भारत भूगोल सामान्य ज्ञान नद्या

भारतातील सर्वात मोठी नदी कोणती?

3 उत्तरे
3 answers

भारतातील सर्वात मोठी नदी कोणती?

7
गंगा नदी

गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्वाची नदी आहे. तसेच ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीची लांबी २,५२५ किमी आहे. गंगा नदीचा उगम भारतातील उत्तराखंड या राज्यात हिमालय पर्वतात होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोर्‍यातून वाहत वाहत बांगलादेशात प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागरात मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो.

हिंदू धर्मात गंगा नदीला सर्वात पवित्र मानले आहे. गंगेला माता म्हटले गेले आहे. लक्षावधी भारतीयांची गंगा नदी ही जीवनदायिनी आहे. भारतातील पाटलीपुत्र (पाटणा), कनोज, कौशांबी, काशी, प्रयाग, मुर्शिदाबाद, मुंगेर, कांपिल्य, बेहरामपूर, कलकत्ता, इ. प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.

राजा रवी वर्मा यांनी काढलेले 'गंगा अवतरणाचे चित्र'

अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही किलोमीटर पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्राने पश्चिमेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरिचा येथे संगम होतो. या बदलास इ.स. १८९७चा भूकंप काही अंशी कारणीभूत होता.

गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरवन असे म्हणतात. येथे बर्‍याच वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.

यमुना ही गंगेची उपनदी स्वतःच एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला प्रयाग येथे येऊन मिळते.

डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगा डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत.

उत्तर लिहिले · 8/4/2017
कर्म · 2160
3
एक नाही, तीन नावं  सांगते

सिंधू - भारतातून वाहते हे सगळे विसरूनच गेले आहेत! लांबी 3180 किलोमीटर.

ब्रह्मपुत्र - "तो" ब्रह्मपुत्र! अवाढव्य नद. लांबी 2900 किलोमीटर.

गंगा - उत्तर भारताची जीवनदायिनी, गंगामैया! लांबी 2525 किलोमीटर.

पण तरीही... भारतातील सर्वात मोठी नदी कोणती?

खरं सांगू? खूप अवघड प्रश्न आहे! कसं, ते बघूया...

सिंधू

सिंधू सगळ्यात लांब आहे. पण "भारतातून" किती वाहते?

सिंधू नदी "हिमालयाच्या पलिकडे" मानस सरोवराच्या आसपास उगम पावते. तिबेटमधून (म्हणजे चीनमधून) पुढे ती लद्दाखमध्ये भारतात शिरते. लेहच्या जवळून वहात वहात ती पुढे "गिलगित-बल्तिस्तान"मध्ये शिरते. (हा भाग भारताचा, पण पाकिस्तानव्याप्त. आता आपल्यादृष्टीने तोसुद्धा "लद्दाख केंद्रशासित प्रदेशाचाच" एक भाग!)

नंतर ती "खऱ्या पाकिस्तानात" शिरते आणि त्या देशाची जीवनदायिनी बनते! पंजाबच्या पाच नद्या (झेलम, चिनाब, रावी, सतलज, आणि बियास) सिंधूच्याच उपनद्या.

वेदकाळातल्या सप्तसिंधूंमधली सगळ्यात महत्त्वाची नदी सिंधूच! खरं तर वेदांची निर्मिती याच परिसरात झाली असं म्हटलं जातं. (आता कुणी म्हणेल की वेद अपौरुषेय आहेत, त्यांची निर्मिती झाली नाही. मग कुणी आर्य-अनार्य याची चर्चा सुरू करेल. आपण त्यात पडूया नको!) एक मात्र खरं की वेदकालीन वाङ्मयात सिंधू नदीचा उल्लेख बराच येतो. हिंदू हा शब्दच मुळी सिंधू नदीवरून आलाय!

आणि सिंधू संस्कृती विसरून कसं चालेल? हडप्पा, मोहेंजोदडो वगैरे ठिकाणी सापडलेल्या अवशेषांवरून या परिसरात अतिप्राचीन काळी एक उत्क्रांत संस्कृती नांदत होती असं कळालं.

ही सिंधू नदी पाकिस्तानात कराचीजवळ, सिंध प्रांतात, अरबी समुद्राला मिळते. भूगोलाच्या भाषेत भारतीय उपखंडाची पश्चिम सीमा साधारणपणे सिंधू नदीला समांतर आहे.

सिंधू पुराण खूप झालं, आता गंगा पुराण सुरू करू!

गंगा

गंगेबद्दल काही सांगायची गरज आहे का? अर्ध्या भारताची लोकसंख्या तिच्यावर अवलंबून आहे.

हिमालयाच्या मुख्य रांगेत "गंगोत्री" हिमनदीत उगम पावणारी ही खळखळणारी नदी उत्तर भारताच्या मैदानात आली की संथ वाहू लागते. यमुना, गंडकी, कोसी अशा उपनद्या तिला येऊन मिळतात. हिमनद्यांवर पोसलेल्या या नद्यांमुळे वर्षभर गच्च भरून वाहणारी गंगा नदी अख्ख्या उत्तर भारताचं कल्याण करते.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार अशी वहात वहात ही पश्चिम बंगालमध्ये शिरते आणि तिला फाटे फुटतात. एक फाटा हुगली (Hooghly) या नावाने कलकत्त्याजवळून वाहतो आणि गंगासागरला बंगालच्या उपसागरात विलीन होतो.

दुसरा फाटा बांगलादेशाकडे गेला की 'गंगा'मैयाची पद्मा होते, आणि तिला पुढे ब्रह्मपुत्रा येऊन मिळते.

ही पद्मा पुढे मेघनेला मिळते, नंतर तिला अनेक फाटे फुटतात आणि ते बंगालच्या उपसागरात विलीन होतात.

या अवाढव्य नद्यांच्या जंजाळातून सुंदरबनचा प्रचंड मोठा त्रिभुज प्रदेश तयार होतो.

ब्रह्मपुत्र

ब्रह्मपुत्रा हे मात्र जरा विचित्रच प्रकरण आहे!

या नदाचं खरं नाव ब्रह्मपुत्र! म्हणजे ब्रह्माचा पुत्र, मुलगा! सध्या आपण मराठीतला शब्द ब्रह्मपुत्राच म्हणू.

ब्रह्मपुत्रेचा उगम कुठे आहे हेच बराच काळ माहीत नव्हतं! हिमालयाच्या कुठल्यातरी घळीतून अचानक प्रगट होणारी ही नदी खरी कुठे सुरू होते हे कळतंच नव्हतं. नंतर कळालं की ही नदी हिमालयाच्या पलिकडे मानस सरोवराच्या आसपास उगम पावते. तिबेटमधून (म्हणजे चीनमधून) पुढे ती अरुणाचल प्रदेशात भारतात शिरते.

तिबेटमधल्या या पूर्ववाहिनी नदीला यारलुंग त्सांगपो (किंवा नुसतंच त्सांगपो) म्हणतात. अरुणाचलमध्ये दक्षिणवाहिनी झाल्येल्या या नदीला सियांग म्हणायचं. आसाममध्ये पश्चिमवाहिनी झालेल्या या नदीला ब्रह्मपुत्र म्हणायचं. बांग्लादेशात शिरल्यावर तिला जमुना म्हणायचं.

पुढे ही जमुना पद्मा नदीत विलीन होते. आपण त्याला बांग्लादेशातला गंगा-जमुना संगम म्हणू शकतो!

मत्स्यप्रेमी मंडळींसाठी खास माहिती! पद्मा नदी जिथे मेघनेला मिळते त्या परिसरातला हिलसा मासा सगळ्यात चविष्ट. जसा देवगडचा हापूस, तसा चांदपूरचा हिलसा!

सिंधू, गंगा, आणि ब्रह्मपुत्र

सिंधू, गंगा, आणि ब्रह्मपुत्र या तीनही नद्या ज्या भल्या मोठ्या सुपीक सखल प्रदेशातून वाहतात त्याला Indo-Gangetic Plain म्हणतात. म्हणजे उत्तर भारताचा मैदानी प्रदेश!



गंगा नदी हिमालयाच्या मुख्य रांगेत उगम पावते आणि हिमालयाच्या दक्षिण दिशेला वाहते.

सिंधू आणि ब्रह्मपुत्रा हिमालयाच्या पलीकडे उगम पावतात आणि हिमालयाला कवेत घेतात!

हिमालयाचं पश्चिम टोक म्हणजे नंगा पर्बत आणि त्याच्या पलीकडे सिंधू नदी. म्हणजे थोडक्यात पश्चिमेला सिंधूपाशी हिमालय संपतो.

हिमालयाचं पूर्व टोक म्हणजे नामचा बरवा हे (चीनमधलं) शिखर. तिथे पूर्ववाहिनी यारलुंग त्सांगपो नदी (म्हणजे आपली ब्रह्मपुत्रा!) अचानक दक्षिणवाहिनी होते. (यारलुंग त्सांगपो घळई Yarlung Tsangpo Gorge हे वेगळंच प्रकरण आहे. त्याबद्दल नंतर कधीतरी!) असो, तर पूर्वेला ब्रह्मपुत्रेपाशी हिमालय संपतो.

थोडक्यात, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा हिमालयाला कवेत घेतात!

भारतातील सर्वात मोठी नदी कोणती?

हरिदासाची कथा मूळपदावर आलीच!

आता बघा, या तिन्ही नद्यांमधली सर्वात लांब सिंधू. सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी (बहुधा) ब्रह्मपुत्रा. "भारतात सगळ्यात जास्त लांबी असलेली" गंगा!


उत्तर लिहिले · 24/11/2021
कर्म · 121765
0

भारतातील सर्वात मोठी नदी गंगा आहे.

लांबी: सुमारे 2,525 कि.मी.

गंगा नदी हि भारत आणि बांग्लादेशातून वाहते. हिचा उगम उत्तराखंड राज्यातील हिमालयात होतो.

गंगा नदीला भारतात पवित्र मानले जाते.


अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1080

Related Questions

भारताची सर्वात लांब नदी कोणती?
अनेक जलप्रवाह एकत्र येऊन काय तयार होते?
संबळ नदीची उपनदी कोणती?
उताऱ्यात आलेल्या नदीचे नाव?
ॲमेझॉन नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते?
हिमालयातून वाहणाऱ्या नद्या?
अरवली पर्वता कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे?