भारुड
0
Answer link
एकनाथमहाराजांनी ४५० वर्षांपूर्वी 'एडका' या भारुडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रूपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारुडांचा उपयोग केला जातो.
भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली, पण एकनाथ महाराजांसारखी विविधता त्यांत नाही. संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत.
लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडांची रचना केली. भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसते तर त्याचे संपादनही करावे लागते. भारुडांत ब्रह्म ज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते. तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती ही अध्यायाबरोबरच नटही असावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातली गेल्यामुळेच भारुडांनी जनमनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोक शिक्षणाचे व स्वधर्म जागृतीचे कार्य केले आहे. हीच भारुडे लळितात अभिनय करून संभाषणे टाकून म्हटली जातात आणि म्हणूनच लळिताचे बीज भारुडात आहे असे म्हटले जाते. मराठी संतांनी प्रौढ, सुशिक्षित जनांसाठी भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभव अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच इतर सर्वजनांनाही परमार्थाचा आनंद घेता यावा व अध्यात्म सुलभ व्हावा म्हणून भारुडांची व्यवस्था केली. हा एक वारकरी कला आविष्कार आहे.
स्त्री भारूड सादरकर्त्या
पूर्वी भारूड फक्त पुरुष सादर करीत असत. परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे. संत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई तिवाडी या स्त्री-भारुडकर्त्या भारुडे सादर करीत असतात. चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करण्यास त्यांना आमंत्रित केले जाते. महाराष्ट्रात निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप हे भारूड सादरर्कते आहेत. स्वातंंत्र्यपूर्व काळात जुन्नर तालुक्यातील राधाबाई आरोटे व सीताबाई आरोटे (डुंंबरवाडी) यांंनी महाराष्ट्रभर वारकरी भारुडे सादर केली. पुरुषवेष धारण करून या दोघी बहिणींंनी मुंंबईसह महाराष्ट्र गाजविला. मुंबईमध्ये त्यांच्या भारुडासाठी अलोट गर्दी व्हायची.
0
Answer link
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥ धृ ॥
विंचू, विंचू चावला म्हणजे काय झालं? इथून सुरुवात करूया. हा विंचू नेहमीचा विंचू नसून काम (कोणत्याही वास्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल हाव निर्माण होणे) आणि क्रोध यांनी उत्पन्न झालेला अधर्मी, विनाशकारी आणि अहंकारी भाव आहे. हे तमस् म्हणजे अंधःकार. अज्ञानाचा आणि अहंकाराचा विनाशकारी अंधःकार. एकदा काम आणि क्रोधाचा विंचू चावला की माणसाला तमाचा घाम येतो, जणू माणूस खरोखरीच विंचू चावल्यासारखा बेभान होतो, विचित्र वागू लागतो, चुकीचे निर्णय घेऊ लागतो आणि शेवटी अधर्माच्या वाटेवर चालू लागतो.
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥ १ ॥
अशा विंचू चावलेल्या मनुष्याला जेव्हा या दंशाची जाणीव होते तेव्हा लक्षात येतं की, या तामसी दोषांमुळे पंचप्राण (पाच प्रकारचे प्राणवायू, याबद्दल अधिक माहिती इथे देणं क्रमप्राप्त ठरणार नाही. पण या ठिकाणी चांगली माहिती दिलेली आहे.) आणि त्यांचा प्रवाह दोषरहित होतो. त्याचा परिणाम फक्त शरीरावरच नव्हे तर माणसाच्या वृत्तीवर, विचारांवर आणि शेवटी आचारांवर देखील होतो. हे प्राणवायू व्याकुळ होतात, जीव किंवा आत्मा (परमेश्वराचा अंश) गुदमरतो. असं वाटू लागतं आता प्राण जावू लागले आहेत. आयुष्य अनिर्बंध मार्गावर जात आहे, भरकटत आहे. पाप आणि अधर्माने बरबटलेले आहे. आणि आता यातून मुक्तता नाही! सर्वांगाचा दाह, हा दाह दोन प्रकारचा असू शकतो काम आणि क्रोधामुळे किंवा या निरुपयामुळे.
