शेती पिके कृषी पीक उत्पादन

गहू पिकाची पूर्ण माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

गहू पिकाची पूर्ण माहिती मिळेल का?

4
गहू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जिरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी 2.5 क्विंटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रातील काळ्या जमिनीत सोयाबीन- गहू या पीक पद्धतीमध्ये गव्हाची पेरणी 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायत उशिरा गव्हाची पेरणी उशिरात उशिरा म्हणजे डिसेंबरअखेरपर्यंत करावी. उशिरा पेरणी केलेल्या गव्हास थंड हवामानाचा कालावधी कमी मिळत असल्यामुळे उत्पादनात बरीच घट येते.
बागायत वेळेवर पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्यास जमीन ओलावून घ्यावी. वाफसा आल्यानंतर जमीन कुळवावी. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि गहू बियाणे दोन चाड्यांच्या पाभरीने एकत्रित पेरावे. एकेरी पेरणी करावी. त्यामुळे योग्य प्रकारे आंतरमशागत करता येते.
बागायत उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्यांच्या पाभरीने एकेरी पद्धतीने पेरावे.
गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास तीन ग्रॅम थायरमची बीज प्रक्रिया करावी. यानंतर प्रति किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्टरची बीजप्रक्रिया करावी. हे जिवाणूसंवर्धक कीडनाशक आणि रासायनिक खतांबरोबर एकत्रित मिसळू नये. जिवाणूसंवर्धकामुळे बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते, तसेच उत्पादनातही वाढ होते.
बागायत वेळेवर पेरणीसाठी प्रति हेक्टरी 25 ते 30 गाड्या शेणखत वापरावे, तसेच प्रति हेक्टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद (375 कि. सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 40 किलो पालाश (65 कि. म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. निम्मे नत्र (130 कि. युरिया) आणि संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले निम्मे नत्र (130 कि. युरिया) पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी करून द्यावे.
बागायत उशिरा पेरणीसाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 40 किलो नत्र (87 कि. युरिया), 40 किलो स्फुरद (250 कि. सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 40 किलो पालाश (65 कि. म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
पेरणीनंतर तीन आठवड्यांनी शेताची खुरपणी करून प्रति हेक्टरी 40 किलो नत्राची मात्रा (87 कि. युरिया) द्यावी.
जिरायती गहू पिकाची वाढ ही जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावरच होत असते. बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी- जास्त होऊ शकतात. गहू पिकास देण्यासाठी एकच पाणी उपलब्ध असेल तर ते पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी द्यावे.
जिरायती पेरणीसाठी - पंचवटी (एनआयडीडब्ल्यू- 15), शरद (एकेडीडब्ल्यू- 2997- 16)
जिरायती आणि मर्यादित सिंचन - नेत्रावती (एनआयएडब्ल्यू- 1415)
बागायत वेळेवर पेरणीसाठी - तपोवन (एनआयएडब्ल्यू- 917), गोदावरी (एनआयडीडब्ल्यू- 295), त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू- 301), एमएसीएस- 6222
बागायत उशिरा पेरणीसाठी - एनआयएडब्ल्यू- 34, एकेएडब्ल्यू- 4627
दोन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे आणि तीन पाणी उपलब्ध असतील, तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
उत्तर लिहिले · 12/11/2017
कर्म · 2350
0

गहू हे जगातील एक महत्त्वाचे अन्नधान्य आहे. भारतात, गहू हे उत्तर आणि वायव्येकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गव्हाची लागवड, हवामान, जमीन, मशागत, पेरणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, काढणी आणि साठवण याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे.

हवामान:

  • गव्हाच्या वाढीसाठी थंड आणि कोरडे हवामान आवश्यक असते.
  • 10 ते 25 अंश सेल्सियस तापमान गव्हाच्या वाढीसाठी योग्य असते.

जमीन:

  • गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते.
  • जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा.

मशागत:

  • जमिनीची नांगरणी करून ती भुसभुशीत करावी.
  • दोन ते तीन वेळा कुळप्या फिरवून ढेकळे फोडावीत.
  • जमीन पेरणीसाठी तयार करावी.

पेरणी:

  • गव्हाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावी.
  • पेरणीसाठी सुधारित आणि प्रमाणित बियाणे वापरावे.
  • बियाण्याची मात्रा 100 ते 120 किलो प्रति हेक्टर असावी.
  • पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर 22.5 सेंटिमीटर ठेवावे.
  • बियाणे 5 ते 6 सेंटिमीटर खोल पेरावे.

खत व्यवस्थापन:

  • गव्हाला नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांची आवश्यकता असते.
  • हेक्टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे.
  • नत्राची अर्धी मात्रा पेरणीच्या वेळी आणि उर्वरित मात्रा दोन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावी.
  • स्फुरद आणि पालाशची पूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी.

पाणी व्यवस्थापन:

  • गव्हाला 4 ते 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • पहिली पाणी पाळी पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी द्यावी.
  • दुसरी पाणी पाळी 40 ते 45 दिवसांनी, तिसरी 60 ते 65 दिवसांनी आणि चौथी 80 ते 85 दिवसांनी द्यावी.

काढणी:

  • गहू पिक 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होते.
  • गव्हाचे दाणे कडक झाल्यावर आणि ओलावा 20% पेक्षा कमी झाल्यावर काढणी करावी.
  • काढणीनंतर गव्हाचे मळणी करून धान्य वेगळे करावे.

साठवण:

  • गहू साठवण्यापूर्वी तो चांगला वाळवावा.
  • धान्यामध्ये 12% पेक्षा कमी ओलावा असावा.
  • साठवणुकीच्या ठिकाणी हवा खेळती असावी.
  • धान्याला कीड लागू नये म्हणून योग्य उपाययोजना करावी.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5220

Related Questions

9. कृषी विपणन म्हणजे काय? त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
कृषी विपणनातील समस्या कोणत्या आहेत? त्यावर उपाय सुचवा.
2. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा?
भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा?
माझी एनजीओ (NGO) संस्था आहे, मला कृषी विभागात प्रशिक्षण घ्यायचे आहे, काय करावे?
सेंद्रिय खतावर आधारित उपक्रम?
सेंद्रिय खत महत्त्व लागणारे घटक बनवण्याच्या पद्धती उपक्रम?