भारत भूगोल प्राकृतिक भूगोल

भारत व ब्राझील यांचे स्थान व विस्तार याबद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

भारत व ब्राझील यांचे स्थान व विस्तार याबद्दल माहिती मिळेल का?

6
भारत --:

भारताचे स्थान :

भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात  येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले. आहे. भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे 80.40 ते 370.60 उत्तर अक्षांश आणि 680.70 ते 970.250 पूर्व रेखांशामध्ये विस्तारले आहे. अंदमान आणि निकोबार या बेटांनी पुढे दक्षिणेकडे भारताचा रेखांशीय विस्तार वाढविला आहे. ग्रेट निकोबार बेटातील  ‘इंदिरा पाँईंट’ हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. तर जम्मू व काश्मीर मधील ‘इंदिरा कोल’ हे भारतातील उत्तरेकडील टोक आहे.
भारताच्या मध्यातून   23 1/20 उत्तर अक्षांश गेले आहे. ते कर्कवृत्त या नावाने ओळखले जाते. तर  82 1/20 पूर्व रेखांश देशाच्या मध्यातून गेलेले आहे.  हे भारताचे मध्य रेखांश असून ते अलाहाबाद शहराजवळून गेलेले आहे. त्यावरूनच भारताची प्रमाणवेळ (आयएसटी) निश्चित करण्यात आलेली आहे.

भारताचा विस्तार :

रशिया, कॅनडा, चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यासाररख्या देशानंतर भारत हे जगातील सातवे मोठे राष्ट्र आहे.  भारताचे एकूण क्षेत्रफळ 32, 87, 263 चौ.कि.मी इतके आहे. जगाच्या एकूण भूभागापैकी 2.42 % भाग भारताने व्यापलेला आहे. भारताची पूर्वपश्चिम रूंदी 2,933 कि.मी आणि उत्तर - दक्षिण लांबी  3,214 कि.मी, इतकी आहे.




भारताच्या सीमा :

भारताला भूसीमा व  जलसीमा दोन्ही लाभल्या आहेत. देशाच्या भूसीमेची लांबी 15,200 कि.मी.  आहे.  उत्तरेकडे असलेला हिमालय पर्वत ही भारत आणि चीन यांच्यातील नैसर्गिक सीमा आहे.  भारताच्या प्रमुख भूप्रदेशाला 6100 कि.मी. लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे.  (अंदमान निकोबार  आणि लक्षद्वीप बेटांचा किनारा धरून  ती लांबी 7516.5 कि.मी. इतकी होते.) भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र,  पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे.


शेजारील राष्ट्रे :

भारताच्या शेजारी एकूण  7 राष्ट्रे आहेत. भारताच्या वायव्येला पाकिस्तान आणि अफगणिस्तान,  उत्तरेला नेपाळ, भूतान आणि चीन. तसेच पूर्वेकडे बांग्लादेश आणि म्यानमार (पूर्वीचा ब्रह्मदेश) हे देश आहेत. भारताच्या आग्नेयेला श्रीलंका देश असून तो पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यामुळे भारताच्या प्रमुख भूभागापासून वेगळा झाला आहे.
राजकीय विभाग : भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. देशाच्या राज्यकारभाराच्या सोयीच्या ट्टष्टीने भारतात भाषावार प्रांतरचनेनुसार जी राज्ये अस्तित्वात आलेली आहेत. त्यांची संख्या सध्या 29 आहे. आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारताची राजधानी दिल्ली असून  दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून विशेष दर्जा आहे. अलीकडे आंध्रप्रदेशमधील काही भाग वेगळा करून ‘तेलंगाणा’ हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले आहे. सध्यातरी त्या राज्याची तसेच आंध्र प्रदेशची राजधानी हैद्राबाद ही आहे. या सर्व राज्यांचा विस्ताराच्या दृष्टीने विचार केला तर सर्व राज्यांमध्ये राजस्थान हे विस्ताराने सर्वात मोठे  राज्य आहे तर  गोवा हे सर्वात छोटे राज्य आहे.
भारत आणि इतर राष्ट्रांमध्ये ज्या सीमा आहेत. त्याही वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. त्यांची नावे विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे.  भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा रॅडक्लिफरेषा म्हणून ओळखण्यात येते.भारत आणि आफगाणिस्तानमधील सीमारेषा ड्युरांड रेषा म्हणून ओळखली जाते. तर   भारत व चीनमधील सीमारेषा मॅकमोहनरेषा म्हणून ओळखतात. अद्याप नवीन ब्ल्यू प्रिंट आलेली नसली तरी नकाशा कसा काढावा तो. कसा अधोरेखित करावा, सजवावा याची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या विषय शिक्षकांकडून समजावून घेतल्यास हा पाठ अतिशय सोपा होऊन जातो.




~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~




ब्राझील--:
ब्राझील– दक्षिण अमेरिकेंतील एक प्रजासत्ताक राज्य. याची दक्षिणोत्तर सर्वांत जास्त लांबी २६२९ मैल व पूर्व  पश्चिम लांबी २६९१ मैल. या राज्याचें एकंदर क्षेत्रफळ ३२७०००० चौरस मैल आहे. याच्या उत्तरेस कोलंबिया, व्हेनेझुएला, ग्वायना, अटलांटिक महासागर; दक्षिणेस युरोग्वे, पॅराग्वे आणि बोलिव्हिया आणि पश्चिमेस अर्जेटिना, पॅराग्वे बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर आणि कोलंबिया.

या राज्याच्या पृष्टभागाचे साधारणपणें दोन भाग करतात. एक अमेझॉन-टोफँटिन्स व ला प्लाटा या नद्यांच्या आसपासचा सखल प्रदेश व दुसरा उंचवट्याचा प्रदेश. किना-याजवळचा प्रदेश विशेषेंकरून रेताड वाळवंटें, पाणथळीच आणि दलदलीचे प्रदेश यांनीं व्यापलेला आहे. कांहीं भाग १००-२०० फूट उंचीवर असून तो चांगला सुपीक आहे. अमेझॉन आणि रीयो दि ला प्लाटा या मोठ्या नद्या होत. तळीं थोडीं आहेत. ब्राझीलच्या किना-यावर उपसागर पुष्कळ असून त्यांवर बंदरें चांगलीं आहेत,

या देशाच बहुतेक भाग उष्णकटिबंधांत आहे. किना-यावरच्या व अमेझॉनच्या सखल प्रदेशांत ॠतुमान फारसें बदललेलें दिसत नाहीं. साधारणपणें पारा ८२० अंशावर असतो, व पाऊसहि पुष्कळ पडतो.

विसाव्या शतकाच्या आंरभीं ब्राझील देशांतील जंगल पृथ्वीवरील सर्व जगलांपेक्षां फार मोठें होतें. अमेझॉन जगलांत एक गोष्ट विशेषेंकरूंन अशी दिसून येते कीं त्यांत असंख्य प्रकारचीं झाडें उत्पन्न होतात. या जंगलांत २०० फुट उंचीचीं झाडें फार थोडीं आहेत परंतु १०० फूट उंचीचीं पुष्कळ आहेत. कॉफीच्या झाडांचा नंबर पहिला आहे. त्याचप्रमाणें ऊंस व कापूसहि पुष्कळ होतो इतर उपयोगी वनस्पती म्हणजे तंबाखू, मका, भात, रताळीं, केळीं, पेरू, संत्रें, नारिंगें, लिंबें, द्राक्षें, अननस, भाकरीचें झाड, पपया, फणस व इतर उष्णकटिबंधांत होणारीं झाडें.

लोक--:

प्रथमतः ज्यावेळीं ब्राझीलचा शोध लागला त्यावेळीं येथें इंडियन लोक असंख्य असावेत असें वाटलें. परंतु किना-यावरील प्रदेश वस्ती करण्यास जास्त सोयीचा असल्यामुळें  तेथेंच लोक पुष्कळ आढळत. आणि अंतर्भागांत फार थोडीं वस्ती होती. यूरोपांतील लोक ज्यावेळीं येथें वसाहती करण्यास आले त्यावेळीं या इंडियन लोकांचा नाश करण्याकरतां टोळ्या बाहेर पडत असत. व जे इंडियन तडाख्यांत सापंडतील त्यांचा नाश करण्यांत येई. नाश न झालेंले इंडियन लोक अंतर्भागांत पळून जात असत. १८९० सालच्या खानेसुमारीवरून त्यांची लोकसंख्या १२९५७९६ असावी असें दिसतें. परंतु त्यांच्या टोळ्या नेहमीं फिरत्या असल्यामुळें  वरील आकडा बराच संशयास्पद आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीं वसाहतवाले बहुतेक पोर्तुगीज लोकच असत .  यांची संख्या वरील शतकाच्या शेवटीं फारच वाढली. सुमारें ९/१० लोक पोर्तुगॉल देशांतील होतें. १८५४ सालापर्यंत (कोणाच्या मतानें १८६० सालापर्यंत) आफ्रिकेंतील गुलाम येथें आणण्याचा प्रघात असें व त्यामुळें शेती व इतर धंदे यांची भरभराट होत गेली. १८२६ सालच्या सुमारास नीग्रो लोकसंख्या सुमारें २५००००० असून गोरे लोक यांच्या १/३  होतें. विसाव्या शतकाच्या प्रारंभातील लोकवस्ती या तीन  जातींच्या मिश्रणाची आहे. या देशांत आतापर्यंत कोणी वर्णभेद मानला नाहीं. जातींच्या मिश्रणासंबंधानें सर्वसाधारणः लोकापवाद नाहीं. सन १९१० च्या खानेसुमारींत ३०६३५६०५ लोकवस्ती असून पैकीं १५६५९६१ लोक परकी होतें. सुमारें ६ लाख इंडियन अमेझॉन टापून होते व जपानी लोक २८००० होते.

इ.स. १८५२ मध्यें या देशांत रेल्वे सुरू झालीं. सन १९२३ सालच्या अखेरीस एकंदर १८७०३ मैल लांबीची रेल्वे होती. सेंट्रल ब्राझील रेल्वे ही सर्वांत मोठी रेल्वे सरकारी आहे भोंवतालच्या संस्थानांशीं जलमार्गानें दळणवळण चालतें.

ब्राझील देशाच्या किना-यावर पुष्कळ लहान लहान उपसागर व नद्यांचीं मुखें आहेत व त्यांतून भरतीचें पाणी आत शिरूं शकतें. तथापि त्या मानानें सर्व दृष्टींनीं सोयीस्कर अशीं बंदरें फारच कमी आहेत. कांहीं तर अगदींच निरूपयोगी आहेत. कांहीं बंदरांत सुधारणा केल्यामुळें तीं साधारण सोयीस्कर झालीं आहेत. उदाहरणार्थ सन्टॉस् आणि मनॉस् हीं होत.

व्यापार--:

जरी ब्राझील देश मुख्यत्वेंसरून शेतकीविषयक आहे तथापि निर्वाहोपयोगी सर्व वस्तूंचा पुरवठा देशातंल्या देशांतच होत नाहीं. कारण गहूं, कणीक, तांदूळ, मासे, लोणी, मांस, बटाटे, भाजीपाला, फळफळावळ व इतर जिन्नस ब-याच प्रमाणांत बाहेरून येतात. हें राज्य प्रजासत्ताक झाल्यापासून देशांत येणा-या मालावर मोठेमोठे कर वसविले आहेत व त्यामुळें देशांत कापसाच्या गिर-या वगैरे सुरू झाल्या आहेत. परंतु खप फार असल्यामुळें  देशांतील पुरवठा पुरा पडत नाहीं व त्यामुळें कापूस, लोकर, रेशमी, बूट वगैरे पदार्थ परदेशांतून येतात. त्याचप्रमाणें देशांतील व्यापार वाढत्या प्रमाणावर असल्यामुळें देशांत परदेशांतून यांत्रिक सामान बरेंच येऊ लागलें आहे, देशांतून बाहेर जाणारे जिन्नस म्हणजे कॉफी, रबर, साखर, कापूस , कोको, ब्राझिल कठिण कवचीचीं फळें, कातडीं, फळें, सोनें, मँगेनीझ, धातु औषधी वनस्पती इत्यादि. किना-यावरील व नदींतील मासे चांगले असतात  असें म्हणतात. तरी तयार केलेंली व डब्यांत भरलेली मासळी परदेशांतून या देशांत येते. जंगलांत उत्पन्न होणा-या पदार्थांत इंडिया रबरचा नंबर पहिला येईल. खनिज पदार्थांची निर्गत फारच थोडीं होतें.


धंदे--:

राज्य प्रजासत्ताक होण्यापूर्वीं उद्योगधंदे थोडें होते. परंतु आतां कापसाच्या गिरण्या वगैरे पुष्कळ निघाल्या आहेत. अगदीं मोठा धंदा कापड विणण्याचा आहे. १९११ सालीं येथें २४२ कापडाच्या गिरण्या होत्या. तसेंच बूट, लोणी, चीज, कांचसामान, छापण्याचा कागद, आगपेट्या, टोप्या, कापड, साबण, गंधी सामान, सिगार, दारूकाम, मेणबत्या करणें, फळें डब्यांत भरणें वगैरे धंदे हल्लीं अस्तित्वांत आहेत.

राज्यव्यवस्था--:

रायो डी जनेरियो येथें तारीख १५ नोव्हेंबर १८८९ रोजीं एक बंड झालें व त्यांत बादशाहीचा शेवट झाला. नंतर १५ नोव्हेंबर १८९० रोजीं प्रजासत्ताक राज्यांचा एक खर्डा प्रसिद्ध झाला. व त्या पद्धतीप्रमाणें तारीख २४ फेब्रुवारी १८९१ पासून काम सुरू झालें. देशांतील सर्व प्रकारचे वरिष्ट अधिकारी तीन निरनिराळ्या कार्यकारी, कायदेखातें, व न्यायखातें, सरकारच्या स्वाधीन आहते. अध्यक्ष व त्याचें मंत्रिमंडळ, राष्ट्रसभा आणि वरिष्ठ न्यायकचेरी या मिळून हें सरकार झालेलें आहे. राष्ट्रांत वीस संस्थानें व एक राष्ट्राच्या मालकीचा जिल्हा असे एकवीस भाग असून, आपापल्या संस्थानच्या अंतर्गत राज्यव्यवस्थेबद्दल तींच जबाबदार असतात. परेदशाशीं हरत-हेचा व्यवहार करणें, सैन्य व आरमार ठेवणें, आयात मालावर जकात बसविणें, परराष्ट्राच्या व्यापारास आला घालणें, नाणीं पाडणें, टपालखातें व तारखातें चलविणें हीं कामें  राष्ट्रीय सरकारचीं आहेत. राष्ट्रांतील सर्व प्रकारची सत्ता अध्यक्षाच्या हातांत असतें. कायदे करणें हें राष्ट्रीय काँग्रेसचें काम आहे त्या काँग्रेसचे दोन भाग असून सभासदांची निवडणूक मतदारांकडून होत असतें. न्यायखात्यांत एक १५ जज्जांचें वरिष्ठ कोर्ट असून तें राजधानींत असतें. न्यायधिशांची नेमणूक त्यांच्या हयातीपर्यंत केली जाते.

सैन्य व आरमार--:

  १९२४ सालीं ४८६२ सेन्याधिकारी व ४०३९३ शिपाई होतें. वेळ पडल्यास एक लाख वीस हजार पर्यंत सैन्य जमा करतां येईल. १९२३ सालीं २१ ते ४४ वर्षें वयापर्यंतच्या सर्व ब्राझीलियनांनां लष्करी नोकरी सक्तीची केली गेली. १९०६ सालपर्यंत या देशाचें आरमार अगदींच कमकुवत होतें. परंतु अलीकडें नवीन पद्धतीवर आरमार बांधण्याचें काम राष्ट्रानें अंगावर घेतलें आहे.

शिक्षण--:

या राष्ट्रांतील शिक्षण फारच मागासलेलें आहे. सुमारें  शेंकडा ८० लोकांस लिहितांवाचतां येत नाहीं. विशेषतः दक्षिणेकडील संस्थानांत निरक्षर वर्गाचें प्रमाण जास्त आढळतें. प्राथमिक शिक्षण मोफत दिलें जातें परंतु तें घेतलेंच पाहिजे असा निर्बंध नाहीं.

कला, शास्त्र व वाङमय--:

या देशांतील लोकांनां गायन, कला व वाड्ःमय याविषयीं नैसर्गिक अभिरूची आहे. भौतिकशास्त्रांत हे लोक फार मागें आहेत. इतर राष्ट्रांतील शास्त्राज्ञांनीं आपलीं पुष्कळ वर्षें शास्त्राशोधनांत घालविलीं आहेत. परंतु या देशांतील लोकांनीं शास्त्रीय शोध फारसे लावले नाहींत. कांहीं भूस्तरवेत्त्यांचीं मंडळें आहेत त्यांनीं थोडें फार काम केलें आहे. वाड्ःमय देखील असेंच मागासलेलें आहे. १८२१ सालापर्यंत देशांत मुद्रणस्वातंत्र्य नव्हतें. परंतु तें मिळाल्यापासून वर्तमानपत्रांचें महत्त्व बरेंच वाढत गेलें. व वर्तमानपत्रकारांनीं लोकमत तयार करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला व त्यांत त्यांनां यशहि चांगलें आलें. या देशाच्या राज्यकारभारांत वर्तमानपत्रांनीं जितकें काम केलें आहे तितकें काम दुस-या कोणत्याहि देशांत झालें नसेल. परंतु इतर वड्ःमयासंबंधानें कांहीं विशेष लिहिण्यासारखें नाहीं.

