2 उत्तरे
2 answers

छक्का म्हणजे काय?

18
हिजडा म्हणजे काय ?

हिजडा  हा शब्द खरतरं आपल्याकडे शिवी सारखा वापरला जातो.  सप्रमाण सांगायचे झाले तर आजही मुली मोठ्यांनी हसल्या कि घरातील ज्येष्ठ मंडळीकडून एक वाक्य कानी पडते ते म्हणजे ‘काय हसते हिजड्यासारखी’.  पण हिजडा म्हणजे नेमकं काय? कोठून हि संकल्पना उदयास आली हे ह्या अभ्यासाच्या निमित्ताने समजून घेण्याचा छोटासा प्रयास आहे.  आम्ही हिजडे आम्ही माणूस हा अभ्यास करतांना सात राज्यातील विविध तृतीयपंथी आणि त्यांचे गुरु यांच्याशी संवाद साधून हिजडा म्हणजे काय हे जाणून घेतले. याची सर्व माहिती राष्ट्रीय ट्रान्सजेंडरकार्यकर्त्या गौरी सावंत यांनी दिली ती माहिती शब्दबद्ध करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

‘हिजडा’ हा मूळ उर्दु शब्द आहे.  ‘हिजर’ या अरबी शब्दावरून आलेला आहे.  हिजर चा अर्थ आपली जमात सोडलेला किंवा त्या जमातीतून बाहेर पडलेला.   वेगवेगळ्या राज्यानुसार हिजड्यांचा इतिहास, संस्कृतीत थोडाफार फरक आहे.  उर्दूमध्ये हिजडा आणि ख्व्याजा सरा,  हिंदीमध्ये किन्नर आणि हिजडा,   मराठीमध्ये छक्का आणि हिजडा, गुजरातीत पावैया, तेलगुमध्ये नपुंसकुडू,कोज्जा, मादा,  तमिळमध्ये थिरूनानगाई, अली, अरवन्नी,अरुवणी असे संबोधले जाते.

‘हिजडा’ जन्म पुरुष म्हणून घेतो.  त्याचप्रमाणे त्याचे संगोपन होते.  मात्र वयात आल्यावर त्याची लैंगिकता हि वेगळी आहे याची त्याला जाणीव होते. त्यातून तो स्त्रीची भूमिका जगत असतो. परिणामी कुटुंबात हे मुल स्वीकारले जात नाही.  घरातून बाहेर पडावे लागते, त्यामुळे  जीवन जगत असताना अनेक अडचणीवर मात देत ते जगत असतात.

 हिजड्यांची  ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी:

बहुचरा किंवा भोचरा  माता हिजड्यांची देवी : बहुचरा मातेचे मंदिर गुजरातमधील मेहसाना येथे आहे.  बहुचरा माता हि कोंबड्यावर विराजमान आहे. म्हणून तिला मुर्गेवाली माता असंही म्हटलं जात.  बहुचरा मातेच्या वेगवेगळ्या आख्यायिका ऐकावयास मिळतात.

एक राजकुमारी किंवा राजकन्या होती.  तिचा एका राजघराण्यातील राजपुत्राशी विवाह झाला होता.  मात्र तो राजपुत्र एक स्त्री वागते त्याप्रमाणे  वागायचा. स्त्री सारखे हावभाव करायचा.  विवाह झाल्यानंतर राज्कुमारीशी जेव्हा शरीरसंबंध ठेवायची वेळ आली तेव्हा तो राजपुत्र पळून जात असे.  हे पळून जाणे वारंवार होत होते.  शेवटी एक देवी राजकुमारीच्या रुपात आली आणि तिने त्याच लिंग कापून टाकल.  ती देवी म्हणजे बहुचरा माता असे सांगण्यात येते.

दुसरी आख्यायिका अशी सांगण्यात येते कि, स्त्रीरुपातील एक देवी तिच्या वडिलांसोबत जंगलातून प्रवास करत होती.  त्यावेळी त्याच्यावर दरोडा घातला गेला.  त्यात या स्त्रीरुपी देवीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला.  तेव्हा त्या स्त्रीरुपीदेवीने त्याला नपुंसक होण्याचा शाप दिला.  यावर त्याने देवीची याचना करून उ:शाप मागितला तेव्हा देवीने त्याला सांगितले जेव्हा तू स्त्रीसारखा राहशील- वागशील तेव्हाच तू या शापातून मुक्त होशील.

