2 उत्तरे
2
answers
उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती मिळेल का?
1
Answer link
आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक
हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो कि पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.

'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले नाहीत.इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही?
तर टोस म्हणतो,उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.
हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते.त्यामुळेच त्यांना नाईक हि पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार,भाते,कुर्हाडी,तीरकामठी ,गोफणी चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला.छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या कारवाया आणखी वाढल्या.उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले.
उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते.
१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण घेतले होते.
१६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात.देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत.इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे.त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता.तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.
या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले.आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला.मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला.इंग्रजांनी उमजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले.त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता.त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली.
आहा या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढला.अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
0
Answer link
उमाजी नाईक: एकbrief माहिती
- जन्म: उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी या गावी झाला.
- initial जीवन: उमाजी हे रामोशी समाजाचे होते. रामोशी हे traditionally protectors होते.
- क्रांतिकारक: उमाजी नाईक हे ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढणारे एक early क्रांतिकारक होते. त्यांनी आपल्या समाजाला एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला.
- कार्य: उमाजींनी ब्रिटिशांच्या treasury लुटल्या आणि त्या पैशांचा उपयोग गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी केला. त्यांनी ब्रिटिश अधिकार्यांना त्रास दिला आणि त्यांच्यात भीती निर्माण केली.
- पकड आणि फाशी: उमाजी नाईक यांना 1831 मध्ये ब्रिटिशांनी पकडले आणि 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुणे येथे फाशी देण्यात आली.
- वारसा: उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात केलेल्या संघर्षातून लोकांना प्रेरणा मिळाली. ते एक महान देशभक्त आणि क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात.
अधिक माहितीसाठी: