2 उत्तरे
2
answers
वाहतूक आणि दळणवळण याबद्दल सविस्तर उत्तर १५० ते २५० शब्दांत लिहा.
0
Answer link
वाहतूक व दळणवळण म्हणजे काय?
उत्तर : वस्तू, सेवा व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसèया ठिकाणी नेण्याच्या व्यवस्थेला ‘वाहतूक’ असे म्हणतात.
एका व्यक्तीकडून दुसèया व्यक्तीकडे किंवा एकाठिकाणाहून दुसèया ठिकाणी बातम्यांची देवाणघेवाण करणे यालाच 'दळणवळण' (संपर्क माध्यमे) असे म्हणतात.
वाहतूक -
वाहतूक : एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाप्रत माणसे व माल हलविण्याची क्रिया वा कृती. माणसांना इष्ट त्या स्थळी जाण्याची गरज वा इच्छा असल्यास त्या स्थळी पाठविणे वा नेणे तसेच त्यांना आवश्यकता वा गरज भासणाऱ्या वस्तूंची वा मालाची पोच वा पाठवणी करणे, ह्या गोष्टी वाहतुकीमुळे शक्य होतात. वाहतुकीविना व्यापार शक्य नाही, व्यापाराशिवाय गावे वा शहरे वसणे शक्य नाही. परंपरेने गावे व नगरे (शहरे) ही संस्कृतिकेंद्रेच समजण्यात येतात. म्हणूनच एका प्रकारे वाहतूक ही संस्कृतीची माता वा जननीच मानावयास हवी.
विविध संस्कृत्यांचे (वा देशांचे / राष्ट्रांचे) इतिहास पाहू जाता असे आढळून येते की, वाहतुकीची प्रगती सतत मंद व अत्यंत अवघड अशीच होत आली आहे. प्रागैतिहासिक काळापासून लोक मुख्यतः पायीच प्रवास करीत. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे माल आपल्या पाठीवरून, डोक्यावरून अथवा जमिनीवरू ओढत वा ढकलत नेत असत. इ. स. पू. ५००० वर्षांच्या सुमारास, लोक ओझी वाहून नेण्याकरिता प्राण्यांचा वापर करू लागले. इ. स. पू. ३००० वर्षांच्या सुमारास, चार चाकांची गाडी (वॅगन) तसेच शिडांची गलबते यांचा शोध लागला. त्यामुळे प्राणी, वॅगन व शिडांची गलबते यांचा वापर केल्यामुळे लोकांना ओझी व माल अधिक अंतरावर-सुदूर अंतरावर -वाहून नेणे सुलभ होत गेले. अर्थातच वाहतुकीचा वेग मात्र गतिमान होण्यासाठी अनेक शतकांचा काळ जावा लागला.
एंजिनांमुळे गतिमानता लाभलेल्या वाहनांचा शोध सतराव्या शतकाच्या जवळजवळ शेवटी व अठराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकांत लागल्याचे आढळते. हा विकास म्हणजे वाहतूकक्षेत्रातील क्रांतीचा आरंभ टप्पा (आरंभावस्था) मानावयास हवा, कारण की विकासप्रक्रिया अजूनही चालू आहे. सांप्रत जेट विमाने माणसांना जवळजवळ ध्वनीच्या वेगाने अथवा त्याहूनही अधिक वेगाने एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी वाहून नेतात. जगातील बहुतेक भागांत आगगाड्या, ट्रक, अवाढव्य मालवाहू जहाजे प्रचंड मालाचा साठा सातत्याने खरेदीदारांकडे पोहोचवीत असतात. मोटारगाड्या लक्षावधी लोकांची सोयीस्कर व सुकर वाहतूक देश-प्रदेशांच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत घडवून आणतात.
जरी एंजिनप्रणीत वाहनांच्या वाहतुकीमुळे लोकांना अनेक फायदे झाले असले, तरी तीमुळे समस्याही उद्भवल्या आहेत. उदा., एंजिनांच्या वाहनांमुळे इंधन इंधन प्रमाण फार मोठे लागते व परिणामी जगाच्या ऊर्जा पुरवठ्यावर व साठ्यावर विलक्षण ताण निर्माण होतो. मोटारगाड्यांच्या वाहतुकीमुळे अनेक रस्ते व राजमार्ग यांमध्ये प्रचंड अडथळे निर्माण होऊन त्यांचा परिपाक प्रवासाच्या मंदगतीमध्ये होतो. याशिवाय या मोटारगाड्यांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे व वाफेमुळे सबंध परिसर व आसमंत दूषित होतो. या समस्या इतक्या जटिल आहेत की, वाहतूक प्रश्नांची उकल करण्याच्या कामी शासनांना जास्तीत जास्त भाग घ्यावा लागत आहे.