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिने ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ॥ २ ॥
या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट संत एकनाथ महाराज सांगतात की, या सगळ्या त्रासाचे मूळ कुठे आहे? तर मनुष्यामध्ये. शेवटी कर्म मनुष्यच करतो. त्यामुळे या रोगाचे मूळ म्हणजे मनुष्य हिटर इंगळी आहे. इंगळी म्हणजे मोठा विंचू. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण, ज्याच्या त्याच्या अवस्थेला ज्याचे त्याचे कर्म जबाबदार असते हे जोपर्यंत मनात ठसवून घेणार नाही तोपर्यंत मनुष्य आपल्या दुःखासाठी नेहमी दुसऱ्याला दोष देण्यात गर्क राहतो. या मनुष्य इंगळीने नांगी मारली म्हणजे आपल्या कर्मावर आणि आपल्या विचारांवर जर मनुष्याचा ताबा राहिला नाही तर त्याची परिणीती दुःखात होणं अगदी स्वाभाविक आहे. हेच महाराज इथे सांगतात.
ह्या विंचवाला उतारा ।
तमो गुण मागे सारा ।
सत्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरा ॥ ३ ॥
आत्तापर्यंत आपण विंचू म्हणजे काय, दाह कशाचा असतो आणि मूळ कुठे आहे हे पाहिलं. पण या सगळ्या दुःखाला आणि अवस्थेला उत्तर काय? जोपर्यंत या रोगाचे निवारण होणार नाही तोपर्यंत माणूस असाच तडफडत राहणार. मग या रोगाला औषध काय? या विंचवाच्या विषाला उतारा काय? तर महाराज सांगतात, तमोगुण मागे सारा, थोडक्यात असा कोणताही विचार आणि कृती जी तुम्हाला अज्ञानाकडे ढकलेल त्यांचा त्याग करा. क्रोध, काम, अहं भाव, लालसा, ईर्षा इत्यादी भाव मनात येत असतील तर त्यांना प्रयत्नपूर्वक टाळा. म्हणजेच तमोगुण मागे सारा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. सत्वगुण अंगाऱ्यासारखा लावा. सत्वगुण म्हणजे सत् उत्पन्न करणारा गन. सत् म्हणजे सत्याचे मूळ. सत्याच्या मार्गावर चाला. ज्ञान मिळवा. थोडक्यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. सतःला पुनःपुन्हा विचारा की ‘जे मी करतोय ते सत्याला आणि धर्माला अनुसरून आहे की नाही. यात माझ्यातले तमोगुण तर डोकावत नाही ना?’ सत्त्वगुण अंगी लावण्याचा आणखीन एक सोपा उपाय म्हणजे स्वतःला हे सतत सांगत राहणे की ‘जी गोष्ट माझी नाही त्याला स्पर्ष करायचा नाही’ मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव. जिथे तुमचा अधिकार नाही तिथे तुमचा स्पर्ष नसलाच पाहिजे. एवढं केलं की, इंगळी म्हणजेच हे तमाचे विष झरझर उतरून जाईल.
सत्व उतारा येऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दने ॥ ४ ॥
हा सत्त्व उतारा एकदा घेतला की तमोगुण मागे जाईल. पण तरीही माणसाची वृत्ती अशी असते की तो तमोगुण अधुनमधुन डोकावतोच. त्यालाच माझ्या मते संत एकनाथ महाराज फुणफुण म्हणतात. पण आता या फुणफुणीला उतारा किंवा औषध काय? तर परमेश्वराची भक्ती. कारण दरवेळेस फक्त माणसाचे कर्म उपयोगी नसते, त्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची – कृपेची सुद्धा जोड लागते. त्यामुळे तुम्ही परमेश्वराची भक्ती करा म्हणजे ही फुणफुण सुद्धा निघून जाईल!