उत्पन्न--:

राष्ट्राचें उत्पन्न मुख्यत्वेंकरून आयात मालावरील जकात, स्टँप्स, बूट, मेणबत्या, वगैरे मालावरील कर यांनीं मिळालेलें  असतें. राष्ट्राला कर्ज बरेंच आहे. राष्ट्राला चलनी नाणें निकल व ब्राँझ या धातूचें होतें. परंतु १९०६ सालापासून चांदीचें नाणें पाहावें असा ठराव झाला. राष्ट्रांतील सोन्याचें नाणें मिल्रेज नांवाचें असून १० मिल्रेज सोन्याच्या नाण्याचें वजन ८.९६४८ ग्रॅम्स् असतें. व त्यांत ८.२१७८ ग्रॅम्स् निर्भेळ सोनें असतें. हें नाणें राष्ट्रांत प्रचलित नाहीं.

इतिहास--:

१४९९ (फेब्रुवारी) सालीं व्हिन्सेंट यानेंझ पिंझॉन् (कोंलबसचा सहकारी) यानें या देशांचा शोध लावला व त्यानें स्पेन देशांतील सरकारच्या नांवानें देशाचा ताबा घेतला. पुढें काब्राल यानें येथें येऊन पोर्तुगालची सत्ता जाहीर केली (ता. २४ एप्रिल १५००) पोर्तुगालचा राजान जॉन (तिसरा) यानें कांहीं विशिष्ट  पद्धतीवर या देशांत वसाहत करविण्याचें ठरविलें. त्यानें वंशपरंपरेनें कांहीं लोकांस जमीनदा-या देण्याचें ठरविलें. प्रत्येक जमीनदारीचें क्षेत्र किना-यावर ५० लीग लांबीचें असून अंतर्भागांतील सीमा आंखलेली नव्हती. यात पद्धतीवर पूर्वीं मदीरा आणि अझोर्समध्यें वसाहत करविली होती व या पद्धतीस चांगलेंच यश आलें होतें.

पोर्तुगॉलचा राजा तिसरा जॉन यानें कांहीं लोकांस वंशपरंपरेनें जमिनी देण्याचें कबूल केल्यामुळें ब्राझील देशाचा किनारा (ला प्लाटाच्या मुखापासून अमेझॉनच्या मुखापर्यंत) पोर्तुगीज वसाहतीनीं भरून निघाला. व त्या त्या भागांत थोडा फार कायदा व न्याय यांची अमलबजावणी होऊं लागली. पुढें दुसरा फिलिप यानें पोर्तुगालचें राज्य बळकावलें व स्पॅनिश लोकांनीं ज्या ठिकाणीं वसाहत केली होती त्या ठिकाणापेक्षां यामध्यें खनिज संपत्ति कमी आहे असें मानण्यांत घेऊन या वसाहतींकडे लक्ष कमी झालें व १५७८ सालापासून १६४० सालपर्यंत या वसाहती सर्व हळूहळू स्पॅनिश लोकांच्या मालकीच्या झाल्या. या वसाहती स्पेनच्या झाल्यावर इंग्लिश लोकांनीं त्यांत ढवळाढवळ करण्यास आरंभ केला.  १५८६ सालीं विदरिंगटन यानें बाहिया लुटलें; तसेंच १५९१ व १५९५ सालीं निरनिराळ्या गांवांवर इंग्लिश लोकांनीं हल्ले केलें परंतु या सर्वांपासून विशेष फलनिष्पत्ति झालीं नाहीं. १६१२ सालीं फ्रेंच लोकांनीं माराजो बेटांत स्वतंत्र वसाहत करण्याचा प्रयत्न केला. व ती वसाहत १६१८ सालापर्यंत त्यांच्याकडेच होती. परंतु यांनांहि तेथें आपला हात कायमचा शिरकवितां आला नाहीं. तें काम डच लोंकानीं केलें. १६२४ सालीं ईस्ट इंडिया कंपनीनें एक आरमार बाहियावर पाठविलें व विशेष  त्रास न पडतां शहर हस्तगत झालें. बाहिया डच लोकांनीं घेतल्यामुळें स्पॅनिश व पोर्तुगीज लोकांनां एक होण्याची स्फूर्ति झालीं. व १६२५ सालीं बाहिया परत घेण्याकरितां केडिझ आणि लिस्बनहून एक आरमार निघालें. बाहिया परत स्पॅनिश पोतुगीजाच्या हातीं लागलें (मे, सन १६२५) १६३० त डच लोकांनीं पुन्हां वसाहत करण्याचा प्रयत्न केला व ओलिंडा आपल्या ताब्यांत घेतलें व तेथील किल्ल्यांची तटबंदी केली. स. १६३६ पर्यंत डच लोकांनां ओलिंडा शहराच्या स्वामित्वापलीकडे मजल मारतां आली नाहीं. या वर्षीं येथें काउंट जॉन् मॉरिस याची नेमणूक झालीं; व याच्या आठ वर्षांच्या कारकीर्दींत यानें मारान्होपासून सॉनफ्रान्सिस्कोच्या मुखापर्यंत ब्राझीलच्या किना-यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. यानें निरनिराळ्या जातींचें संमिश्रण करण्याचें प्रयत्न केले व पोर्तुगीज लोकांवर भरवसा ठेवून त्यांचा विश्वास संपादला. एक मोठ्या राज्याची स्थापना  करावी असा याचा हेतु होता; परंतु याच्या मालकांस हा हेतु पसंत नव्हता. कारण ही कंपनी केवळ देशांतून पैसा नेण्याकरितां स्थापना झाली होती. त्यामुळें इ. स. १६४४ मध्यें काउंट मॉरिसनें आपल्या कामाचा राजीनामा दिला. त्याच्या मागून जे अधिकारी आले त्यांच्या अंगांत ही राजकीय व लष्करी कला नव्हती.

इ. स. १६४० मध्यें झालेंल्या राज्यक्रांतींत ब्रगांझाचें घराणें पुन्हां पोर्तुगालच्या सिंहासनावर आलें व त्यामुळें ब्राझीलकडे साहजिक लक्ष जाण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं. शिवाय तिकडे लक्ष पुरविणें हें यावेळीं अपरिहार्य होतें. कारण उत्तरेकडचा बराच भाग हॉलडच्या ताब्यांत गेला होता व दक्षिणेकडच्या वसाहतवाल्यांस स्वतंत्र होण्याची इच्छा झाली होती. त्यांचें मुख्य ठाणें सॉव् पॉलो होतें. त्यांनीं जेव्हां आपली वसाहत पोर्तुगालच्या राज्यापैकीं एक भाग होणार असें पाहिलें तेव्हां त्यांनीं स्वतःबंडाचें निशाण उभारून आपणासाठीं स्वतंत्र संस्थानाची स्थापना करावी. असा घाट घातला; परंतु ज्यास यांनीं राजा करण्याचें ठरविलें होतें त्यानेंच आयत्या वेळीं मागें घेतलें व बंडवाल्यांस कोणी पुढारी उरला नाहीं व अखेरीस ती वसाहत ब्रगांझा घराण्याकडे आली. याप्रमाणें सर्व वसाहती पोर्तुगालच्या ताब्यांत आल्या. पोर्तुगालनें यावेळीं स्पेनचें जूं आपल्या खांद्यावरून फेंकून दिलें होतें त्यामुळें ब्राझीलच्या वसाहतवाल्यांस पोर्तुगालशींच (आपल्या मातृदेशाशींच)  मिळून राहण्यांत फायदा आहे असें वाटत होतें. पोर्तुगॉल देशांत यावेळीं विशेष सामर्थ्य नव्हतें. तथापि वसाहतवाल्यांनीं आपल्या स्वतःच्या जोरावर परकीय सत्तेविरूद्ध बंड करण्याचा निर्धार केला. याच वेळीं डच लोकांचा काउंट मॉरिस हा आपल्या कामाचा राजीनामा देऊन निघून गेला होता. व त्यामुळें त्या लोकांची बाजू लंगडी पडली होती. इ. स. १६४५ मध्यें जॉन फर्नांडिस व्हायेरा नांवाच्या मनुष्याच्या प्रमुखत्वाखालीं ब्राझिलियन वसाहतवाल्यांनीं बंडाळी सुरू केली.  डच लोकांनां हॉलंडकडून फारशी मदत मिळाली नाहीं. तसेंच इ. स. १६४९ मध्यें पोर्तुगालमध्यें दुसरी एक प्रतिस्पर्धी कंपनी निघाली व तिनें वसाहतवाल्यांच्या मदतीला एक आरमार पाठविलें. हळूहळू डच लोकांनीं मिळविलेला प्रदेश वसाहतवाल्यांच्या ताब्यांत जाऊं लागला. इतक्यांत त्यांची इंग्लंडशीं लढाई जुंपली व ब्राझीलमध्यें राज्यविस्तार करण्याची डच लोकांची इच्छा संपुष्टांत आली. इ. स. १६५४ मध्यें त्यांची राजधानी व्हायेरच्या हातीं लागली. इ. स. १६६२ मध्यें झालेल्या तहांत डच लोकांनीं राज्य स्थापण्याचे सर्व हक्क सोडून दिले. यानंतर इ. स. १७१० मध्यें फ्रेंच लोकांनीं आणखी एकदां प्रयत्न केला परंतु त्यांत त्यांनां यश आलें नाहीं. यापुढें पोर्तुगीज लोकांच्या सत्तेंत ढवळाढवळ करण्याचा कोणी यत्न केला नाहीं. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धांत पोर्तुगालचा प्रधान मार्क्विस ऑफ पोंबाल नांवाचा होता. यानें या देशांत ब-याच सुधारणा केल्या. पूर्वीं ज्या वेळीं जमीनदा-या दिल्या त्यावेळीं अंतर्भागाची वाटणी अगदींच अनिश्चित होती. यानें अंतर्भागावर जमीनदाराचा हक्क नाहीं असें ठरविलें. यानें सर्व वर्णांच्या लोकांकरितां एकच कायदा सुरू केला; या व इतर सुधारणांमुळें ब्राझीलची भरभराट झालीं. पोंबालची कारकीर्द संपल्यानंतर विशेष लिहिण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे इ. स. १७८९ साली झालेला मीनास येथील कट . याच सुमारास उत्तर अमेरिकेंतील इंग्लिश वसाहतींनीं बंड करून आपलें स्वातंत्र्य प्रस्थापित केलें होतें. त्याचप्रमाणें पोर्तुगालपासून आपण स्वतंत्र व्हावें असें मीनास येथील कांहीं सुशिक्षित तरूणांस वाटलें व त्यानीं आपला पुढारी सिल्हवा झेवियर यास केलें. परंतु हा कट लवकरच उघडकीस आला व पुढा-यास फांशी देण्यांत आलें.

नेपोलियननें ज्या वेळीं पोर्तुगालवर स्वारी करण्याचा निश्चय केला त्यावेळीं देशांत आपला टिकाव लागावयाचा नाहीं असें पाहून राजानें आपलें वास्तव्य ब्राझीलमध्यें करण्याचें ठरविलें व त्याप्रमाणें ता. २१ जानेवारी सन १८०८ रोजीं राजा आपल्या राज्याच्या सर्व अधिका-यांसहित बाहिया येथें येऊन दाखल झाला. येथें आल्यावर त्यानें वसाहतींतील सर्व बंदरांनां परकीय राष्ट्राशीं व्यापार करण्याची परवानगी दिली. व पोर्तुगाल देशाच्या राज्यपद्धतीसारखी पद्धति येथें सुरू केली. सर्व राष्ट्रांतील लोकांनां व्यापाराची मोकळीक मिळाल्यामुळें निरनिराळ्या देशांतील कारागीर पैसा मिळविण्याकरितां येथें येऊं लागलें व त्यांच्यामुळें देशांत व्यापारविस्तार होऊं लागला.

इकडे फ्रेंचांनीं पोर्तुगाल ताब्यांत घेतला. त्याचें उसनें फेडण्याकरीतां पाराहून, फ्रेंच वसाहत ग्वायना येथें स्वारी करण्यांत आली व ती वसाहत ब्राझीलला जोडण्यांत आली. परंतु १८१५ सालीं झालेल्या व्हिएन्ना येथील तहान्वयें ही वसाहत पुन्हां फ्रेंचांच्या स्वाधीन करण्यांत आली. इ .स. १८८६ मध्यें डॉम जॉन् (चवथा) नांवाचा राजा गादीवर बसला.

या वेळीं वस्तुतः जरी ब्राझील हें मातृ देशाच्या कारभाराचें मुख्य ठिकाण होतें तरी राज्यकारभार ब्राझिलियन लोकांच्या हातांत नसून राजाबरोबर आलेले पोर्तुगीज लोक यांच्या हातांत होता. व यांचा व राजघराण्याचा खर्च चालविण्याकरितां ब्राझिलियन लोकांवर जादा कर बसले हाते व त्यामुळें त्यांच्यांत असंतोष पसरला होता. व त्यामुळें कोठें कोठें कटहि होत असत. इतक्यांत सन १८२० मध्यें पोर्तुगाल देशांतील लोकांनीं बंडाळी  करून लोकशाहीचा पुकारा केला. इकडे  रियो येथें राजानें आपल्या रक्षणाकरितां आपल्या भोंवतीं जें पोर्तुगीज सैन्य ठेवलें होतें त्यानेंच इ. स. १८२१ मध्यें राजाला वेढून पोर्तुगॉलनें स्वीकारलेलें राज्यधोरण अंगिकारण्यास भाग पाडलें . यावेळीं डॉम पेड्रो नांवाचा राजपुत्र होता व हाच राज्याचा वारस होता. यानें राजा व सैन्य यांच्यामध्यें रदबदली करण्याचा प्रयत्न केला. परंतु विशेष कांहीं न होतां राजानें तें धोरण मान्य केलें व त्याप्रमाणें शपथ घेतली व नवीन मंत्रिमंडळ नेमलें; यावेळीं पोर्तुगॉलमध्यें राजघराण्यापैकीं कोणी तरी असलें पाहिजे म्हणून राजा स्वतःतिकडे निघून गेला व राजपुत्र डॉम् पेड्रो यास ब्राझीलमध्यें ठेवलें. इकडे लिस्बनमध्यें पोर्तुगीज व ब्राझिलियन मुसद्यांचें आपसांत न जुळल्यामुळें हमरीतुमरीवर प्रकरण आलें व डॉम पेड्रोनें ब्राझील सोडून पोर्तुगालला परत यावें असा ठराव पास केला. परंतु डॉम पेड्रो पोर्तुगॉलला गेला तर ब्राझीलचें महत्त्व कमी होऊन त्यास पुन्हां पूर्वींची स्थिति येईल असें ओळखून ब्राझीलमधील मुत्सद्यांनीं तिकडे न जाण्याविषयीं त्याचें मन वळविलें व राजपुत्रानें तें कबूलहि केलें. यावेळीं अंड्राडा बंधूंचें वजन येथें फार होतें. यांनीं राजपुत्रास ब्राझीलचें स्वतंत्र राज्य स्थापण्याची फूस दिली व ता. ७ सप्टेंबर सन १८२२ रोजीं ब्राझीलचें स्वातंत्र्य पुकारलें. लिस्वन येथील कोर्टानें यास विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांत त्याला यश आलें नाहीं व सन १८२३ च्या अखेरीस ब्राझीलचें स्वातंत्र्य सर्वांनीं कबूल केलें. पुढें लंडन येथें पोर्तुगाल व ब्राझील यांच्या मुत्सद्यांत परस्पर खलबतें सुरू झालीं व स. १८८५(ता. २५ आगस्ट) मध्यें पोर्तुगालचा राजा डॉम जॉन् यानें तहावर सही केली. त्याप्रमाणें यानें ब्राझीलचा बादशहा ही पदवी स्वीकारली व ताबडतोब आपल्या पुत्राकरितां म्हणून ती सोडली व ब्राझील स्वतंत्र राज्य आहे हें कबूल केलें. शिवाय ब्राझीलनें सुमारें २० लक्ष पौंड कर्ज पोर्तुगालकडून घ्यावें असेंहि तहांत एक कलम होतें. हा वेळेपर्यंत डॉम पेड्रो हा लोकांचा फार आवडता होता, परंतु हा पुन्हां पोर्तुगीजांच्या सल्ल्याप्रमाणें वागूं लागल्यामुळें व ज्यांनीं ही क्रांती घडवून आणली त्यांनां हद्दपार केल्यामुळें लोक त्याविषयीं नाखुष होऊं लागलें. परंतुं इतक्यांत पोर्तुगालचा राजा-त्याचा बाप-वारला. व पोर्तुगालची गादी त्याजकडे आली. परंतु यानें ती न स्वीकारतां आपली मुलगी डॉना मेरिया हीस दिली. यामुळें ब्राझीलचे लोक पुन्हां याजवर प्रेम करूं  लागलें. परंतु यानें युरोपांतील निरनिराळ्या राष्ट्रांशीं तह करूंन त्यांनां कांहीं सवलती दिल्या व त्या सवलती ब्राझीलच्या व्यापारास विघातक आहेत असा येथील लोकांचा समज झाला व लोकांत बराच असंतोष पसरला. एकदां त्यानें लोकमताविरूद्ध मंत्रिमंडळ नेमण्याचा घाट घातला, परंतु तो जनतेस न आवडल्यामुळें त्यांनीं सभा भरवून आपला असंतोष प्रदर्शित केला, सैन्याची मदत लोकांसच असल्यामुळें  त्यानें तें मंत्रिमंडळ मोडलें व आपल्या पांच वर्षांच्या मुलाला गादीवर बसवून आपण स्वतः राज्याचा राजीनामा दिला व पोर्तुगालला निघून गेला (सन १८३१).