अशा वेगवेगळ्या आख्यायिका ,कथा, कहाण्या याबाबत सांगितल्या जातात.  देशभरातल्या हिजड्यांचे हे तीर्थक्षेत्र आहे.  तिथे जाणारे लोक आपले केस देवीला वाहतात.  आपण केस देवीला दान केले नाही तर देवी मुलाचं लिंग मागून घेते अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे.

रामायण आणि महाभारतातील उल्लेख : रामायण आणि महाभारतात हिजड्यांचे उल्लेख  आढळतात. रामायणातील उल्लेखानुसार राम जेव्हा चौदा वर्षाच्या वनवासासाठी गेले तेव्हा अयोध्येची सगळी प्रजा त्यांना निरोप देण्यासाठी अयोध्येच्या वेशीपर्यंत आली होती.  त्यावेळी सगळ्या प्रजेने परत अयोध्येत जावे यासाठी रामने सगळ्या नर-नारीनी परत जावे असे म्हटले होते.  त्यावेळी यामध्ये तृतीयपंथीही होते.  रामाने नर-नारीना परत जाण्यास सांगितले म्हणून ते तिथेच वेशीवर रामाची वाट पाहत थांबले.

महाभारतात कुरुक्षेत्र युद्धात पांडवांचा विजय व्हावा म्हणून अरावनने त्याचे रक्त कालीमातेला दिले.  त्या बदल्यात कालीमाते त्याला विशेष शक्ती दिली होती.  युद्धाच्या आधी काही दिवसातच मी मरणार आहे म्हणून मारण्यापूर्वी माझं लग्न झालं पाहिजे हि इच्छा अरावनने व्यक्त केली.  अरावन काही तासातच मरणार आहे म्हणून कोणतीही स्त्री त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार झाली नाही.  तेव्हा कृष्णाने स्त्रीच रूप घेवून अरावनशी लग्न केल होत.

पांडवांना बारा वर्ष अज्ञातवासात राहायचे होते.  त्यावेळी अर्जुन स्वर्गात गेला होता. तेव्हा त्याची नजर उर्वशीवर पडली आणि तो उत्तेजित होऊन कामुक हावभाव करू लागला तेव्हा उर्वशीने त्याला किल्बा (हिजडा / तृतीयपंथी) होण्याचा शाप दिला.  या शापाबद्दल अर्जुनाने कृष्णाला सांगितले.  तेव्हा कृष्णाने अर्जुनाला यातून मुक्त होण्यासाठी आणि हि गोष्ट कोणाला कळू नये म्हणून विराट राजाच्या दरबारी ‘बृहन्नडे’ (नृत्य आणि गाणे हि कला जाणणारी स्त्री किंवा शिक्षिका )  म्हणून अज्ञातवास संपेपर्यंत राहिला.

महाभारतातील आणखी एक उल्लेख म्हणजे शिखंडीचा.  अंबा काशीच्या राजाची मुलगी. काशीच्या राजाला तीन मुली होत्या. अंबा, अंबिका आणि अंबालिका.  यातील अंबाचे सौबल देशाचा राजपुत्र सल्व याच्यावर प्रेम होते.  ज्यावेळी काशीचा राजा मुलीच्या स्वयंवर आयोजित करतो तेव्हा भीष्माचार्य यातिघींना त्यास्वयंवरातून  त्याचा सावत्र भाऊ विचित्रविर्य यांच्यासाठी लग्न करण्याकरिता उचलून आणतो.  हस्तिनापुरात आल्यावर अंबा भीष्माला तिच्या आणि सल्वच्या नात्याबद्दल सांगते.   आणि तुम्ही मला त्याच्याकडे जावू द्या.  त्याला मी मनोमन पती मानले आहे हे सांगते.  तेव्हा भीष्म तिला परत पाठवतो.  मात्र सल्व राजा अंबाचा स्वीकार करत नाही. कारण तिला परपुरुषाने तिला जिंकले आहे.  तेव्हा अंबा परत भिष्माकडे जाते आणि तू माझा स्वीकार कर म्हणून सांगते. तेव्हा भीष्म त्याने ब्रम्हाचार्यच व्रत घेतलं आहे.  त्यामुळे तुझा स्वीकार करू शकत नाही.  तेव्हा अंबा खूप रागात येते.  जंगलात जावून घोर ताप केले. महादेवाला प्रसन्न करून घेते. शिखंडीचा जन्म धृपदराजाच्या घरी होतो.  शिखंडीच्या रुपात जन्म घेऊन.  भीष्माचा मृत्यू होतो.

मध्यंतरीच्या काळात नॅशनल स्कूल ऑफ परर्फोर्मिंग आर्ट्स स्कूलने ‘शिखंडी’ नाटक तयार केल आहे.  फोएज जलाली यांनी हे नाटक लेखन आणि दिग्दर्शित केल आहे.  या नाटकातून शिखंडी एक तृतीयपंथी म्हणून त्याचे संगोपन कसे झाले असेल., सोबतच्या वयाच्या मुलांसोबत खेळतांना बागडताना कोणत्या अडचिनीतून जावे लागत असेल.   मुस्लीम राजवटीमध्ये जनानखाण्याच्या सुरक्षेसाठी हिजड्यांना ठेवले जाई. दरबारामध्ये स्त्रियांच्या सुरक्षेचा भाग म्हणून हिजड्यांची नियुक्ती केली जाई.

मुस्लीम राजवटीत / धर्मात हिजड्यांचे स्थान : मुस्लीम धर्मात हिजड्यांना स्थान आहे.  मुस्लीम राजवटीमध्ये जनानखान्याच्या सुरक्षेसाठी हिजड्यांना ठेवले जाई. तसेच दरबारामध्ये स्त्रियांच्या सुरक्षेसाठी हिजड्यांना अंत:पुरांचे विश्वासू रक्षक म्हणून खूप मानाचे स्थान होते.   तसेच मोहरममधील तिज्जा ही प्रथा हिजड्यांसाठी खूप महत्वाची आहे.  त्याचप्रमाणे अजमेरमधील बाबा चिश्ती दर्ग्यातील उरूस खूप महत्वाचा आहे.  या ठिकाणी हिजड्यांना फार मान असतो.  काही ज्येष्ठ हिजड्यांना ‘सराय ख्वाजा’हा किताब मिळालेला असतो . सराय ख्वाजा म्हणजे अल्लाहच्या रस्त्यावर चालणारे.   बहुतांश हिजडे दरवर्षी या उरुसात सहभागी होतात.

लैंगिक वर्तनावर आधारित ओळख

समलैंगिक संबंध ठेवणारे (होमोसेक्शुअल ):

होमोसेक्शुअल म्हणजे असे पुरुष ज्यांना पुरुषांचेच आकर्षण वाटते आणि पुरुषांकडून त्यांना लैंगिक सुख मिळते.  समलैंगिकता ही फार व्यक्तिगत बाब आहे.  स्वत:ची ओळख हा संपूर्णपणे वैयक्तिक निवडीचा प्रश्न असून त्याचा त्या व्यक्तीच्या लैगिक वर्तनाशी काहीच किंवा फार थोडा संबध असतो.  दुसऱ्या पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवणारे भरात असेही अनेक पुरुष आहेत कि जे जाहीररित्या स्वत:ची होमोसेक्शुअल अशी ओळख करून देत नाहीत.

प्रत्येक व्यक्तीची लैंगिकता लैंगिक आकर्षणाच्या संपूर्ण पटावर कुठेतरी आढळते.  एकूण लोकसंख्येच्या फक्त १०% लोकांना भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण असते असा एक अंदाज आहे. दुसऱ्या १०% लोकांना फक्त समलिंगी लोकांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते.  आणि बाकीचे सगळे ८०% या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतात.  समाजाच्या प्रबळ दबावामुळे आईवडिलांच्या, समवयाच्या मित्रमैत्रिणीच्या अपेक्षामुळे या मधल्या ८०% लोकांपैकी बरेच जन (आणि १० % समलैगिक संबंध ठेवू इच्छिणाऱ्यापैकी देखील खुपजण  ) भिन्नलिंगी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या जीवनशैलीची निवड करतात.

