भाषा व्याकरण

मराठी चिन्हांचे प्रकार कोणते?

3 उत्तरे
3 answers

मराठी चिन्हांचे प्रकार कोणते?

4
वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.

मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थाॅमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली. पुढे हे सर्व लोकमान्य आणि रूढ झाले. अपूर्णविरामासारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही. मात्र विरामचिन्हानंतर एक जागा सोडूनच पुढचा शब्द (असल्यास) लिहितात.

विरामचिह्न 
पूर्णविराम ( . ) (Full Stop) : वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. उदा० अ) मी मराठी बोलतो. ब) हे चिह्न संक्षिप्त रूपात शेवटीही वापरतात. उदा० वि.स. खांडेकर यात विष्णूऐवजी वि.आणि सखारामऐवजी स. ही संक्षिप्त रूपे वापरून त्यांसमोर पूर्णविरामासारखे चिन्ह काढले आहे.
स्वल्पविराम ( , ) : एकाच विभागातील अनेक शब्द वाक्यात सलग आल्यास ते शेवटचे दोन शब्द सोडून पहिले सर्व शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. शेवटच्या दोन शब्दांमध्ये व/आणि वापरतात. एखाद्याला हाक मारल्यानंतर नाव किंवा संबोधन यापुढे हे चिन्ह वापरतात. उदा० अ) शीतकपाटात भाजी,गाजरे,पालक,बीट व काकडी आहे. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू. स्वल्पविराम चिन्हाला हिंदीत 'अल्पविराम चिन्ह' व इंग्रजीत 'काॅमा' म्हणतात.
अपूर्णविराम (:) (इंग्रजीत Colon) : जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्णविरामाचे चिन्ह वापरतात. उदा० मुख्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.
अर्धविराम ( ; ) (इंग्रजीत Semi Colon) : दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्ह वापरले जाते० उदा० १. त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही. २. इतक्यात, आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले; थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला; त्या गारांच्या माऱ्याने डोक्यास टेंगळे आली; अशा कचाट्यात आमची मैना सापडली.
उद्गारचिह्न ( ! ) : आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते. हे चिन्ह भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. उदा. अरे वा! किती सुंदर फुले आहेत! अभिनंदन! अशीच प्रगती करा. अनेकदा एकापाठोपाठ तीन उद्गारचिन्हे (!!!) वापरून उद्गारांची तीव्रता दाखवतात.
प्रश्नचिह्न ( ? ) : एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
एकेरी अवतरणचिन्ह (‘…’) : एखाद्या शब्दास विशेष जोर देण्यासाठी दोन उलट-सुलट एकेरी अवतरणचिन्हे वापरतात. जसे — मूलध्वनींना 'वर्ण' म्हणतात. उच्चारलेला शब्द मुळाबरहुकूम-जशाच्या तसा लिहून दाखवायचा असेल तर त्या शब्दाआधी व नंतर एकेरी अवतरणचचिन्हे असतात. ही चिन्हे उलट-सुलट स्वल्पविरामांसारखी दिसतात.
दुहेरी अवतरण चिन्ह (“…”) : बोललेले वाक्य मुळाबरहुकूम-जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल त्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला उलटे आणि शेवटी सुलटे 'दुहेरी अवतरण चिन्ह' येते. उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे."असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते.
संयोग चिन्ह : जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. उदा० पती-पत्नी, राम-कृष्ण, गंगा-यमुना, इत्यादी. इंग्रजीत याला हायफन म्हणतात.
'ते' अथवा 'किंवा' अशा अर्थाने एक विग्रह चिन्ह येते. उदा० १). ४-५ (चार ते सहा/चार किंवा पाच). २). कालावधी दाखविण्यासाठी. उदा० १९४७-१९५२ (४७ ते ५२) या काळात.
तारीख-महिना-वर्ष दाखविण्यासाठी विग्रह चिन्ह वापरतात. उदा० दिनांक ७-५-२०२० किंवा ७/५/२०२० रोजी.
अपसारण चिन्ह : हे चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते. (इंग्रजीत याला एम-डॅश म्हणतात.) हे (– )एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी खुलाशाच्या अगोदर वापरतात. उदा० सुमेध-माझा मामे भाऊ- आज एक चित्र काढणार होता.
शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर (०) हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ – डाॅक्टरसाठी डाॅ०.
जुन्या काळी साहेब चे संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना वापरीत उदा० 'रावसाहेब'साठी रावसोा. अजूनही कोल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत रावसाहेबसाठी रावसोा, आप्पासाहेबसाठी आप्पासोा, तात्यासाहेबसाठी तात्यासोा असेच लिहितात.
'किंवा' या शब्दाऐवजी (/) (तिरपा डॅश) वापरतात. उदा० प्रगती पुस्तकावर वडील/पालक यांची सही आणावी.
विराम चिन्हांखेरीज छापलेल्या मजकुरात काही 'छपाई' चिन्हे आढळतात; त्यांपैकी काही चिन्हे ही :

'एकेरी खंजीर' नावाचे चिन्ह (†) मजकुरातल्या एखाद्या शब्दाचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरण जेव्हा पानाच्या तळाशी देतात, तेव्हा त्या शब्दाला लागून हे चिन्ह वापरतात व एकापेक्षा अधिक खुलासे असतील तर दुहेरी खंजीर (‡), तारा (*), (¶ - पिलक्रो=परिच्छेद चिन्ह) यांचाही उपयोग करतात.
'संदर्भ अंक' ग्रंथात/पुस्तकांत खुलासे परिशिष्टात केले असतील तर जितके खुलासे असतील त्यांना क्रमाने नंबर दिले जातात. ते शब्दाच्यापुढे घातांकासारखे लिहितात.
उदा.नचिकेत² वज्रबाहू³

'काकपद)^ हस्तलेखनात एखादा शब्द विसरला तर तो ओळीच्या वर लिहून तो शब्द ज्या ठिकाणी हवा त्या जागी काकपद दिले जाते.
उत्तर लिहिले · 17/12/2020
कर्म · 34235
3
मराठी मधे व्याकरणदृष्ट्या विरामचिन्हांबरोबरच
संक्षिप्तचिन्हे, खुलासाचिन्हे, संदर्भचिन्हे म्हणून
बरीच विशेषचिन्हे वापरली जातात.
१) पूर्णविराम ( . )
२) अर्धविराम ( ; )
३) स्वल्पविराम ( , )
४) अपूर्णविराम ( : )
५) प्रश्नचिन्ह ( ? )
६) उद्गारचिन्ह ( ! )
७) अवतरणचिन्ह एकेरी ( ' शब्दासाठी ' )
    अवतरणचिन्ह दुहेरी ( " वाक्यासाठी " )
८)* संयोगचिन्ह = दोन शब्दांचा संयोग (-)
     दाखविण्यासाठी जसे = गंगा-जमुना,
     लहान-मोठे, पति-पत्नि, पैसा-अडका वगैरे.
    * अपसारणचिन्ह = विग्रह किंवा कालावधी (-)
      अंतर, सुमारे, अंदाजे वगैरे तील ऊल्लेखासाठी.
    जसे = १०-१२ जणांचा घोळका वा २०-२५
    फूट अंतरावर, ३०-३५ वर्षांपूर्वी, शिवरायांचा
    जिवनकाळ १६२७-१६८०, इंग्रजांचा अंमल
    भारतावर दिडशे- पावणेदोनशे वर्षे होता, अशा
     प्रकारे ऊल्लेख करताना.
९) लोपचिन्ह ( ... ) एखादे प्रचलित कवन, म्हण,
    वचन, वाक्प्रचार, पूर्ण न दाखवता त्याची फक्त
   सुरूवात किंवा महत्त्वाचे शब्द दाखवून पुढे
    ( विरामचिन्हाप्रमाणे) तिन बिंदू ...
   जसे = " कर्मण्येवाधिकारस्ते ..."
             " ठेविले अनंते ..."
             " ज्या गावच्या बोरी..."
             " तुका म्हणे उगी रहावे..."
             " घरोघरी..."
             " पळसाला पाने..." ईत्यादी किंवा
अर्ध वाक्य दर्शविताना " मी पास झालो असतो पण...
                                 " मी पंतप्रधान असतो तर...
१०) दंड (उभा) ( | ) = कवनाच्या शेवटी, अभंग वा श्लोक ईत्यादी मधे वापरताना.
            पूर्वार्धाच्या शेवटी एक दंड ( | )
            उत्तरार्धाच्या शेवटी दोन दंड ( || )
११) दंड (तिरपा) विकल्पचिन्ह ( / ) हे अथवा ते
       दाखविण्यासाठी किंवा हे किंवा ते
       उदाहरणार्थ = स्त्री किंवा पुरुष, वडील/पालक
       ' स्त्री/पुरुष' ' ५०० रुपये दंड किंवा सात दिवस
      कारावास' ' ५००रू./सात दिवस कारावास'
      ईत्यादी ऊल्लेखासाठी.
१२) एक जास्तीचा काना (सोा.) साहेब,
       रावसाहेब, बाबासाहेब, दादासाहेब यांचे
     शॉर्टफॉर्म लिहिताना साहेब शब्द न लिहिता
     सा नंतर एक जास्तीचा कानामात्रा लिहिण्याची
     सोय असते, जसे दादासाहेब ऐवजी दादासोा.
     रावसाहेब ऐवजी रावसोा. बाबासाहेब ऐवजी
     बाबासोा. असंही लिहीलं जायचं पण या बर्‍याच
     चिन्हांच्या उपयोगाच्या अज्ञानामुळे त्याचे वापर
     लक्षात न आल्याने, बाबासो, रावसो, दादासो,
     अप्पासो, वगैरे नांवे प्रचलित झाली.
     त्याचबरोबर गावांचा ऊल्लेख पूर्वी मौजे म्हणून
     केला जायचा (गावाचा नविन किंवा बाजारपेठेचा
    भाग कसबा व राबता, कामगार वर्ग असणारा
     मौजा ) या मौजे शब्दासाठीही शॉर्टफॉर्मसाठी
    मो ला जास्तीचा काना म्हणजे ( मोा. ) लिहिले
   जायचे तसेच तालुक्यासाठी ही ता ला जास्तीचा
  काना म्हणजे ( ताा. ) असे लिहिले जायचे. पण
  काही चिन्हांचा नक्की अर्थ न समजल्यामुळे
  वापराविषयी अज्ञान राहिले.
१३) दोन काने ( ाा ) हे चिन्हही स्थळांच्या
      ऊल्लेखासाठी शॉर्टफॉर्मसाठी वापरण्याची सोय
      म्हणून असत, जसे दोन एकाच नावाची गांवे
      असताना एक खुर्द व एक बुद्रुक असे, नामकरण
      केले जायचे (काही कारणाने गावाचे दोन भाग
     पडत किंवा पाडले जायचे. मोठे, मुख्य गांव
     आणि गावाच्या कडेवर वसलेले किंवा ओढा,
     नदी वा माळ, टेकडीमुळे थोडा बाजूला वा
     तुटक वा वेगळा गावाचाच भाग. मोठा भाग
     म्हणजे बुद्रुक व छोटा म्हणजे खुर्द.
     (महाराष्ट्रात मोगली (ईस्लामी) आमदनीत
     फारशी, अरबी, ऊर्दू भाषांचा प्रभाव व वापर
     राज्यकारभारात होत असल्याने, मोठे गांव
     म्हणजे बूजूर्ग, याचा अपभ्रंश होऊन 'बुद्रुक'
     प्रचलित झाले व खुर्द म्हणजे 'खुद्द' मूळ वा
     किंवा 'दस्तूरखुद्द' प्रॉपरच्या अर्थाने.) अशी
     नांवे लिहिताना पूर्ण न लिहिता शॉर्टकट म्हणून
     बुद्रुक ऐवजी बु. शब्दापुढे दोन काने म्हणजे
     बु.ाा व खुर्द ऐवजी खु. शब्दापुढे खु.ाा
     तसेच गावांच्या वैशिष्ट्यांवरून कसबा, बावडा
     दुमाला वगैरे नावांचे लिखित ऊल्लेख करण्यासाठी
    अशी चिन्हे वापरली जात. जसे बावडा ऐवजी
     बाा. , कसबा ऐवजी काा. , दुमाला ऐवजी दुाा. ई.
१४) काकपादचिन्ह ( ^ ) = एखाद्या मजकूरात
     एखाद-दुसरा शब्द लिहिण्याचा राहिल्यास तेथे
    ^ हे चिन्ह वापरून जेथे हवा आहे तेथे, मधे रेषेच्या
    वर हे चिन्ह वापरून, तो शब्द जोडता येतो.
१५) संदर्भ देण्यासाठी त्या मजकूरापुढे कंसात
      छोटेसे क्रूसासारखे (†) चिन्ह वापरतात व
      एकापेक्षा जास्त संदर्भ असतील तर हेच चिन्ह
      एकावर एक असे (‡) डबल वापरतात.
१६) तसेच आजकाल सांप्रत काळात परिच्छेद
       बदलताना किंवा मुद्दे विषद करताना
       डॉट•, स्टार * अशी चिन्हे परिच्छेद चिन्हे म्हणून
      आणि (तळटिपेसाठीही)  #, § , ¶ अशी चिन्हे ही
      वापरली जातात.
उत्तर लिहिले · 18/12/2020
कर्म · 960
0
मराठीमध्ये अनेक प्रकारचे चिन्ह वापरले जातात, त्यापैकी काही प्रमुख चिन्हे खालीलप्रमाणे आहेत:

विरामचिन्हे (Punctuation Marks):

  • पूर्ण विराम (Full Stop): (.) वाक्य पूर्ण झाले हे दर्शवते.
  • स्वल्पविराम (Comma): (,) वाक्यातpause घेण्यासाठी किंवा समान गोष्टींची यादी करण्यासाठी वापरतात.
  • अर्धविराम (Semicolon): (;) दोन लहान वाक्ये जोडण्यासाठी किंवा स्वल्पविरामांचा वापर असलेल्या यादीत भाग दर्शवण्यासाठी उपयोगात येतो.
  • अपूर्ण विराम (Colon): (:) एखादे विधान स्पष्ट करण्यासाठी किंवा यादी सुरू करण्यासाठी वापरतात.
  • प्रश्नचिन्ह (Question Mark): (?) प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाते.
  • उद्गारवाचक चिन्ह (Exclamation Mark): (!) आश्चर्य, आनंद, दुःख अशा भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात.
  • अवतरणचिन्हे (Quotation Marks): (“ ”) (‘‘ ’’) एखाद्याचे बोललेले शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी किंवा शब्दावर जोर देण्यासाठी वापरतात.
  • अ apostrophe ('): (') possessive noun दर्शवण्यासाठी किंवा अक्षरे वगळण्यासाठी वापरतात.
  • कंस (Brackets): (), [], {} वाक्यात अधिक माहिती देण्यासाठी किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी वापरतात.
  • संयोगचिन्ह (Hyphen): (-) दोन शब्द जोडण्यासाठी किंवा शब्द अपूर्ण राहिल्यास वापरतात.
  • लघचिन्ह (Abbreviation mark): (. ) शब्दाला संक्षेप देण्यासाठी वापरतात.
  • लोपचिन्ह (Elision mark): (...) काही भाग वगळल्यास वापरतात.

इतर चिन्हे (Other Symbols):

  • गणितीय चिन्ह (Mathematical Symbols): +, -, *, /, =, <, >
  • टक्केवारी चिन्ह (Percentage Symbol): %
  • ॲट चिन्ह (At Symbol): @
  • रूपये चिन्ह (Rupee Symbol):

हे काही प्रमुख चिन्हे आहेत जी मराठीमध्ये सामान्यतः वापरली जातात. यांचा योग्य वापर भाषेला अधिक स्पष्ट आणि प्रभावी बनवतो.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

मराठी आणि महाराष्ट्री मध्ये काय अंतर आहे?
संस्कृत- हल संधी, विसर्गसंधी, दुर्जनपद्धती, कर्म पद्धती?
सम्राट अलेक्झांडर कसे लिहावे?
वाक्याचे चार प्रकार लिहा?
वाक्याचे चार प्रकार कोणते?
शब्दसमूहांबद्दल एक शब्द: एक मेकांवर अवलंबून असणे?
दमछाक होणे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा?