2 उत्तरे
2
answers
लोकांचे सल्ले ऐकावेत की नाही?
0
Answer link
लोकांचे सल्ले ऐकावेत की नाही
आयुष्यात यश मिळालं की आपल्याला आनंद होतो आणि अपयश आलं की दुःख. अपयश आलं तरी लढत रहावं असं कितीही म्हंटल, तरी त्यामुळे आपण हिरमुसतोच. अपयशाची दोन महत्त्वाची कारणं म्हणजे फक्त लोकांचंच ऐकणं आणि कोणाचंच न ऐकणं. ही दोन्ही टोकाची कारणं आपल्याला अपयशाकडे खेचून नेतात.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ध्येय असतं. जेव्हा आपलं ध्येय आपण लोकांना सांगतो तेव्हा अनेकांकडून वेगवेगळे सल्ले येतात. या भडीमारामुळे आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि कदाचित लोकं जे सांगतात तेच बरोबर आहे असं समजून आपण त्यांच्या सांगण्यानुसार कामाला लागतो. हे करताना आपल्याला सांगणाऱ्या लोकांचा अनुभव काय, त्यांची आपल्याप्रती कशी भावना आहे हे तपासण्यावर आपण भरच देत नाही. या सगळ्या गोंधळातून यश मिळणं दूर राहतं आणि अपयशाचा सामना आपल्याला करावा लागतो. जर ध्येय आपण ठरवलं आहे तर ते पूर्ण करण्याची तयारी, मार्गही आपणच तयार केलेला असावा हे साधं तत्व आपण विसरुन जातो. या मार्गात आपण जाणकारांचं मार्गदर्शन आपण नक्की घ्यावं, पण आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे ओळखण्याची विवेकबुद्धीदेखील जागृत ठेवायला हवी.

अपयशाचं दुसरं कारण म्हणजे इतरांचं अजिबात न ऐकणं. काही लोकांना इतरांनी सांगितलेले सल्ले ऐकण्यात कमीपणा वाटतो. सांगणाऱ्याची भावना चांगली असली तरी लोकं आपल्याला वाईटच सांगत असतील असा त्यांचा समज असतो. यामुळे आपलं जे काही ध्येय आहे त्या मार्गावर जाताना काय करु नये, हे कोणी सांगितलं तरी त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि नंतर पस्तावतो. रस्त्यावरुन चालताना आपल्याला कोणी सांगितलं की सांभाळून जा नाहीतर खड्ड्यात पडशील, हे ऐकून आपण सावधपणे चालायला लागलो तर त्यात आपलंच भलं होतं. पण सांगणारा आपली मस्करी करत असेल या भावनेने आपण बिनधास्तपणे चालत राहिलो आणि खड्ड्यात पडलो तर यात नुकसान कोणाचं होईल? अर्थातच आपलंच. त्यामुळे जर कुणी काही सांगितलं तर त्याबाबत किमान विचार करुन सजगपणे पाऊल आपल्याला टाकता आलं पाहिजे. सांगणाऱ्याची मानसिकता आपल्याप्रती चांगली असेल तर तिथे शंका घेणं आपल्यासाठीच नुकसानकारक ठरु शकतं.
ध्येय ठरवणं आणि ते पूर्ण होणं यामध्ये खूप मोठा प्रवास असतो. आपल्या मेहनतीचा, कष्टाचा कस या प्रवासात लागतो. हा प्रवास सोपा होण्यासाठी हितचिंतकांचं मार्गदर्शन घेण्यावर आपण भर दिला पाहिजे. काही लोकं निश्चितच अशी असतात जी आपल्याला सल्ले तर देतात पण ते सल्ले आपल्या भल्याचे नसतात. आपल्याला चुकीची वाट दाखवणारी असतात. अशा माणसांमध्ये योग्य विभागणी त्यांना ओळखून आपल्याला करता यायला हवी. कुठे आपलं भलं आहे आणि कुठे नुकसान आहे हे ओळखण्याची क्षमता आपल्यात असेल तर गोष्टी सोप्या होऊ शकतात.
ध्येयपूर्तीच्या मार्गावर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनतीला चातुर्याची जोड दिली तर कदाचित ध्येयाचा मार्ग आणखी सहजसोपा होऊ शकतो. त्यामुळे कुठे ऐकायचं आणि कुठे नाही ऐकायचं याची जाण आपल्यात असायलाच हवी. कोणाचंही अजिबात न ऐकणं आणि फक्त इतरांचंच ऐकणं ही अपयश येणारी दोन कारणं प्रकर्षाने टाळून गरज आहे तिथे ऐकणं आणि गरज नाही तिथे न ऐकण्याला प्राधान्य दिलं पाहिजे, तरच आपण अपयशाला दूर करुन यश मिळवू शकतो.
0
Answer link
लोकांनी दिलेले सल्ले ऐकावेत की नाही, हे परिस्थिती आणि सल्ल्यावर अवलंबून असते. या संदर्भात काही गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे:
सल्लागाराची योग्यता: सल्ला देणारी व्यक्ती त्या क्षेत्रात तज्ञ आहे का? त्यांचे अनुभव आणि ज्ञान तुम्हाला मदत करू शकतात का?
सल्ल्याचा उद्देश: सल्ल्यामागे काय हेतू आहे? काहीवेळा लोक चांगले हेतूने सल्ला देतात, पण तो तुमच्यासाठी योग्य नसेल.
तुमची परिस्थिती: तुमचा दृष्टिकोन आणि ध्येये काय आहेत? सल्ला तुमच्या परिस्थितीशी जुळतो का?
विश्लेषण: मिळालेल्या सल्ल्याचे विश्लेषण करा. तो तार्किक आहे का? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?
अंतर्ज्ञान: आपल्या आतल्या आवाजाला ऐका. तुमचा स्वतःचा अनुभव आणि अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतात.
अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे.