व्यक्तिमत्व इतिहास

रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई या दोन नावाच्या व्यक्ती एकच आहेत की वेगवेगळ्या?

2 उत्तरे
2 answers

रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई या दोन नावाच्या व्यक्ती एकच आहेत की वेगवेगळ्या?

5
➡️1⃣ रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या.रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी साताराजिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्‍नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.

न्यायमूर्ती रानड्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन रमाबाई स्त्रीसमाज सुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या. त्यांनी आपले आयुष्य समाज चळवळीसाठी वाहून घेतले. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी 'हिंदू लेडीज सोशल क्लब'ची मुंबईमध्येस्थापना केली. पुण्यातील 'सेवा सदन' या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुण्यात मुलींसाठी 'हुजुरपागा' शाळेची स्थापना केली. त्यांनी आपला जीवनपट 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे. [१]

इ.स. १९०१ मध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या मृत्यूनंतर त्यांनी आपले जीवन पूर्णपणे राष्ट्र्कार्याला अर्पण केले. त्या सतत पुण्याच्या येरवडा येथील मानसिक रुग्णालयाला आणि मध्यवर्ती तुरुंगाला स्वेच्छेने भेट देऊ लागल्या. स्त्री कैद्यांच्या सामुदायिक प्रार्थना सभांना हजर राहून त्यांचे मनोबळ वाढवून जीवनाचा एक नवीन मार्ग दाखवण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला. मनोरुग्णांच्या इस्पितळाच्या कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थित राहून रुग्णालयाच्या समस्यांकडे त्या लक्ष देत असत. याशिवाय, रमाबाई सामाजिक बांधिलकी म्हणून अन्य रुग्णालयांनाही भेट देत, रुग्णांची आपुलकीने चौकशी करत व त्यांच्यासाठी फळे, फुले आणि पुस्तके घेऊन जात असत. रमाबाई बालसुधारगृहांना भेट देऊन मुलांशी गप्पा मारत आणि सणासुदीच्या दिवशी खाऊ आणि मिठाई वाटत असत.

रमाबाईंची दानशूर वृत्ती भौगोलिक सीमा जुमानणारी नव्हती, त्यांनी इ.स. १९१३ मध्ये गुजरात आणि काठेवाड येथील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन दुष्काळपीडितांना मदत केली. आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षांमध्ये त्या आपल्या सेवा सदनच्या कार्यकर्त्यांसोबत आषाढी आणि कार्तिकी वारीच्या वेळी आळंदीला जात असत. तेथे सेवा सदनच्या कार्यकर्त्या वारीला आलेल्या स्त्री वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करीत असत. त्यांच्या अशा सामाजिक कार्यांतून समाजसेवेच्या कार्यांत एकूणच स्त्रियांचा सहभाग वाढत गेला. इ.स. १९०४ मध्ये जेव्हा रामकृष्ण गोपाळ भांडारकर, श्री. भाजेकर आणि सामजिक चळवळीतील नेत्यांनी अखिल भारतीय महिला परिषद आयोजित करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी रमाबाईंकडे या कार्याची सूत्रे सपूर्द केली. रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेचे पहिले अधिवेशन डिसेंबर इ.स. १९०४ रोजी मुंबईयेथे भरले होते.

इ.स. १९०८ मध्ये श्री. बी.एम. मलबारी आणि श्री. दयाराम गिडुमल हे, रमाबाईंकडे स्त्रियांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन समाजात रुग्णसेविका निर्माण करण्याची कल्पना घेऊन आले. त्यातूनच मग रमाबाईंच्या मार्गदर्शनाखाली सेवा सदन, मुंबईची स्थापना झाली. इ.स. १९१५ साली, सेवा सदन, पुणे उदयास आली आणि मग अनेक शाखांमार्फत संस्था विस्तारत गेली. मुलींचे प्रशिक्षण केंद्र, तीन वसतीगृहे असे अनेक उपक्रम सेवा सदनमार्फत राबवले गेले.

इ.स. १९२४ मध्ये, रमाबाईंच्या मृत्यूसमयी पुण्याच्या सेवा सदनमधील विविध उपक्रमांमध्ये १०००हून अधिक महिला प्रशिक्षण घेत होत्या. सेवा सदनचा झपाट्याने झालेला विस्तार आणि प्रसार हा रमाबाईंच्या ध्यासाचेच द्योतक आहे. समाजातील रूढ समजुतींच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन समाजाचे मतपरिवर्तन करून सेवेचे अखंडित व्रत सुरू ठेवण्यातच रमाबाईंच्या जीवनाची इतिकर्तव्यता होती. रमाबाईंच्या आयुष्यातील अजून दोन अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे, स्त्रियांसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची मागणी करण्यासाठी केलेले आंदोलन आणि इ.स. १९२१-२२ मध्ये मुंबई प्रांतात स्थापन केलेली पीडित महिलांची संघटना. रमाबाईंच्या समाजातील अतुलनीय कामगिरीची दखल खुद्द महात्मा गांधीनी घेतली. गांधीनी लिहिलेल्या शोकसंदेशाचा मजकूर : "रमाबाई रानडे यांचा मृत्यू ही राष्ट्राची मोठी हानी आहे. हिंदू विधवांसाठी रमाबाई या मोठा आधारस्तंभ होत्या. त्यांच्या नामांकित पतीच्या सामाजिक चळवळीत एका सच्च्या सहधर्मचारिणीप्रमाणेच त्या नेहमी वागल्या. पतीच्या निधनानंतर त्यांनी सामाजिक चळवळीलाच आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले. न्यायमूर्ती रानडे हे एक क्रांतिकारी विचारवंत आणि भारतीय स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेची कळकळ असणारे असे होते. ते त्यासाठी सतत झटत राहिले. रमाबाईंनी सेवा सदनमध्ये आपले आयुष्य ओतले. मनापासून आपल्या सर्व शक्तीनिशी त्यांनी सेवा सदन उभे केले. सेवा सदन ही संपूर्ण भारतातील या धर्तीची एकमेव संघटना आहे." भारतीय डाक आणि तार विभागाने रमाबाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याच्या गौरवाप्रीत्ययर्थ खास पोस्टाचे तिकीट काढले होते.

➡️2⃣ पंडिता रमाबाई सरस्वती (२३ एप्रिल, इ.स. १८५८ - ५ एप्रिल, इ.स. १९२२) या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या.पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई 17-18 वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.

अनंतशास्त्री डोंगरेंना कदाचित माहीतही नसेल, की ज्या मुलीला आपण संस्कृत शिकवले, काळाच्या पुढे जाऊन 'उदारमतवादी' विचारसरणीची हवा चाखायला देतोय, ती मुलगी पुढे जाऊन इतिहासाच्या पानात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवेल. पण ते घडले.

दीडशे वर्षांपूर्वीचा समाज अज्ञान, पारंपरिक विचारसरणीच्या अंधकारात अडकला होता. मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्र्यांनी मुलीला संस्कृत शिकवले. त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. फक्त शिक्षण देऊन थांबवले नाही, तर मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला. रमाबाईंवरचा हा उदारमतवादी पिता मात्र जास्त काळ जगू शकला नाही. रमाबाई सोळा वर्षाच्या असतानाच अनंतशास्त्री वारले. त्यांची पत्नीही गेली. रमाबाई आणि त्यांच्या भावाला आता कुणीही नव्हते.

पण पित्याने दिलेल्या संस्कृताच्या शिदोरीच्या जोरावर रमाबाई उत्तर दिग्विजयाला निघाल्या. त्या काळात त्या भारतभर हिंडल्या. आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी अनेकांना चकीत केले. कोलकत्याला तर प्रचंड मोठा समुदाय त्यांना ऐकण्यासाठी आला होता. इथेच त्यांना 'सरस्वती' आणि नंतर त्यांच्या नावाचा अविभाज्य भाग झालेली 'पंडिता' ही पदवी मिळाली. रमाबाईंच्या विद्वत्तेला लोकमान्यता मिळाली.

मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई या त्या काळातील एकमेव महिला होत.

▶️विवाह आणि समाजकार्य-

इ.स. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. हा त्या काळातील क्रांतिकारी असा विवाह होता. कारण पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते. पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने इ.स. १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. बालविवाह, पुनर्विवाहासबंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर,सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. इ.स. १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या. तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृतशिकवले. १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या. भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्‌सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले.

१८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामत: २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.

११ मार्च, इ.स. १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. इ.स. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले. २४ सप्टेंबर, इ.स. १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. इ.स. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व इ.स. १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला.

आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. ’मुक्तिसदना' त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या मदतीने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली.

आपल्या या प्रवासात रमाबाईंना देशभरातील स्त्रियांच्या हलाखीच्या परिस्थितीची कल्पनाही आली. उच्च जाती पुढारल्याचा दावा करीत असल्या तरी त्यातील स्त्रियांचे मागासलेपण किती आहे, हेही त्यांना अस्वस्थ करत होते. रमाबाईंच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले असे वाटत असतानाच त्यांच्या पतीचे निधन झाले. आणि हिंदू समाजातील विधवेला काय काय सहन करावे लागते, याचा अनुभव त्यांना आला. केशवपनापासून अनेक प्रथा हिंदू समाजातील उच्च जातीच्या स्त्रियांना पाळाव्या लागत. रमाबाईंना हे सारे सहन होईना.

याच काळात त्यांनी वंचित, पीडित स्त्रियांसाठी काम करणे सुरू केले होते. या सगळ्या परिस्थितीत रमाबाईंनी पुण्यात विधवा आणि अनाथ महिलांसाठी आश्रम काढला. नंतर मुंबईतही तो सुरू केला. या केंद्रांत महिलांना मूलभूत शिक्षण देण्यात येई. शिवाय समाजात रहाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्यात येई. अल्पावधीतच रमाबाई वंचित, पीडित महिलांच्या जणू वकीलच बनून गेल्या.

त्यांच्या या समाजकार्यातच त्यांचा ख्रिस्ती मिशनऱ्यांशी संबंध आला. त्यांच्या मदतीने १८८३ मध्ये रमाबाईंना इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर तेथील स्त्रियांची स्थिती त्यांनी पाहिली. हिंदू रूढीवादी मानसिकतेत स्त्रियांचा होत असलेला संकोच त्यांना प्रकर्षाने जाणवला. त्यावर आधारीत त्यांनी उच्च जातीतील हिंदू स्त्रिया नावाचे पुस्तकही लिहिले. त्याचा अनुवाद इंग्रजीत होऊन त्याचा प्रसार इंग्लंड-अमेरिकेत झाला. त्याचवेळी त्यांनी बायबलचाही अभ्यास सुरू केला. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी ख्रिश्चन धर्म अंगीकारला.

त्यांच्या धर्मांतराने तत्कालीन सनातनी समाजात मोठी खळबळ उडाली. टीकेचा भडिमार झाला. पण रमाबाईंनी आपल्या धर्मांतराचे समर्थन केले. धर्मांतर करणे म्हणजे भारतीय संस्कृतीशी आणि तिच्या मुळांशी जोडलेली नाळ तोडणे नव्हे, असे त्यांनी परोपरी समजावून सांगितले. पण तरीही त्यांच्यावर व्हायची टीका ती झालीच.

इंग्लंडहून परतल्यानंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. कुमारी मातांसाठी केंद्र, स्त्री सहाय्यता केंद्र, गरीब मुलींसाठी शाळा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. मुंबईत शारदासदन आणि केडगावला मुक्तीमिशन या त्यांच्या संस्था. एकीकडे त्यांच्या समाजसुधारणेचे आयाम विस्तारत असताना त्यांनी ज्या ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला, त्या धर्माचे लोकही त्यांच्यावर टीका करायला लागले. त्याचे कारण वेगळेच होते. रमाबाई ख्रिश्चन धर्मात आल्या तरी त्या ज्यांच्यासाठी काम करत होत्या, त्या महिलांनी ख्रिश्चन धर्मात यावे यासाठी त्या काहीही करत नव्हत्या. त्यामुळे रमाबाईंचे धर्मांतरण हे दांभिक आहे, अशी टीका करण्यास त्यांनी सुरवात केली. रमाबाईंनी बिशप वगैरे परंपराही नाकारली. त्यामुळे त्यांचा अधिकच भडका उडाला. त्यावर रमाबाईंचे म्हणणे स्पष्ट होते. मी ख्रिस्ताच्या चर्चची खरी भाविक आहे. पण बिशप किंवा ख्रिस्ती पुजाऱ्याच्या तोंडून येणाऱ्या प्रत्येक शब्दाचे पालन करण्यास मी बांधील नाही. कारण हिंदू संस्कृतीतील भिक्षुक पुरोहित संस्कृतीतून स्वतःला मी सोडवून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या भिक्षुक संस्कृतीत स्वतःला अडकविण्याची माझी इच्छा नाही.

महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर इ.स. १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.

अशा या थोर विदुषीला इ.स. १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले. ‘कैसर-ए-हिंद’ हे सुवर्णपदक होते. पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढण्यात आले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व कार्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे इ.स. १९२२ मध्ये केडगावयेथे निधन झाले.

उत्तर लिहिले · 8/12/2017
कर्म · 5555
0

रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. दोघींनीही आपापल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

रमाबाई रानडे:
  • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी.
  • त्या समाजसेविका आणि महिलांच्या हक्कांसाठी लढल्या.
  • त्यांनी 'सेवासदन' संस्थेची स्थापना केली, जी महिलांच्या शिक्षण आणि विकासासाठी समर्पित आहे. [अधिक माहितीसाठी]
पंडिता रमाबाई:
  • त्या एक विदुषी, समाजसुधारक आणि ख्रिश्चन धर्मप्रचारक होत्या.
  • त्यांनी विधवा आणि निराश्रित महिलांसाठी 'मुक्ति सदन' संस्थेची स्थापना केली. [अधिक माहितीसाठी]
  • त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी खूप महत्त्वपूर्ण कार्य केले.
उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 1040

Related Questions

बाबासाहेब आंबेडकर माहिती?
गौतम बुद्ध यांच्याबद्दल माहिती द्या?
मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?