दिनविशेष दिनदर्शिका सामाजिक महिला दिन

महिला दिनविशेष बद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

महिला दिनविशेष बद्दल माहिती मिळेल का?

2
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

संपूर्ण अमेरिका आणि यूरोप जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत,सर्व जगातच, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली. त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला. स्त्रीवाद किंवा फेमेनिझम हा मूळ फ्रेंच शब्द. तो जेव्हा पहिल्यांदा वापरला गेला, तेव्हा त्याची सर्वत्र टर उडवली गेली. आणि कमाल म्ह्णजे राणी व्हिक्टोरियाही या चेष्टेत सामील होती, तिने स्त्रीवाद म्हणजे मूर्खता, पाप आणि महाचूक अशी त्याची संभावना केली.

       मुळात, नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंगविषमता खटकू लागली. पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या. आणि मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या. स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे.

स्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्ववेत्तीने लिहिलेल्या  ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकातून. सन 1792 मधे तिने अतिशय स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करुनच केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, पण स्वत:ला मनापासून काय आवडते, ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची कुवतही ती गमावून बसते.' मुळात 1792 सालात असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरूध्द पोहण्यासारखे होते. या परखड आणि धाडसी विचारांमुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते.

दुसरे महत्वाचे नाव आहे ते एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन. यांनी पहिल्या 'विमेन्स राईट्स कन्व्हेन्शन'ची स्थापना केली. याशिवाय, स्त्रियांना नोकरी करता यावी, विद्यापीठांमधे प्रवेश मिळावा म्हणून मरियन हाईनिश या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला. तर, केट शेफर्ड यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यूझिलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला. १८९३ साली न्यूझिलंडमधे झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीमधे पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला. पुढे अनेक देशांमधे मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले. ब्रिटनमधे, एमिलिन पॅन्खर्स्ट हिने महिलांच्या मतदानाच्या अधिकरासाठी स्त्रीवादी चळवळ उभारली. कॅरोलिन एगान हे नाव तर प्रत्येक स्त्रिने लक्षात ठेवावे, असे आहे. कारण, मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरुच असलेल्या लढ्याची ती पहिली पुरस्कर्ती.

१८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली.

दि. 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्युयॉर्क येथे, थेरेसा मालकियल यांच्या मार्गदर्शनाखाली ' सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका' यांनी आयोजित केलेला महिला दिन, हा अगदी पहिला महिला दिन होता, असे मानले जाते.

पण तत्पूर्वी, ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.  दि. 8 मार्च 1917 या दिवसाचे मात्र, विशेष महत्व आहे. ग्रेगेरियन कॅलेंडरमधील, दि. 8 मार्च 1917 रोजी, पॅट्रॉग्राड या रशियन साम्राज्याच्या राजधानीत, वस्त्रोद्योगातील स्त्री कामगारांनी संपूर्ण शहरभर निदर्शने केली. ही रशियन राज्यक्रांतीची सुरुवात मानली जाते. सेंट पिट्सबर्ग मधील महिला ' ब्रेड व शांतता' या मागणीसाठी संपावर गेल्या. त्यांनी पहिले महायुद्ध समाप्त करण्याची, रशियातील अन्न तूटवडा संपुष्टात आणण्याची तसेच झारशाहीचा अंत करण्याची मागणी केली.लिओन ट्रॉटस्कीने लिहिले आहे की, ' 23 फेब्रुवारी (8 मार्च) हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस होता. महिलांच्या बैठका, कारवाया यांचा पूर्वअंदाज जरी होता तरी हा महिला दिन रशियन राज्यक्रांतिची नांदी असेल, अशी पुसटशी कल्पना कोणालाही आली नव्हती. या दिवशी, व्यवस्थेच्या विरोधात जाऊन, सगळे आदेश झुगारुन अनेक वस्त्रोद्योग कारखान्यातील स्त्री कामगार आपापले काम सोडून कारखान्यातून बाहेर पडल्या, संपाला पाठिंबा मिळविण्यासाठी, त्यांनी ठिकठिकाणी प्रतिनिधी पाठविले; त्याची परिणीती सामुदायिक संपात झाली. सर्व स्त्री कामगार लढ्यासाठी रस्त्यावर उतरल्या. सात दिवसानंतर रशियन सम्राट- दुसरा निकोलस याला पायउतार व्हावे लागले. सत्तेवर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार मंजूर केला.'

सन 1917 मधे झालेल्या रशियन राज्यक्रांती नंतर व रशियाने स्वीकार केल्यानंतर हा दिवस जगभरातील साम्यवादी देशांत व चळवळीत साजरा केला जाऊ लागला. चीनमधील साम्यवादी, सन 1922 पासून तो साजरा करतात.

   संयुक्त राष्ट्रांनी, आंतरराष्ट्रीय महिला वर्षापासून म्ह्णजेच 1975 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. सन 1977 मधे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सदस्य राष्ट्रांना आमंत्रित करून घोषित करण्यात आले की, 8 मार्च हा संयुक्त राष्ट्रांचा महिला हक्क व शांतता दिन असेल

उत्तर लिहिले · 4/3/2019
कर्म · 2410
0

जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांसाठी आणि समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे.

इतिहास:
  • १९०९: अमेरिकेत पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.
  • १९१०: क्लारा Zetkin यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची कल्पना मांडली.
  • १९११: पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये साजरा करण्यात आला.
  • १९७५: संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून मान्यता दिली.
महत्व:
  • महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन देणे.
  • महिला हक्कांसाठी जागरूकता वाढवणे.
  • लैंगिक समानता (Gender equality) आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे.
कसा साजरा करतात:
  • महिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • महिलांना सन्मानित केले जाते.
  • महिलांच्या हक्कांसाठी चर्चासत्रे आयोजित केली जातात.

अधिक माहितीसाठी, आपण युनेस्को (https://www.unesco.org/en/days/international-womens-day) किंवा संयुक्त राष्ट्र (https://www.un.org/en/observances/international-womens-day) या वेबसाइट्सला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

महिला दिनाचा इतिहास काय आहे, सुरुवात कशी झाली?
आंतरराष्ट्रीय (जागतिक) महिला दिन केव्हा साजरा केला जातो?
जागतिक महिला दिनाबद्दल माहिती मिळेल का?