देवळातील देवाला महत्त्व असते की मनातील भावाला जास्त महत्त्व असते?
देवळातील देव आणि मनातील भाव या दोघांनाही सारखेच महत्त्व आहे. फरक ते मानणाऱ्या व्यक्तीं मध्ये आहे. माझ्या मताप्रमाणे तीन प्रकारच्या व्यक्ती आहेत. एक बुद्धीला प्रमाण मानणाऱ्या. दोन मानसिकतेला प्रमाण मांडणाऱ्या, आणि तीन भावनिकतेला प्रमाण मानणाऱ्या. तीनही प्रकारच्या व्यक्तींनी ईश्वराची वेगवेगळी; खरं तर प्रतिमा ही म्हणता येणार नाही; पण संकल्पना केलेली आहे.
बुद्धीला प्रमाण मानणारा, प्रथम ईश्वर आहे की नाही यावरच विचार करेल. मग तो कसा आहे याचा विचार. पहिला विचार संपल्याशिवाय दुसरा चालू होतच नाही. कधीकाळी या व्यक्तीसाठी अशी वेळ येईल की तो विचार करेल की हो, काही शक्ती असू शकेल, जी ब्रम्हांड चालवत आहे. पण त्या शक्तीची प्रतिमा बनवण्याच्या प्रयत्नात तो पडणार नाही. त्याच्यासाठी मूर्ती काय?; किंवा मनातील भाव काय? दोन्हीचे महत्त्व नाही!
दुसरी व्यक्ती मानसिकतेला प्रमाण मानणारी. या प्रकारची व्यक्ती ईश्वराला मूर्त स्वरूप देण्याचे प्रयत्न करेल मग एखादा तिला काव्यात अथवा गद्यात वर्णन करेल. ज्याच्या हाती कला आहे तो तिची प्रतिमा बनवेल अथवा शिल्प बनवेल आणि तीच मूर्ती ईश्वर म्हणून तिची पूजा करेल. मानसिकतेला प्रमाण मर्यादा नाहीत म्हणून सर्व सामान्य वर्णनाच्या पलीकडे जाऊन काव्य आणि प्रतिमा आणि शिल्पे तयार केली गेली. मग हजारो हातांची देवी,डोंगराएवढ्या उंचीचे महावीर आणि बुद्ध तयार झाले. याही पलीकडे जाऊन तीन मुखे असलेले देव तयार झाले. लोकांसाठी झटून क्रुसावर चढवलेला रक्तबंबाळ येशूही तयार झाला. देवाचे संक्षेपइ रूपही लोकांनी तयार केले. स्त्रीच्या गर्भाशयात जाऊन योनीतुन आत आलेले लिंग तयार झाले आणि शिव रूप म्हणून प्रमाण झाले. ते कित्येक हजारो वर्षे लोकप्रिय आणि प्रमाण मानले गेले आहे. ही सर्व रूपे सर्वसामान्य भाविकाने स्वीकारली आणि देवाचे हेच खरे रूप असे प्रमाण मानले.याबद्दल पुढे येतच आहे
तिसरी व्यक्ती भावनिकता; प्रमाण मानणारी. या प्रकारात दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत. यातील प्रथम प्रकारच्या व्यक्ती डोळे मिटून पाहिलेली मूर्ती अथवा प्रतिमा डोळ्याच्या पापण्यांवर प्रक्षेपित करून तीच ईश्वर आहे असे मानणारी. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे जरुरीचे आहे; आपण जागृत अवस्थेत डोळे मिटल्यावर आपण पापण्यांचा अंतर्भाग डोळ्याच्या बाहुल्या मधून बघत असतो मग त्यावर भावनिक प्रक्षेपण करतो ही अवस्था आपणास निद्रिस्त असताना आणता येत नाहीत येत नाही, कारण त्यावेळी डोळे सुद्धा निद्रिस्त अवस्थेत असतात. मग देवळात जाऊन मूर्तीच्या प्रतिमेसमोर उभे राहून डोळे मिटले तर तीच पंचमहाभूतांची बनलेली मूर्ती भावनिक प्रक्षेपण होऊन त्या व्यक्तीस दिसते. माझ्या मते याला मनातील भाव म्हणला जातो. परंतु हा भाव जागृत अवस्थेतच जाणता येतो निद्रिस्त अवस्थेत नाही. याच प्रकारातील दुसरा म्हणजे सर्वसामान्य भाविक, सर्वसामान्य विचार करतो. तो पंचमहाभूतांची बनलेली मूर्ती उघड्या डोळ्यांनी बघून तिलाच देव मानतो. त्याच्यावर लहानपणापासून झालेले संस्कार त्याला निर्देशीत करत असतात. मग हा भाविक शेंदूर लावलेल्या पाषाणाला ही हाच देव म्हणत असतो. तर शिवलिंगाला ही; हाच शिव म्हणून कवटाळत असतो. म्हणून अशा प्रकारचे भाविक स्थान-महिमा मानतात आणि त्याच-त्याच स्थानाला भेट देतात ज्याला ते ईश्वराशी भेट असे म्हणतात अशा प्रकारचे भाविक संख्येने जगात जास्तीत जास्त आहेत.
कदाचित याच कारणामुळे देवांच्या पंचमहाभूतांच्या प्रतिमा अथवा शिल्पे तयार झाली असावीत. याच कारणामुळे मूर्तिपूजा न मानणाऱ्या धर्मात सुद्धा देवांच्या प्रतिमा अथवा शिल्पे काही काळाने आपोआप निर्माण झाली. जेथे परमेश्वराचे अंश मानवी स्वरुपात लोकांनी पाहिले त्यांनी त्याच लोकांनी त्यांच्या प्रत्यक्ष प्रतिमा अथवा शिल्पे बनवली मग त्या वेळी मूर्तीपूजा करू नये या तत्त्वाचा त्यांना विसर पडला. प्रभू येशू ख्रिस्ताची क्रूसावरची प्रतिमा 1000 वर्ष अस्तित्वात नव्हती ती इसवी सनाच्या दहाव्या शतकात अस्तित्वात आली. इस्लाम धर्मातील भाविकानी जरी कोणतीही मूर्ती बनवली नाही तरी मक्का, म्हणजे ईश्वराच्या प्रेषिताचे जन्मस्थान ज्या दिशेस आहे त्या दिशेला पवित्र भिंती बनवून तिच्यासमोर नमाज अदा केली.
तात्पर्य, ईश्वराचे नेमके रूप भाविकाच्या नजरेस सर्वसामान्यपणे येत नाही. त्या वेळी ते मूर्तीची आराधना करतात हे सत्य नाकारता येत नाही. ज्याला मूर्तीच्या अस्तित्वाच्या पलीकडे जायचे आहे ते डोळे मिटून तिचे अस्तित्व प्रक्षेपित करू पाहतात आणि त्याला भाव म्हणतात. निद्रिस्त अवस्थेत म्हणजेच मानवाच्या सर्व अवस्थेत मनातील भाव येत नाही. हे सत्य आहे.
शेवटी काय? मूर्ती अथवा मनातील भाव यामध्ये काहीही फरक नाही.