Topic icon

शैवाल

1
*शैवाल/शेवाळ (अल्गी)* 
******************************

सर्वात साधा वनस्पतीचा प्रकार म्हणजे शैवाल. मुख्यत: अपुष्प व बीजहीन या प्रकारात ही वनस्पती मोडते. गोड्या वा खाऱ्या पाण्यात वाढणारी ही वनस्पती आहे. जेथे मुबलक पाणी आहे, तेथे शैवाल असणारच. एखादा खडबडीत आधार शोधून या वनस्पतीची वाढ सुरू होते. गोड्या पाण्यातील शैवालाचा रंग हिरवा असतो, तर समुद्र शेवाल लालसर तपकिरी रंगावर असते.

हरितद्रव्याचा वापर करून सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने ही वनस्पती स्वतःचे अन्न बनवते. त्यावरच तिची वाढ व पोषण अवलंबून असल्याने पाण्यात जेथवर सूर्यप्रकाश पोहोचतो, तेथेवरच शेवाळाची वाढ झालेली दिसून येते. अतिसूक्ष्म सागरी शेवाळाच्या खाद्यावर छोटे मासे वाढतात. प्लांक्टन वनस्पती या नावाने ती ओळखली जाते.

साचलेल्या गोड्या पाण्यावर अनेकदा या वनस्पतीचा थर साचलेला आढळून येतो. एकात एक धागे व तंतू गुंतत जाऊन हा सलग थर एखादा गालीचा पसरावा, तसा पसरलेला असतो. विविध तापमानाच्या पाण्यात तगून राहणे हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य मानता येईल. जवळपास शून्याची रेंगाळणारे बर्फाळ पाणी असो किंवा एखाद्या उष्ण झर्‍यामुळे गरम झालेले पाणी असो, दोन्हींमध्ये शैवाल असणारच. एवढेच काय, पण एखादा डोंगरकड्यावरून वाहणारा प्रवाह असेल, तर त्याच्या संपूर्ण उतारावरही ही वनस्पती आढळते.

साऱ्या जगातील विविध समुद्रांतील समुद्रशैवालाचे ७००० विविध प्रकार आजवर सापडले आहेत. पाण्याचे व शैवालाचे अतूट नाते आहे, असे समजावयास हरकत नाही.

निळे व हरित शैवाल पृथ्वीतलावरील अगदी पुरातन स्वरूपाचे सजीव अवशेष मानले जातात. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी सापडलेल्या अश्मीभूत अवशेषात शैवाल सापडले असून त्याआधीचे सजीव आज तरी ज्ञात नाहीत.

पृथ्वीच्या अगदी सुरुवातीच्या काळाकडे वळले तर पाण्यात सजीवांची सुरुवात झाली. त्यांतील पाण्याबाहेर पडलेली पहिली वनस्पती म्हणजे शेवाळे. पाण्यातील शेवाळाची एक जात म्हणजे प्लांक्टन. जमिनीवर आली की तिला शेवाळे वा माॅस म्हणतात. अशी ही अगदी पुरातन पण प्राथमिक स्वरूपाची वनस्पती बुरशीपेक्षा वेगळी असते. सहसा शेवाळाचे एकच रोप सापडणार नाही; कारण एकाच वेळी हवेतून, पाण्यातून, वाऱ्याद्वारे पसरलेल्या असंख्य स्पोअर्सद्वारे ही वनस्पती अन्य ठिकाणी पसरते व रुजते. त्यामुळे एका जागी पडलेली डझनावारी स्पोअर्स पडून तशीच ओलाव्याची वाट पाहत राहतात. जेव्हा पाऊस, ओल, पाण्याचा पुरेसा पुरवठा मिळेल, तेव्हा ती लगेच रुजतात. त्यांची मुळे थोडय़ाशाही खडबडीत भागात झटकन पकड घेतात. खरे म्हणजे मुळे म्हणण्यापेक्षा त्यांच्या केसाइतक्या बारीक केशवाहिन्या खडबडीत भागाच्या अगदी छोटय़ाशा भोकातही पकड मिळवतात.

शेवाळाची वाढ फार झपाट्याने होते. आठवड्याभरापूर्वी स्वच्छ दिसणारा एखादा खडक पावसाळय़ात बघताबघता हिरवट दिसू लागतो. महिन्याभराने त्याच्यावरचा बोटभर जाडीचा हिरवागार गालीचा मन मोहून टाकतो. पावसाळा संपता संपता त्यालाच छोटे छोटे दांडे येऊन त्याच्या टोकाला असलेल्या पिशवीतून पुन्हा स्पोअर्स बाहेर पडतात. काही वेळा पावसाचे थेंब या पिशव्या उघडण्याचे काम करतात. आता मूळ वनस्पती वाळून गेली व ती वाळल्यामुळे करड्या रंगाचे तुकडे पडले, तरी पुढच्या पुनरुत्पादनाची सोय झालेली असते.

पर्जन्यवनांमध्ये शेवाळे सर्वत्र आढळते. दाटच्या दाट थर असलेले शेवाळे हे झाडांवरही खूप उंचापर्यंत पसरलेले असते. वाळलेले ओंडके तर शेवाळलेलेच असतात. शेवाळ्यावरून पाय घसरून आपटी खाल्ल्याची आठवण नसलेले मूल क्वचितच आढळते, नाहीत का ?

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 19/3/2019
कर्म · 569245