शब्दाचा अर्थ भूगोल पृथ्वी विषुववृत्त

विषुववृत्त म्हणजे नेमकं काय?

3 उत्तरे
3 answers

विषुववृत्त म्हणजे नेमकं काय?

8
पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या अक्षास (आस), काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण धृवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजे विषुववृत्त होय. विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.

विषुववृत्ताची लांबी साधारणपणे ४०,०७५.० किलोमीटर अथवा २४,९०१.५ मैल एवढी आहे. विषुववृत्त हे पृथ्वीवरील पाच प्रमूख अक्षवृत्तांपैकी एक आहे. विषुववृत्तावरील ठिकाणांवर सर्वात जलद सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. तसेच विषुववृत्तावर नेहमी १२ तास दिवस तर १२ तास रात्र अनुभवायास मिळते. इतर ठिकाणी दिवस आणि रात्र ऋतूप्रमाणे लहान अथवा मोठ्या होतात.

आपली पृथ्वी ही पूर्ण गोलाकार नसून काहीशी लंबगोलाकार आहे. पृथ्वीचा सरासरी व्यास १२,७५० किलोमीटर असून विषुववृत्ताशी मात्र तो साधारणपणे ४३ किलोमीटरने अधिक आहे.

अवकाशयाने अवकाशात सोडण्यासाठी विषुववृत्तावरील ठिकाणांचा वापर करतात. कारण पृथ्वीच्या परिवलनामुळे विषुववृत्तावरील ठिकाणे पृथ्वीवरील इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा पृथ्वीच्या मध्याभोवती जास्त वेगाने फिरत असतात. ह्या मिळालेल्या अधिक वेगामुळे अवकाशयाने सोडायला कमी इंधन लागते. फ्रेंच गयाना (French Guiana) मधील कोउरू (Kourou) येथील गयाना स्पेस सेंटर (Guiana Space Center) हे ह्याचेच एक उदाहरण आहे

विषुवृत्ताला इंग्रजीत Equator  म्हणतात. विषुवृत्ताप्रमाणे कर्कवृत्त आणि मकरवृत्त अशी काल्पनिक वर्तुळे म्हणजेच वृत्त आहेत. 
.
उत्तर लिहिले · 6/7/2017
कर्म · 48240
2
*विषुववृत्त
******************

पृथ्वीचा अप्रतिम फोटो (उपग्रहातून काढलेला) एका कार्यक्रमात स्लाइड प्रोजेक्टरमधून दाखवला गेला. ते विलोभनीय दृश्य पाहून अनेकजण भारावून गेले होते. निरनिराळ्या छटांतून फोटोमधील काय भाग व्यक्त होतो, याचे यथार्थ वर्णनही केले जात होते. एवढ्यात एकाने उठून शंका विचारली, "फोटो छानच आहे, पण त्यावर व विषुववृत्त - ते कुठे कसे दिसत नाही ? अक्षांश व रेखांश यांच्याशिवाय ही पृथ्वी कशी म्हणायची ?"

प्रत्येकाच्या मनातील पृथ्वीची आकृती व पृथ्वीचा गोल हा असा ठसलेला असतो. पृथ्वीवर प्रत्यक्षात अक्षांश, रेखांश वा वृत्ते नाहीतच, तर त्या काल्पनिक रेषा आहेत, हे लक्षातच राहत नाही. अशीच काही फसगत बोटीवरून प्रथम विषुववृत्त ओलांडणाऱ्यांची होते. प्रत्येक बोटीवर विषुववृत्त ओलांडण्याचा एक सोहळा अावर्जून पार पाडला जातो. पृथ्वीच्या एका गोलार्धातून दुसऱ्या गोलार्धात जाणे हे जरा कौतुकाचेच नाही काय ? निदान पुर्वी तरी तसे समजले जायचे. डेकवर सगळे जमून जेव्हा विषुववृत्त 'पार' करतात - म्हणजे नेव्हिगेटर तसे सांगतो - तेव्हा हा सोहळा साजरा केला जातो. नव्याने बोटीवर आलेला कॅडेट मात्र डोळे फाडफाडून विषुववृत्ताची रेषा शोधायचा व या सोहळ्याचा संदर्भ सापडायचा प्रयत्न करत असतो. त्याच्या पुढच्या खेपेला मात्र तो नवीन दाखल झालेल्या कॅडेटला विषुववृत्त पार करायच्या सोहळ्याचे वर्णन आधीपासून सांगू लागतो.

तर असे हे विषुववृत्त म्हणजे पृथ्वीची मध्यभागी बरोबर दक्षिण व उत्तर गोलार्धात फोड करणारी काल्पनिक रेषा आहे. विषुववृत्तावर पृथ्वीचा परीघ ४०,०७७ किलोमीटर भरतो. मुख्यतः २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी दुपारी बारा वाजता सूर्य बरोबर विषुववृत्तावर असतो, तर या दोन तारखांच्या दरम्यान जवळपासच असतो. त्यामुळे या प्रदेशात तापमान नेहमीच चांगले उष्ण असते. अनेक विषुववृत्तीय प्रदेशात दुपारी भरपूर हवा तापत जाते व सायंकाळच्या वेळी एखादी पावसाची सर येऊन हवेत गारवा येतो. भरपूर ऊन, भरपूर पाऊस यामुळे सर्व विषववृत्तीय प्रदेश दाट जंगलांनी भरलेला आहे.

विषुववृत्ताची आठवण विमानातून पृथ्वी प्रदक्षिणेचे उच्चांक करायला जाणाऱ्यांनाही हमखास होत असते.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 26/2/2019
कर्म · 569225
0

विषुववृत्त: विषुववृत्त ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एक काल्पनिक रेषा आहे. ही रेषा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांच्या मधोमध पृथ्वीला दोन समान भागांमध्ये विभागते.

महत्व:

  • विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध असे दोन भाग होतात.
  • हे सर्वात मोठे अक्षांश (latitude) आहे आणि त्याचे मूल्य 0° अंश आहे.
  • विषुववृत्तावर वर्षभर दिवस आणि रात्र समान असतात.
  • सूर्यकिरणे थेट पडल्यामुळे या भागात तापमान जास्त असते.

भौगोलिक स्थान: विषुववृत्त खालील देशांमधून जाते:

  1. इक्वेडोर
  2. कोलंबिया
  3. ब्राझील
  4. साओ टोमे आणि प्रिन्सिप
  5. गॅबन
  6. काँगो
  7. काँगो लोकतांत्रिक प्रजासत्ताक
  8. युगांडा
  9. केनिया
  10. सोमालिया
  11. मालदीव
  12. इंडोनेशिया
  13. किरिबाटी

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: विकिपीडिया

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 980

Related Questions

विषुव्रुत्त कश्यास म्हणतात?
ब्राझीलच्या उत्तर भागातून कोणते वृत्त जाते?
विषुववत कशास म्हणतात?
विषुववृत्त कशाला म्हणतात?
विषुववृत्त कशास म्हणतात?