मूलभूत विज्ञान विज्ञान

सायन्स (विज्ञान) म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

सायन्स (विज्ञान) म्हणजे काय?

4
विज्ञान काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाल्यास तर मी म्हणेन-

१. विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञानसंपादनाची एक पद्धतही आहे.

२  विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.

३. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. (अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही.)

४. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.

५. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच किती तरी शतकांपासून लाखो-करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत व त्यात आपले योगदान देऊन त्याला व स्वत:ला समृद्ध करत आली आहेत. हा ‘खेळ’ तो खेळणाऱ्यांसाठी  जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे.

६. विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्त्वांचे उपयोजन मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, ते अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण ‘तंत्रज्ञान’ म्हणतो.

विज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी पृथ्वीवरील लाखो व्यक्तींद्वारे होत असते. त्यातील कोणताही तुकडा सुटा नसतो, तर तो इतर तुकडय़ांशी, विश्वातील एकूण विज्ञानसमुच्चयाशी जुळलेला असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रित साठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते (किंवा असायला हवी). विज्ञानाचा मूळ उद्देश हा सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. ते शोधून काढण्याच्या पद्धतीचे नावही विज्ञानच. काय आहे ही पद्धत? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. नंतर त्याकडे जाण्याचा आरंभिबदू – गृहीतक – ठरविणे. त्यानंतर या दोन िबदूंना सांधणारा रस्ता प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष यांच्या साखळीतून शोधणे. येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहीतक व संशोधन पद्धती तपासून पाहणे व नव्याने सुरुवात करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते व तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे. प्रयोगाच्या विषयापासून जर आपण अंतर घेतले नाही, तर जे घडत आहे त्याचे निरीक्षण किंवा मोजणी अचूकपणे करणे आपल्याला शक्य होणार नाही.
उत्तर लिहिले · 20/11/2019
कर्म · 4390
0

विज्ञान म्हणजे निसर्गाचा आणि आपल्या सभोवतालच्या जगाचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धतशीर प्रक्रिया आहे.

विज्ञानामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

  • निरीक्षण: आपल्या सभोवतालच्या जगाचे लक्षपूर्वक निरीक्षण करणे.
  • प्रश्न विचारणे: आपण जे पाहतो त्याबद्दल प्रश्न विचारणे.
  • अनुमान काढणे: प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पुरावा वापरणे.
  • प्रयोग करणे: आपल्या अनुमानांची चाचणी घेण्यासाठी प्रयोग करणे.
  • निष्कर्ष काढणे: प्रयोगांच्या निकालांवर आधारित निष्कर्ष काढणे.

विज्ञान हे सतत बदलत असते. नवीन शोध लागतात आणि जुन्या कल्पना सुधारल्या जातात.

विज्ञानाचे काही महत्वाचे भाग:

  • भौतिकशास्त्र (Physics): ऊर्जा आणि पदार्थ यांचा अभ्यास.
  • रसायनशास्त्र (Chemistry): पदार्थांचे गुणधर्म आणि त्यांची रचना यांचा अभ्यास.
  • जीवशास्त्र (Biology): सजीव आणि त्यांच्या कार्यांचा अभ्यास.
  • भूगर्भशास्त्र (Geology): पृथ्वीचा अभ्यास.
  • खगोलशास्त्र (Astronomy): ग्रह, तारे आणि अवकाश यांचा अभ्यास.

विज्ञानाचा उपयोग अनेक गोष्टींसाठी होतो, जसे की नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, रोग बरे करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

विकिपीडिया
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5080

Related Questions

विज्ञान म्हणजे नेमके काय?
विज्ञानं म्हणजे काय?
विद्यान म्हणजे काय?
विज्ञान म्हणजे काय?
विज्ञान म्हणजे काय?
सायन्स म्हणजे काय?
what is science ?