गडदुर्ग किल्ले इतिहास

प्रतापगड किल्ल्याविषयी माहिती?

2 उत्तरे
2 answers

प्रतापगड किल्ल्याविषयी माहिती?

4
          पौराणिक व एतिहासिक संदर्भ लाभलेल महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील पर्यटकांच आवडत पर्यटन स्थळ आहे. ''महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात'' शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला तो म्हणजे ''प्रतापगड''. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला. महाबळेश्वरच्या सानिध्यात असलेला हा किल्ला आजही सुस्थितीत उभा आहे. प्रतापगडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत जाणारा गाडीमार्ग, किल्ल्यावर फिरण्यासाठी बनवलेल्या सिमेंट रूंद पायर्याड, रस्ते व किल्ल्यावर उपलब्ध असलेली खान पान सेवा यामुळे किल्ल्यावर पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.

          प्रतापगडाच्या दक्षिणेस असलेल्या टेहाळणी बुरुजाखाली वाहनतळ आहे. येथून गडावर जाताना उजव्या बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत जागोजागी "जंग्यांची" रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे.

          प्रतापगडाचा पश्चिमाभिमूख दरवाजा तटबंदीत लपवलेला आहे. या महाद्वाराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. जमिनीपासून उंचावर असल्यामुळे हत्ती किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येत नसे. महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांतसाठी देवड्या (विश्रांतीकक्ष) आहेत. यातील उजव्या बाजूच्या देवडीत एक प्रचंड तोफ ठेवलेली आहे. महाद्वारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला लांबवर पसरलेली माची आहे. माची वरून वाट टेहाळणी बूरुजावर (जीवा महाला बुरुज) जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. या बुरुजा खालीच वहानतळ आहे. बुरुजावरून प्रतापगडाचा बालेकिल्ला, जावळीचे खोरे व उजव्या बाजूला एका उंचवट्यावर असलेली अफजलखानाची कबर दृष्टीपथात येते.

          प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास, १६५६ मध्ये चंद्रराव मोर्यांकचा पराभव करुन शिवाजी महाराजांनी 'जावळी' ताब्यात घेतली. त्यावेळी जावळीच्या खोर्यारत पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर ''भोरप्या डोंगर'' एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. या भोरप्या डोंगरावर किल्ला बांधण्याची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दूर्गबांधणीचे कौशल्य पणाला लावून १६५८ साली बुलंद व अभ्येद्य किल्ला तयार केला; तोच हा प्रतापगड.

          इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोर्यानत आणले. दिनांक ९ नोव्हेंबर १६५९ रोजी दूपारी २ वाजता शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून दिला. स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. इ.स. १६६१ मध्ये महाराजांनी गडावर महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली. इ.स १६५९ ते १८१८ ह्या प्रदिर्घ कालखंडात १६८९ सालातील काही काळ वगळता हा किल्ला शत्रुला जिंकता आला नाही.

          टेहळणी बुरुज पाहून परत किल्ल्याच्या महाद्वारापाशी यावे. येथून पायर्यां ची वाट गडावर गेली आहे. या वाटेच्या डाव्या बाजूस सध्या वापरात नसलेली वाट, दूसरा आणि तिसरा दरवाजा आहे. पायर्याळ चढून वर गेल्यावर आपण श्रीभवानी मंदिरात पोहोचतो. येथे काही हॉटेल्स आहेत. श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा पाहायला मिळतात. मंदिरातील महिषासूरमर्दिनीच्या रुपातील भवानी मातेची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीच्या काठावरुन आणलेल्या खास शिळेमधून घडवलेली आहे. मंदिरात स्फटीकाचे शिवलिंग आहे. मंदिरासमोर दगडी दिपमाळा आहेत. मंदिरामागील पायवाटेने आपण गडाच्या टोकावर असलेल्या स्नानाचे तळे (नैऋत्य तलाव) व तटबंदीत असलेला चोर दरवाजा पाहू शकतो.

          श्रीभवानी मंदिराकडून बालेकिल्ल्याच्या पायर्याा चढतांना उजव्या हातास श्रीसमर्थांनी स्थापन केलेला हनुमान आहे. बालेकिल्ल्यावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व छोटी बाग आहे. गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला अनुक्रमे दुपदरी बांधणीचा यशवंत बुरुज व रेडका बुरुज आहे. या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे. ह्या खेरीज गडावर वेताळाचे मंदिर, स्वयंभू केदारेश्वराचे मंदिर, घोरपडीचे चित्र असलेली राजपहार्यांदची दिंडी, कडेलोट, सूर्य बुरुज इत्यादी ठिकाणे आहेत.

उत्तर लिहिले · 4/8/2018
कर्म · 3775
0

प्रतापगड किल्ला: माहिती

प्रतापगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये आहे. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला.

इतिहास:

  • छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये प्रतापगडाची स्थापना केली.
  • १० नोव्हेंबर १६५९ रोजी याच किल्ल्यावर शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्यात लढाई झाली, ज्यात शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला.

भौगोलिक महत्त्व:

  • प्रतापगड किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3,500 फूट उंचीवर आहे.
  • हा किल्ला जावळीच्या घनदाट जंगलात वसलेला आहे.
  • किल्ल्याच्या पूर्वेला कोयना नदी आणि पश्चिमेला सोळशी नदी आहे.

संरचना:

  • किल्ल्यात महादेवाचे मंदिर, भवानी मातेचे मंदिर आणि अफझल खानाची कबर आहे.
  • किल्ल्याला दोन भाग आहेत: एक उंच डोंगर माथा आणि दुसरा त्याच्या पूर्वेकडील बाजूला असलेला माचीवजा भाग.

प्रतापगडाला भेट देण्यासाठी उत्तम वेळ:

प्रतापगडाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च दरम्यानची असते, कारण या दरम्यान हवामान आल्हाददायक असते.

संदर्भ:

  1. विकिपीडिया
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5180

Related Questions

भारतामध्ये किती किल्ले आहेत?
तोरणा किल्ल्याची उंची किती आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
पट्टा किल्ल्याबद्दल माहिती द्यावी?
मुंबईच्या किल्ल्यांची माहिती द्या?
दातेगडाबद्दल माहिती द्या?
महाराष्ट्र मध्ये किती किल्ले आहेत?