ गुंठे आहे, पण उतारा ४८ गुंठ्यांचाच आहे. यात काय चूक आहे आणि काय बरोबर, हे कसे कळणार?
प्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवते?
जागा मोजणी शासकीय नियम काय आहेत?
बऱ्याच गावांच्या नावांमध्ये उपसर्ग किंवा प्रत्यय लावलेला असतो जसे की नान्नज दुमाला, जेऊर कुंभारी, जेऊर पाटोदा, लोणी खुर्द, पिंपरी खालसा, जळगाव नेऊर इत्यादी. तर त्यातील जेऊर, दुमाला, खालसा याचा अर्थ काय असावा, मुख्यत्वे जेऊरचा?
Online भू-नकाशा वर शेतीचा गट नंबर कसा शोधावा?
परगणा म्हणजे काय?
तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास काय म्हणतात?