सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन आग

आग व आगीचे प्रकार आणि आग विझवण्याचे प्रकार सांगा?

2 उत्तरे
2 answers

आग व आगीचे प्रकार आणि आग विझवण्याचे प्रकार सांगा?

9
१. आगीचे घटक

आग निर्माण होण्यासाठी इंधन (ज्वलनशील पदार्थ), प्राणवायू आणि उष्णता हे तीन प्रमुख घटक एकत्र येण्याची आवश्यकता असते. हे तीनही घटक योग्य प्रमाणात एकत्र आल्यासच आग निर्माण होते.

२ अ. नैसर्गिक

वादळ, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी.

२ आ. अनैसर्गिक

या आगींना माणूस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या उत्तरदायी असतो. अनैसर्गिक आगींचीही अन्य पोटकारणे आहेत, उदा. अज्ञान, निष्काळजीपणा (उदा. इस्त्री अतिशय तापणे, जळत्या सिगरेटचे थोटूक न विझवता टाकणे), अपघात, घातपात, युद्ध इत्यादी.

३. आगीचे वर्गीकरण

इंधनाच्या प्रकारावरून आगीचे चार प्रकार आहेत.

३ अ. ए प्रकारची आग

जेव्हा जळणारे पदार्थ कागद, लाकूड, कोळसा, प्लास्टिक, रबर यांसारखे कार्बनयुक्त आणि घनरूप असतात, तेव्हा त्या आगीला ए प्रकारची आग म्हणतात.

३ आ. बी प्रकारची आग

जेव्हा जळणारा पदार्थ द्रवरूपात असतो किंवा कोणत्याही घनपदार्थाचे द्रवरूप जळत असते, तेव्हा त्या आगीला बी प्रकारची आग असे म्हणतात, उदा. पेट्रोल, डिझेल, वंगण, रसायने, रंग इत्यादी.

३ इ. सी प्रकारची आग

ज्या आगीमध्ये ज्वलनशील वायूरूप किंवा द्रवरूप पदार्थाचे वायूरूप जळत असते, त्या आगीला सी प्रकारची आग म्हटले जाते, उदा. स्वयंपाकाचा गॅस (एल्.पी.जी.), वेल्डिंगचा गॅस इत्यादी.

३ ई. डी प्रकारची आग

जेव्हा कोणताही धातू जळत असतो, तेव्हा त्या आगीला डी प्रकारची आग म्हटले जाते, उदा. सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, टिटॅनियम इत्यादी.

४. आग बघितल्यावर आपण काय कराल ?

अ. आग-आग असे मोठ्याने ओरडून अवतीभोवतीच्या लोकांना सावध करा.

आ. अग्नीशमन दल, पोलीस आणि नगरपालिका यांना आगीविषयी कळवा.

इ. अग्नीशमन दलाचे साहाय्य येईपर्यंत आग मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करा. दारे-खिडक्या बंद करा. वीजपुरवठा बंद करा. सभोवतालचे ज्वलनशील पदार्थ सुरक्षित स्थळी हलवा. शक्य असल्यास आगीच्या सभोवतालचा परिसर पाण्याच्या फवार्‍याने भिजवा.

ई. योग्य प्रकारचे अग्नीशमनाचे माध्यम वापरून आग विझवा.

५. अग्नीशमनाच्या पद्धती

५ अ. जळण / इंधन मिळू न देणे (स्टार्व्हिंग)

आगीला इंधनापासून वंचित केले किंवा इंधनपुरवठा बंद केला, तर आग त्वरित विझते. या पद्धतीला स्टार्व्हिंग असे म्हणतात, उदा. गॅसची शेगडी विझवतांना आपण गॅसचा पुरवठा बंद करतो. शेगडी इंधन न मिळाल्याने विझते.

५ आ. थंड करणे (कूलिंग)

जळणार्‍या पदार्थाचे तापमान त्या पदार्थाच्या ज्वलनबिंदूच्या खाली आणल्यास, म्हणजेच पदार्थातील उष्णता घटल्यास आग त्वरित विझते. अग्नीशमनाच्या या प्रकाराला थंड करणे म्हणतात, उदा. जळत्या लाकडावर पाणी घालणे.

५ इ. वायू बंद करणे / वायू तोडणे (स्मॉदरिंग)

प्राणवायूचा पुरवठा आगीपासून पूर्णपणे तोडल्यास किंवा हवेतील प्राणवायूचे प्रमाण १६ टक्क्यांपेक्षा घटल्यास आग त्वरित विझते. जळत्या मेणबत्तीवर काच झाकण्याच्या प्रयोगावरून हे सिद्ध होते. यालाच हवा तोडणेे (स्मॉदरिंग) असे म्हणतात.

५ ई. साखळी अभिक्रिया तोडणे

काही विशिष्ट रसायनांचा वापर करून ज्वलनाची साखळी अभिक्रिया तोडली जाऊन आग विझवता येते, उदा. हॅलॉन वायू. अशा रसायनांचा वापर पुष्कळ खर्चिक असल्याने त्याचा वापर मर्यादित स्वरूपात केला जातो.

६. अग्नीशमनाची माध्यमे

सामान्यपणे वापरली जाणारी अग्नीशमनाची माध्यमे आणि त्यांची कार्यपद्धत पुढीलप्रमाणे आहे.

६ अ. पाणी

जळते लाकूड, कागद यांसारख्या कार्बनयुक्त पदार्थांवर (ए प्रकारची आग) किंवा धातूवर (डी प्रकारची आग) पाण्याचा फवारा सतत मारल्याने पाणी जळणार्‍या पदार्थांमधून उष्णता शोषून घेते. उष्णता शोषून घेण्याचा वेग उष्णतानिर्मितीच्या वेगापेक्षा जास्त असल्यास आग विझते.

६ आ. सुकी रासायनिक भुकटी (ड्राय केमिकल पावडर)

सोडियम बायकार्बोनेट आणि पोटॅशियम बायकार्बोनेट या रासायनिक भुकटींना सुकी भुकटी म्हणून ओळखले जाते. त्या पांढर्‍याशुभ्र असतात. द्रव कार्बन डायऑक्साईड वायूचा वापर करून दाबाखाली ती भुकटी आगीवर शिंपडल्याने या भुकटीच्या कणांचा आगीवर एक ढग बनतो. या ढगामुळे आगीचा हवेशी संपर्क तुटतो आणि प्राणवायू न मिळाल्यामुळे, तसेच जळण्याची साखळी क्रिया तुटल्यामुळे आग विझते. या माध्यमाचा उपयोग प्रामुख्याने बी आणि सी प्रकारच्या आगी विझवण्यासाठी केला जातो. विद्युत उपकरणे जळत असली, तरीही सुक्या भुकटीचा उपयोग लाभदायक ठरतो.

६ इ. कार्बन डायऑक्साईड

अती उच्च दाबाखाली हा वायू द्रवरूपात विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या सिलिंडरमध्ये साठवला जातो. या वायूचा फवारा आगीवर मारल्यावर तो हवेपेक्षा पाचपट जड असल्यामुळेे त्याचा थर जळत असलेल्या पदार्थावर निर्माण होतो. अशा प्रकारे आगीचा हवेशी, म्हणजेच प्राणवायूशी संपर्क तुटल्यामुळे आग विझते. कार्बन डायऑक्साईड मुख्यत्वे विद्युत् उपकरणांना आग लागल्यास वापरला जातो.
६ ई. विशिष्ट रसायने

काही रसायने ज्वलनाची साखळी क्रिया तोडून आग विझवण्यास साहाय्य करतात. अशा रसायनांचा अग्नीशमनासाठी मर्यादितपणे वापर केला जातो.

६ उ. वाळू

आग लहान असली आणि अन्य कोणतेही माध्यम उपलब्ध नसले, तर ए, बी आणि डी प्रकारच्या आगी विझवण्यासाठी वाळू परिणामकारकरित्या वापरली जाऊ शकते. वाळू न मिळाल्यास भुसभुशीत मातीही वापरली, तरी चालते.
आग विझवण्यासाठी वाफ, अ‍ॅसबेस्टॉस कापड, फेस (फोम) आदी माध्यमे केव्हा वापरायची, तसेच विविध प्रकारचे एक्सटिंग्विशर्स कसे वापरायचे, यांचेही विवेचन ग्रंथात केले आहे.

