समाज सेवा समाज युवा लिखाण

समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी या विषयावर निबंध लिहा?

2 उत्तरे
2 answers

समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी या विषयावर निबंध लिहा?

7
मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन."  - थॉमस हक्सले


खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत?  हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत  - खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या  तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.


तरुण वर्गाविषयी विचार व त्यांना देण्यात येत असलेले महत्त्व वेगळ्या प्रकारचे आहे. समाजाचा विचार करताना वर्गानुसार, जातीनुसार गट पाडुन विश्लेषण केले जाते. वयानुसार समाजाची विभागणी करुन युवक हा वेगळा सामाजिक गट निर्माण करण्याची प्रवृत्ती नवीन आहे. त्याचप्रमाणे तरुण माणसांनाही आपण युवक म्हणुन कोणीतरी वेगळे आहोत, वेगळी सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे व समाज परिवर्तनाच्या कामात आपल्याला विशेष स्थान आहे, ही जाणीव होत आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत आसतानाच काही गोष्टींचे भान तरुण वर्गाने ठेवले पाहीजे या मध्ये प्रमुख म्हणजे नैतिकता, विचारसरणी व आदर्शवाद.  आपण जसे वागणार आहोत, जी कार्ये करणार आहोत ती इतर  कुणाला लक्षात ठेवाविशी वाटली नाहीत तरी काळ व इतिहास यांना मात्र निश्चितच नोंद घ्यावी  लागेल. इतिहास हा संदर्भासाठी असतो. जेव्हा नवीन पिढी गतकाळाची पाने उलगडुन बघेल त्यावेळेस आत्ताचा इतिहास त्यांना सामोरा येईल. माणूस अनुकरणप्रिय जरुर आहे, मात्र ब-याचवेळेस वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होते. उद्या एखाद्या चुकीच्या प्रथेचा पायंडा पडू नये याची खबरदारी घेणे हे प्रत्येक तरुण पिढीसमोरील प्रथम आव्हान आहे. त्यामुळे आज ज्या वाटेवर आपण चालतोय ती नैतिक की अनैतिक हे बघणे गरजेचे आहे. 


 बरं, हे निकष लावताना कशाचा आधार  घ्यावयाचा ! याबाबत सुनिता देशपांडेंचे विचार पहा - कशाला वाईट म्हणावे व कशाला चांगले? कशापेक्षा काय बरं, अगर कशापेक्षा काय वाईट ?  आपल्या हाती समांतर आयुष्य थोडच आहे, शिवाय आपली मतंदेखील बदलत असतात. विशेषतः परतीचे वारे वाहु लागले, की त्यांची चाहुल संवेदनशील माणसांना लगेच लागते आणी मग सिंहांवलोकन सुरु झालं  की सगळं उलट्याच पालट  दिसु लागत. यावेळी उपयोगी पडतात ते आदर्श. जगातील प्रत्येक माणुस नियतीने नेमलेली कामे करत असतो. तो आदर्श आहे का नाही हे त्याने केलेल्या कामच्या यशावर अवलंबुन असतं. आदर्शवादानेच बघायला गेल तर प्रत्येक माणुस हा आपल्यातच एक आदर्श बनत असतो. 


एका प्रसिद्ध वाक्यामध्ये सांगायचे म्हटले तर  We don't need  followers, we need  Ideals. पण तरीसुद्धा मान्यता पावलेले आदर्श व्यक्तिमत्व नेहमीच आपल्याला उपयुक्त ठरेल. भारतीय युवकाच्या दृष्टिने स्वामी विवेकानंद, महात्मा   गांधी व अगदिच अलिकडल्या काळातील म्हटले तर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख होईल. यानांच आदर्श का म्हणावे यामागील काही महत्वाची कारणे विषद करणे मला महत्वाचे वाटते. त्यांचे नुसते ज्ञानच प्रचंड आहे ,एवढेच नाही तर  त्यांची नैतिकता व सखोल विचार  करण्याची प्रवृत्ती. गौतम बुद्धानी  केलेल्या , " मी सांगतो आहे म्हणुन माझ्यावर विश्वास ठेवु नका, धर्मग्रंथात आहे म्हणुन आंधळेपणाने स्विकार करु नका तर सर्व विचार तुमच्या बुद्धिवर तपासुन पहा आणि योग्य अयोग्य काय ते ठरवा " , या उपदेशाचे तंतोतंत त्यांनीं पालन केले.  साधे जीवन जगत उच्च विचारसरणी जोपासली. त्यांची काम करण्याची पद्धत, सचोटी, जगाकडे व जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन, काहीतरी बनुन दाखवण्याची मनीषा व आपण जगाला काहीतरी देणे लागतो ही भावना  हे त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक पैलुंपकी काही आहेत. 


ही आदर्श व्यक्तिमत्व घराघरात नुसती पोहोचवणच नव्हे तर ती तिथे रुजवण व निर्माण करणे युवकांपुढे  प्राथमिक आहे. हे घडवताना काही जोड आव्हाने , उदाहरणार्थ प्रबोधन, शिक्षण, बेरोजगारी सारखी युवा वर्गासमोरील मोठी समस्या, आदर्शवाद व वै चारीक जडणघडण इत्यादी विचारात घेणे आवश्यक आहे. आजची पिढी रुळ सोडुन धावते आहे ,असे स्वर  कानी पडतात. अशा या द्रुतगतीने धावण्या-या गाडीला एका चालकाची गरज आहे व तो चालक म्हणुन आपल्याला युवा प्रबोधनाकडे पाहता येईल. 19 व्या शतकातील ज्या प्रकारची युरोपची उन्नती झालेली दिसते त्यामध्ये युवा प्रबोधनामुळे झालेले चमत्कार  ठळकपणे दिसून येतात. भारतामध्येही असे प्रबोधन गेल्या काही वर्षात वेगाने झाले. पण यास परंपरागत पार्श्वभुमीची सांगड होती. त्यामुळे हे  प्रबोधन वरचेवर  राहीले व त्याची सामन्य तरुणांवर तितकिशी पकड बसली नाही. तेव्हा खेड्यापाड्यातील तरुणांना प्रबोधीत करणे हे एक महत्वाचे व आकाराने मोठे असे आव्हान म्हणता येईल. 


या प्रबोधनाचे फ़लीत म्हणुन आपणास युवक चळवळीकडे बघता येईल. स्वातंत्र चळवळीनंतर, देशव्यापी स्वरुपावर फ़क्त संपच दिसतात. युवकांना राजकारणी लोक केवळ मतदार म्हणून पहातात व राजकीय फ़ायद्यासाठी त्यांचा उपयोग बरेचदा करुन घेतात. त्यांच्या समस्यांकडे  ख-या अर्थाने पाहिलेच जात नाही. युवा संघटना, मग ती कुठलीही असो, अभाविप वा इंदिरा युवक कॉग्रेस, विद्यापिठांच्या वा विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादीत रहाते. युवकांचे सामाजिक प्रबोधन,  रोजगार  उपलब्धता, व्यक्तिमत्व विकास यांकडे कानाडोळा केला जातो. ही परिस्थीती हाताबाहेर जाण्याआधीच युवकांना जागृत करणं व त्यांच्या इच्छाशक्तीला प्रबळ चालना देणे नैमित्तीक आहे.  तरुण पिढिला धेयवादी व आदर्शवादी बनविण्याची ताकद त्यांच्या  इच्छाशक्तीच्या विकासात आहे. 



ध्येयाच्या वेदना मनाला होउ दे

वार तुझ्या प्रत्येक क्षणास होऊ दे,

अशक्य सुद्धा म्हणेन शक्य आहे,

इतका गर्व तुझ्या बुद्धीच्या मीपणास होऊ दे !



जेव्हा या तरुणांना ध्येयाने पछाडले जाईल, संकटांना सामोरे जाण्यासाठी निधडी छाती निर्माण होईल, आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य अंगी येईल  त्यावेळेस उज्ज्वल भारतवर्षाची निर्मिति होऊ शकेल. ही जबाबदारी पेलणे हे जबरदस्त आव्हान नियतीने तरुणां समोर ठेवले आहे. या आव्हानाला सामोरे जाताना दुसरे पुढे ठाकणारे आव्हान म्हणजे समाजकारण व राजकारणात युवा शक्तीचा सहवास. ढोबळमानाने युवा समाजाचा विकास हाच उद्याच्या समाजाचा विकास आहे. फ़ायद्याच्या राजकारणापासुन स्वतःला दुर  ठेवणे व समाजाच्या फ़ायद्यासाठी काम करणे हेच हितावह ठरेल. पाश्च्यात्त्य युवक चळवळीपांसून एकांगी व असमज धडा घेणारे मुठभर विद्यार्थी, मॉड तरुण, तथाकथीत संतप्त तरुण साहित्यिक व राजकीय पक्षांच्या अधीन असलेल्या गटांच्या मोहजालातुन सुटणे व या घटकांना सरळ करणे कालप्राप्त ठरेल.



