3 उत्तरे
3 answers

शिवाजी महाराजांची आग्रा भेट?

7
आग्रा भेटीचे मूळ मिर्झा राजा जयसिंग यांच्या स्वारीत व पुरंदरच्या तहात आहे. या तहाने महाराजांच्या राजकीय व लष्करी प्रतिष्ठेचे खच्चीकरण झाले. त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण कालखंड होता. त्यांना मिर्झा राजाने काढलेल्याविजापूरच्या स्वारीत सामील व्हावे लागले होते. या मोहिमेतच दिलेरखान त्यांच्या जीवावर उठला होता, पण मिर्झा राजाच्या गुप्त मसलतीने ते मोगली छावणीतून निसटून स्वराज्यात आले.विजापूरच्या स्वारीतच मिर्झा राजाशी महाराजांची जवळीक निर्माण झाली. त्यातूनच आग्रा भेटीचे परिणाम स्वरूप फलित निर्माण झाले असावे. तुम्हास दक्षिणेचीसरसुभेदारी बादशहाकडून मिळवून देतो, असे आश्वासन मिर्झा राजाने त्यांना दिले असले पाहिजे. खरोखरच तसे झाले असते तर तमाम दक्षिण आपल्या ताब्यात आणण्याची किल्लीच त्यांच्या हाती येणार होती. मिर्झा राजाच्या शब्दावर महाराजांचा विश्वास बसला होता. त्यांच्या शब्दाला मोगल दरबारात किती प्रतिष्ठा आहे, हे महाराजांनी प्रत्यक्ष पाहिले होते. असा मोगलांचा सर्वश्रेष्ठ सरदार आपल्याला बादशहाभेटीचा आग्रह करत असेल, तर ती एक सुवर्णसंधीचआहे, असे त्यांना वाटले असण्याची शक्यता आहे.अर्थात हा सुद्धा एक तर्क आहे, पण तो ऐतिहासिक सत्याच्या अधिक जवळ जाणारा आहे. हा तर्क जर आपण स्वीकारला तरी महाराजांनी आपला एकुलता एक पुत्र स्वराज्याचा वारसदार युवराज संभाजीराजे यांना आग्रा भेटीत आपल्याबरोबर का न्यावे? एवढा दूरदर्शी व अखंड सावधान असणार्या राजाने औरंगजेबसारख्या दगाबाज शत्रूच्या शब्दांवर कसा काय विश्वास ठेवला असावा? संभाजीराजास समवेत नेण्यात आपण केवढा मोठा धोका पत्करत आहोत, याचा त्यांनी काहीच विचार केला नसेल का? मग एवढा मोठा धोका त्यांनी का पत्करला? इतिहासकारांकडे याचे उत्तर नाही. हे गूढ फक्त महाराजांनाच माहीत होते!राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन महाराज राजगडाहून निघाले. शृंगारलेले हत्ती, घोडे, सोन्याच्या पालख्या पुढे हत्तीवर डौलाने फडकणारा भगवा झेंडा अशा राजाला शोभेल असा वैभवी लवाजम्यासह ते प्रवास करत होते. मार्गातील प्रवासात त्यांची बडदास्त शहाजाद्याप्रमाणे ठेवावी, असे मिर्झा राजाचे हुकूमहोते. त्यामुळे आग्य्रापर्यंतचाप्रवास सुखनैव झाला. मार्गातच खुद्द औरंगजेबाचे दिलासा देणारे फर्मान आले. त्यामुळे योजिलेल्या कार्यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास महाराजांना आला.पण असे घडणार नव्हते. आग्य्राजवळच्या मुलूकचंद सराईत महाराजांचा शेवटचा मुक्काम असताना त्यांचे स्वागत एखाद्या बादशाही उमरावांकडून व्हावे असा राजनैतिक संकेत असतानाही रामसिंगाच्या एका सामान्यमुन्शीकडून ते झाले; इथेच त्यांच्या मनात धोक्याची पाल चुकचुकली. पुढचा वृत्तांत इतिहासप्रेमी वाचकांना ज्ञात आहेच. तो समग्र देण्यास इथे अवकाश नाही, पण एवढे मात्र नमूद करावयास हवे की, औरंगजेब बादशहाच्या भर दरबारात या मराठा राजाने आपल्या अस्मितेचे जे तेजस्वी दर्शन घडविले, त्यामुळे मोगल दरबारच नव्हे सर्व हिंदुस्थान थरारून गेला. स्वतःलास्वाभिमानी व शूर समजणार्या रजपूतांचेही डोळे या अभूतपूर्व प्रसंगाने दिपून गेले!शेवटी आग्रा भेटीची परिणती महाराजांच्या नजरकैदेत झाली. मराठ्यांच्या या राजाचे काय करावे, या विचारात बादशहा काही दिवस होता आणि शेवटी महाराजांचा निकाल लावण्याचा त्याने निर्णय घेतला. तेव्हा मिर्झा राजाचा पुत्र रामसिंग मध्ये पडला. आपल्या पित्याच्या शब्दावर विसंबून शिवाजी महाराज इथं आले असून त्यांच्या जिवाची हमी मी दिली आहे, असेत्याने बादशहाला सांगितले. मारणारच असाल तर प्रथम मला ठार करा, असे त्याने निक्षून सांगितल्यावर बादशहाने त्याच्याकडून जामीन घेऊन आपला निर्णय दक्षिणेतून मिर्झा राजाचा निरोप येईपर्यंत तहकूब ठेवला.पण ‘शिवाजी’ हे प्रकरण बादशहास स्वस्थ बसू देतनव्हते. लवकरच त्याने महाराजांना सोबत घेऊन काबूलच्या मोहिमेवर जाण्याचा रामसिंगास हुकूम केला. आग्य्राचा क्रूरकर्मा किल्लेदार रणअंदाजखान यास आघाडीवर तैनात केले. मार्गात महाराजांचा निकाल लावण्याची कामगिरी त्याच्यावर सोपविली गेली. तथापि,महाराजांनी वजीर जाफरखानाला अत्यंत किमती भेट देऊन बादशहाचा हा हुकूम रद्द करवून घेतला. असे झाले तरी बादशहाच्या डोक्यातील महाराजांना ठार मारण्याचे विचार रद्द झाले नव्हते. दरम्यान, महाराजांच्या अर्जी बादशहाकडे जात होत्या. त्यास बादशहा उत्तर देत होता, पण सुटकेविषयी काहीच बोलत नव्हता. शेवटी महाराजांनी ही कोंडी फोडण्याचे ठरविले. प्रथम त्यांनी रामसिंगाने दिलेला जामीन रद्द करवून घेतला.आपल्याबरोबर आलेल्या नोकर- चाकर, सैनिक यांना बादशाही दस्तके देऊन महाराष्ट्राकडे रवाना केले आणि मग ते आजारी पडले. या आजारातून लवकर बरे व्हावे म्हणून साधुसंतांकडे, दर्ग्याकडे मिठाई-फळांचे पेटारे रवाना करू लागले.बादशहाने महाराजांच्या निवासस्थानावरचेपहारे कडक केले होते. बाहेर पडण्यास मज्जाव केला गेला. फौलादखान नावाचा अधिकारी या बंदोबस्ताचा प्रमुख होता. डोळ्यात तेल घालून तो सुरक्षा यंत्रणेवर नजर ठेवून होता. रामसिंगाची माणसेही महाराजांच्या जिवास अपाय होऊ नये म्हणून आतील बाजूस पहारा देत होती. महाराजांवरही नजर ठेवून होती.१८ ऑगस्ट १६६६ चा दिवस. बादशहा दरबारात बसला असतानाच फौलादखान धावत आला आणि कुर्निसात करून बोलला, ‘राजा कोठडीत होता. वरचेवर जाऊन पहात असता एकाएकी गइब (गायब) जाहाला, पळाला किंवा जमिनीमध्ये घुसला की अस्मानमध्ये गेला न कळे! आम्ही जवळच आहो. देखत देखत नाहीसा जाला. काय हुन्नर जाहाला न कळे!’ बादशहाची मनःस्थिती काय झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो. चौतर्फा अष्टदिशेला त्याने सैन्य रवाना केले. रामसिंगावर खप्पा मर्जी झाली. त्याला दरबारलायायला मना केले गेले!महाराज आदल्या दिवशीच म्हणजे १७ ऑगस्ट रोजी कैदेतूननिसटले होते! इतक्या कडक पहार्यातून महाराज कसे बाहेर पडले, हेच कोणाला उमजत नव्हते. बराच विचार केल्यावर काही अधिकार्यांनी शोध लावला. महाराज नेहमी किल्ल्याच्या आत-बाहेर जाणार्या पेटार्यांतून पळाले! राजस्थानी पत्रात हे नमूद केलेगेले आहे. सभासद बखर, जेधे शकावली, खाफीखान, सुरतकर इंग्रज यांनी या कथेस दुजोरा दिला आहे. पण सुप्रसिद्ध इतिहासकार पं. सेतुमाधवराव पगडी यांना हे मान्य नाही. महाराजांनी सुटकेसाठी पेटार्यांची जरूर उपाययोजना केली असेल; पण त्यांच्यासारखा मानी पुरुष असहाय्य बनून पेटार्यात बसला असेल असे वाटत नाही; पेटारे वाहणार्या नोकराचा वेश घेऊन ते बाहेर पडले असावेत, असे त्यांनी म्हटले आहे. हे मतही विचारात घेण्यासारखे आहे. महाराजांचा परतीचा प्रवास हे एक तिसरे गूढ आहे. समकालीन राजस्थानी पत्रात महाराज २५ दिवसांनी राजगडास पोहोचले असे नमूद केले आहे. अनेक इतिहासकारांनी महाराजांचा हा प्रवास आग्रा- मथुरा- अलाहाबाद- वाराणसी- गया- गोवळकोंडा- बिदर- गुलबर्गा- पंढरपूर- फलटण- राजगड असा दिला आहे. या मार्गानी हे अंतर १५०० -१७०० मैलांचे पडते आणि त्या काळातील रस्त्यांची अवस्था लक्षात घेतली तर हे अंतर अवघ्या २५ दिवसांत पार करणे केवळ अवघड होते. या पार्श्वभूमीवर महाराज मथुरेहून सरळ दक्षिणेकडे 1 हजार मैलांचे अंतर २५ दिवसांत कापून राजगडास पोहोचले असावेत, असा तर्क शिवचरित्रकार मेहेंदळे यांनी केला आहे, त्याचाही विचार करायला हवा. आजमितीस परतीच्या प्रवासाचा मार्ग निश्चितपणे सांगणारा कोणताही पुरावा आपल्या हाती नाही आहे. तेव्हा तर्कावरच अवलंबून रहावे लागते.आग्य्राच्या मुक्कामात आपल्या बरोबरचा नोकर-चाकरांचा लवाजमा महाराजांनी संमतीने दक्षिणेत पाठविला होता. त्यावेळी त्यांना लागणारे दस्तके (प्रवास परवाने) मिळाली होती, त्यातील काही दस्तकांचा उपयोग महाराजांना आपल्या प्रवासात झाला होता. शेवटी आग्रा भेट व आग्य्राहून सुटका या घटनांचे फलित काय? औरंगजेब बादशहाच्या बाजूने त्याच्या बलाढ्य सार्वभौम साम्राज्य सत्तेच्या प्रतिष्ठेला तडा गेला, पण सर्वात मोठी अप्रतिष्ठा वमानहानी झाली ती मिर्झा राजा जयसिंगाची. बादशहाचा वहीम रामसिंगावर होताच. त्याच्याच मदतीने शिवाजी महाराज निसटले, असे त्याला वाटत होते. मिर्झा राजाही त्याच्या मर्जीतून पूर्ण उतरला. केवढ्या उमेदीने व आत्मविश्वासानेतो दक्षिणेत उतरला होता! आता तो पूर्णपणे खचून गेला. आयुष्यभर बादशहाची केलेली सेवा व मिळविलेली प्रतिष्ठा धुळीला मिळाली, ही नैराश्याची भावना उरात बाळगून तो उत्तरेची वाट चालू लागला. मार्गात बुर्हाणपूर येथे मोगलांचा हा महान सेनापती अपयशाच्या गर्तेत मरण पावला. त्याला बादशहाच्या हुकमानेच विषप्रयोग केला गेला, असा प्रवाद त्या काळी उत्पन्न झाला होता.मराठ्यांच्या दृष्टीने या घटनांचे फलित म्हणजे त्यांचा राजा मृत्यूच्या कराल दाढेतून सुखरूप बाहेर पडला, हीच सर्वात मोठी जमेची बाजू होती. यामुळे स्वराज्याला जीवदान मिळाले. लवकरच महाराजांनी पुरंदरच्या तहात गेलेले किल्ले व मुलूख ताब्यात आणला. एवढेच नव्हे तर स्वतःला राज्याभिषेक करून दक्षिणेत मराठ्यांची स्वतंत्र व सार्वभौम सत्ता स्थापन झाल्याचे त्यांनी जगाला जाहीर केले. याच सत्तेने महाराजांनंतरच्या अवघ्या ५० वर्षांत दिल्लीच नव्हे तर पंजाबपावेतो आपली सत्ता नेली. साभार: पुढारी संपादकीय लेख
उत्तर लिहिले · 26/7/2017
कर्म · 210095
0

महाराज आग्रा भेटीस का गेले?
मिर्झा राजांना महाराजांविरुद्ध यश मिळाले पण त्यांना भीती वाटायला लागली की जर का महाराज हे आदिलशहा व कुतुबशाहा यांना जाऊन मिळाले तर आपले दक्खन जिंकणे जवळपास अशक्य आहे , या भावनेने मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना आग्रा भेटीच्या कल्पनेबद्दल सांगितले व त्यांना राजी केले. पण महाराज औरंगजेब सारख्या स्वतःच्या वडिलांना  कैदेत टाकणाऱ्या  तसेच सक्ख्या भावांना पण ठार करणाऱ्या क्रूर माणसाच्या भेटीस आग्र्यात गेलेच कशाला ? या बद्दल अनेक इतिहासकारांमध्ये अनेक मत आहेत, त्या बद्दल काही तर्क

१)काहींच्या मते महाराजांना बादशाही दरबाराचे निरीक्षण करायचे होते.
२)काहींच्या मते शिवाजी महाराजांना जंजिर्याचा "सिद्धी" हवा होता. तो औरंगजेबाच्या चाकरीत असल्याने आग्रा भेटीमुळे जंजिरा प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता होती. म्हणजेच औरंगजेब हा "सिद्दी" वर दबाव निर्माण करेल व जंजिरा स्वराज्यात दाखल होईल.
३) काहींच्या मते महाराज हे कधीही नर्मदा नदीच्या पुढच्या प्रदेशात गेलेले नव्हते, कशी आहे तेथील परिस्थिती तसेच कसे आहे तेथील राजकारण ते समजण्यासाठी महाराज आग्रा भेटीस तयार झाले.

अश्या प्रकारे ५ मार्च १६६५ ला महाराज आग्र्याला जाण्यासाठी निघाले. त्यांच्या बरोबर त्यांचे अतिशय विश्वासू साथीदार त्याच प्रमाणे त्यांच्या गुप्तहेर खात्यातील अनेक माणसे होती.
                   




महाराष्ट्र ते आग्रा 

राजगडावरून निघताना जिजाबाई यांच्या हाती स्वराज्याचा कारभार सोपवून संभाजी राजांना सोबत घेऊन महाराज क्रूरकर्मा औरंजेबाच्या भेटीस आग्र्याला निघाले. सर्वप्रथम ते औरंगाबादेस आले जे दक्खन चे ठाणे होते. या शहरात महाराष्ट्राच्या या पराक्रमी राजाला पाहण्या साठी तुडुंब गर्दी उसळली होती. वास्तविक औरंगजेबाने महाराजांचा "शहजादा" प्रमाणे इंतजाम करावा अशी तंबी दिली हती. त्यांचा प्रवासखर्च देखील दक्खन च्या तिजोरीतून मंजूर केला होता. औरंगाबादेस आल्यावर बादशहाचा सरदार "साफ्शिखन खान " नावाचा सरदार हा उद्धटपणे महाराजांच्या भेटीस गेला नाही , परंतु महाराजांनी देखील त्याला काडीचीही किमत न देत मिर्झा राजे यांच्या तेथील हवेलीत वास्तव्यास निघून गेले परंतु वरिष्ठांकडून आपली चांगलीच कान उडानी होणार या भीतीने तो महाराजांच्या भेटीस गेला , तेव्हा मिर्झा राजांच्या हवेली मागे असलेल्या शंकराच्या मंदिरात राजे गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यानंतर हा खान  भेटीस गेला. विशेष म्हणजे आजदेखील २०१३ मध्ये हा भाग जयसिंगपूर म्हणूनच ओळखला जातो. परंतु आता येथे या भागात इमारती आहेत. आग्रा प्रवासात महाराज बहुतेक वेळा सराईत (धर्मशाळा) थांबल्याचे आढळून येते.
शेरशहा सूर याने दक्खन ते दिल्ली हा प्रवास करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी दर ५ किलोमीटर अंतरावर विश्रांतीसाठी सराई बांधल्या होत्या.आज या सार्यांवर अतिक्रमणे झालेले आढळतात. आग्रास महाराजांच्या स्वागतासाठी वरिष्ठ सरदार ऐवजी मिर्झा राजे यांचा पुत्र रामसिंग यांचा मुन्शी ला पाठवले.या मुन्शीने महाराजांविषयी अतिशय सुंदर पत्र लिहिले आहे त्यात महाराजांचे कौतुक सुद्धा केले आहे. महाराज व औरंगजेब हे लाल किल्ल्यात दिवान-ए-आम मध्ये भेटणार होते परंतु चुका-मुकी मुळे ते दिवान-ए-खास मध्ये भेटले. व पुढील इतिहास हा आपल्या सर्वाना ठाऊकच आहे!

                





कैद - सुटका

दरबारातील प्रसंगानंतर महाराज कुठे गेले ? याबाबतीत राजस्थानी पत्रांमध्ये उल्लेख आहे अकबर बादशाह ने निर्माण केलेल्या "फिरोज खान" च्या कबरीच्या परिसारत रामसिंग चे डेरे होते याच परिसरात शिवाजी महाराजांनी मुक्काम केला होता व पुढे काही दिवसांनी पोलाद्खानाच्या ( व अप्रत्यक्षरीत्या औरंगजेबाच्या ) कैदेत राहिले! राजस्थानी पत्राच्या अनुसार शिवाजी महाराज ज्या प्रदेशात वास्तव्यास होते तेथे तिहेरी पहारा होता त्याचप्रमाणे या परिसरात एक पाण्याचे तळे देखील होते ( आता नाही आहे). महाराजांनी नंतर आपल्या सर्व सहकार्यांना महाराष्ट्रात परत पाठवण्यची विनंती औरंगजेबाला केली तसेच त्यांच्या साठी परवाने देखील काढले. याच सुमारास महाराजांनी आपल्या स्वतःचे खोट्या नावाचे परवाने देखील मोठ्या शिताफीने काढले.यानंतर योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी  मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरूवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. त्या नंतर  हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांच्या हाताचे कडे दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता, व मदारी मेहतर हा त्यांचे पाय चेपीत होता. शिवराय दूर गेल्याचे अंदाज येताच हे दोघे पण निसटले, तब्बल १८ तासानंतर बादशाला सिंह पिंजयातून सुटला आहे याचे भान झाले पण तोवर उशीर झाला होता.

                 




परतीचा रस्ता 


आग्रा भेटीचा हा अतिशय विवादास्पद भाग आहे . कारण महाराज कोणत्या रस्त्याने परत आले महाराष्ट्रात याबद्दल दुमत आहे.

१) महाराज आल्या रस्त्याने परत गेले असतील महाराष्ट्रात. 

२) परंतु याची शक्यता अतिशय कमी आहे कारण हा सर्व प्रदेश मुघलांच्या ताब्यात आहे. त्यामुळे महाराज क्वचितच या प्रदेशातून गेले असतील. 

३) नरवर च्या घाटातून उतरताना मुघल सैनिकांनी महाराजांना पकडलेले परंतु महाराजांनी ( मगाशी वर उल्लेख केल्याप्रमाणे) खोट्या नावाचे परवाने दाखवून शिताफीने सुटका करून घेतली.

४) औरंगजेबाला जेव्हा हे गोष्ट कळली तेव्हा त्याने या सैनिकांची मनसब कमी गेली.

५)चंबळ नदीतून शिवाजी महाराज आपल्या साथीदारांसह गेले असा उल्लेख येथील स्थानिक मच्छीमारांनी केलेला आढळतो.

५) शिवाजी महाराजांनी आपला जो दुसरा रस्ता निवडलेला तो दोन सत्ता ( मुघल व इतर) यांच्या सरहद्दी वरचा होता असे मानण्यात येते

६) महाराज २५ दिवसात विक्रमी वेळेत राजगडावर पोहोचले

७) महाराजांना किंबहुना पुन्हा एकदा दिल्ली वर स्वारी करायची असेल त्यामुळे त्यांही हा रस्ता कोणता आहे ते गुलदस्त्यातच ठेवले असेल 

८) परंतु महाराज सुखरूप पणे राजगडावर पोहोचले यात महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे यश आहे हे निश्चितच.

काही तर्क 


शिवाजी महाराज जेव्हा लहानपणी शहाजी राजांशी भेटावयास बंगलोर ला गेलेले तेव्हा पुण्यात परत जाताना शहाजी राजांनी शिवाजी महाराजांकडे काही विश्वासू माणसे पाठवली त्यात काही शिक्षक देखील पाठवले त्यांमध्ये " शत्रूने अचानक आक्रमण केले व आपण कैद झालो तर त्याच्या प्रदेशातून कसे निसटून जावे" ही विद्या शिकवणारे काही तज्ञ देखील शहाजी राजांनी शिवाजी महाराजांसोबत पुण्याला पाठवले होते. किंबहुना या विद्येचा महाराजांना आग्र्याच्या प्रसंगी फायदा झाला ?

नाण्याच्या २ बाजू
 
शिवाजी महाराज औरंगजेबाला धूळ चारून महाराष्ट्रात परत आले. नंतर काही वर्षातच महाराजांनी अजेय बढत मिळवत पुरंदर च्या तहात गेलेले सगळे किल्ले परत मिळवले. याच्या उलट दक्खन च्या पराभवाने मिर्झा राजे हे परत गाशा गुंडाळून दिल्ली ला परत निघण्याची तयारी करू लागेले. शेवटी औरंजेबानेच "विषप्रयोगाने" त्यांना ठार केले.

अश्या प्रकारे मला सापडलेला महाराजांच्या आग्रा भेटी संदर्भातला माहितीचा खजिना मी आपल्यापुढे उघड केला आहे. शिवाजी महाराजांसारख्या थोर राजाला माझा त्रिवार मुजरा.

उत्तर लिहिले · 26/7/2017
कर्म · 4405
0
शिवाजी महाराजांची आग्रा भेट 1666 मध्ये झाली. औरंगजेबाने शिवाजी महाराजांनाcaption class="mw-redirect">आग्रा येथे भेटीसाठी बोलावले होते. या भेटीदरम्यान काही अप्रिय घटना घडल्या, ज्यामुळे महाराज औरंगजेबावर नाराज झाले आणि त्यांनी तेथून सुटका करून घेतली.

भेटीची पार्श्वभूमी:

  • शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध अनेक युद्धे जिंकली होती, त्यामुळे औरंगजेब त्यांच्या सामर्थ्याची कल्पना होती.
  • औरंगजेबाने महाराजांना तह करण्यासाठी आणि मुघल साम्राज्यात सामील होण्यासाठी बोलावले.

आग्रा भेट:

  • शिवाजी महाराज आपल्या मुलासह, संभाजी राजेंसह, मार्च १६६६ मध्ये आग्रा येथे पोहोचले.
  • औरंगजेबाने त्यांचा योग्य सन्मान केला नाही आणि त्यांना दरबारात कमी दर्जाच्या मनसबदारांच्या रांगेत उभे केले, ज्यामुळे महाराजांचा अपमान झाला.

निराशा आणि सुटका:

  • शिवाजी महाराजांनी या अपमानाचा निषेध केला आणि दरबार सोडला.
  • त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले, परंतु तेथून ते गुप्तपणे आपल्या मुलासह निसटून जाण्यात यशस्वी झाले.

परिणाम:

  • या घटनेमुळे मुघल आणि मराठा यांच्यातील संबंध अधिक बिघडले.
  • शिवाजी महाराजांनी परत येऊन पुन्हा मुघलांविरुद्ध संघर्ष सुरू केला आणि आपले साम्राज्य वाढवले.

या भेटीमुळे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडला आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1080

Related Questions

सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धा नंतर माघार घेतली नसती तर काय झाले असते?
सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला नसता तर काय झाले असते?
भारतातील ऐतिहासिक क्रांती व त्यांचे जनक?
शिवाजी महाराज यांच्यावर पहिला ग्रंथ कोणत्या युरोपियन व्यक्तीने लिहिला?
छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले ग्रंथ कोणी लिहिले?
संभाजी महाराज जन्म?
इ.स. 1750 ते 1850 या काळातील इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीची वाटचाल?