७. प्रसंग आणि प्रासंगिक उपाययोजना

अग्नीशमनासाठी तत्परता जेवढी महत्त्वाची तेवढाच किंवा त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचा असतो मी एकट्याने आगीशी सामना करायचा का ? हा निर्णय. हा निर्णय घेेणे सोपे व्हावे यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. पुढीलपैकी कोणत्याही एक किंवा अधिक प्रश्‍नांचे उत्तर होय असे असल्यास अग्नीशमनाचा प्रयत्न करू नका. ते तुमच्या जिवावर उलटू शकते.

अ. आग लागलेल्या ठिकाणाहून ती अन्यत्र वेगाने पसरत आहे का ?

आ. तुमच्या सुटकेच्या वाटेकडे पाठ करून आग विझवणे शक्य नाही का ?

इ. तुमच्या सुटकेच्या एकमेव वाटेत आग आडवी आहे का ?

ई. तुमच्याजवळ अग्नीशमनाची योग्य उपकरणे नाहीत का ?

उ. तुमच्याजवळील अग्नीशमनाचे माध्यम संपले आहे का ?

ऊ. आग प्रतिबंधक व्यक्तीगत सुरक्षा उपकरणे तुमच्याजवळ उपलब्ध नाहीत का ?
अशा प्रसंगात अग्नीशमनाचा प्रयत्न न करता आगीच्या स्थानावरून त्वरित सुरक्षित ठिकाणी चला आणि साहाय्य मागवा.

७ अ. जळणार्‍या घरातून / वास्तूतून स्वतःची सुटका

आग लागलेली खोली किंवा माळ्यावरून बाहेर पडतांना शेवटच्या माणसाने दार केवळ ओढून घ्यावे. कुलूप लावू नये. कुलूप लावल्यास अग्नीशमन दलाला शोध आणि सहकार्य करण्यात अडथळा येतो.

१. आपत्कालीन कृती आराखड्यात नमूद केलेल्या मार्गानेच बाहेर पडा.

२. आणीबाणीच्या प्रसंगी उद्वाहनाचा (लिफ्ट) वापर चुकूनसुद्धा करू नका.

३. धूर आणि विषारी वायूंना टाळण्यासाठी खाली वाका. स्वच्छ हवा भूमीलगत असते. आवश्यकता भासल्यास भूमीवर पालथे पडा आणि हातापायांवर रांगत पुढे जा. पोटावर सरपटत पुढे होऊ नका. उष्णतेमुळे धुराचे ऊर्ध्वगमन होत असते आणि काही जड विषारी वायूंचा थर भूमीवर जमतो; म्हणून रांगतांना डोके भूमीपासून साधारण ०.५ मीटर उंचीवर धरले पाहिजे.

४. शक्य असल्यास नाक आणि तोंड ओल्या फडक्याने झाका.

५. जळक्या पायर्‍यांवरून (जिन्यावरून) / खोलीतून जातांना भिंतीकडूनच चाला. भिंती इमारतीच्या मुख्य सांगाड्यावर उभारलेल्या असल्यामुळे भिंतीजवळचा भाग हा सर्वांत सुरक्षित असतो. अन्य भाग कोसळण्याची शक्यता असते.

६. अनेक माळ्यांची वास्तू (बहुमजली इमारत) असल्यास पायर्‍या हाच सुटकेचा प्रमुख मार्ग असतोे. न घाबरता, सावधपणे आणि शिस्तीत बाहेर व्हा.

७. पायर्‍यांवर आल्यावर एका बाजूनेच खाली उतरा. पायर्‍यांची दुसरी बाजू अग्नीशमन आणि साहाय्यपथकासाठी रिकामी सोडा. चुकूनही पुन्हा वर जाऊ नका.

८. वास्तूबाहेर आल्यावर अग्नीशमन दल आणि पोलीस दल यांना त्वरित घटनेविषयी कळवा.

७ आ. स्वतःलाच आग लागल्यास

जिथे आहात तिथे थांबा, आणि भूमीवर पडा आणि लोळण घ्या. कपड्यांची पेटलेली बाजू भूमीलगत राहील, याची दक्षता घ्या. यामुळे ज्वाळा दडपल्या जाऊन विझतील आणि तुमचा जीव वाचू शकेल. कपड्यांना आग लागली असता घाबरून पळू नका (धावल्यामुळे आग भडकण्यास साहाय्य होते.), तसेच भूमीवर गडाबडा लोळू नका.

७ इ. साथीदाराला आग लागल्यास

रग, घोंगडी, सतरंजी किंवा कोणतेही जाड कापड घेऊन जळणार्‍याभोवती गुंडाळा.
१. आग विझल्यावर त्याच्या अंगावरील जळके कपडे काढून टाका.
२. योग्य प्रथमोपचार द्या.

स्टोव्हचा भडका उडाल्यास, कढईतील तेलाला आग लागल्यास, घरगुती वापरातील द्रवरूप वायूची (गॅसची) गळती झाल्यास काय करायचे, यांचेही विवेचन ग्रंथात केले आहे.

८. अग्नीप्रतिबंधक उपाययोजना

दैनंदिन व्यवहारात काही निवडक प्रसंगी घ्यावयाच्या सर्वसाधारण उपायांविषयीची माहिती पुढे दिली आहे.

८ अ. वीज आणि विजेच्या उपकरणांमुळे लागू शकणारी आग

१. काम झाल्यावर विजेच्या उपकरणांची कळ बंद करून दट्टा (प्लग) काढून ठेवा.

२. विजेची उपकरणे दुरुस्तीसाठी उघडली असल्यास तारेच्या जोडण्या दणकट असल्याची निश्‍चिती करा. दुरुस्ती कुशल तंत्रज्ञाकडूनच करून घ्या.

३. विजेची उपकरणे, विशेषकरून या उपकरणांची चलन यंंत्रे (मोटर) स्वच्छ ठेवा. त्यांवर धूळ, तेल किंवा ग्रीस साठू देऊ नका.

४. कारखान्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या विजेच्या हात-दिव्यांवर (हॅन्ड लॅम्प) लांब वायर जोडलेली असल्यामुळे त्यांना हवे तसे आणि हवे तिथे हलवता येते. हात-दिव्यांवर काचेचे आवरण असणे आवश्यक आहे; कारण दिव्याच्या उष्णतेमुळे तेलकट पदार्थ पेट घेऊ शकतात.

५. विजेची उपकरणे / बटणे यांच्याजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवू / साठवू नका.

६. फ्युजची तार जळल्यास योग्य क्षमतेचीच तार वापरा.

७. कोणत्याही विजेच्या उपकरणातून जळका किंवा अनैसर्गिक वास आल्यास ते त्वरित बंद करून पडताळून (तपासून) घ्या. जळका वास येणे, हे आग लागली असण्याचे प्राथमिक लक्षण आहे.

८. कोणत्याही उपकरणावर किंवा विजेच्या बटणावर त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्युतभार टाकू नका.

९. विजेच्या तारांची पाणी किंवा उष्ण भाग यांतून मांडणी करू नका. भूमीवरून, दरीखालून (कार्पेटखालून), दार / खिडकी यांतून त्यांची मांडणी करू नका.

१०. ओल्या हातांनी विजेच्या उपकरणांना स्पर्श करू नका.

११. विजेच्या तारांचेे जोड (जॉइंट) उघडे ठेवू नका. योग्य प्रकारच्या वीजवाहक नसलेल्या पट्टीने (इन्स्युलेटिंग टेपने) ते झाका.

८ आ. स्वयंपाकघरातील आग

१. स्वयंपाकघराची मांडणी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य अशी करा.

२. स्वयंपाक करतांना सैल, घोळसर कपडे घालू नका, साडीचा पदर नीट खोचून घ्या.

३. स्टोव्हवरून तापलेली (गरम) भांडी उतरवतांना नेहमीच सांडशीचा किंवा चिमट्याचा वापर करा. या कामी टॉवेल, फडके किंवा साडीचा पदर वापरणे अत्यंत धोक्याचे असते.

४. घरगुती वापराच्या वायूची शेगडी, स्टोव्ह किंवा ओव्हन चालू असतांना घर सोडून बाहेर जाऊ नका.

५. घरात कोणीच नसतांना किंवा झोपी जातांना मेणबत्त्या आणि तेलाचे दिवे विझवा.

६. घरगुती वापराच्या वायूची शेगडी किंवा स्टोव्ह नेहमी उंचावर ठेवा. लादीवर कधीच ठेवू नका.

७. शेगडीवर मुठीचे भांडे ठेवतांना मूठ आतल्या बाजूस ठेवा.

८. लाकडी कपाट, फळ्या, पडदे, कपडे इत्यादी ज्वलनशील वस्तू शेगडी / स्टोव्ह यांपासून दूर ठेवा.

९. लहान मुलांना स्वयंपाकघरात खेळू देऊ नका.

१०ं. मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतांना काळजी घ्या. ते बाह्यतः जरी गार वाटत असले, तरी आतील पदार्थांचे तापमान जास्त असू शकते. ओव्हनमधल्या पदार्थाने पेट घेतल्यास वीजपुरवठा त्वरित बंद करा आणि आग विझेपर्यंत ओव्हनचे दार उघडू नका.

११. काडीपेटीची काडी पेटवतांना शरिरापासून लांब धरा. जळती काडी फेकण्यापूर्वी पूर्णपणे विझल्याची निश्‍चिती करा.

१२. स्वच्छता हा आग टाळण्याच्या उपाययोजनेचा पाया आहे.
उत्तर लिहिले · 14/9/2018
कर्म · 6225
0

आग (Fire) एक रासायनिक क्रिया आहे ज्यामध्ये उष्णता आणि प्रकाश निर्माण होतो. आग मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे, परंतु ती विनाशकारी देखील ठरू शकते. आगीचे प्रकार आणि ती विझवण्याचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

आगीचे प्रकार (Types of Fire):

  1. वर्ग अ (Class A): लाकूड, कागद, कापड, प्लास्टिक यांसारख्या घन पदार्थांमुळे लागलेली आग.
  2. वर्ग ब (Class B): ज्वलनशील द्रव पदार्थांमुळे लागलेली आग, जसे की पेट्रोल, डिझेल, रॉकेल, तेल आणि वायू.
  3. वर्ग क (Class C): विद्युत उपकरणांमुळे लागलेली आग, जसे की शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग.
  4. वर्ग ड (Class D): विशिष्ट धातूंमुळे लागलेली आग, जसे की मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम.
  5. वर्ग के (Class K): व्यावसायिक किचनमध्ये तेल आणि चरबीमुळे लागलेली आग.

आग विझवण्याचे प्रकार (Methods of Extinguishing Fire):

  1. पाणी (Water): वर्ग अ च्या आगीसाठी उपयुक्त. पाणी उष्णता शोषून घेते आणि आगीला थंड करते.
  2. फोम (Foam): वर्ग ब च्या आगीसाठी उपयुक्त. फोम ज्वलनशील पदार्थांवर थर निर्माण करते, ज्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.
  3. कार्बन डायऑक्साइड (Carbon Dioxide - CO2): वर्ग ब आणि क च्या आगीसाठी उपयुक्त. CO2 ऑक्सिजनची जागा घेते आणि आग विझवते.
  4. ड्राय केमिकल पावडर (Dry Chemical Powder): वर्ग अ, ब आणि क च्या आगीसाठी उपयुक्त. ही पावडर आगीच्या रासायनिक प्रक्रियेत व्यत्यय आणते.
  5. ओल्या रसायनाचा वापर (Wet Chemical): वर्ग के च्या आगीसाठी उपयुक्त. हे रसायन तेल आणि चरबीच्या आगीला थंड करते आणि त्यावर थर निर्माण करते.

आग विझवताना घ्यावयाची काळजी:

  • आगीचा प्रकार ओळखून योग्य अग्निशामक (Fire Extinguisher) वापरा.
  • विद्युत उपकरणांमुळे लागलेली आग विझवताना पाणी वापरणे टाळा.
  • धुरामुळे गुदमरल्यास जमिनीवर झोपूनcrawl करून बाहेर पडा.
  • आग मोठी असल्यास अग्निशमन दलाला (Fire Brigade) त्वरित संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त संकेतस्थळे:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2100

Related Questions

गावातील तलाव भिंत फुटली तर त्याची तक्रार कुठे करावी?
आपत्ती व्यवस्थापनावर एक वाक्यात चर्चा करा?
आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा?
दुष्काळ झाल्यास तुम्ही काय कराल?
नैसर्गिक निर्मित व मानवनिर्मित आपत्तीचा तक्ता तयार करा?
आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती मिळवण्याची साधने कोणती?
आपत्तीजनक परिस्थितीत ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा समन्वय कसा साधावा?