अन्न स्वयंपाक आहार

रात्रीच्या जेवणात भात खाऊ नये असे का म्हणतात?

1 उत्तर
1 answers

रात्रीच्या जेवणात भात खाऊ नये असे का म्हणतात?

2
जगातील देशानुरूप खाण्यापिण्याच्या सवयी, आवडी निवडी, खाद्यप्रकार बदलतात. परंतु तरीही या सर्वांत कुठेतरी एक समान धागा आहे - भाताचा!

तसा गहू देखील जगभर खाल्ला जातो, पण तो त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपात! पण तांदूळ हा एकमात्र असा पदार्थ आहे जो भात या स्वरूपातच खाल्ला जातो!

जगात तांदूळ पिकवणाऱ्या देशांत चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक असलेल्या भारतात भात हे प्रमुख अन्न आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! किनारपट्टीच्या प्रदेशात तांदूळ मुबलक प्रमाणात घेतला जातो. जेवण म्हटलं की भात, भाजी आणि आमटी अथवा कढी किंवा कालवण, हे ठरलेलं!

भात हा तसा पचायलाही सोपा आहे त्यामुळे दोन्ही जेवणात त्याचे स्थान अढळंच!

तथापि, हे देखील खरेच की रात्री भात खाणे आरोग्यासाठी लाभदायक गोष्ट नाही.


तांदळात स्टार्च आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते आणि ते पचायलाही सोपे असते. पण तांदूळ हा एक असा पदार्थ आहे जो रक्तातील साखरेच्या पातळीत त्वरित वाढ करतो कारण त्याचे विघटन अगदी लवकर होते.

तांदूळ हा असाही एक घटक आहे ज्यामुळे वजन वाढू शकते कारण त्यातील कर्बोदकांमधे जास्त कॅलरीज असतात ज्याचा त्वरित वापर न केल्यास शरीरातील चरबीचा साठा वाढतो. रात्रीच्या जेवणात व झोपण्यात फारसे अंतर नसल्याने ही जास्तीची चरबी उपयोगात आणली जात नाही, आणि मग पोट…

दुसरी एक गोष्ट - जेव्हा रात्रीच्या जेवणात भात खाल्ला जातो, तेव्हा उर्जेची झटपट वाढ होते कारण अन्न सहज पचते. पण पुढचे काही तास झोपणार असल्यामुळे शरीराला सकाळपर्यंत उर्जारूपी अन्न मिळत नाही. याचा अर्थ, जागे झाल्यावर भूक लागते कारण रात्री खाल्लेला भात लवकर पचला होता आणि त्यानंतर शरीर रात्रभर उपाशी स्थितीत होते.

भात पचायला हलका असल्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी हा एक चांगला पर्याय आहे असे वाटते पण खरे तर रात्री जास्त फायबर असलेले पदार्थ खाणे हा एक चांगला पर्याय आहे. खरं तर, बरेचजण या कारणास्तव संध्याकाळी कर्बोदके असलेले पदार्थ वगळतात. गहू हा त्यासाठी अधिक चांगला पर्याय आहे. गव्हाचे विघटन व्हायला आणि पचायला वेळ लागतो, त्यामुळे तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण अचानक वाढत नाही व पचायला वेळ लागत असल्याने पोट ही उपाशी रहात नाही.

खरं तर आहारतज्ञांच्या मते, रात्री फक्त कोशिंबीर आणि सूप हे आदर्श जेवण आहे. परंतु आपली जीवनशैली अशी आहे की अशा प्रकारच्या जेवणाचा आपण विचारही करू शकत नाही. भात आणि चपाती शिवाय जेवण? छे छे, शक्य नाही! पण भाताऐवजी कधी कधी फक्त चपातीचा पर्याय तर स्वीकारता येईल!

दुसरा एक पर्याय म्हणजे नेहमीच्या सफेत तांदळाऐवजी तपकिरी तांदूळ, ज्याचे सहजरित्या विघटन होत नाही आणि परिणामी आपल्या रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही!

अर्थात ही काळजी फक्त त्यांनीच घ्यायची आहे ज्यांचे साखरेचे प्रमाण जास्त आहे आणि जे जेवल्यावर फारशी शतपावली न करता लगेच ताणून देतात!

अन्यथा भाताशिवाय जेवण अपूर्णच हो !

नमोस्तुते !.


उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 121645

Related Questions

स्वयंपाक म्हणजे काय?
ओट्स म्हणजे काय, त्याचे फायदे आणि नुकसान कोणते आहे?
पोहे कशापासून तयार करतात?
आहार व पोषण या शाखेचा अभ्यास केलेली गृहिणी कोणता स्वयं रोजगार करू शकते?
पितळेच्या भांड्यात स्वयंपाक कसा करावा? कढी किंवा टोमॅटो असलेल्या भाज्या केल्याने पितळी भांडी खराब होतात का?
स्वयंपाकातील क्रियांशी संबंधित असणारे मराठीतील काही शब्दप्रयोग कोणते आहे?
स्वयंपाक करण्यासाठी कोणती भांडी वापरणे फायदेशीर आहे, स्टील का लोखंडी?