
मीठ उत्पादन
1
Answer link
मीठ कुठे तयार होते आणि ते कसे तयार करतात
माझा जन्म हा रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एका खेड्यात झाला
मिठागरात मीठ पिकवणे हा तेथील मुख्य व्यवसाय होता
माझे बालपण त्याच परिसरातील असल्याने या प्रश्नाचे उत्तर मी व्यवस्थितपणे देऊ शकतो
माझे आजोबा हे या क्षेत्रातील गावठी इंजिनिअर त्यांचे नाव बळवंत आलोजी कडू त्याना सर्व बाळ्यामामा असे म्हणत रायगड जिल्ह्यातील 75 % मिठागरे ही त्यांच्या देखरेखीखाली झाली आहेत
हा कालखंड होता 19 व्या शतकाच्या अखेरचा आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीचा
मिठागर तयार करण्याचे एक शास्त्र होते
वार्याची दीशा आणि एकूण क्षेत्र याचा विचार करून आखणी करावी लागायची त्याकाळी साधन सामुग्री अशी काहीच नव्हती
मोजणीसाठी बांबूची काठी असायची त्यावर खूणा करून हे सर्व कामकाज चालायचे
आता मीठ उत्पादन कसे व्हायचे त्याची माहिती
मिठागराचे चार भाग असायचे पहिला वळण दुसरा तापवणी तिसरा कोंडी आणि चौथा मीठ ठेवण्यासाठी बांध
भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी पहिल्यांदा एका साधारण तीन फूट खोलीच्या लांब रूंद तळ्यात घ्यायचे याला वळण असे म्हणतात
यात उत्कृष्ट अशी तुडतूडी कोळंबी मिळायची
साधारण 15 ते 20 दिवसांनी बाष्पीभवन होऊन ते आणखी खारट झाल्यावर
तापवणीत घेतले जायचे ही साधारण एक ते दीड फूट खोल आणि लांबलचक असायची
हे पाणी बाष्पीभवन होऊन अधिक खारट बनायचे काही दिवसांनी ते पाणी कोंडीमध्ये घेतले जायचे
कोंडी ही साधारण एक फूट खोल 15 फूट रूद आणि 30 फूट लांब असते
या अतिखारट पाण्याचे आणखी बाष्पीभवन होउन काही दिवसांनी मिठाचे खडे स्पष्टपणे दिसतात
ते फळीच्या सहाय्याने बाहेर ओढले जाते
या फळीला लवटाणा असे म्हणतात
त्यानंतर दोन दिवसांनी मीठ डोक्यावर वाहून बांधावर टाकून राशी करतात
नंतर जशी मागणी असेल तसे विकले जायचे
विक्रीदर ऐकून तुम्हाला धक्का बसेल 1 नवा पैसा किलो हा 60 आणि 70 च्या दशकातील दर
त्यानंतर या सर्व मिठागराच्या जमिनी JNPT बंदरासाठी 80 च्या दशकात भूसंपादन करण्यात आल्या
या सर्व जमिनी केंद्र सरकारच्या मालकीच्या असल्याने त्या स्थानिकांनी भाडे पट्टयाने घेतल्या होत्या त्यामुळे मोबदला मिळाला नाही
भूमिपुत्र सुप्रिम कोर्टापर्यंत लढा देऊन हारले