2 उत्तरे
2
answers
कुत्रा चावला तर रेबीज होईल का?
0
Answer link
होय......
प्राण्याने त्यातही प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळे होणारा आजार म्हणजे 'रेबीज'. हा आजार अत्यंत जीवघेणा असून, वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येऊ शकतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळेच, जगभरात दरवर्षी 59 हजारपेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात.
रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे.
सामान्यांना या आजाराबाबत फार माहिती नाही. त्यामुळे सामान्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
1. रेबीज म्हणजे काय?
प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा 'रेबीज' हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे.
रेबीजचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर, म्हणजेच मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रेबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरला तर रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो.
काही रुग्णांमध्ये पॅरालिसिसची (लकवा) समस्या निर्माण होते. काहीवेळा रुग्णांच्या व्यवहारात अचानक बदल होतो आणि रुग्ण अधिक हायपर झालेले दिसून येतात.
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सूपरटेल्स नावाच्या संस्थेत वरिष्ठ पशूवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉ. पूजा कडू सांगतात, "माणसाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर रेबीज व्हायरस अत्यंत वेगाने पसरण्यास सुरूवात होते."
तज्ज्ञ म्हणतात, एकदा रेबीजचं निदान झालं तर या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वांत महत्त्वाचे आहेत.
2. रेबीज कसा पसरतो?
रेबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये पण काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो.
रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून हा आजार पसरतो.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (NCDC) माहितीनुसार, प्राण्यांनी चावल्यामुळे, अंगावर ओरखडे मारल्यामुळे, माणसांच्या अंगावरची उघडी जखम चाटल्यामुळे प्राण्यांच्या लाळेतून रेबीजचा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो.
भारतात 95 टक्के प्रकरणात माणसांना रेबीज होण्यामागे कुत्रा कारणीभूत आहे. तर, 2 टक्के प्रकरणात मांजर आणि 1 टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मूंगूसामुळे रेबीज परसतो.
3. रेबीजची लक्षणं काय?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रेबीजची लक्षणं काहीवेळा फार उशीराने लक्षात येतात. पण, तोपर्यंत उपचार कठीण होण्याची शक्यता असते.नानावटी रुग्णालयाचे संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. हर्षद लिमये म्हणतात, "रेबीजचा संसर्ग झाल्यानंतर एका आठवड्यापासून ते एक वर्षात लक्षणं दिसू लागतात."
पण, सामान्यत: आजाराची लक्षणं 2-3 महिन्यातही दिसून येतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार,
ताप आणि अंगदुखी होणं
व्हायरस सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये (चेतासंस्थेत) शिरल्यानंतर मेंदू आणि मणक्यात सूज येणं
फ्युरिअस रेबीजमध्ये रुग्णाचं वागणं बदलतं. रुग्ण हायपर होतो किंवा त्यांना पाण्याची भीती वाटू लागते
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू होणं
पॅरेलॅटीक रेबीजमध्ये स्नायू हळूहळू कमकूवत होतात. रुग्ण कोमात जातो आणि त्यानंतर मृत्यू होतो
ते पुढे सांगतात, "तात्काळ उपचार केले नाहीत तर 100 टक्के प्रकरणांमध्ये रुग्णाचा जीव जातो."
4. प्राणी चावलेली जागा स्वच्छ कशी करावी?
रेबीज व्हायरस प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणं सर्वांत महत्त्वाचं आहे.
डॉ. लिमये म्हणतात, "प्राण्याने चावल्यानंतर जखमेवर योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे संसर्ग शरीरातील इतर भागात पसरण्यावर नियंत्रण मिळवता येतं. ज्यामुळे पुढील गुंतागुंत कमी होते."नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (NCDC) प्राणी चावल्यामुळे झालेली जखम कशी स्वच्छ करावी यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्यात.
प्राणी चावल्यामुळे जखम झालेल्या जागेवरची लाळ लवकरात लवकर स्वच्छ करावी.
पाणी आणि साबणाने जखमेचा भाग 15 मिनिटं स्वच्छ धूवावा.
जखम धुवून झाल्यानंतर त्यावर अॅन्टिसेप्टिक लावावं.
साबण किंवा व्हायरसविरोधी पदार्थ (अल्कोहोल, प्रोव्हिडोन आयोडिन) उपलब्ध नसेल तर जखम पाण्याने धूवावी.
जखमेत संसर्ग होऊ नये यासाठी टीटॅनसचं इंजेक्शन घ्यावं.
कुत्रा चावलेल्या रुग्णाला मानसिक आधार द्यावा.
तात्काळ डॉक्टर किंवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय मदत घ्यावी.
5. प्राणी चावल्यामुळे झालेल्या जखमेवर हे लावू नका
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार,
साध्या हातांनी जखमेला स्पर्श करू नका, स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ करावेत.
जखमेवर माती, तेल, लिंबू, खडू, मिरची पावडर यांसारखे पदार्थ लावू नका.
जखमेवर पट्टी बांधू नका.
6. डॉक्टरांकडे केव्हा जावं?
कुत्रा किंवा प्राणी चावल्यानंतर तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो.
फोर्टिस रुग्णालयाचे आपात्कालीन-विभाग संचालक डॉ. संदीप गोरे म्हणतात, "कुत्रा किंवा मांजर चावल्यानंतर जखम झालेली जागा तात्काळ साबण आणि पाण्याने धूवून रुग्णालयात जावं. सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, रेबीजवर नियंत्रण हा एकमेव पर्याय आहे."लोकांमध्ये रेबीज या आजाराबाबत आणि वैद्यकीय उपचारांबाबत जनजागृती नसल्याने लोक उशीरा डॉक्टरांकडे उपचारांसाठी पोहोचतात. काही प्रकरणात रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होईपर्यंत रुग्णाचा मृत्यू होतो.
