शिक्षण व्यावसायिक शिक्षण

व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

व्यावसायिक शिक्षण म्हणजे काय?

2
 व्यवसाय शिक्षण : (व्होकेशनल एज्युकेशन). कृषी, व्यापार, उद्योग इ. क्षेत्रांतील प्रगतीसाठी व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाच्या मिश्र शिक्षणपद्धतीद्वारे,माध्यमिक शाळांत तसेच महाविद्यालयीन दर्जाच्या शिक्षणसंस्थांत दिले जाणारे प्रशिक्षण. हे प्रशिक्षण सर्वसामान्य शिक्षणापेक्षा वेगळे असते. नोकरी मिळविण्यासाठी किंवा व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता ह्या शिक्षणाद्वारे संपादन करता येते. या गुणवत्तेमध्ये कौशल्य, क्षमता, ज्ञान, वृत्ती, कार्यव्यग्रता व पारख करण्याची शक्ती या सर्व गोष्टींचा समावेश होतो.

व्यवसायात काही प्रकारभेद आढळतात, ते असे : (१) पारंगततेसाठी शिकणाऱ्यांच्या अंगी आवश्यक असणारी गुणवत्ता काही व्यवसायांत उच्च, दर्जाची, तर काहींत सामान्य दर्जाची असते. (२) पारंगततेसाठी मिळवावयाचे ज्ञान काही व्यवसायांत विविध प्रकारचे व जटिल असते, तर काहींत अल्प ज्ञान पुरेसे होते. (३) पारंगतता मिळविण्यासाठी लागणारा कालावधी काही व्यवसायांत दहा वर्षांपर्यंत, तर काहींत दोन-तीन महिन्यांचा असतो. थोडक्यात, विविध व्यवसायांसाठी लागणारे शिक्षण वेगवेगळ्या प्रकारचे असते. वैद्यकासारख्या व्यवसायात पारंगत होण्यासाठी श्रेष्ठ बुद्धिमत्ता, तसेच तात्त्विक व प्रात्यक्षिक अभ्यास आवश्यक असतो. याउलट डाकघरात पत्रांचे वर्गीकरण करणाऱ्यां व्यक्तीला भाषाज्ञान पुरते आणि व्यवसायातील कुशलता अल्पज्ञानाने किंवा प्रत्यक्ष अनुभवाने मिळविता येते. 

व्यवसाय शिक्षण हे व्यवसायांची विविधता आणि विपुलता या कारणांनी अनेक स्तरांवर आयोजित केले जाते किंवा उपलब्ध असते. त्या दृष्टीने सामान्यपणे व्यावसायिक शिक्षण-प्रशिक्षणाची संरचना व्यापक ठरते. मराठी विश्वकोशात या दृष्टीने अनेक नोंदी स्वतंत्रपणे दिलेल्या आहेत : उमेदवारी, औद्योगिक शिक्षण, कामगार प्रशिक्षण, कृषिशिक्षण, तंत्रविद्या, तांत्रिक शिक्षण, विज्ञान, विज्ञानशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, शिक्षण व शिक्षणशास्त्र इत्यादी. यांशिवाय अभियांत्रिकी, वैमानिकी यांसारख्या नोंदींत संबंधित विषयांच्या शिक्षण-प्रशिक्षणाविषयीची माहिती थोडक्यायत दिलेली आहे.

व्यवसाय शिक्षणाच्या पद्धती : व्यवसायशिक्षण देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांपैकी व्यवसाय-विद्यालयात शिक्षण देणे हा एक प्रकार व कारखान्यांत उमेदवारी पद्धतीने शिकविणे हा दुसरा प्रकार. तिसऱ्या प्रकारात वरील दोहोंचा समन्वय केलेला असतो. तांत्रिक शिक्षण घेत असताना त्याच्या जोडीला व्यवसाय-स्थळी उमेदवारी पद्धतीने शिक्षण देण्यात येते. ही तिसरी पद्धत सर्वोत्कृष्ट मानली जाते. म्हणून प्रगत देशांत व्यवसाय-विद्यालये आणि कारखाने, औद्योगिक कंपन्या, यंत्रशाळा व उद्योगशाळा इत्यादींत व्यवसायशिक्षणासाठी परस्परसहकाऱ्याचे संबंध जोडले जातात.

व्यवसायशिक्षणाची दोन भिन्न स्वरूपे आढळतात. नोकरीत प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असे व्यवसायपूर्व शिक्षण हा एक प्रकार आणि सेवाकालात अधिक कार्यक्षमता मिळविण्यासाठी योजिलेले व्यवसायांतर्गत किंवा व्यवसाय-मध्य शिक्षण हा दुसरा प्रकार. उमेदवारी पद्धतीमध्ये या दोन्ही स्वरूपांचा संयोग आढळतो. व्यवसायपूर्व शिक्षण साधारणत: पूर्ण वेळ चालणाऱ्या शिक्षणसंस्थांतून देतात आणि व्यवसाय-मध्य शिक्षण साधारणपणे अल्पकाळ चालणाऱ्या सायंकालीन प्रौढ शिक्षणवर्गात देतात.

व्यवसाय शिक्षणाचा हेतू विशिष्ट धंदा करून उपजीविका करता यावी, हा असतो, तर गुणवत्तेच्या शिक्षणाचा हेतू दृष्टिकोन व्यापक करण्याचा असतो. उदा., प्राथमिक व माध्यमिक शाळांत चित्रकला शिकविण्याचा हेतू सौंदर्यदृष्टी निर्माण करणे व कल्पकतेस उत्तेजन देणे, हा असतो. उलट पहिल्या प्रकारात रोजगार यशस्वीपणे करावा, म्हणून शिल्पशाळेमध्ये चित्रकलेचे शिक्षण दिले जाते. प्रगत देशांत व्यवसायशिक्षणाचा व्याप मोठा आहे. विद्युत, इलेक्ट्रॉ निकी, तंत्रविद्या, स्थापत्य, वैद्यक, सैनिकी, विधी, वाणिज्य, व्यवस्थापन, कृषी इ. विषयांच्या शिक्षणाची सोय विद्यापीठांत व महाविद्यालयांत केलेली असते. याच व्यवसायांतील निम्नस्तरीय उमेदवारांसाठी माध्यमिक शिक्षणाच्या पातळीवर प्रशाळा असतात. इतकेच नव्हे तर न्हावी, धोबी, स्वयंपाकी, वाढपी, रक्षक, विक्रेता, मोटारचालक इ. व्यावसायिकांसाठीही शिक्षणाची सोय केलेली असते. एखादे काम केवळ सरावाने करू लागणे व तेच काम तंत्रमंत्र समजून घेऊन शिकणे, यांत कार्यक्षमतेच्या दृष्टीने महदंतर असते, हे त्यामागील गृहीततत्त्व आहे. सर्व कामगार समाजाचे सेवक असतात, त्यांनी करावयाची सेवा कमीत कमी काळात व अल्प श्रमात समाधानकारक होण्यासाठी, केवळ उमेदवारी व्यवसायपद्धतीचा वापर न करता, विविध व्यवसायांसाठी शास्त्रोक्त शिक्षणाची सोय उपलब्ध होणे अगत्याचे आहे.

व्यवसाय शिक्षणाची सूत्रे : व्यवसायशिक्षण यशस्वी होण्यासाठी पुढील काही सूत्रांचे पालन होणे आवश्यक असते : (१) व्यवसाय करणाऱ्याच्या अंगी आवश्यक ती मानसिक व शारीरिक क्षमता असावी. उदा. संशोधकांच्या व्यवसायासाठी श्रेष्ठ बुद्धिमत्ता व चिकाटी हे गुण आवश्यक असतात, तर परिचारिकेच्या अंगी सोशिकता व सहानुभूती हे गुण असावे लागतात. आवश्यक गुण अंगी नसणारी व्यक्ती अंगीकृत व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून गुणवत्तेची चिकित्सा व तीनुसार मार्गदर्शन होण्याची सोय शिक्षणव्यवस्थेत समाविष्ट असणे आवश्यक आहे. अशा मार्गदर्शनाच्या अभावी व्यवसायशिक्षणाची उद्दिष्टे पुरी होऊ शकणार नाहीत. (२) शिक्षणात केवळ कौशल्य हस्तगत करण्यावर भर नसावा. त्या कौशल्याच्या पार्श्वभागी असणारे शास्त्र व त्या कौशल्याचे समाजधारणेतील स्थान या गोष्टींचाही समावेश शिक्षणात व्हावा. उदा. कापसाची परीक्षा, त्यावर होणारा हवामानाचा परिणाम, यंत्रज्ञान, रंगपरीक्षा व तदंगभूत पदार्थ, विज्ञान, रसायन इ. शास्त्रांचे ज्ञान, तसेच विणकर व्यवसायाची परंपरा व त्या व्यवसायाची समाजासाठी उपयुक्तता यांचाही विणकराच्या प्रशिक्षणात समावेश व्हावा. अमेरिकन तत्त्वज्ञ व्हाइटहेड यांनी यासंबंधी असे नमूद केले आहे, की व्यवसायशिक्षणाचे स्वरूप व्यक्तीची सांस्कृतिक प्रगती करणारे असावे. व्यावसायिकाने व्यवसायाचे मर्म समजून त्यात रस घेऊन, कार्यक्षमतेने व स्वाभिमानाने आपला व्यवसाय करावा, असे व्यवसाय शिक्षणाचे स्वरूप असावे. (३) व्यवसायशिक्षणात तत्त्व व व्यवहार यांचा समन्वय असावा. त्या तत्त्वाचा व ज्ञानाचा उपयोग शिक्षकास वर्गात करता येणे आवश्यक असते. पुष्कळदा असा अनुभव येतो, की रेडिओ प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळविलेल्या इसमास घरचा रेडिओ दुरुस्त करता येत नाही. अशा प्रकारचे व्यवसायशिक्षण निकामी ठरते. म्हणून प्रगत राष्टांत व्यवसायशिक्षण व व्यवसायकेंद्रे यांची सांगड घालण्यात येते. (४) व्यवसायशिक्षणासाठी वापरावयाची यंत्रसामग्री अद्ययावत असावी. जुन्या यंत्रांवर प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना नवीन यंत्रावर काम करणे कठीण जाते. काही कारखानदार स्वत:च प्रशाळा स्थापन करून त्यांद्वारे कामगारांना प्रशिक्षण देतात. (५) व्यवसायशिक्षण सामाजिक गरजांना अनुसरून असावे. आवश्यक कामगारांचा तुटवडा व प्रशिक्षितांची बेकारी हे दोन्ही अनर्थ टाळणे इष्ट आहे. म्हणून व्यवसायशिक्षणाची योजना करताना प्रारंभी प्रादेशिक पाहणी वा योग्य ते सर्वांगीण सर्वेक्षण करणे आवश्यक असते. तसेच संबंधित व्यवसायासंबंधी उपयुक्त आकडेवारी प्रारंभी गोळा करणे आवश्यक ठरते. व्यवसाय पुष्कळ असल्यामुळे प्रत्येक व्यवसायाबाबात अशी माहिती किंवा आकडेवारी गोळा करणे सुलभ होत नाही तथापि शासन, कारखानदार इत्यादींचे सहकार्य झाल्यास हे सहज साध्य करता येईल. शास्त्रीय पद्धतीने प्रत्येक व्यवसायातील उपलब्ध नोकऱ्यांची गणना करून त्यानुसार त्या त्या व्यवसायाच्या प्रशिक्षणाची व सेवांची तरतूद करणे, हेच हिताचे ठरते. नवी दिल्लीस येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनपॉवर प्लॅनिंग या नावाची संस्था, भारताच्या भविष्यकाळातील प्रगतीचा अंदाज घेऊन ,कोणती कौशल्ये वा ज्ञान असणारे किती तंत्रज्ञ वा कामगार किती आणि केव्हा लागतील, याचा वेळोवेळी अंदाज जाहीर करते. नियोजन मंडळासही पंचवार्षिक योजनांचे आराखडे तयार करताना ही माहिती उपयुक्त ठरते.
उत्तर लिहिले · 16/12/2020
कर्म · 34255
2
व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज बनली आहे कारण भारतासारख्या महान लोकसंख्या असणाऱ्या देशात आता बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. याठिकाणी शेती हा व्यवसाय मुख्य असून त्यावर आधारित व्यवसाय प्रशिक्षण जर शालेय जीवनातच मिळाले तर बेरोजगारी आणि शेतकऱ्या समोरील संकटे कमी होतील.
व्यावसायिक शिक्षणाची गरज या विषयावर सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा -(वाचन मित्र)
उत्तर लिहिले · 29/11/2021
कर्म · 0
0

व्यावसायिक शिक्षण म्हणजे असे शिक्षण जे विद्यार्थ्यांना विशिष्ट व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी तयार करते.

हे शिक्षण विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करते, ज्यामुळे ते नोकरी मिळवण्यासाठी आणि त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सक्षम बनतात.

व्यावसायिक शिक्षणाचे काही प्रमुख फायदे:

  • रोजगारक्षमता वाढवते: हे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
  • कौशल्ये विकसित होतात: विशिष्ट व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये शिकता येतात.
  • वेळेची बचत: पारंपरिक शिक्षणापेक्षा कमी वेळात नोकरीसाठी तयार करते.
  • आत्मविश्वास वाढतो: प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवल्याने आत्मविश्वास वाढतो.

व्यावसायिक शिक्षणाची उदाहरणे:

  • तंत्रज्ञान प्रशिक्षण (Technology Training)
  • औद्योगिक प्रशिक्षण (Industrial Training)
  • कृषी शिक्षण (Agricultural Education)
  • कला आणि हस्तकला शिक्षण (Arts and Crafts Education)

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (Ministry of Skill Development and Entrepreneurship)

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5280

Related Questions

एक वर्ष गॅप घेऊन डी.एड करू शकतो का?
माध्यमिक स्तरावरील शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या समस्या व उपायांवर चर्चा करा.
व्यावसायिक शिक्षण म्हणजे?
शालेय शिक्षण व व्यावसायिक शिक्षण यांतील संबंध स्पष्ट करा?
• शालेय शिक्षण व व्यावसायिक शिक्षण यातील सहसंबंधांवर स्पष्ट करा?
शालेय शिक्षण व व्यवसायिक शिक्षण यातील?
शालेय शिक्षण व व्यवसाय शिक्षण यातील सहसंबंध स्पष्ट करा?