वाहतूक प्रकार : वाहतुकीचे मुख्यतः (१) जमीन, (२) जल व (३) हवा, असे तीन प्रकार संभवतात. जमिनीवरील वा भूपृष्ठावरील वाहतूक ही प्रामुख्याने चाकांच्या वाहनांवर उदा., मोटारगाड्या, आगगाड्या व ट्रक यांवर अवलंबून असते. जहाजे व आगबोटी ही मुख्यतः जलवाहतूक करणारी वाहने होत. हवेतून केली जाणारी वाहतूक ही सर्वस्वी विमानांवरच अवलंबून असते.
प्रत्येक वाहतूक प्रकार ही पुन्हा ती वाहतूक करणारी वाहने एंजिनप्रणीत वा एंजिनाविरहित आहेत किंवा काय, यांवर सीमित असतो. एंजिनप्रणीत वाहनांना पेट्रोल, डीझेल वा जेट एंजिने लावलेली (बसविलेली) असतात. एंजिनविरहित वाहने ही मानवाच्या, प्राण्यांच्या स्नायुशक्तीमुळे अथवा वारा किंवा वाहते पाणी यांसारख्या नैसर्गिक शक्तिस्त्रोतांमुळे चालविणे शक्य होते.
एंजिनप्रणीत वाहतूक ही एंजिनरहित वाहतुकीपेक्षा पुढील कारणांमुळे फायदेशीर ठरतेः एकतर ती जलद, वेगवान, सोयीस्कर आणि अवलंबून राहता येईल अशी असते दुसरे म्हणजे तिच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मालाची ने-आण करणे शक्य होते. अर्थातच अशा प्रकारची वाहतूक ही महागडी व खर्चिक असते. एंजिनप्रणीत वाहनांद्वारे करण्यात येणाऱ्या वाहतुकीवर अनेक सहस्त्र डॉलरपासून लक्षावधी डॉलरपर्यंत खर्च करावा लागतो आणि ही खर्चमर्यादा वाहतूक कोणत्या प्रकारच्या वाहनांतून केली जाते, यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या वाहतुकीमध्ये, वापरण्यात येणाऱ्या वाहनांकरिता आधार सुविधा आवश्यक असतात. उदा., मोटारींना वाहतुकीसाठी रस्त्यांची, आगगाड्यांना लोहमार्गाची, जहाजे व आगबोटी यांना बंदरांची, तर विमानांना विमानतळांची अत्यावश्यकता असते. या सर्व सुविधा बांधावयास (निर्माण करावयास) व त्यांचे जतन वा संवर्धन करावयास अत्यंत खर्चिक (महागड्या) असतात. एंजिनप्रणीत वाहतुकीच्या प्रत्येक प्रकाराला ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे वाहनांची किंमत, आनुषंगिक सुविधा आणि ऊर्जा यांवर येणारा खर्च हे सर्व जमेस धरता एंजिनप्रणीत वाहतूक ही अत्यंत खर्चिक होऊ शकते.
औद्योगिक दृष्ट्या विकसित राष्ट्रांमध्ये (उदा., अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, यूरोपीय राष्ट्रे इ.) एंजिनप्रणीत वाहनांचा सर्वाधिक उपयोग वापर केला जातो, तर आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका यांसारख्या खंडांतर्गत देशांत एंजिनप्रणीत वाहनांचा उपयोग वा वापर अतिशय खर्चिक व त्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना परवडणारा असू शकत नाही.
भूपृष्ठीय वा जमिनीवरील वाहतूक ही सर्वाधिक स्वरूपात केली जाणारी वाहतूक मानली जाते. एंजिनप्रणीत (एंजिनचालित) भूपृष्ठवाहतुकीमध्ये मोटारगाड्या, बसगाड्या, मोटारसायकली, नळमार्ग, बर्फावरील घसरगाड्या, आगगाड्या (रेल्वे), तसेच ट्रक यांचा प्रामुख्याने समावेश होतो. नळमार्ग आणि बर्फावरील घसरगाड्या यांव्यतिरिक्त अन्य सर्व वाहनांना चाकांची आवश्यकता असते.
मोटारगाड्या, बसगाड्या व मालवाहू गाड्या (ट्रक) ही प्रामुख्याने रस्त्यावरून धावणारी वाहने होत. ज्या भागांत रस्त्यांचे (मार्गांचे) चांगले जाळे पसरलेले असेल, त्या प्रदेशांत या वाहनांमुळे अनेक प्रकारच्या वाहतूक सुविधा पुरविल्या जाणे शक्य होते. लोकांना सोयीस्कर वेळेस व अतिजलद मार्गाने (मार्गावरून) मोटारगाड्यांमधून प्रवास करता येतो. बसगाड्यांच्यायोगे शहरांमधील तसेच शहरांच्या अनेक भागांमधून प्रवाशांना प्रवास करणे शक्य व सोयीचे होते. यूरोपीय देश, जपान यांसारख्या देशांमध्ये अनेक लोक आपल्या घरांतून कामाच्या जागी व पुन्हा घरी मोटारसायकली तसेच स्कूटर या जलद व सुटसुटीत वाहनांद्वारा प्रवास करतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात, निखळ मनोरंजनाच्या हेतूने लोक मोटारसायकली वापरतात.
याउलट आगगाड्यांना लोहमार्गांवरून अथवा रुळांवरून धावावे लागते. परिणामी, ट्रकांप्रमाणे घरपोच मालवाहतूक सेवा अथवा बसगाड्यांप्रमाणे जोडसेवा रेल्वेला करता येणे अवघड असते. परंतु ट्रकांपेक्षा अधिक प्रमाणात मालवाहतूक तसेच बसगाड्यांपेक्षा कितीतरी अधिक संख्येने प्रवासी वाहतूक रेल्वेला करता येते. बर्फावरील घसरगाड्या या वर्षातून अधिक काळ बर्फवेष्टित उत्तर गोलार्धातील प्रदेशांतून वाहतूक करीत असतात. नळमार्ग हे वाहतुकीच्या अन्य प्रकारांसारखे स्वतः हालचाल करीत नाहीत. बहुतेक नळमार्ग हे जमिनीवरून बांधण्यात आलेले असतात परंतु काही नळमार्ग हे नद्यांमधून अथवा जलप्रदेशांतून टाकण्यात येतात. या नळमार्गातून मुख्यतः द्रवपदार्थ, वायू (उदा., खनिज तेल, नैसर्गिक वायू इ.) इत्यादींची वाहतूक केली जाते.
एंजिनरहित जमिनीवरील वाहतूक : चालणे हा वाहतुकीचा सर्वांत प्राथमिक प्रकार होय. पाठीवरून वा डोक्यावरून ओझे वाहून नेणे अथवा ओझे (माल) वाहून नेण्याकरिता, प्राण्यांचा वापर करणे, हाही प्राथमिक प्रकार होय. अशा प्रकारची मालवाहतूक करणाऱ्या जनावरांना ‘पॅक ॲनिमल्स’ अथवा ‘बीस्ट्स ऑफ बर्डन’ (ओझी वाहून नेणारी जनावरे वा प्राणी) असे संबोधिले जाते. या प्राण्यांमध्ये उंट, गाढवे, हत्ती, घोडे, लामा, बैल इत्यादींचा अंतर्भाव होतो. ज्या भागांत आधुनिक पद्धतीचे रस्ते नसतात, अशा भागांत (उदा., वाळवंटे, दुर्गम पर्वतीय प्रदेश, जंगले इ.) अशा प्राण्यांचा वापर करण्यात येतो.
कित्येक लोक ढकलगाड्या, सायकली, पेडिकॅब यांसारखी स्नायूंचे सामर्थ्य दाखविणारी वाहने वापरताना आढळतात. ढकलगाडीला दोन वा चार चाके असतात सायकलीला दोन चाके असून ती पायंड्याच्या आधाराने फिरविता येतात. यूरोपातील अनेक देशांमधून तसेच आशियाई देशांतून लोकांना मोठ्या प्रमाणावर कामावर जाण्यासाठी सायकलचा वापर करणे शक्य होते. पेडिकॅबला मागील बाजूस दोन चाके असतात तिचा वापर टॅक्सीप्रमाणे आणि कित्येक पौर्वात्य देशांमधून शाळेत मुलांना नेण्या-आणणाऱ्या बसगाडीसारखा करण्यात येतो. बैल वा घोडे यांसारख्या प्राण्यांमार्फत खेचून नेणाऱ्या गाड्या पौर्वात्य व विकसनशील देशांच्या ग्रामीण भागांत सर्रास वापरात असलेल्या आढळतात.
जलवाहतूक ही मुख्यत्वे बोटी वा जहाजे, तसेच तराफे यांवर अवलंबून असते. वल्ह्यांच्या साहाय्याने नद्या, कालवे, सरोवरे यांमधून नावांचा वापर करण्यात येतो. जहाजांचा वापर खासकरून समुद्रातील वाहतुकीसाठी केला जातो. मोठमोठे ओंडके एकत्र बांधून त्यांद्वाराही सामानाची वा प्रवाशांची वाहतूक केली जाते. अशा साधनांना ‘तराफे’ असे संबोधतात.
एंजिनचालित जलवाहतूक : बहुतेक मोठ्या बोटी व जहाजे यांची एंजिनाच्या साहाय्याने वाहतूक करण्यात येते. कित्येक मोठी जहाजे वा बोटी ह्या प्रचंड प्रमाणावर माल सागरांतून वाहून नेण्याचे कार्य करतात. ग्रेट लेकसारख्या मोठ्या सरोवरांतून प्रचंड जहाजे माल वाहून नेत असतात. सर्व साधारणपणे एंजिनचलित जहाजे वा बोटी यांची वाहतूक ही तशी वेगवान नसते. जहाजे वा बोटी यांच्यापेक्षा अधिक वेगाने जलवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांची (जलपर्णी नौका – हायड्रोफॉइल क्राफ्ट व वाततल्पयान -हॉव्हरक्राफ्ट) अभियंत्यांनी रचना करून त्यांमार्फत प्रवासी अथवा माल यांची वाहतूक वेगने करण्याची कार्यवाही प्रत्यक्षात आणली आहे. मोठी सरोवरे वा नद्या यांमधून वरील वाहनांतून जलवाहतूक सामान्यतः केली जाते.
एंजिनरहित जलवाहतूक : एंजिनांचा वापर न करता नौका, तराफे, शिडांच्या बोटी व जहाजे यांमधूनही जलवाहतूक करण्यात येऊन प्रवासी व माल एका ठिकाणाहून इष्ट त्या ठिकाणी पोहोचविले जातात. नौका, तराफे वगैरेंमधून वल्हे मारून वाहतूक करणे शक्य होते, तर वाऱ्याच्या मदतीने शिडांच्या जहाजांमधून प्रवासी व माल यांची वाहतूक केली जाते ताफा व तराफा यांमधून वल्हे, पायंडी, शिडे वा जलप्रवाह यांच्या मदतीने मालाची व प्रवाशांची वाहतूक करता येते. पौर्वात्य देशांत अशा प्रकारच्या वाहनांना ‘सेलबोट’ (शीडजहाज) वा ‘जंक’, तर रो-बोटींना ‘संपान’ अशी संज्ञा आहे. मोठ्या आकाराची जंक वा संपान यांमधून अवजड मालवाहतूक करणे सोईचे होते.
हवाई वाहतूक : एंजिनचालित वायुयानांमधून, म्हणजेच मुख्यत्वे विमानांमधून, हवाई वाहतूक करणे शक्य होते. एंजिनरहित वायुयाने म्हणजे ग्लायडर, उष्ण-वायुप्रणीत बलून यांचा उपयोग व वापर मुख्यतः मनेरंजनात्मक साधने वा क्रीडासाधने म्हणूनच करण्यात येतो.
विमानांमुळे सर्वांत अत्यंत गतिमान (जलद) वाहतूक उपलब्ध होऊ शकते. रॉकेटप्रणीत अवकाशयाने अधिक वेगाने प्रवास करतात. मोठाली विमाने दरताशी सु. ८०० ते १,००० किमी. या वेगाने प्रवास करतात. सांप्रतच्या काळात बहुतेक विमानांना जेट एंजिने असतात. स्वनातीत (सुपरसोनिक) जेट विमाने ध्वनीहून अधिक वेगाने प्रवास (सु. २,४०० किलोमीटर प्रतितास) करतात. विमानांतून सामानाची व मालाची वाहतूक करणे हे अतिशय खर्चिक असते कारण हवाई माल-वाहतुकीचे दर अतिशय महागडे असतात यामुळेच इलेक्ट्रॉनीय उपकरणांसारख्या अतिशय महाग तथापि वजनाने हलक्या वस्तू वा उपकरणे किंवा ताज्या फुलांसारख्या नाशवंत वस्तू विमानाने पाठविणे शक्य होते. हेलिकॉप्टर ही विमानांप्रमाणेच एंजिनप्रचलित असली, तरी त्यांचा आकार विमानांपेक्षा लहान असल्याने त्यांच्यामधून मर्यादित प्रमाणातच प्रवासी वाहतूक करता येते. हवाई वाहतुकीमध्ये यामुळेच त्यांची दुय्यम दर्जाची भूमिका असते. तथापि संचलनामध्ये व काही महत्त्वाच्या कार्यांमध्ये (मदत-कार्य तसेच जंगलांमधील वणवे विझविणे यांसारखी कामे) त्यांची उपयुक्तता अधिक असते.
इतिहास :
चाकाच्या वाहनांचा विकास मेसोपोटेमियात इ. स. पू. ३५०० च्या सुमारास झाला. हे तंत्र येथूनच हळूहळू प्रसृत होत गेले. भारतात ते इ. स. पू. २५०० च्या सुमारास, युरोपमध्ये इ. स. पू. १४०० च्या सुमारास व चीनमध्ये इ. स. पू. १३०० च्या सुमारास पोहोचले.
पहिली चाकांची वाहने चार-चाकी असून ती बैलांकरवी वा इ. स. पू. ३००० च्या सुमारास गर्दभसदृश प्राण्यांकडून ओढली जात असत. प्रथमतः मेसोपोटेमियनांनी अशा प्रकारच्या वाहनांचा वापर शववाहिका म्हणून केला. इ. स. पू. ३००० नंतर अशी वाहने मेसोपोटेमियन सैनिक, त्याचप्रमाणे वाळू, धान्य आणि अशाच प्रकारचे सामान वाहून नेण्याकरिता वापरण्यात येऊ लागली. इ. स. पू. २००० पर्यंत चाके ही तीन लाकडी फळ्यांची बनविण्यात येत असत. नंतर इ. स. पू. २००० – इ. स. पू. १५०० च्या दरम्यान आरे असलेली चाके प्रथमच वापरात आली. या प्रकारच्या चाकांमध्ये एक पाळ (रिम), तुबा (हब) व आरे, असे तीन भाग असत. आऱ्यांच्या चाकांमुळे भरीव लाकडी चाकांपेक्षा अधिक सुखावह व जलद वाहतूक होऊ लागली. आरे असलेली चाके प्रथम रथांकरिता वापरली गेली असावीत. इ. स. पू. २००० च्या सुमारास रथ ओढण्याकरिता प्रथमच घोड्यांचा वापर करण्यात आला. इ. स. पू. ४०० च्या सुमारास ग्रीकांनी सागरी व्यापाराचा विस्तार केला. त्याचप्रमाणे एकाऐवजी दोन डोलकाठ्या व चार शिडांची जहाजे वापरण्यास प्रारंभ केला. ग्रीक व्यापारी जहाजांच्या योगे ग्रीक संस्कृतीचा पश्चिम दिशेकडे विस्तार होण्यास मोठीच मदत झाली. संस्कृतीपाठोपाठ जहाजवाहतूक व व्यापार या दोहोंत वाढ होणे अपरिहार्य होते.
इ. स. पू. १०० पासून इ. स. ४०० वर्षांच्या कालावधीत रोमन साम्राज्याची कारकीर्द लक्षणीय असल्याचे प्रत्ययास येते. रोमन साम्राज्याच्या उत्कर्षकाळी, भूमध्य समुद्राच्या किनारी भागातील सर्व प्रदेश रोमन साम्राज्यात अंतर्भूत झाले होते, उत्तरेस ब्रिटिश बेटांपासून पूर्वेकडील इराणच्या आखातापर्यंत रोमन साम्राज्या पसरले होते. एवढ्या विस्तीर्ण साम्राज्यातील भूप्रदेशाला सुसूत्रपणे सांभाळण्यासाठी रोमन शास्त्यांनी अतिशय प्रगत अशी रस्ते-यंत्रणा उभारली. अर्थातच रोमनांपूर्वी रस्त्यांचे बांधकाम चालू होते. इ. स. पू. २००० च्या सुमारास चीनमध्ये मोठी शहरे जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम करण्या येत होते इराणी राज्यकर्त्यांनी इ. स. पू. ५०० च्या सुमारास असेच रस्ते तयार करण्याचे काम चालू केले होते. तथापि अशा प्रकारचे आंतर-नगरीय रस्ते म्हणजे धूळ- पायवाटेपेक्षा जरा बरी अवस्था असलेले, असे ते रस्ते होते. फरसबंदी रस्त्यांचे जाळे प्रथम रोमनांनीच निर्माण केले त्यांची रुंदी ५ ते ६ मी. व जाडी १ ते २ मी. एवढी होती. आपले सैन्यदल तसेच युद्धसामग्री यांची ने-आण करण्याच्या उद्देशानेच रोमनांनी हे रस्ते बांधले होते. त्याचबरोबर रोम व इतर प्रांत यांमधील संदेशव्यवस्था (संपर्कव्यवस्था) अबाधित राहण्याकरिताही (राखण्याकरिताही) या रस्त्यांचा विहित उपयोग केला जात असे. इ. स. २०० च्या सुमारास रोम व रोमन साम्राज्यांतर्गत बहुते सर्व प्रदेश ८०,००० किमी. पेक्षा अधिक लांबीच्या फरसबंदी रस्त्यांनी जोडण्यात आले होते. इ. स. ४०० च्या सुमारास जर्मन टोळ्यांनी पश्चिम यूरोपमधील बहुतेक रोमन प्रदेश बळकाविले. पुढेपुढे रोमन रस्त्यांची अवस्था अतिशय खराब होत गेली. रस्त्यांप्रमाणेच सागरी वाहतुकीत रोमन मालवाहू जहाजांनी अग्रेसरत्व प्रस्थापित केले होते [⟶ रस्ते].
मध्ययुगामध्ये (इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंतचा कालावधी) भूपृष्ठीय व सागरी अशा दोन्ही वाहतूक प्रकारांत मोठ्या सुधारणा घडून आल्याचे आढळते. त्या म्हणजे घोड्याला बांधावयाचा गळपट्टा (हॉर्स कॉलर), घोड्याला मारावयाचे लोखंडी नाल (आयर्न हॉर्स-शू) आणि घोड्याच्या पाठीवर बांधलेले ओढण (व्हिफल ट्री), ह्या होत. घोड्याच्या गळपट्ट्याचा शोध इ. स. ८०० च्या सुमारास, लोखंडी नालाचा युरोपमध्ये इ. स. ९०० च्या सुमारास, तर घोड्याच्या ओढण्याचा इ. स. १००० च्या सुमारास लागला. गळपट्ट्यामुळे ओझ्याचा ताण घोड्याच्या मानेवरून त्याच्या खांद्यांवर पडला. त्यामुळे घोडे चौपट ते पाचपट अधिक ओझे ओढून नेऊ लागले. नालाशिवाय घोड्यांच्या खुरांना दूरवरच्या प्रवासात इजा होत असे. लोखंडी नालाच्या योगे घोड्यांच्या खुरांना संरक्षण लाभले व परिणामी घोड्यांना अधिक दूरवर व जलद गतीने अंतर कापणे शक्य झाले. ओढण्यामुळे वाहनांना एकापेक्षा अधिक घोडे जुंपता येऊ लागले, परिणामी वाहनांची गती वाढली, त्याचबरोबर घोड्यांनाही अधिक ओझे वाहून नेणे सोयीचे झाले. या तिन्ही शोधांमुळे जमिनीवरील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला घोड्यांच्या वाहनांमुळे प्रवासी वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होत गेली.
मध्ययुगात जहाजांचा अभिकल्प व त्यांची बांधणी अशा दोहोंतही परिणामकारक सुधारणा घडून आल्या. जहाजांच्या मागील बाजूस (स्टर्न –म्हणजेच वराम – भागात) असलेल्या वल्ह्यांऐवजी सुकाणूचा वापर करणारी जहाजे यूरोपात १३०० च्या सुमारास प्रचारात आली. १४०० च्या सुमारास जहाजांच्या आकारात पूर्वीपेक्षा चौपटीने वाढ झाली तसेच त्यांमधून एक सुकाणू, तीन डोलकाठ्या व तीन शिडे वापरण्यात येऊ लागली. याच काळात नौकांच्या मार्गनिर्देशनाची उपकरणेही (नॅव्हिगेशनल इन्स्ट्रूमेंट्स, उदा., खलाशांचा वा नावाड्यांचा दिक्सूचक-मरीनर्स कंपास) विकसित झाली.
दळणवळण
उत्तम दळणवळण हे आजच्या काळातील महत्त्वाची गरज बनली आहे. भुतलावर, जलाशयावरून व आकाशातून दळणवळण होउ शकते. दळणवळणासाठी वाहने लागतात पण खुष्की वाहतुकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणारे रस्ते किंवा रुळमार्ग असावे लागतात.
भारतात रस्त्यांचे खालील प्रकार आहेत:
- राष्ट्रीय महामार्ग: हे मार्ग देशाच्या विकासात फार मोठा हातभार लावतात. या रस्त्यांची बांधणी आणि देखभाल केंद्र सरकार करते.
- राजकीय महामार्ग: हे महामार्ग राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.
- प्रमुख जिल्हा रस्ता
- इतर प्रमुख जिल्हा रस्ता
- ग्रामीण रस्ता
- द्रुतगतीमार्ग: प्रगत देशात विस्तृत जाळे असणारा पण भारतात नवीन असणारा हा रस्ता प्रकार गेल्या ५ वर्षात भारतातही अवतरला आहे. त्यात वर्षागणिक संख्येने व लांबीने वाढ होत आहे. या रस्त्यांवर कमीतकमी विशिष्ट गति असलेल्या वाहनांनाच प्रवेश असतो.
वाहनांचे प्रकार:
१. रस्त्यावरची वाहने
२. रेल्वे
३. जहाज
४. विमान
याशिवाय दळणवळणाचे आणखी प्रकार :-
१. दूरध्वनी (टेलीफोन)
२. रेडियो
३. दूरदर्शन
४. अंतरजाल (इंटरनेट)
0
Answer link
वाहतूक:
वाहतूक म्हणजे Man power आणि Goods एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे. वाहतूक आपल्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. वस्तू आणि सेवांची जलद आणि कार्यक्षम वाहतूक व्यापार आणि विकासासाठी खूप आवश्यक आहे.
वाहतुकीचे प्रकार:
- जमीन वाहतूक: रस्ते आणि रेल्वे हे जमीनीवरून वाहतुकीचे दोन मुख्य प्रकार आहेत.
- जल वाहतूक: जहाजे आणि बोटी यांचा वापर करून समुद्रातून तसेच नद्यांमधून Malachi वाहतूक केली जाते.
- हवाई वाहतूक: विमानांच्या साहाय्याने प्रवासी आणि माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद पोहोचवला जातो.
दळणवळण:
दळणवळण म्हणजे माहितीची देवाणघेवाण करणे. पूर्वी दळणवळणासाठी जास्त वेळ लागायचा, पण आता तंत्रज्ञानामुळे ते खूप सोपे झाले आहे.
दळणवळणाचे प्रकार:
- Post: Post cards, letters आणि parcels पाठवणे.
- दूरसंचार: Telephone, mobile phone आणि internet च्या साहाय्याने संवाद साधणे.
- Mass communication: Radio, television आणि वर्तमानपत्रे हे माहिती आणि बातम्या देण्यासाठी वापरले जातात.
वाहतूक आणि दळणवळणाचे महत्त्व:
वाहतूक आणि दळणवळण दोन्ही एकमेकांना जोडलेले आहेत. त्यांच्यामुळे व्यापार, Tourism आणि लोकांना एकमेकांशी जोडले राहण्यास मदत होते. त्यामुळे देशाचा विकास जलद होतो.