पुरुष आणि स्त्रिया दोघेही समलैंगिक संबंध ठेवणारे असू शकतात आणि असतातही.  यातले पुरुष अधिक चटकन लक्षात येतात कारण समाजाकडून एकूणच पुरुषांना त्यांच्या लैंगिक वर्तनाच्या / इच्छाबद्दल अधिक मोकळीक दिली जाते.

समलैंगिकता एक मानवी वास्तवता असून तिचा कुठल्याही देशाचा नागरिकत्वाशी काही संबंध नाही.  आपल्याला असे म्हणता येईल की भारतात तरी हजारो वर्षापासून समलैंगिक संबंध अस्तित्वात होते आणि कामसूत्रासारख्या प्राचीन ग्रंथात त्यांची स्पष्ट व थेट वर्णने आपल्याला वाचायला मिळतात.  खजुराहो आणि इतरत्रच्या शिल्पांमध्ये सम लैंगिकतेचे अविष्कार आपल्याला पाहायला मिळतात. हिजडे किंव अतारून मुलांचे जनानखाने दरबारी ठेवण्याची परंपरा तर किमान १५०० वर्षाची जुनी असावी असे ऐतिहासिक कागदपत्रावरून समजून येते.

पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही या प्रकारचे सम लैंगिक आकर्षण वाटू शकते.  आयुष्यात वेगवेगळ्या वेळी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या माणसांविषयी आकर्षण वाटू शकते.  बहुसंख्य लोकांना हा अनुभव येतो कि आयुष्यात कधीतरी त्यांना समलैंगिकांबद्दल थोडेतरी आकर्षण वाटले.  यात काहीही गैर नाही.

‘गे’ (समलिंगी पुरुष)

समलैंगिक संबंध ठेवणाऱ्या लोकांच्या अधिकारांसाठी होणाऱ्या चळवळीत सहभागी होणारे होमोसेक्शुअल लोक स्वत:ला ‘गे’ म्हणवून घेतात आणि ‘गे’ चळवळीसाठी आपण काम करतो अशी स्वत:ची ओळख करून देतात.

हिजडा (Eunchs)-

पौगंडावस्था यायच्या आधी ज्याची वृषणे काढून टाकली आहेत अशा पुरुषाला हिजडा म्हणतात.  हे केल्यामुळे इतर लैंगिक वैशिष्टये विकसित होत नाहीत.  पुरुषी संप्रेरकांच्या अभावे बायकी आवाज, चेहऱ्यावर दाढी-मिशा न येणे असे काही परिणाम निर्माण होऊ शकतात.

मध्यपूर्व आणि काही आशिया खंडातील देशात जानानखाण्यावर पहारा ठेवण्यासाठी हिजड्यांची नेमणूक होत असे. पुरुषी संप्रेरकांच्या संपूर्ण अभावामुळे हे हिजडेपण उद्भवते.  शरीरातल्या अवयवाच्या आकारात घात होण्यामुळे किंवा एखादा अवयव वाया जाण्यामुळे किंवा वृषणे काढून टाकल्यामुळे हे घडत असावे.  या माणसात नेहमीची पुरुषी वैशिष्ट्ये विकसित होतच नाहीत.   उदा. पुरुषी आवाज, पुरुषी केसांची वाढ, हिजडे स्वत:ची ओळख स्त्रिया म्हणून स्वीकारत असल्यामुळे ते महिलांचे कपडे घालतात आणि तसेच वागतात.  त्यांना बायकी कपडे आणि दागिन्यांबद्दल आकर्षण असते.  गडद रंगाचे कपडे ते वापरतात आणि भरपूर मेकअप करतात.

आजही भारतीय समाजात हिजड्यांना स्वीकारण्याचे प्रमाण फार कमी आहे.  त्यांमुळे त्यांना कुठले काम मिळत नाही. परिणामी ते बाजार मागून पैसा गोळा करतात.

पुरुषांबरोबर संभोग करणारे सर्वच पुरुष स्वत:ला होमोसेक्शुअल किंवा गे म्हणवून घेत नाहीत.  यातले काही जण विवाहितही असतात.

