मानसशास्त्र भावनिक बुद्धिमत्ता

फोडासारखं जपणं म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

फोडासारखं जपणं म्हणजे काय?

0


फोडासारखं जपणं म्हणजे काय


फोड म्हणजे खरं तर एक जखम. मग ती जखम काहीतरी लागल्यामुळे होते किंवा शरीरातील काही अंतर्गत बदलांमुळे होते. फोड हे सामान्यपणे त्वचेच्या दृश्य भागांवर उठतात यावरून आपल्याला कळतं की आपल्या शरीराचा समतोल काही कारणाने थोडा ढासळला आहे, मग आपण त्यावर काही घरगुती उपचार करून ते बरे करण्याचा प्रयत्न करतो. घरगुती उपचारांनी जर ते फोड गेले नाही तर आपण डॉक्टरकडे जातो. उदाहरणार्थ, बहुतेकदा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे किंवा पित्त वाढल्यामुळे फोड उठतात. अशावेळी आपण लिंबू किंवा कोकम सरबत घेतो. ज्यामुळे शरीरातील उष्णता अवाक्यात येते आणि ते फोड निघून जातात. नाहीच गेले तर आपण डॉक्टरकडे जातो मग सी विटामिन सारखी औषधं ते देतात त्यानेही फोड गेले नाहीत तर डॉक्टर सांगतील त्या टेस्ट करून घेत असतो. त्यातून जे निदान होईल त्यानुसार डॉक्टर आपल्यावर उपचार करतात. थोडक्यात काय तर “फोड” ही काही मिरवण्याची गोष्ट नाही. ते फोड एक तर उठू नयेत किंवा मग उठलेच तर ते लवकर निघून जावेत म्हणून आपण प्रयत्न करीत असतो. मग प्रश्न हा पडतो की एखादी गोष्ट जीवापाड जोपासण्याला आपण “तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपणं” असं का म्हणतो? बरेचदा हा शब्द आई बाप आपल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी तिची पाठवणी करताना तिच्या नवऱ्याला कळवळून सांगत असतात. “जावईबापू, आमच्या मुलीला आम्ही अगदी लाडाकोडात, अगदी तळहातावरच्या फोडासारखी जपली आहे हो. आता ही जबाबदारी तुमची आहे.” म्हणजे काय? तो नवरा बिचारा मनात म्हणत असेल, “म्हणजे आता हा फोड मी जपायचा का?” विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर या विधानातील फोलपणा आपल्या लक्षात येईल. मराठी भाषा वळवावी तशी वळते असं म्हणतात. त्यामुळे “फोडाप्रमाणे जपणं” याला काही एक अर्थ असेलही. पण सकृद्दर्शनी तरी वर उल्लेखिलेला अर्थच याला अभिप्रेत आहे असं दिसतंय.
फोड हा फक्त तळहातावर येत नाही तर तो कुठेही येऊ शकतो अगदी सांगता येणार नाही अशा भागावर सुद्धा येतो. अशा बाबतीत त्याला आपण जेंव्हा जपतो ते त्याला बसता उठताना, काम करताना काही लागू नये म्हणून. याचा अर्थ असा नाही की तो फोड तसाच रहावा म्हणून त्याला आपण जपत असतो.
फोडाप्रमाणे जपणं हा वाक्प्रचार अनेकांनी अनेक कारणांसाठी वापरला आहे. म्हणजे एखाद्या प्रेयसीचं पत्र प्रियकराने जपून ठेवणं, आईने मुलाचा लहानपणीचा फोटो जपून ठेवणं, एखादी आवडती वस्तू किंवा वास्तू वर्षोनुवर्षे जपून ठेवणं. अशा अनेक गोष्टींविषयी इतरांना सांगताना आपण या वाक्प्रचाराचा उपयोग करतो. त्यामुळे तो चुकीचा असावा असा माझा दावा नाही. तर तो “फुलाप्रमाणे जपणं” या शब्द प्रयोगाचा अपभ्रंश असावा असं मला वाटतं.
प्रियकर आपल्या अयशस्वी प्रेमाच्या आठवणी जर फोडाप्रमाणे जपत असेल तर ती एक ठसठसणारी जखम असावी असं वाटतं पण तेच जर फुलाप्रमाणे जपत असेल तर त्या आठवणी मोरपंखी असतील, लाघवी असतील, सुखद असतील. कधीही आपल्या आठवणींच्या बागेत जावं आणि त्या आठवणी हुंगाव्यात अशा असतील. आपल्या मुलीला आईवडिलांनी फोडाप्रमाणे जपणं याचा अर्थ ‘कधी एकदा हिला उजवून टाकतोय’ या भावनेने तिचा मनाविरुद्ध सांभाळ करणं असा असू शकतो. पण तेच जर तिला फुलाप्रमाणे जपलं असं म्हटलं तर? लहानपणापासून तिच्या बाललीला पहात, तिला हवी ती गोष्ट आणून देत, तिला पाहिजे तो खेळ खेळू देत, हवं तेंव्हा मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याची परवानगी देत तिचं संगोपन केलं असा त्याचा अर्थ होतो. अशा फुलाप्रमाणे वाढवलेल्या मुलीला आपली परिणीता म्हणून घेऊन जाणारा तिचा नवरा सुद्धा तिला फुलाप्रमाणेच आदराने वागवेल नाही का? थोडक्यात आपल्या आवडत्या वस्तू, वास्तू आणि व्यक्तीला “फोड” संबोधून आपणच त्यांची किंमत कमी करतो. तेच जर आपण त्यांना “फुल” म्हटलं तर त्यांच्या सोबत आपलंही मूल्य वाढतं, बरोबर ना? तेंव्हा यापुढे तुम्ही एखाद्या वस्तू, वास्तू आणि व्यक्ती विषयी समोरच्याला सांगताना फोडाप्रमाणे जपलं म्हणण्याऐवजी फुलाप्रमाणे जपलं असं म्हणा, तुम्ही त्यांना किती महत्त्व देता हे त्यावरूनच कळेल.
उत्तर लिहिले · 10/2/2023
कर्म · 53720
0

'फोडासारखं जपणं' या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची अत्यंत काळजी घेणे, ती गोष्ट सुरक्षित ठेवणे.

अर्थ:

  • खूप जतन करणे.
  • अत्यंत काळजी घेणे.
  • सुरक्षित ठेवणे.

उदाहरण:

आई आपल्या बाळाला फोडासारखं जपते.

शेतकरी आपल्या शेतातल्या पिकाला फोडासारखं जपतो.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

भावनाशून्य माणसे असू शकतात का?
खरा आनंद म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो?
सामाजिककरण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे?
आपण एखाद्याबद्दल विचार करत आहात असे वाटते तेव्हा ते देखील आपल्याबद्दल विचार करत असतात का?
आपला कोणीतरी फायदा घेतोय हे कसं समजणार?
जेव्हा जुना मित्र परका वाटू लागतो, तेव्हा दोष नात्याचा असतो की वेळेचा?
खरं सुख कुठे आहे – आपल्या गरजांमध्ये की आपल्या समाधानात?