पर्यावरण
पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व काय आहे?
2 उत्तरे
2
answers
पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व काय आहे?
0
Answer link

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व’
पृथ्वीवरील जीवसृष्टी ज्या विशिष्ट अधिवासात व नैसर्गिक परिस्थितीत जगते, त्या सर्व पाश्र्वभूमीला सर्वसाधारणपणे ‘पर्यावरण’ असे म्हटले जाते. या पर्यावरणातील एक घटक म्हणजे माणूस. या माणसाच्या बुद्धिमत्तेमुळे आज पृथ्वीवर त्याचे अधिपत्य आहे. त्यामुळे उन्मत्त होऊन पर्यावरणाची पर्वा न करता त्याने विकास साध्य करण्याचे ठरविले तर तो विकास साबणाच्या फुग्याप्रमाणे
आकर्षक दिसेल पण क्षणभंगूर ठरेल.
या विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, म्हणून प्रदूषणाचे प्रमाण कमी करून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी व त्यातून चिरंतन विकास साध्य करण्यासाठी प्रामुख्याने पुढील उपाययोजना करता येतील.
१) पर्यावरणाबाबत जागृती व शिक्षण : अलीकडे पर्यावरण शिक्षणाचा शालेय तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश झाला, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. लहान वयातच पर्यावरण समस्यांची जाणीव झाली तर मोठेपणी आपली जबाबदारी लक्षात घेऊन पर्यावरणाची काळजी घेणारे सुजाण नागरिक निर्माण होण्यास मदत होईल. पर्यावरणासंबंधीची माहिती व्याख्यानांद्वारे, प्रदर्शनाद्वारे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविणे व त्यांनी चंगळवादी जीवनशैली न स्वीकारता पर्यावरण- सुसंवादी जीवनशैली स्वीकारणे महत्त्वाचे ठरेल.
२) कायदे व नियम - पर्यावरणाला हानिकारक कृती करणाऱ्यांवर कठोर कायद्यांचा वापर करून दंडात्मक कारवाई झाली तरच समाजाला शिस्त लागेल व बेजबाबदार वर्तणुकीला आळा बसेल. या कडक कायद्यांमुळेच सिंगापूर स्वच्छ आहे.
३) नावीन्याचा शोध : प्लॅस्टिकसारख्या मानवनिर्मित अनेक घटकांमुळे पर्यावरणाची हानी झाली असली, तरीही पूर्वीच्या अनुभवावरून शहाणे होऊन नवीन पर्यावरण सुसंवादी सामग्रीचा शोध चालू ठेवायला हवा तरच विकास आणि पर्यावरण या दोन्हींमध्ये संतुलन राखता येईल व पर्यावरणाची हानी न करता विकास साध्य करता येईल.
४) पर्यायी साधनसंपत्तीचा शोध : खनिज तेल, कोळसा यासारखी ऊर्जा निर्माण करणारी साधनसंपत्ती वापरल्यावर नष्ट होते व त्यामुळे काही वर्षांनी ही साधनसंपत्ती संपुष्टात येईल. ती अधिक काळ वापरता यावी यासाठी सध्या खनिज तेलाच्या जागी जलविद्युत वापरता येणे शक्य आहे का? बसने प्रवास करण्याऐवजी विजेवर चालणाऱ्या ट्रेनने प्रवास केल्यास खनिज तेलाची बचत होईल. प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्जऐवजी कापडी पिशवीचा वापर करणे चांगले. रासायनिक खतांपेक्षा शेणाचा वापर अधिक पर्यावरण सुसंवादी आहे.
५) पुनर्वापर : एखादी वस्तू वापरून झाल्यावर लगेच टाकून देण्याऐवजी तिचा पुनर्वापर करता येईल का, याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. आपल्या अवती-भवती असणाऱ्या अनेक घटकांचा आपण पुनर्वापर करू शकतो. उदा. शेण टाकून देण्यापेक्षा त्याचा बायोगॅस निर्मितीसाठी वापर करता येईल. तसेच नैसर्गिक खत म्हणूनही वापर करता येईल.
६) साधनसंपत्तीचे संवर्धन : पाण्याला जीवन असे संबोधले जाते. खरोखरच पाणी नसेल तर पृथ्वीवरील जीवनच संपुष्टात येईल व त्यासाठी पाण्याचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. तसेच, वनस्पतींच्या वाढीसाठी माती अत्यावश्यक आहे व त्यामुळे मृदेचे संवर्धन महत्त्वाचे आहे. तर, डोंगर उतारावर झाडे लावल्यामुळे मातीची धूप कमी होते, जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढते. एकंदरीत परिसंस्थेचे संतुलन कायम राखण्यासाठी वनांचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. अशा तऱ्हेने पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वानी पर्यावरण सुसंवादी जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे. यासाठी हाव न धरता, पर्यावरणातील घटक ओरबाडून न घेता आवश्यक तेवढेच गरजेपुरते घेतले पाहिजे. अशा प्रकारे ‘जागतिक पर्यावरण दिनाचे’ औचित्य साधून प्रत्येकाने प्रत्येक दिवशी पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.पर्यावरण व्यवस्थापन
मानवी कृतींमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढविणे व पर्यावरणाची स्थिती सुधारणे या ध्येयांसाठी जाणीवपूर्वक केलेली कृती. पर्यावरणाच्या अवनतीमुळे सर्व सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यावरणतज्ज्ञ, अभ्यासक, शासक, प्रशासक, सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते या समस्यांवर विचारविनिमय करीत आहेत. त्यातूनच पर्यावरण व्यवस्थापन ही संकल्पना पुढे आली आहे. पर्यावरण व्यवस्थापन ही विकास व नियोजनाच्या संदर्भातील संकल्पना आहे. यात समाजाचा सर्वांगीण विकास करणे तसेच नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर करून सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे, ही उद्दिष्टे अभिप्रेत आहेत. त्याचबरोबर मानवाच्या अविचारी कृतींवर नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय समस्यांच्या निवारणासाठी निर्धारित केलेली तत्त्वे यांचा पर्यावरण व्यवस्थापनात समावेश होतो. मानवाच्या सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर पर्यावरणाची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न यातून केला जातो.
पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यावरणाच्या आपत्तीवर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया ही पर्यावरण व्यवस्थापनाचे एक अंग असून यात नियोजन, विश्लेषण व मूल्यांकन यांच्या आधारे संसाधनांचा विचारपूर्वक उपयोग करण्याचे तंत्र वापरले जाते.
पर्यावरणाचे व्यवस्थापन विशिष्ट प्रदेश किंवा राष्ट्र यांच्याशी मर्यादित नसून ती संपूर्ण जगाची गरज आहे. भविष्यात मानवी समाजाच्या समन्यायक्षम उपयोगासाठी परिसंस्थांचे रक्षण करणे व परिसंस्थांतील अखंडत्व राखणे हे पर्यावरण व्यवस्थापनाचे ध्येय आहे.
पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे
पर्यावरणातील निरनिराळ्या घटकांचे संशोधन करणे.
पर्यावरणाच्या नियोजनाची रूपरेषा तयार करणे.
पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त ठेवणे.
मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे.
अवक्षय होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे.
पर्यावरणाचा दर्जा राखला जावा म्हणून विशिष्ट नियमावली वा तत्त्वे ठरविणे. प्रदूषण नियंत्रणाद्वारे पर्यावरणाच्या गुणवत्तेचे रक्षण करणे.
व्यवस्थापनासाठी उपायांचे समीक्षण करणे व त्यात सुधारणा करणे.
व्यवस्थापनासाठी नियोजित केलेल्या उपायांच्या परिणामांची तपासणी करणे.
पर्यावरण व्यवस्थापनासाठी साहित्यसंग्रह करणे.
पर्यावरण शिक्षण देण्याची व्यवस्था करणे आणि समाजात जाणीव व जागृती निर्माण करणे.
संसाधनांचा बहुउद्देशीय वापर करून पारिस्थितिकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न करणे.
जैवविविधतेचे परिरक्षण करणे.
स्वच्छ तंत्रज्ञान उत्पादन संकल्पना स्वीकारणे.
पर्यावरण संधारणासाठी नियम व कायदे करून त्यांची अंमलबजावणी करणे.
पर्यावरण व्यवस्थापनाचे धोरण
पर्यावरणीय अवनती टाळण्यासाठी हवा प्रदूषण, जलप्रदूषण व भूमिप्रदूषण यांवर प्रभावीपणे नियंत्रण आणणे व कार्यक्षम उपाय योजणे.
ऊर्जा संसाधनांसह इतर सर्व संसाधनांचा अतिवापर टाळणे व टाकाऊ पदार्थांची कमीत कमी निर्मिती व्हावी यासाठी कमी खर्चिक परंतु कार्यक्षम तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे.
शाश्वत विकासासाठी उत्पादन निर्मितीकरिता स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करणे.
शाश्वत विकासासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन तपासणी, पर्यावरण व्यवस्थापन पद्धती, पर्यावरण जोखीम मूल्यमापन इत्यादी साधनांचा स्वीकार करणे.
व्यापक स्तरावर पर्यावरणीय जगजागृती व्हावी यासाठी प्रोत्साहन देणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण समस्यांची समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे.
शैक्षणिक स्तरावर पर्यावरण शिक्षण व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे.
लोकसंख्या वाढीस प्रतिबंध व्हावा यासाठी योजना आखणे.
सामाजिक समन्याय व्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणे.
पर्यावरणाच्या प्रमुख घटकांचे व्यवस्थापन
पर्यावरण हे जैविक तसेच अजैविक घटकांपासून बनलेले असते. असे व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे. पर्यावरणातील काही प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत :
वन व्यवस्थापन,
वन्यजीव व्यवस्थापन,
0
Answer link
पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अनेक कारणांसाठी आहे:
- नैसर्गिक संसाधनांचे जतन: पर्यावरण संवर्धन आपल्याला नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यास मदत करते, जेणेकरून ते भावी पिढ्यांसाठी उपलब्ध राहतील.
- पर्यावरणाचा समतोल राखणे: पर्यावरण संवर्धनामुळे परिसंस्थेतील नैसर्गिक समतोल राखला जातो. प्रत्येक सजीव आणि निर्जीव घटकाचे महत्त्व टिकून राहते.
- प्रदूषण कमी करणे: पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण कमी होते, ज्यामुळे आपले आरोग्य सुधारते.
- वन्यजीवनाचे संरक्षण: पर्यावरण संवर्धन वन्यजीवनाचे संरक्षण करते. त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे जतन करणे महत्त्वाचे आहे.
- हवामान बदल रोखणे: पर्यावरण संवर्धनाच्या उपायांमुळे हवामान बदलाच्या गंभीर समस्यांना तोंड देण्यास मदत होते.
- नैसर्गिक आपत्ती कमी करणे: पर्यावरण संवर्धनाने नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी होतो.
थोडक्यात, पर्यावरण संवर्धन करणे हे आपल्या जीवनासाठी आणि पृथ्वीच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.