कोती   

स्वत:ला कोती म्हणून घेणाऱ्या व्यक्तीचे वर्तन ‘बाई’ सारखे असते.  शरीर संबंधासाठी ते विशीष्ट हावभाव करून ‘पंथी’ पुरुषांना आकृष्ट करून घेतात.

पंथी

साधारणत: संभोग करतांना हे लिंग घालणारे असतात.  (कोतीच्या तुलनेत अधिक पुरुषी भूमिकेत असतात. ) यातल्या बहुसंख्य पुरुषांना  ‘होमोसेक्शुअल’ किंवा  ‘गे’ अशी लैंगिक ओळख नसते.  सर्वसाधारणत: उत्सर्जन करण्यासाठी काही सबब शोधणारे हे पुरुष असतात.  जोडीदाराच्या लैंगिक ओळखीबद्दल हे तुलनात्मक निर्विकार असतात.

तृतीयपंथी  आणि त्यांच्या समस्या

नालसा निकालपत्राने तृतीयपंथी समाजाला राज्यघटनेने बहाल केलेले सर्व अधिकार मिळण्याचा हक्क आहे असा निकाल दिला. त्याच्या कल्याणासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा  तृतीयपंथीना दिल्या पाहिजे असे म्हटले आहे. तरीही  तृतीयपंथी व्यक्ती अजूनही पुरेशा प्रमाणात  समाजाच्या मुख्यप्रवाहात येऊ शकला नाही.  त्याची लढाई त्यांच्या स्वत:, कुटुंबाशी आणि समाजाशी सुरूच आहे. वर्ष २०१४ मध्ये नालसा निकालपत्रातील तरतुदीनुसार  राज्यांनी तृतीयपंथीय कल्याण बोर्ड स्थापन करावे असे म्हटले होते.  या बोर्डाची स्थापना करणारे तेव्हा महाराष्ट्र हे  देशातील पहिले राज्य होते.  परंतु हे  कल्याण बोर्ड पुढे कार्यान्वित होऊ शकले नाही.  तसेच संजय निराधार योजनेचा लाभ तृतीयपंथी व्यक्तींना मिळावा अशी तरतूद केली आहे.  मात्र त्यातील योजनेतील तांत्रिक अडचणीमुळे हा लाभही वृध्द तृतीयपंथीया मिळत नाहीये.    याच अनुषंगाने तृतीयपंथी आणि त्याच्या समस्या काय आहेत याविषयी आम्ही हिजडे आम्ही माणूस या अभ्यासाच्या दरम्यान तृतीयपंथीयांनी त्याच्या समस्या मांडल्या या समस्यावर मांडणी करण्याच्या हा प्रयास…..

ओळखीचे द्वंद – तृतीयपंथी व्यक्तीच्या समस्या समजावून घेताना असे लक्षात आले कि, त्यांची ओळख हि समस्या आहे.  आपण ज्या शरीर रचनेत जन्माला आलो त्या  शरीर रचनेच्या  त्याविरुद्ध  आपल्या भावना आहेत असे जेव्हा व्यक्ती आपल्या कुटुंबियांना सांगते तेव्हापासून त्यांच्या ओळखीचे द्वंद सुरु होते.  ज्या कुटुंबात आपण जन्माला आलो त्यांनी आपल्याला एक पुरुष म्हणून ओळख दिली आहे.  मात्र आपल्यातील सगळ्या कृती, भावना ह्या स्त्रीसारख्या आहेत.  हे कुटुंबातील व्यक्ती समजून घेत नाही. परिणामी कुटुंबातून अनेक अडचणींना भेदभावाला सामोरे जावे लागते.    

कुटुंबातून होणारा भेदभाव – मुल वयात आल्या नंतर त्याला / तिला जेव्हा त्याच्या ‘स्व’ ची जाणीव होते, ओळख होते तेव्हा कुटुंबातील सदस्य त्यांना स्वीकारत नाही. त्यामुळे भावंडामध्ये भेदभाव केला जातो.  आपण वेगळे आहोत म्हणून सतत अपमानित करणे, मारहाण करणे, अघोरी उपचाराला सामोरे जाणे, बहुतांश वेळा मनोरुग्णालयात दाखल करणे अशा अत्याचाराला सामोरे जावे लागते.

शाळेतून होणारा भेदभाव – मुल जेव्हा शाळेतील मित्रासोबत  वावरताना, खेळतांना मुलीसारखे हावभाव करतात त्याप्रमाणे वागतात तेव्हा त्यांना शाळेतील मित्राकडून छळले जाते.  समवयस्क मुलांसोबत भांडणे होते.  अन्य मुले यांना चिडवतात. शारीरिक अत्याचार करतात तेव्हा मुल शाळेतून बेदखल होते.  काही वेळा मुल यासगळ्या अत्याचाराला त्रासून शिक्षण सोडून देते.  काही वेळेला मुल शाळेतील शिक्षकाकडून छळले जाते. परिणामी शिक्षण अर्थवट राहते.

 

कुटुंबातून जबरदस्ती हाकलून देणे – तृतीयपंथी व्यक्तीला कुटुंबात समजावून घेतले जात नाही.  जेव्हा मुल आपल्या कुटुंबियांना त्याच्या मनातील भावना व्यक्त करतो तेव्हा कुटुंबीय त्यांना स्वीकारत नाही.  त्यावर उपाय म्हणून त्यांना घरात कोंडून ठेवणे, मारहाण करणे, उपाशी ठेवणे, घरातील कामात जुंपणे असे उपाय केले जातात.  जेव्हा तृतीयपंथी ह्या सगळ्या गोष्टी करूनही आपल्या विचारांवर ठाम असते तेव्हा परिणामी त्यांना घरातून हाकलून दिले जाते.  घरातून हाकलून दिल्यामुळे यांना रस्त्यावर राहावे लागते.  त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

शारीरिक-मानसिक अत्याचार – तृतीयपंथीयांना कुटुंब आणि समाज अशा दोन्ही ठिकाणी स्वीकारले जात नाही. जेव्हा एखादी व्यक्ती ती तृतीयपंथी आहे हे जेव्हा लोकांना समजते तेव्हा त्यांना नाकारले जाते.  त्याच्यावर शारीरिक अत्याचार केले जातात.  सतत त्याच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने त्यांना बोलले जाते. त्याचे अस्तित्व समाजात नाकारले जाते.

जीवन जगण्याचा संघर्ष – तृतीयपंथीयांना  जेव्हा घरातून हाकलून दिले जातात तेव्हा त्याच्या पुढे जगण्याच कस हा प्रश्न उभा राहतो.  त्याचप्रमाणे रस्त्यावर एकटे राहताना अनेक प्रकारच्या त्रासातून त्यांना जावे लागते.  त्यातून त्याचे शारीरिक शोषण होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातून बलात्काराच्या घटनाचे बळी पडतात. मात्र त्याची दखल घेतली जात नाही.   समाजात त्यांना स्थान मिळत नाही त्यामुळे नकळतपणे ते वेश्याव्यवसायातून ढकलले जातात. 

तृतीयपंथीयांचे आरोग्य – तृतीयपंथीयांचे आरोग्य समस्या पाहताना त्याच्यामध्ये लैंगिक आजार आणि एचआयव्ही एड्सचे प्रमाण मोठे आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर समाजात एकटे जगत असताना त्यांना अनेक प्रकारच्या शोषणाला बळी पडावे लागते त्यातून त्याच्यावर अधिकतर वेळा शारीरिक अत्याचार होत असतात.  यातून त्याच्यामध्ये एचआयव्ही एड्स, लैंगिक संक्रमण आजाराचे प्रमाण मोठे आहे. तसेच आजारी असल्यावर जेव्हा रुग्णालयात जातात तेव्हा डॉक्टर  तपासणीसाठी तयार होत नाही.

तृतीयपंथीयाचे शोषण – तृतीयपंथी हे पूर्ण स्त्रीसदृश आयुष्य जगू  पाहतात, म्हणून त्याचे  जोडीदार त्यांना फसवत असतात.  त्यांना कळतही असतं, की आपण या  नात्यात फसवल्या जात आहेत, तरी  मानसिक आधार आणि शारीरिक गरजांपोटी फसत राहतात.  तृतीयपंथी समुदायाचे जोडीदार हे  बहुसंख्य पुरुषांमधले पुरुष असतात.  जे त्यांचा सोयीने तृतीयपंथीयाकडे येत असतात.  घर, समाज, ‘मूल पाहिजे’ असली कारणं देऊन त्यांना सहजपणे स्वत:पासून वेगळ करतात. शिक्षणाचा अभाव व कुटुंब सोडल्यामुळे आलेले एकटेपण कित्येक वेळा आत्महत्या करण्याचे कारण ठरते.  इतर वेळी, स्वातंत्र्याची आस घेऊन वेगळी वाट निवडणाऱ्या या घटकांना अस्तित्व, ओळख, आणि प्रेम या सगळ्याच पातळीवर शोषणाला सामोरे जावे लागते; पण ‘पुरुषी’ मानसिकतेमुळे नात्यांतर्गत होणारे शोषण त्यांनाही चुकत नाही.

शिक्षणाच्या संधीचा अभाव – मुल वयात आल्यानंतर जेव्हा त्याला लक्षात येते कि, आपण पुरुष म्हणून जन्माला आलो असलो तरी आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या भावना ह्या एका स्त्रीच्या आहेत.  मुल जेव्हा एका स्त्रीप्रमाणे वर्तन करू लागते.  त्यावेळी त्याला त्याचे मित्र, शाळेतील शिक्षक आणि कुटुंबीय यांच्याकडून तिरस्काराला सामोरे जावे लागते.  शाळेत याचे वर्तन पाहून अन्य मुल बिघडतील म्हणून त्याला शाळेतून काढून टाकले जाते.  परिणामी मुलाचे शिक्षण अर्धवट राहते.  काहीवेळा तृतीयपंथी आपली खरी ओळख लपवून आपले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तेव्हाही त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शाळा महाविद्यालयातील अन्य मुले त्याचे शारीरक शोषण करण्याच्या घटनाही त्याच्यासोबत घडत असतात.

अनैतिक मानवी वाहतुकीचे बळी – तृतीयपंथी असल्यामुळे व्यक्ती जेव्हा घर सोडावे लागते तेव्हा त्याच्यापुढे जगण्यासाठी काही पर्याय उरत नाही. त्यामुळे नकळतपणे ते वेश्याव्यवसायाकडे ढकलले जातात.  त्यातून त्याचे काहीवेळा अनैतिक मानवी वाहतुकीचे बळी पडतात.

सामाजिक सुरक्षेचा अभाव- तृतीयपंथी हे कुटुंबात स्वीकारले जात नाही. त्यामुळे घर सोडल्यानंतर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.  स्वत:चा उदरनिर्वाह चालविण्यासाठी बहुतांश तृतीयपंथी रस्त्यावर भीक मागून पैसे जमा करतात.  त्यातून आपला उदरनिर्वाह चालवितात. काहीवेळा रस्त्यावर, लोकलमध्ये फिरत असताना त्यांना समाजातील इतर लोक, पोलीस यांच्याकडून होणाऱ्या अपमानास्पद वागणूक, छळ, मारहाण याला बळी पडावे लागते. रस्त्यावर राहत असल्यामुळे जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्यात त्यांना संशयित म्हणून  पकडले जाते.  पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले जाते. परिणामी कोणताही कौटुंबिक आधार आणि सामाजिक सुरक्षा नसल्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या शोषणातून जावे लागते.

अन्न सुरक्षेचा अभाव – भारतात वर्ष २०१३ साली अन्न सुरक्षा कायदा अस्तित्वात आला. त्यानुसार समाजातील गरीब घटकांना अन्न सुरक्षेचा हक्क कायद्याने प्राप्त झाला आहे.   तृतीयपंथी समाजही गरीब घटकात मोडतो.  मात्र त्यांच्याकडे अन्न सुरक्षेचा हक्क मिळविण्यासाठी जे मुलभूत दस्तावेज गरजेचे आहेत ते नसल्यामुळे अन्न सुरक्षेचा हक्क त्यांना मिळू शकत नाही. याविषयी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायाशी बोलत असताना त्यांनी सांगितले कि, आम्ही एकूण ३२ जनी एकत्र राहतो.  आमच्या पैकी फक्त एकीकडे आधारकार्ड आहे ज्यावर टीजी म्हणजे तृतीयपंथी असा उल्लेख आहे.  एकीकडे रेशन कार्ड आहे.  त्या कार्डवर आम्हाला आजपर्यंत कधीही धान्य मिळाल नाही.

रोजगाराच्या संधीचा अभाव – तृतीयपंथी समुदायाला समाजात रोजगार नाकारला जातो. काही ठिकाणी मनरेगा योजनेत काम द्यावे असे म्हटले आहे.  मात्र प्रत्यक्षात ते मनरेगात काम मिळत नाही.  त्यासाठी तृतीयपंथी म्हणून ओळखपत्र नसल्यामुळे अडचणी येतात.  त्याचप्रमाणे आज अनेक तृतीयपंथी व्यक्तीकडे स्वत:चे कौशल्य आहे.  समाजात त्यांना समाविष्ट करून न घेतल्यामुळे त्यांना त्याच्या कौशल्याचा वापर रोजगार म्हणून करता येत नाही.  याविषयी बोलतांना तृतीयपंथी श्रेया सांगते कि, मी खूप छान चित्र काढते. मला चित्रकारच होण्याचे स्वप्न होते परंतु मी लिंगबदल केल्यामुळे मला माझ्या कॉलेजमध्ये स्वीकारलं गेल नाही.  परिणामी माझ शिक्षण अर्धवट सुटले.  अनिला  सांगत होती , मला लहानपणापासूनच चित्र काढायला आवडायचे. त्यातून मी  टॅटू आणि मेहंदी काढायला शिकले. त्यातून मी लग्नाच्या काळात चांगले पैसे कमावत होते.  जेव्हा मी लिंग बदलले हे लोकांना समजले तेव्हापासून माझ्याकडे कोणीच मेहंदी काढण्यासाठी येत नाही.  उलट माझी टिंगल उडवतात.  घरच्यांनी तर माझ्याशी कधीच संबंध तोडले आहेत.

पोलिसांकडून होणारा त्रास – घरातून बाहेर पडल्यामुळे अनेक तृतीयपंथीयांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. डोक्यावर छप्पर नसते त्यामुळे कोठेतरी आडोसा पाहून किंवा फुटपाथवर रात्रीचा निवारा शोधतात. जेव्हा कधी पोलिसांची रेड होते किंवा रस्त्यावर एखादा गुन्हा घडतो अशा वेळी संशयित म्हणून तृतीयपंथीयाकडे पाहिले जाते.  त्यातून त्याची चौकशी सुरु होते.  अनेक वेळा पोलीस स्टेशनला बोलावले जाते.  शारीरिक मानसिक त्रास दिला जातो.

तृतीयपंथीयावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली जात नाही– तृतीयपंथी म्हणून जगत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.  समाजातील लोकांकडून त्याची फसवणूक होते. बहुतांश वेळा त्याच्यावर लैंगिक अत्याचार होतात.  अशा वेळी तृतीयपंथी आपली तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले तर त्याची तक्रार नोंदवली जात नाही.   उत्तर प्रदेशमधील एक तृतीयपंथी प्रेमप्रकरणातून फसवली गेली.  तिच्या मित्राचे तिचे शारीरिक शोषण करून तिच्या जवळील सगळे पैसे घेऊन पळून गेला.  ती जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यासाठी गेली. त्यावेळी तिची तक्रारच नोंदवून घेतली गेली नाही.  तिने सांगितले कि, त्या पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलने तिची तक्रार नोंदवली तर नाही उलट तिला ‘किन्नरोसे कोन प्यार करेंगा’ असे म्हणून अपमानित केले.

उत्तर लिहिले · 16/5/2018
कर्म · 20065
0

छक्का हा शब्द भारतीय उपखंडात किन्नर किंवा तृतीयपंथी व्यक्तींसाठी वापरला जातो.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हा शब्द काहीवेळा अपमानजनक मानला जातो.

या ऐवजी 'तृतीयपंथी' किंवा 'किन्नर' असे शब्द वापरणे अधिक योग्य आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 980

Related Questions

आधुनिक समाजात पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत का?
जात आणि वर्ग?
सामाजिक वैशिष्ट्ये काय आहेत?
कुटुंब सामाजिक करण्याचे साधन आहे का?
दलित शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो?
पुरुषाला बघून स्त्री आपला पदर का सावरत असते?
निसर्ग नियमानुसार लग्न करणे योग्य आहे का?