0
Answer link
. |
संतांनी आपापल्या परीने विविध माध्यमातून जसे भजन, कीर्तन करून कधी प्रेमाने तर कधी कठोर शब्दात त्या वेळी समाजाचे प्रबोधन करण्याचे मौलाचे कार्य केलेले आहे त्यातीलच एक माध्यम म्हणजेच "भारूड" हे होय.
भारूड हा मराठी पद्यवाड:याचा एक प्रकार आहे. भारूड या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ ' धनगर ' असा मानला जातो. या भारूडातून साध्या रुपकांमधून धार्मिक व नैतिक तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले गेलेले आहे. काहींच्या मते बहुरूड या शब्दाचा अपभ्रश करून भारूड हा शब्द प्रचलित झाला आहे.
भारूडाचे मुख्यतः तीन प्रकार मानले जातात. भजनी भारूड, सोंगी भारूड व कूट भारूड. यापैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे असते. महाराष्ट्रातील संतांनी लोकशिक्षणासाठी भरुडाची रचना केली होती.
भारूड काव्यरचनेचा उगम हा मराठी भाषेतूनच झालेला आहे. भारूडाचे विषय हे सर्वसमान्यांच्या ओळखेचे व दैनंदिन जीवनातील व्यवहारात आढळणारे विषय असतात. समाज व त्याचे वृत्तीदर्शन, नाती-गोती, व्यवसाय, पशु- पक्षी, सणवार असे अनेक विषय भरुडामध्ये दिसून येतात.
भारूड हे नुसते गायनाने दाखवाची रचना नसून त्याचे संपादन ही करावे लागते. भारूड या काव्यप्रकारात ब्रम्हज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजनात्मक पद्धतीने सादर करावे लागते. त्याचप्रमाणे भारूड सादर करणाऱ्या व्यक्तीला अध्ययानाचे चांगले ज्ञान तर असावेच परंतु त्याचबरोबर एक नट ही असावे लागते.
संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्यरचनेला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचविले आहे. संत एकनाथांनी त्यांचा आध्यात्मिक अनुभव अगदी साध्या आणि सरळ भाषेत मांडला होता. त्यांच्या भारूडात समाजाला समजणारे सोप्या भाषेतील तत्वज्ञान आढळते त्याचबरोबर त्यांच्या भारूडमध्ये विविधता आढळून येते. संत एकनाथ महाराजांनी 'एडका' या भरुडाची रचना केली होती. राज्यात आजही जनजागृतीसाठी व लोकजागृतीसाठी भारुडाचा उपयोग केला जातो.
काहींच्या मते संत ज्ञानेश्वर हे भारूडाचे आद्यरचनाकार होते असे म्हंटले जाते. तर काहींच्या मते, भारूडचे उगमस्थान म्हणजेच हरिकीर्तन व कीर्तन परंपरेचे जनक म्हणजेच संत नामदेव महाराज मानले जातात म्हणून संत नामदेव महाराज जे नाचून कीर्तन करायचे त्याला लळीत म्हणतात व या लळीतातूनच रुपकाचा जन्म झाला आहे. त्याचमुळे आध्यात्म सांगायला एक गोष्ट किंवा या रुपकाच्या माध्यमातून सांगू शकतो, व भारुड काव्यरचनेचा मुख्य हेतू हाच होता.
पूर्वीच्या काळी फक्त पुरुषाच भारूड सादर करीत होते परंतु आता मात्र काळ बदलला आहे आता स्त्री भारूडकर्त्या ही भारुडे सादर करू लागल्या आहेंत. यामध्ये संत साहित्य अभ्यासक गंगुबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम व चंदाबाई तिवाडी या भारुडे सादरकर्त्या आहेत. यातील चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला आहे.
असा हा भारूड काव्यप्रकार लोक प्रबोधनासाठी अत्यंत उपयुक्त असल्यामुळे जनजागृतीसाठी बऱ्याच संप्रदायांनी त्याचा उपयोगी करून घेतला आहे.