पशुपालन कृषी

मला मुक्त संचार गोठा करायचा आहे तरी मला माहिती द्या कोणत्या दिशेला काय असावे ।। दावन पाणी चारा सावली ऊन ?

●मुक्तसंचार  गोठा पद्धत म्हणजे काय●

1.   मुक्तसंचार गोठ्या मध्ये गाईंना बांधले जात नाही.

2.   गाईंना एका मोठ्या कंपाऊंड मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते.

3.   त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते.

4.   शेण वारंवार काढले जात नाही.

5.   गाई एकेमकाना मारत नाहीत.

आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे.  वरील सर्व गोष्टी खालील माहिती द्वारे स्पष्ट होतील.


एका गाईला किंवा म्हैशीला मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यात मोकळे सोडण्या साठी कमीत कमी २०० चौ. मी. जागा लागते. एक गुंठा जमीन क्षेत्रात आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो. गाईला मुक्त सोडण्या पूर्वी तार जाळीचे किंवा भिंतीचे अर्ध्या जाळीयुक्त कंपाउंड करून आत मध्ये गव्हाण व पाण्याच्या हौदाची व्यवस्था करणे आवश्यक असते.  गाईला मोकळे सोडल्यावर एक ते दोन दिवस मुक्त पद्धतीची सवय लागण्यात जातात. या कालावधीत शेतकऱ्याने सतर्कता बाळगायला हवी.  गाई मोकळ्या सोडल्यावर त्या एकमेकींना मारतील या भीतीने शेतकरी मुक्त गोठा पद्धत अवलंब करण्यापासून माघार घेतात.  परंतु पहिले दोन दिवस सवय लागल्यावर गाई एकमेकांना मारत नाहीत.  जर एखादी गाय इतर गाईंना मारत असेल तर तिला पायकूट घालून आपण प्रतिबंध करू शकतो. गाईच्या तोंडाच्या म्होरकीला एक बाज व कोणत्याही एका पायाच्या गुडघ्याच्या थोडेसे वर असे दोरीच्या साहाय्याने आखडून बांधणे म्हणजेच पायकूट  घालणे होय.  अशा प्रकारे आपण जनावरांच्या हालचालीवर प्रतिबंध घालू शकतो.

★★★★★★★★■■■■■★★★★★★

मुक्त संचार पद्धतीत एका गाईला 100 ते 150 चौ. फूट याप्रमाणे जागा उपलब्ध करून देणे, याशिवाय सावली आणि ऊन, पिण्याचे पाणी, चारा आणि तेथेच दूध काढण्याची सोय उपलब्ध केल्यामुळे त्यांना पाहिजे त्या वेळी त्यांच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार चारा खातात, पाणी पितात, हवामानातील बदलानुसार ऊन- सावली घेतात, स्वच्छ जागेत जाऊन बसतात, त्यामुळे त्यांच्या शरीराला शेण लागत नाही, स्वच्छंदाने त्या फिरतात. त्यांच्या इच्छेनुसार निवांत बसून चांगले रवंथ करतात. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते. त्यांना फिरता येत असल्यामुळे नखे वाढत नाहीत, गोचीड होत नाहीत, आजाराचे प्रमाण कमी होते. मोकळ्या सोडलेल्या गाईंच्या अंगावर एक वेगळी चकाकी येते. त्यांनी दिलेल्या दुधातील जैविक घटकांमध्ये निश्‍चितच बदल होत असतील. 

मुक्त संचार पद्धतीने गोठा तयार करावयाचा म्हणजे फार मोठा खर्च येईल या शंकेने काही शेतकरी याकडे वळत नाहीत. शेतकऱ्यांकडे उपलब्ध भांडवलामध्ये अत्यंत कमी खर्चापासून ते जास्त खर्चाच्या आधुनिक पद्धतीचा गोठा तयार करता येतो. ज्या शेतकऱ्यांकडे सध्या गाई बांधण्यासाठी शेड आहे, त्यालाच जोडून बांबू, लाकडी गोल्टे, चेनलिंक, सिमेंट पाइप, लोखंडी पाइप यासारखे साहित्य वापरून मोकळे फिरण्यासाठी जागा उपलब्ध करता येईल. या मोकळ्या जागेतही काही भागामध्ये शेडनेट टाकली, तर काही प्रमाणात सावली अन्‌ काही प्रमाणात ऊन मिळते. गाई ज्या जागेत फिरतात तेथे उभ्या उसाचे पाचट किंवा बारीक केलेला काडीकचरा टाकला तर त्याचा उपयोग गाईंना बसण्यासाठी बेडिंग मटेरिअल म्हणून होतो. दहा गाईंना अंदाजे दोन गुंठे क्षेत्राच्या आकाराची मोकळी जागा करावी. चारा खाण्यासाठी एका बाजूला विशेषतः शेडमध्ये गव्हाण करावी. गव्हाण शेडच्या उत्तरेकडे असल्यास चांगले. गव्हाणीत चारा बाहेरून टाकता येईल, अशी सोय करावी. यामुळे चारा वाहतूक करणे सोपे जाईल. चारा डेपो, कडबाकुट्टी यंत्र आणि चाऱ्याची गव्हाण यांतील अंतर कमी ठेवावे, त्यामुळे कष्ट वाचतील. पाण्याची सोय शेडच्या दुसऱ्या बाजूला करावी, जेणेकरून टाकी धुतल्यानंतर पाणी बाहेर काढून देणे सोपे होईल. गाईंना खाजविण्यासाठी मुक्त गोठ्याच्या मधोमध सोय करावी. एक खांब जमिनीत गाडून त्या खांबाला जाड काथ्या गुंडाळाव्यात. याचा वापर जनावरे अंग खाजविण्यासाठी करतात. 

मुक्त संचार गोठा करताना तीन भाग करावेत. एका लहान भागामध्ये वासरांची सोय करावी. वासरांच्या शेडच्या बाजूला भिंतीची उंची जास्त असावी, जेणेकरून त्यांचे बदलत्या वातावरणात संरक्षण होईल. दूध देणाऱ्या गाई आणि गाभण गाई वेगवेगळ्या ठेवाव्यात. त्यानुसार त्यांना आहार देता येतो, तसेच त्यांचे योग्य व्यवस्थापनही करता येते. दूध काढण्यासाठी गोठ्याच्या एका बाजूला सोय करावी. या शेडजवळच खाद्य ठेवण्याची, तसेच भिजवून ठेवण्याची सोय असल्यास गाईच्या दूध उत्पादनाप्रमाणे त्यांना वेगवेगळे खाद्य खाऊ घालता येते. तेथेच गाईंना लागणारी विविध औषधे, जैविके, प्रतिजैविके, खनिजे ठेवण्याची सोय करावी. त्याच्याजवळच कार्यालय केले तर तेथे कॉम्प्युटर व इतर सर्व व्यवस्था करता येते. भविष्यात किती प्रमाणात हा व्यवसाय वाढवायचा किंवा या व्यवसायाचे स्वरूप काय ठेवायचे, यानुसार सर्व व्यवस्था करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय असेल तर वेगळे मिल्किंग पार्लर करणे फायद्याचे ठरेल. प्रत्येक गाईचे रेकॉर्ड कॉम्प्युटरवर ठेवून दूध उत्पादनानुसार खुराक देणे, तसेच इतर व्यवस्थापन ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. 

मुक्त संचार पद्धतीमध्ये शेण उचलण्याचे काम दररोज करावे लागत नाही; परंतु गरजेनुसार महिन्यातून एकदा- दोनदा सर्व काडीकचरा, शेण उचलून बाहेर टाकून सर्व गोठा स्वच्छ करणे चांगले. तसेच, अशा वेळी गाईंनाही स्वच्छ धुता येईल. शेण- गोमूत्र, काडीकचरा चांगला एकत्र होऊन बऱ्याच अंशी कुजलेला असल्यामुळे असे खत शेतात लगेच टाकता येते. अशा खतापासून गांडूळ खतही चांगले तयार होते. मुक्त गोठा तयार करण्यासाठी दहा गाईंकरिता 30 ते 40 हजार रुपयांपासून दोन ते तीन लाखांपर्यंत खर्च येतो. अर्थात, क्षमतेनुसार खर्च करावा किंवा थोडा थोडा खर्च करून आधुनिकीकरण करावे. प्रत्येक गोठ्याला पाणी, रस्ता किंवा तात्पुरती शेडनेटची शेड असावी. शेडच्या कडेला मोठी झाडे लावावीत, यामुळे उष्ण वारे, थंड वारे, वावटळ यांपासून जनावरांचे संरक्षण होईल. झाडी नसेल तर उन्हाळ्यामध्ये गरजेनुसार बाजूला शेडनेट किंवा गोण्याचा कागद सोडावा. यामुळे गाईंवर वातावरणातील बदलत्या हवामानाचा परिणाम होणार नाही. शेडमध्ये गावठी कोंबड्या पाळाव्यात. शेणातील किडे खाण्यासाठी कोंबड्या शेण पसरवितात, त्यामुळे शेण चांगले मिसळून लवकर वाळते, तसेच कोंबड्या गोचीड वेचतात, त्यामुळे गोचिडांचेही नियंत्रण होते. कोंबड्या आणि अंड्यांचे उत्पादन मिळते ते वेगळेच. भविष्यात गॅस आणि विजेचे वाढलेले दर यांचा विचार करून गोबर गॅस प्रकल्प गोठ्याच्या जवळच केला तर तयार झालेल्या गॅसपासून विद्युत तयार करून त्याचा वापर जनरेटरसाठी तसेच घरामध्येही करता येईल. तसेच, गॅस स्वयंपाकासाठी वापरून गॅसची बचत करता येईल. मुक्त संचार पद्धतीचा अवलंब करताना या सर्व बाबींचा विचार करून एक मास्टर प्लॅन तयार करावा. उपलब्ध निधीनुसार सर्व सुविधा उभारण्याचे नियोजन करावे, जेणेकरून सर्व खर्च एकावेळी करावा लागणार नाही. या सर्व बाबींचा विचार करून एकात्मिक पद्धतीने मुक्त संचार पद्धतीने गोसंवर्धन प्रकल्पाचा अवलंब करावा.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

मला मुक्त संचार गोठा करायचा आहे तरी मला माहिती द्या कोणत्या दिशेला काय असावे ।। दावन पाणी चारा सावली ऊन ?

Related Questions

जर्सी गाय एका दिवसाला सरासरी किती दूध देते?
पशुपालनाची तत्त्वे लिहा?
गोठा नोंद करायचा आहे, काय करावे लागेल?
इन्क्युबेटरमध्ये अंडी टाकल्यानंतर कोणकोणत्या दिवशी कॅंडलिंग प्रक्रिया करतात?
पशुपालन खात्याच्या नावे बाजूस येणाऱ्या कोणत्याही दहा बाबी स्पष्ट करा?
भारतातील पशुपालनाचे महत्त्व काय आहे?
पशु पालनाचे रक्षण करणारा देव होता का?