भूगोल पर्वत हिमालय

हिमालय कोणता पर्वत आहे?

2 उत्तरे
2 answers

हिमालय कोणता पर्वत आहे?

5
हिमालय ही एक अशी पर्वत शृंखला आहे जी भारतीय ... माउंट एव्हरेस्ट हिमालयातील एक शिखर आहे.
आशियातील तसेच जगातील सर्वाधिक उंचीची विशाल पर्वतप्रणाली. हिमालय हा सर्वांत तरुण घडीचा पर्वत आहे. हिमालयाच्या उंच रांगा सतत बर्फाच्छादित असतात. हिमालय या संस्कृत शब्दातील हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे वास्तव्य. त्यामुळे हिमाचे आलय असलेला प्रदेश म्हणजे ‘हिमालय’. यावरून या पर्वताला हिमालय हे नाव पडल्याचे मानले जाते. पश्चिम-पूर्व पसरलेल्या या पर्वतश्रेणीची लांबी सुमारे २,५०० किमी., रुंदी सुमारे १५०–४०० किमी. आणि क्षेत्रफळ सुमारे ५,००,००० चौ. किमी. आहे. रेखावृत्तीय विस्तार ७३° पू. ते ९५° पू. रेखांश असा आहे. जगातील सर्वाधिक उंचीची शिखरे हिमालयात आहेत. त्यांतील ३० पेक्षा अधिक शिखरे तर ७,३०० मी. किंवा त्यापेक्षा अधिक उंचीची आहेत. उदा., जगातील सर्वोच्च शिखर मौंट एव्हरेस्ट (उंची ८,८४८ मी.), दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर के-टू (८,६११ मी.), तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कांचनजंघा (८,५९८ मी.) इत्यादी. पर्वताची रुंदी पश्चिमेस जास्त असून पूर्वेस त्यामानाने कमी आहे. भारताच्या उत्तर सरहद्दीवर पश्चिम-पूर्व दिशेत पसरलेली हिमालय ही सलग पर्वतरांग असून तिच्या उत्तरेस विस्तीर्ण असे तिबेटचे पठार, तर दक्षिणेस उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेस भारताच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये सिंधू नदी जेथे एक मोठे वळण घेते, तेथपासून किंवा तेथील नंगा पर्वत (८,१२६ मी.) शिखरापासून ते पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदी एक मोठे वळण घेऊन भारतात प्रवेश करते, तेथपर्यंत किंवा तेथील नामचा बारवा (७,७५६ मी.) या शिखरापर्यंतच्या पर्वतश्रेण्यांचा समावेश हिमालय पर्वतात केला जातो. भारताची उत्तर सरहद्द हिमालय पर्वतश्रेणीने सीमित झालेली आहे. हिमालयाचा आकार कमानीसारखा असून त्या कमानीची बहिर्वक्र बाजू दक्षिणेस भारताच्या बाजूला आहे. हिमालयाचा विस्तार भारतातील जम्मू व काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांत, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांत तसेच पाकिस्तान, चीन (तिबेट), नेपाळ, भूतान या देशांत झालेला आहे.

जगातील इतर प्रमुख पर्वतांप्रमाणेच हा पर्वतही प्राचीन सागरी तळावर वलीकरण प्रक्रियेतून उंचावला गेलेला भूसांरचनिक पर्वत आहे. हिमालयाचे वलीकरण दोन पठार शृंगांभोवती झालेले असून त्यांपैकी एक शृंग पाकिस्तानच्या सरगोधा जिल्ह्यातील किराणा हिल येथे, तर दुसरे मेघालयातील शिलाँग पठार येथे आढळते. शृंगाभोवती पर्वताला तीव्र वळण प्राप्त झालेले असते, त्याला अक्षकेंद्र असे म्हणतात. अशा दोन अक्षकेंद्रांपैकी एक केंद्र भारताच्या पाकव्याप्त काश्मीरमधील नंगा पर्वत, तर दुसरे नामचा बारवा हे आहे. हिमालयासह आशियातील पर्वतश्रेणींचा आकृतिबंध खंडाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पामीर पठाराच्या संदर्भाने स्पष्ट करता येतो. ‘पामीर नॉट’ या जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतांतर्गत पठाराचा विस्तार ताजिकिस्तान, चीन (तिबेट), भारत आणि अफगाणिस्तान यांच्या सीमाभागांत आहे. चोहोबाजूंनी पर्वतांनी वेढल्यामुळे पामीरसह हा संपूर्ण प्रदेश एक पर्वतसमुच्चय बनला आहे. पामीरपासून अनेक लहानमोठ्या पर्वतरांगा निरनिराळ्या दिशांनी विस्तारलेल्या आहेत. त्यांमध्ये पूर्वेस जाणाऱ्या अल्ताई, कुनलुन व काराकोरम या रांगा, ईशान्येकडे जाणारी तिएनशान रांग, नैर्ऋत्येकडे जाणारी हिंदुकुश पर्वतश्रेणी, तर आग्नेयीस जाणारी हिमालय पर्वतश्रेणी यांचा समावेश होतो. हिमालयाव्यतिरिक्त इतर श्रेण्या हिमालयात समाविष्ट केल्या जात नसल्या, तरी त्या हिमालयाशीच निगडित आहेत. खुद्द हिमालय पर्वतश्रेणी तसेच इतर सर्व श्रेण्यांचा विचार केला तर, भारतीय उपखंडाची काहीशी अभेद्य उत्तर सीमा निश्चित करणाऱ्या या संपूर्ण हिमालय पर्वतप्रणालीचा विस्तार पश्चिमेस आशियाच्या अगदी पश्चिम टोकापासून ते पूर्वेस आग्नेय आशियाच्या पॅसिफिक महासागर किनाऱ्यापर्यंत असल्याचे मानले जाते. हिमालयाच्या उत्तरेस सिंधू नदीच्या पलीकडील जटिल पर्वतप्रणालीत काराकोरम ही मुख्य श्रेणी असून तिचा विस्तार पामीर पठारापासून कैलास पर्वतरांगेपर्यंत आढळतो. काराकोरम श्रेणीत के–टू किंवा मौंट गॉडविन ऑस्टिन हे शिखर आहे. ध्रुवीय प्रदेशाच्या बाहेरील सर्वांत लांब हिमनद्या काराकोरम श्रेणीत आहेत. सिंधू नदीने काराकोरमबरोबरच लडाख व कैलास पर्वतश्रेण्याही हिमालयापासून अलग केल्या आहेत. ब्रह्मपुत्रेच्या वरच्या खोऱ्यामुळे हिमालयाच्या मुख्य श्रेणीपासून कैलास व नीएन चेन टांगला या श्रेण्या अलग झाल्या आहेत. हिमालयाच्या उत्तरेस असलेले तिबेटचे पठार हे जगातील सर्वाधिक उंचीवरील विस्तृत पठार असून तेही ‘जगाचे छप्पर’ म्हणून ओळखले जाते. सदैव बर्फाच्छादित असलेले मौंट कैलास (६,७१४ मी.) हे प्रसिद्ध शिखर तिबेटमध्ये आहे. ते हिंदू व बौद्ध धर्मीयांचे पवित्र ठिकाण आहे. भाविक लोक त्यांच्या देव-देवता आणि साधु-संतांचे वास्तव्य येथे असल्याचे मानतात. कैलास शिखरापासून जवळच पवित्र मानसरोवर आहे.

हिमालय पर्वताच्या संदर्भात मराठी विश्वकोशात पुढील शीर्षकांनी स्वतंत्र नोंदी घेण्यात आलेल्या आहेत.

अनु. क्र. नोंदींचे नाव अनु. क्र. नोंदींचे नाव
१ हिमालय पर्वताची निर्मिती ९ हिमालय पर्वतातील पर्यटन
२ हिमालय पर्वताची प्राकृतिक रचना १० हिमालय पर्वतातील वनस्पती व प्राणिजीवन
३ हिमालय पर्वताचे पश्चिम-पूर्व विभाग ११ हिमालय पर्वतातील वाहतूक
४ हिमालय पर्वताचे प्रादेशिक विभाग १२ हिमालय पर्वतातील सरोवरे
५ हिमालय पर्वताचे महत्त्व १३ हिमालय पर्वतातील हवामान
६ हिमालय पर्वतातील खिंडी १४ हिमालय, प्राचीन वाङ्मयातील
७ हिमालय पर्वतातील गिर्यारोहण व समन्वेषण १५ हिमालयाच्या ईशान्येकडील पर्वतरांगा व टेकड्या (पूर्वांचल)
८ हिमालय पर्वतातील नद्या वा हिमनद्या १६ हिमालयाच्या समांतर पर्वतश्रेण्या
 


उत्तर लिहिले · 7/11/2021
कर्म · 121765
0

हिमालय हा जगातील सर्वात उंच आणि तरुण वली पर्वत आहे.

वली पर्वत म्हणजे काय? भूगर्भीय हालचालींमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर दाब निर्माण होऊन खडक वळ्या पडतात आणि उंचवट्याच्या स्वरूपात दिसतात, त्यांना वली पर्वत म्हणतात.

हिमालय पर्वताची काही वैशिष्ट्ये:

  • हा पर्वत भारतीय उपखंडाला तिबेटपासून वेगळा करतो.
  • हिमालयात अनेक महत्त्वाच्या नद्या उगम पावतात, ज्यामुळे उत्तर भारतातील शेती समृद्ध आहे.
  • जगातील सर्वात उंच शिखर, माउंट एव्हरेस्ट, हिमालयातच आहे.

अधिक माहितीसाठी, आपण विकिपीडिया ( https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF ) ला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1780

Related Questions

सर्वात जास्त तिखट फळ कोणते आहे?
जगात सर्वात जास्त स्वच्छ व साफ पाणी कुठे आहे?
जगात सर्वात जास्त गोड पाणी कुठे आहे?
मला गाव नकाशा पाहिजे, ज्यात मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणे असावीत. तो कुठे मिळेल?
कर्नाटकची बॉर्डर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला लागून आहे?
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील. सर्वात मोठा जिल्हा कोणता?
कोणती नदी संपूर्ण देशातून वाहते?