डॉम पेड्रो (दुसरा) अज्ञान असल्यामुळें तिघांचें एक मंत्रिमंडळ नेमण्यांत आलें. पुढें एकच मनुष्य राज्यकारभार करण्याकरितां नेमण्यांत आला. ही सर्व राज्यपद्धति व तो मनुष्य निवडण्याचे प्रकार वगैरे सर्व प्रजासत्ताक राज्यपद्धतीवर होतें. परंतु लोकांनां ही पद्धति न आवडल्यामुळें राजा पाहिजे अशी सर्वांनां इच्छा झाली व १८४० सालीं राजा जरी केवळ १४ वर्षांचा होता तरी त्यास सज्ञान असें कायद्यानें मानून घेण्यांत आलें; व नवीन मंत्रिमंडळ नेमण्यांत आलें; १८२६ सालीं गुलामांचा व्यापार बंद करण्याकरितां ब्रिटिशांचा व या देशाचा तह झाला होता परंतु सन १८४८ पर्यंत ब्राझिलीयन लोकांनीं या तहाकडे कानाडोळा केला त्यामुळें ब्रिटिशांमध्यें आणि या देशामध्यें वैरभाव उत्पन्न झाला. लोकहि या गुलामांच्या व्यापाराविरूद्ध होतें नुकताच सन १८४९ मध्यें देशांत पीतज्वराचा उपद्रव सुरू झाला होता. या आजाराचा या व्यापाराशीं संबंध आहे असा लोकांचा समज झाल्यामुळें त्याविरूद्ध कडक कायदे करण्यांत आले व इ म.स. १८५३ मध्यें हीं आयात अजिबात बंद झाली.

या राजाच्या कारकीर्दींत ब्राझीलची साधाराणपणें भरभराट झाली. यानें लोकांच्या शिक्षणाविषयीं पुष्कळ खटपट केली. हा अतिशय उदारमतवादी असल्यामुळें  समाजसत्ताक  तत्त्वांचा प्रसार देशांत फार झाला. १८६४ सालीं याची वडील मुलगी प्रिन्सेस इसाबेला हिनें लग्न केलें तें लोकांस आवडलें नाहीं. ही देशाची भावी राणी होती. व ती चांगली कार्यतत्परहि  होती. परंतु तिच्यावर मिशनरी लोकांचें वजन होतें त्यामुळें तिच्याविरूद्ध काहूर माजविण्यास लोकांस फावलें. शिवाय गुलामांचा व्यापार बंद झाला होता त्यामुळें देशांतील श्रीमंत वर्ग नाखुष झाला होता व याच सुमारास राजा युरोपमध्यें फिरतीवर गेला होता व त्यानें आपली कन्या इसाबेला हिला रीजंट नेमलें होतें. स. १८८८ च्या अखेरीस राजा देशांत परत आला व लोकांनीं त्याचें योग्य प्रकारें स्वगत केलें. जे प्रजासत्ताकराज्यवादी होते त्यांच्यांतहि राजा डॉम पेड्रोला पदच्युत न करावा अशाहि मताचे होते. परंतु इतरांचें म्हणणें  असें पडलें कीं याची मुलगी जास्त चाणाक्ष व संशय खोर आहे व ती गादीवर आल्यास मग कार्य इतकें सुलभ होणार नाहीं. तेव्हां आतांच कार्य उरकून घ्यावें हें बरें. सैन्यांतील व आरमारांतील नाराज झालेंल्या अधिका-यांस ही गोष्ट पसंत पडली व ता. १४ नोव्हेंबर स. १८८९ ला राजवाड्यास शांतपणानें वेढा पडला. दुस-या दिवशीं सकाळीं राजाची व नातलग मंडळींची पोर्तुगाल देशांत रवानगी करण्यांत आली. देशास 'ब्राझीलचीं संयुक्त संस्थानें' असें नांव देण्यांत आलें. व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानच्या धर्तीवर राज्यपद्धतीचें धोरण आंखण्यांत आलें. ज्यांच्याविषयीं आपण इतकी काळजी वाहिली त्या आपल्या प्रजेची ही अनुदार कृति पाहून राजाचें मन विटलें. त्यानें कोणताहि प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाहीं. जनरल डी फॉन्सेका यास प्रेसिडेंट व जनरल फ्लोरिआनो पीझोटो यास व्हाइस प्रसिडेंट नेमण्यांत आलें. त्यांची मुदत ता. १५ नोव्हेंबर सन १८९४ पर्यंत होती. सर्व सत्ता लष्करी लोकांच्या हातांत होती. ज्यांनीं पूर्वीं राजाच्या हाताखालीं काम केलें हातें त्यांनीं राज्यकारभारांतून आपलें अंग काढून घेतलें; कोणी ब्राझील सोडून गेले; कोणी आपण होऊन एकांतवास पत्करला; कोणी आपल्या शेतवाडीवर निघून गेलें. याप्रमाणें देशांतील खरी कार्यकर्ती मंडळी निघून गेल्यावर देशांत बेबंदशाही माजली. ज्याचें त्याचें आपली तुबंडी भरून घेण्याकडे लक्ष होतें. त्यामुळें देशांत असंतोष पसरला व लहान लहान कट होऊं लागलें. त्यामुळें प्रेसिडेंट जनरल डा फोन्सेका यानें आपण डिक्टेटर आहों असें प्रसिद्ध केलें. त्यामुळें  लोक फार चिडले. व फोन्सेका यास ता. २३ नोव्हेंबर १८९१ रोजीं आपल्या कामाचा राजीनामा द्यावा लागला, व त्याच्या जाग्यावर उपाध्यक्ष फ्लॉरेन्स पीझोटो हा आला. याच्याहि कारकीर्दींत अशीच धामधुम चालू होती. सन १८९३ त आरमारांतील लोकांनीं बंड केलें व सिव्हल वॉर सुरू झाली. पुढें तह झाला व त्याची कारकीर्द संपली. व त्याच्या मागून डॉक्टर प्रुडंट डी मोरे बरॉस् हा अध्यक्ष झाला. यानें लष्करी सत्तेचें प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न केला व एकंदर स्थिति सुधारण्याविषयीं बरेच प्रयत्न केले. याचा एकदां खून करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु तो त्यांतुन बचावला. याच्या मागून ता. १५ नोव्हेंबर सन १८९८ रोजीं डॉक्टर कंपॉस सले हा अध्यक्ष निवडला गेला. व यानेंहि देशाची सांपत्तिक स्थिति सुधारण्याचे प्रयत्न केले. याच्या कारकीर्दींतील महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे निरनिराळ्या राष्ट्रांशीं आपल्या देशाची सरहद्द ठरविणें. यानें निरनिराळ्या राष्ट्रांशीं तह करून सरहद्द कायम करून घेतली. १९०६ सालीं डॉक्टर अफॉन्सो पेन्ना हा अध्यक्ष झाला. हा पूर्वीं डॉम पेड्रो याच्या कारकीर्दींत तीन वेळां मिनिस्टर होता. यानें देशाची सांपत्तिक स्थिति सुधारण्याचे पुष्कळ प्रयत्न केलें. व त्यांत त्याला चांगलें यशहि आलें. हा सन १९०९ (१४ जून ) मध्यें अध्यक्षपदावर असतांनाच मरण पावला.