सामाजिक क्रांती व संस्कृती यांचा सरळ संबंध आहे. काळानुरुप व विज्ञानाची कास धरुन विकसीत पावताना सांस्कृतिक वारसा जपणं हे ओघाने आलेच.   भारताचा विचार करता, जिथे 70 टक्क्याहुन अधिक जनता खेडयांमध्ये रहाते तिथे दर्जेदार ग्रामव्यवस्थेचा वारसा जपण व सद्यपरिस्थीतिल ग्राम संस्कृतीची  जपणुक करणं, त्यात कालानुरुप मात्र योग्य बदल करण हे सुद्धा युवा खांद्यावरील कर्तव्य आहे. महात्मा गांघीनी त्यांच्या 'युवक हे आव्हान स्विकारतील काय ?' या निबंधात लिहिलंय , " देशातील युवक जर त्यागमय जीवनास तयार होतील तरच ग्रामप्रधान संस्कृतितील दोषांचे निवारण करण्याचे मी सुचवलेले उपाय कार्यान्वित होउ शकतील. तसे ते करु इच्छीत असतील युवकांना त्यांच्या जीवनक्रमात आमुलाग्र बदल घडवुन आणावा लागेल " .  शहरी भागातील तरुणांनी इतर खेडुत भागातील युवकांना शिक्षीत व संघटीत करण, तेथील जनतेशी निरोगी संबध निर्माण करण्यासारख्या प्रयत्नांवरच इतर आव्हाने पेलण्याची सक्षमता येउ शकेल. खेड्यातील तरुणांध्ये संघर्ष करण्याची भावना प्रज्वलित ठेवण हे त्यांच्या प्रगतीतील महत्वाचं  अस्त्र ठरु शकेल.

धन्यवाद
उत्तर लिहिले · 24/9/2018
कर्म · 20585
0

समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी

युवक हे कोणत्याही देशाचे भविष्य असतात. ते केवळ देशाचे आधारस्तंभ नाहीत, तर ते समाजाला नवी दिशा देणारे ऊर्जास्रोत आहेत. समाजाच्या प्रगती आणि विकासासाठी युवकांनी सक्रिय भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या युगात, युवकांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे, कारण त्यांच्या हातात तंत्रज्ञान आहे, नवीन विचार आहेत आणि जगाला बदलण्याची क्षमता आहे.

1. शिक्षण आणि जागरूकता:

  • युवकांनी चांगले शिक्षण घेणे आवश्यक आहे. शिक्षणाने त्यांना ज्ञान मिळते आणि जगाला समजून घेण्याची दृष्टी विकसित होते.
  • त्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्यांविषयी जागरूक असले पाहिजे.
  • विविध विषयांवर माहिती मिळवून, विश्लेषण करून योग्य मत तयार करण्याची क्षमता त्यांच्यात असावी.

2. सामाजिक सहभाग:

  • युवकांनी समाजाच्या भल्यासाठी सक्रियपणे सहभागी झाले पाहिजे.
  • रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अशा सामाजिक कार्यांमध्ये योगदान दिले पाहिजे.
  • गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

3. नेतृत्व क्षमता:

  • युवकांनी नेतृत्व क्षमता विकसित केली पाहिजे.
  • आपल्याgraduation शिक्षण संस्था, कार्यक्षेत्र आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
  • टीमवर्क, संवाद कौशल्ये आणि निर्णय क्षमता यांसारख्या गुणांची जोपासना केली पाहिजे.

4. नविनता आणि तंत्रज्ञान:

  • आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. युवकांनी नवीन तंत्रज्ञान शिकून ते समाजाच्या विकासासाठी वापरले पाहिजे.
  • नवीन कल्पना आणि संशोधनांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
  • स्टार्ट-अप्स आणि उद्योगांमध्ये सहभागी होऊन, त्यांनी रोजगार निर्माण केले पाहिजे.

5. नैतिक मूल्ये आणि जबाबदारी:

  • युवकांनी नैतिक मूल्यांचे पालन केले पाहिजे.
  • प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा आणि न्यायावर विश्वास ठेवला पाहिजे.
  • आपल्या कृतीतून समाजाला एक सकारात्मक संदेश दिला पाहिजे.

6. पर्यावरणाचे रक्षण:

  • युवकांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जागरूक असले पाहिजे.
  • प्लास्टिकचा वापर कमी करणे, कचरा व्यवस्थापन आणि ऊर्जा वाचवणे यांसारख्या गोष्टींमध्ये सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे.
  • प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

7. राजकारण आणि प्रशासन:

  • युवकांनी राजकारणात सक्रियपणे भाग घेतला पाहिजे.
  • योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदान केले पाहिजे.
  • प्रशासकीय धोरणांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि आवश्यक बदल सुचवले पाहिजे.

युवकांनी आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून, समाजाला एक नवी दिशा दिली पाहिजे. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, सतत शिकत राहिले पाहिजे आणि आपल्या देशाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे.

निष्कर्ष:

समाजाच्या उभारणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी शिक्षण, सामाजिक सहभाग, नेतृत्व क्षमता, नविनता आणि नैतिक मूल्यांच्या आधारावर एक सशक्त आणि विकसित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5220

Related Questions

हे बेलचे चूक लक्षात आणून देणारे युवकांचे कोणते उद्गार परिषदेत आले आहेत?
आजचा युवक म्हणजे काय?
समाज घडविण्यासाठी युवकांची जबाबदारी कोणती आहे?
असहिष्णुता नियंत्रणात तरुणांची भूमिका कोणती आहे?
भारतीय राजकारणात युवकांची भूमिका काय आहे?
समाज आणि आजचा युवक या विषयावर निबंध लिहा?
समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी (राजकारण निबंध)?