तज्ज्ञ म्हणतात, प्राणी चावल्यानंतर किंवा प्राण्याने अंगावर ओरखडा मारल्यानंतर तात्काळ डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.
डॉ. हर्षद लिमये सांगतात, "प्राण्याने शरीरावर ओरखडा मारला असेल तर रुग्णाला तातडीने रेबीजची लस दिली जाते. पण, जखमेतून रक्त येत असेल किंवा प्राण्यांच्या लाळेशी संपर्क झाला असेल तर लशीसोबत रेबीज इम्युनोग्लोबिन देण्यात येतं."प्राणी चावल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे लक्षणांवर योग्य उपचार होतात आणि रोगाचा प्रसार नियंत्रणात ठेवता येतो.
पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा कडू यांच्याकडून आम्ही प्राणी चावल्यानंतर रेबीजविरोधी लस कशी देण्यात येते याची माहिती आम्ही जाणून घेतली.
त्या सांगतात, "रेबीज प्रतिबंधासाठी रेबीजविरोधी लशीचे पाच डोस घ्यावे लागतात. प्राणी चावल्यानंतर त्याच दिवशी लस घ्यावी लागते. याला शून्य दिवस असं म्हटलं जातं. त्यानंतर तीन, सात, 14 आणि 28 व्या दिवशी रेबीजविरोधी लस घ्यावी लागते."
जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील प्राण्यांनी चावा घेतल्यानंतर अशाच पद्धतीने लसीकरणाबाबत माहिती दिली आहे.
प्राण्यांनाही अशाच पद्धतीने रेबीजविरोधी लशीचे डोस देण्यात येतात.
7. रेबीजबद्दलचे चुकीचे समज
रेबीजबाबत लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव असण्यासोबतच गैरसमजही खूप आहेत.
"रेबीजच्या उपचारात 14 दिवस सलग पोटात इंजेक्शन घ्यावं लागतं किंवा कुत्रा चावल्यानंतर झालेल्या जखमेवर हळद, हायड्रोजन-पेरॉक्साईड, औषधी वनस्पती, तूप लावल्याने संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवता येतं," असे काही गैरसमज लोकांमध्ये असल्याचं डॉ. लिमये सांगतात.
8. रेबीजची लस कोणाला दिली जाते?
डॉ. पूजा कडू पुढे सांगतात, "घरातील कुत्रा, मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांना रेबीजविरोधी लस दिली जाते. त्याचसोबत पशूवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी आणि प्राण्यांसोबत काम करणाऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाते."त्या पुढे म्हणाल्या, रेबीजविरोधी लशीचा अजिबात तुटवडा नाहीये. ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजविरोधी लस उपलब्ध असते.
9. रेबीज झालेल्या प्राण्यांचं काय केलं जातं?
पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. कडू पुढे सांगतात, "कुत्र्यांमध्ये रेबीजचा संसर्ग झाल्याची अनेक प्रकरणं पाहायला मिळतात. एखाद्या प्राण्याला रेबीज असल्याचा संशय आला तर त्यांना मॉनिटर केलं जातं. या प्राण्यांना सरकारी रुग्णालयात किंवा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये वेगळं ठेवलं जातं."
प्राण्यांना रेबीज होऊ नये यासाठी त्यांचं नियमित लसीकरण महत्त्वाचं आहे. डॉ. कडू पुढे म्हणाल्या, "प्राण्यांना पहिल्या वर्षी रेबीजविरोधी लशीचे दोन डोस दिले जातात. त्यानंतर दरवर्षी एक डोस दिला जातो."
0
Answer link
कुत्रा चावला तर रेबीज होण्याची शक्यता असते, पण ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते.
- कुत्र्याला रेबीज आहे की नाही: जर कुत्र्याला रेबीज असेल, तर तुम्हाला रेबीज होण्याची शक्यता जास्त असते.
- कुत्रा लसीकृत आहे की नाही: जर कुत्र्याला रेबीजची लस दिली गेली असेल, तर रेबीज होण्याची शक्यता खूपच कमी होते.
- चावा किती खोल आहे: चावा जितका खोल असेल, तितका धोका जास्त असतो.
- चावा कुठे घेतला आहे: डोके आणि मानेजवळ चावा घेतल्यास धोका जास्त असतो.
रेबीज टाळण्यासाठी उपाय:
- लगेच वैद्यकीय सल्ला घ्या: कुत्रा चावल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.
- घाव स्वच्छ करा: साबण आणि पाण्याने 10-15 मिनिटे घाव चांगला धुवा.
- रेबीजची लस घ्या: डॉक्टर तुम्हाला रेबीजची लस आणि इम्युनोग्लोब्युलिन (immunoglobulin) देतील.
लक्षणे: रेबीजची लक्षणे दिसण्यास काही आठवडे किंवा महिने लागू शकतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी आणि थकवा जाणवतो. नंतर गोंधळ, चिंता, आणि पॅरालिसिस (paralysis) होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी:
- जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) वेबसाइट (https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/rabies) तपासा.
Disclaimer: हा लेख केवळ माहितीसाठी आहे आणि तो वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कुत्रा चावल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.