१९१० सालीं मार्शल हर्मेस ड फान्सोका हा कान्झर्व्हेटिव्ह पक्षाचा पुढारी ब्राझीलचा अध्यक्ष झाला. या सालीं आरमारामध्यें बराच असंतोष पसरला व त्यामुळें कांहीं ठिकाणीं चकमकी झडल्या. तेव्हां आरमारांतील लोकांच्या कांहीं मागण्या मान्य करून सरकारनें हा लढा मिटविला. १९१२ सालीं ब्राझीलचा परराष्ट्रमंत्रि सुप्रसिद्ध बॅसरिया ब्रांको हा मरण पावला. त्याच्या जागीं डॉ. मुल्लर हा परराष्ट्रमंत्री झाला. १९१३ सालीं ब्राझील व पेरू व ब्राझील व यूराग्वे यांच्यामध्ये सरहद्दीसंबंधींची व्यवस्था लावण्याबद्दल तहनामे झाले. ब्राझीलमध्यें उत्पन्नाला व खर्चाला कांहींच मेळ नसल्यानें, आर्थिक परिस्थिति फार हालाखीची होती. महायुद्धपूर्वीं व्यापारालाहि मंदी आल्यामुळें तर ती अतिशयच बिघडली. त्यामुळें कामगारांमध्यें  असंतोष पसरून बंडाळी माजली आणि सरकारला कांहीं काळापर्यंत लष्करी कायदा पुकारावा लागला. पुढें महायुद्धमुळें ब्राझीलमधील आर्थिक स्थिति बरीच निवळली. १९१५ सालीं अर्जेंटिना, ब्राझील व चिली यांच्यामध्यें  राजकीय व व्यापारविषयक तह झाले. याच सालीं प्रेसिडेंट विल्सननें मेक्सिको प्रकरणाची वासलात लावण्याकरितां वरील तिन्ही राष्ट्रांनां (ब्राझील, बोलिव्हिया, व ग्वाटेमाला) चर्चेसाठीं बोलावणें केलें व या राष्ट्रपंचकाच्या विचारानें वेनुस्टियानो कारेझा हा मेक्सिकोचा मुख्य प्रधान झाला. पॅन अमेरिकन फायनॅन्शियल कॉनफरन्समध्येंहि ब्राझीलनें महत्वाचा भाग घेतला. १९१४-१८ या सालीं ब्राझ हा ब्राझीलचा अध्यक्ष होता. पुढें सीनार अल्वेस हा अध्यक्ष निवडला गेला. पण तो थोडक्याच दिवसांत वारल्यामुळें त्याच्या जागीं पेसोआ हा अध्यक्ष झाला. महायुद्धमध्यें ब्राझीलची सहानुभूति दोस्तराष्ट्रांकडे होती. १९१७ सालीं जर्मनीनें आपलें आरमार ब्राझीलच्या आरमारी सरहद्दीवर पाठवल्यामुळें तिच्या विरूद्ध लढाई पुकारण्यांत आली. ब्राझील हें राष्ट्रसंघांत मूळ सभासद आहे व राष्ट्रसंघाच्या कार्यकारीमंडळांतहि याचा समावेश आहे.

धन्यवाद।।
उत्तर लिहिले · 2/12/2019
कर्म · 19610
0
नक्कीच, भारत आणि ब्राझीलच्या स्थानाबद्दल आणि विस्ताराबद्दल माहिती खालीलप्रमाणे:

भारत: स्थान आणि विस्तार

स्थान: भारत हा उत्तर आणि पूर्व गोलार्ध मध्ये स्थित आहे. भारताचे मुख्य भूभाग ८°४' उत्तर ते ३७°६' उत्तर अक्षांश आणि ६८°७' पूर्व ते ९७°२५' पूर्व रेखांश दरम्यान पसरलेला आहे.

विस्तार: भारताचे एकूण क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौरस किलोमीटर आहे. उत्तर-दक्षिण लांबी सुमारे ३,२१४ किलोमीटर आहे आणि पूर्व-पश्चिम रुंदी सुमारे २,९३३ किलोमीटर आहे. भारताला ७,५१६.६ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

ब्राझील: स्थान आणि विस्तार

स्थान: ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठा देश आहे. ब्राझीलचा बराचसा भाग दक्षिण गोलार्ध मध्ये आहे, तर काही भाग उत्तर गोलार्ध मध्ये आहे. ब्राझील ५°१६' उत्तर ते ३३°४४' दक्षिण अक्षांश आणि ३४°४७' पश्चिम ते ७३°५९' पश्चिम रेखांश दरम्यान पसरलेला आहे.

विस्तार: ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ ८५,१५,७६७ चौरस किलोमीटर आहे. ब्राझीलची उत्तर-दक्षिण लांबी सुमारे ४,३९५ किलोमीटर आहे आणि पूर्व-पश्चिम रुंदी सुमारे ४,३१९ किलोमीटर आहे. ब्राझीलला सुमारे ७,४९१ किलोमीटर लांबीचा अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1780

Related Questions

भारतामध्ये असे कुठले राज्य आहे की ज्या राज्यामध्ये पहाटेला ३.३० ते ३.४५ च्या दरम्यान सूर्यकिरणे पडतात, त्या गावाचे नाव लिहा?
राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला काय म्हणतात?
राजस्थानचा मैदानी प्रदेश इतर कोणत्या नावाने ओळखला जातो?
प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप काय आहे?
प्राकृतिक भूगोलाची व्याख्या सांगून स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा?
ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग (प्रकरण ३)?
महाराष्ट्राच्या उत्तर दिशेची सीमा दर्शवणारा पर्वत कोणता, सह्याद्री?